Wednesday, 25 May 2022

नॉस्टाल्जिया

'लोकसत्ते'च्या गुरुवारच्या 'रंगतरंग' पुरवणीत एक सदर असे. एखादं आडवाटेचं सिनेगीत, त्याचं चित्रण आणि सूर, शब्द आणि अभिनय यांबद्दलचं रसग्रहण. जेमतेम दोन-अडीचशे शब्द. एखादा फोटो. त्या सदराची फार आठवण झाली. फारदा. म्हणून.

‍~

अजून नायक-नायिकेत प्रेमाचा इजहार व्हायचाय. आकर्षणाचा एक दिसे-न दिसेसा धागा तेवढा आहे. पण सुंदर नि तरुण असले, तरी नायक-नायिका तसे सुटवंग नाहीत. नायकावर दिवंगत बहिणीच्या तीन पोरांची जबाबदारी अचानकच येऊन पडलीय. नायिका श्रीमंत बापाकडून पळून नायकाकडे चक्क गव्हर्नेस म्हणून राहिलेली. एखादं वत्सल कुटुंब असावं तसं त्यांचं योगायोगानंच जमून आलेलं युनिट.

गाण्यात हे सगळं दिसत राहतं. पोरांसकट नायक-नायिकेनं केलेली धमाल. पावसात भिजणं. खेळणं. भटकायला जाणं. शेकोटीभोवती गाणी गाणं... आणि त्याच्या पृष्ठभागाशीच दोघांमधलं हे आकर्षण. त्यांच्यातला सेक्शुअल टेन्शनचा अवघडलेपणा, चोरटे कटाक्ष, ते पकडले गेल्यावरचा अवघडलेपणा आणि स्वतःशीच फुटणारं बारीकसं हसू, मनोराज्यं आणि त्या मनोराज्यांच्या फॅण्टसीची जाणीव... हे सगळं या गाण्यात आहे. त्याला खेळकर, हलक्याफुलक्या, मस्तीखोर वातावरणाचं सुरेखसं आवरण आहे.

नुकत्याच एखाद्या मस्त पिकनिकची सुरुवात झाली असावी नि त्या सकाळच्या तासातच पुढच्या मजेची चुणूक जाणवून फुलारून जायला व्हावं तसं हे गाणं. पॅशनचं टोक न गाठणारं. सकाळच्या कोवळ्या उन्हाच्या प्रहरातलं.

~

काही गाणी आपल्याला निखळ नॉस्टाल्जियापोटी आवडतात, पण आता चारचौघांत बघायची वेळ आलीच तर लाजल्यासारखं होतं. ‘जाती हूं मैं’ हे तशातलं गाणं. बिछान्यात करायच्या गोष्टी दाखवू शकत नसल्यामुळे त्या जागी गाण्याचा वापर करायचा ही हिंदी सिनेमाची लाडकी ट्रिक त्यातही आहे. पण असल्या इतर गाण्यांपेक्षा हे गाणं चार पावलं पुढेच आहे. तसे त्याचे शब्द प्रामाणिक आहेत. ‘खुद पे नही है भरोसा’, ‘जादू तेरे जिस्म का’, ‘कदम बहक जायेंगे’ वगैरे वगैरे नायक-नायिका दोघंही सुरुवातीपासून सांगत असतात. पण दुर्दैवानं दृश्यांवर मर्यादा असतात. त्यामुळे गाण्याच्या कोरिओग्राफरवर नि कॅमेरामनवर भलतीच मोठी जबाबदारी येऊन पडल्याचं जाणवतं. गुदगुल्या, कढीची पाळ फुटली रे फुटली, शिवाशिवी, कॅच-कॅच, ठो दे रे ठो दे रे, लंगडी इत्यादी खेळांचा त्यांनी फार कल्पक वापर केलाय. पण तरी त्यातल्या नाचाच्या काही स्टेप्स आणि कॅमेर्याच्या पोझिशन्स बघून दचकायला होतं. उदा. २ मिनिटं ११ सेकंदांनी काजोल आडवी झोपते, समोर शारुख. काजोलच्या पायांशी कॅमेरा आणि ती झोपेत आपण गुडघा पोटाशी घेतो तसा घेते, पुन्हा सरळ करते. क्षणभर आपण बिचकतो. आगं, आगं! च दिसेल की! पण तिला प्रेमाचा ताप नीट चढलेला असल्यामुळे तिचं आपलं चालूच. मग कळतं, ओह. ही स्टेप आहे होय नाचाची. ३ मिनिटं १३ सेकंदं. आपण नाकात बोट घालून हळूच बेंचच्या खाली पुसून टाकायचो, तशी एक अॅक्शन शारुख करतो. हे मागे-पुढे करत चांगलं तीनदा पाहिल्यावर कळतं, तो ओठांवर बोट टेकून त्या बोटाची पापी काजोलला देत असतो. ३ मिनिटं २३ सेकंदांनी काजोल शारुखच्या जाकिटात डोकं खुपसते. बरं, खुपसते तर खुपसते. कॅमेर्याचा अॅंगल? तिच्या कमरेपाशी? अं? माणसानं सोसायचं म्हणजे तरी किती? इतक्यानं संपलं नाही. ज्या तबेल्यात हे गाणं घडतं, त्यात ओठांचा एक भला मोठा चंबू डकवलेलं एक होर्डिंग शेवटच्या कडव्यात अवतरतं आणि दोघे त्याच्यासमोर नाचतात. मग शारुख वरून खाली पडतो आणि पालथा पडून फक्त कुल्ले वर करणे, खाली करणे इतकंच करतो. वेळ ४ मिनिटं ४७ सेकंद. राजेश रोशनची ठसकेबाज चाल आणि शारुख-काजोलसारखे जिवंत लोक पडद्यावर असतात, म्हणून का हे आपण सोसलं असेल असं आता मनाशी येतं. पण गाणं मात्र सकाळी ऐकलं की दिवसभर तोंडात राहतंच!

~

हे गाणं जाम सुपरडुपर हिट होईल अशी निर्माता-दिग्दर्शकाचा होरा होता म्हणे. पण ‘बडी मुश्किल है’च खूप गाजलं आणि हे बाजूला राहिलं. पण अनेक अर्थांनी जमून आलेलं गाणं आहे हे. एकतर माधुरीचा जामानिमा. हिरवीकंच चुनरी आणि तपकिरी रंगाचा लेहंगा. त्याचा देखणा घेर आणि चुण्या. नि कहर म्हणजे माधुरीचा मुद्राभिनय. ‘हात-पाय-धड इत्यादी गोष्टी नाचात नंतर येतात, खरं नृत्य असतं ते या वीतभर चेहर्यावर’ असं मागे एकदा ऋषी कपूर कुठेसा म्हणून गेलाय, त्याची आठवण येते हा नाच पाहताना. काय विभ्रम उमटतात बाईच्या चेहर्यावर. ‘जोराजोरी’ करणार्या याराचा धटिंगणपणा, लटका नकार, त्या जबरदस्तीबद्दल मनापासून उमटलेला आनंद आणि त्याबद्दलची लाज, पण त्याबरोबरीनं खट्याळ मिश्किली... आणि या भावांना चपखल हस्तमुद्रांची जोड. प्रचंड उर्जा, फेसाळत्या तरुण नदीचा ओघ, बघणार्यावर भूल टाकणारं भावदर्शन. माधुरी या गाण्यात अक्षरशः जादू करते. खरी भारी गोष्ट म्हणजे, या गाण्यात माधुरी आहे, पण ‘बघा बघा, मी नाचत्ये, माझा नाच बघा...’ असा आविर्भाव मात्र तेव्हाच्या तिच्यात जन्मायचा आहे. ते तिच्या नाचात दिसतं. अहं, ती नाचते नेहमीच सुंदर, आत्मविश्वासानंच. पण या नाचात सहजता आहे, अभिनिवेश नाही. या गाण्याच्या हाताळणीतही माधुरी ‘लार्जर दॅन सिनेमा’ होऊन बसलेली दिसत नाही. ती सिनेमाच्या गोष्टीतलं एक समरसून गेलेलं पात्र आहे. तिचा नवरा असलेला दीपक तिजोरी आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा खलनायक शारूख खान, दोघेही या गाण्यात दिसतात. शारूख तर जवळजवळ माधुरीइतकंच फुटेज खातो. पण त्याचा तिरशिंगराव चेहरा नाही लक्ष्यात राहत. लक्ष्यात राहतो तो दीपक तिजोरीभोवती रुंजी घालणार्या माधुरीचा सहज वावर. तोही पठ्ठ्या ‘हो मग, नाचतेच माझी बायको सुंदर! पण तिची राखण करण्यात माझा पुरुषार्थ सामावलेला नाही.’ हे ठाऊक असणार्या माणसासारखा सहज आत्मविश्वासानं वावरतो. त्याच्या आणि माधुरीच्या दोनचारदाच होणार्या मोहक नजरानजरीत या गाण्याचा आत्मा आहे. असं वाटतं, विजेसारख्या लवणार्या नि सगळं पणाला लावून शृंगार उधळणार्या या नृत्यांगनेच्या नृत्याचं सगळं सार्थक या तिनं निवडलेल्या पुरुषाच्या एका नजरेत आहे... बाकी सगळं झूठ.

~

वास्तविक मला 'अंदाज अपना अपना'चे कढ येत नाहीत, तसंच यातल्या चाली म्हणे ओपीच्या गाण्यांवर डल्ला मारून केल्यात, म्हणून मला फारसा त्रासही होत नाही. ओपी माझ्या नॉस्टाल्जियाचा भाग नाही, पण 'अंदाज अपना अपना'तली गाणी मात्र आहेत. त्यातल्या सगळ्या गाण्यांना विलक्षण साधासोपा गोडवा आहे, तसाच त्यातल्या सगळ्या पात्रांनाही. या गाण्यात आमीर आणि सलमान या दोघांनाही रवीनाला पटवण्यात रस आहे. पण रवीना आणि करिश्मांनी आपापली टारगेट्स नक्की करून घेतली आहेत! अशा खास फिल्मी गोंधळातलं हे गाणं. त्यातल्या करिश्माची नखं नि ओठ गुलाबी रंगाच्या एकाच छटेनं रंगवलेले बघून थोडं क्रिंज व्हायला होतं, पण तिच्या वळवून घातलेल्या 'डबल वेण्या' नि त्यावरच्या लाल रिबिनी, तसंच सलमान खानवर चढायची बाकी असलेली खास सलमानखानी उद्दामपणाची झिलई... हे सगळं क्यूटही वाटतं. गाणं प्रेमिकेला आळवणारं असलं, तरी त्यातला रोमान्स 'हॉट' वा व्याकूळ नव्हे. त्यात कमाल खेळकरपणा आहे. लहान मुलांची ढोलकी गळ्यात घेऊन, चिवट्याबावट्या रंगाच्या शर्टात सलमाननं मारलेल्या माकडउड्या, आमीरनं नाइटड्रेसला मॅचिंग घातलेली सांताक्लॉजी टोपी आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांसह त्या टोपीचं टोकही फुलारणं वा मरगळणं, करिश्माच्या तोंडच्या शब्दांवर रवीनानं केलेला लाडिक मूकाभिनय, सिनेमातल्या खलनायकांनीही गाण्याच्या ठेक्यावर धरलेला ताल, आणि करिश्माच्या सगळ्या नृत्यमुद्रांना असलेली शाळकरी निरागसपणाची डूब. या सगळ्यानं ते गाणं अतीव भाबडं आणि गोड होऊन गेलं आहे.

~

इतका देखणेपणा आवडतो तिचा, तर तिला कॅलेंडरवर छापा, सिनेमात कशाला, हे सोनाली बेंद्रेच्या अभिनयहीन सौंदर्याबद्दलचं माझं मत 'सरफरोश'नं मला इंचभर मागे घ्यायला लावलं, अशी तिची गोष्टीतली पूरक भूमिका. तिचा तो उतावळा, बडबडा स्वभाव या गाण्यात अचूक दिसतो. पावसाळ्यातलं एस्सेलवर्ल्ड, सोनालीचं लक्ष्य नसताना तिच्याकडे बघून हळूच दिलखेचक हसणारा आमीर, आणि ते न कळल्यानं त्याला हर तऱ्हेनं प्रेमाचे इशारे देणारी बिचारी सोनाली. तिचं हताश होणं, तरी न थकता त्याला मस्का लावायला बघणं, त्याच्या वागण्यातले इशारे जोखून धीटपणे त्याच्या गळ्यात पडणं, आणि सरतेशेवटी त्यानं पत्ते ओपन केल्यावर हातातल्या लाह्या भिरकावून देत भाव न खाता धाडदिशी त्याला मिठी मारणं.. अशा हिंदी सिनेमातल्या शालीन नायिकेसाठी तौबा-तौबा ठरवलेल्या गोष्टी ती करते, तेव्हा ती कमाल चिकणी दिसते. आमीरच्या गालाची पापी एका लहान मुलाकरवी घेववून त्याला स्कॅण्डलाइज् करणारा तिचा खट्याळ नि मग खट्टू चेहरा लक्ष्यात राहतो. 'होशवालों को'मधला टेक्स्टबुक क्लासिक रोमान्स या गाण्यात नाही. उलट या गाण्यात आमीर स्कार्फमध्ये नाक शिंकरतो, डेलियाचं एक नाजूक फूल चावून खातो, प्रेमिकेनं प्रियकराला मारलेल्या चपराकी बघून प्रेमापासून पळून जाण्याचा आव आणतो... सिनेमाशी फटकून नसलेलं, आपलं स्वतःचं कथानक असलेलं, पात्रांचे स्वभाव अधोरेखित करणारं हे गाणं अजूनही बघावंसं वाटतं खरं.

~

गाणं सुरू होण्याआधी दोनेक मिनिटं या गाण्याची नांदी चाळीखालच्या नाक्यावरच्या टपरीवर घडताना दिसते. तीत या गाण्याची अर्धी गंमत आहे. वाळलेलाच टॉवेल वाळत घालायला बाल्कनीत येणार असलेल्या नायिकेपासून ते नायिकेनं कठड्यावर वाजवलेल्या 'धिनकधिन्धा-' या तबल्याच्या बोलांपर्यंत, आणि नायिकेच्या बापाच्या निरुपद्रवीपणापासून ते नायिकेनं फेकलेल्या फ्लाइंग किसचा झेल नायक कसा 'अझरसारखा' पकडेल इथपर्यंत... ही सगळी भविष्यवाणी नाना पाटेकरचं वल्ली असलेलं पात्र टपरीवर बसल्या-बसल्या अचूक वर्तवतं, त्याबरहुकूम सगळं यथासांग घडतं, आणि एखादा क्यू मिळावा, तसे गाण्याचे बोल उमटतात – ‘सर्दी खॉंसी ना मलेरिया हुआ, ये गया यारों इस को, लव्ह लव्ह लव्ह – लव्हेरिया हुआ’! एखाद्या नाटकाच्या कविमनाच्या सूत्रधाराला शोभेलशा भूमिकेत नाना पाटेकर 'थोडासा रूमानी'त दिसला होता, त्यानंतर यात. मग पुन्हा दिसला, तो थेट सात वर्षांनी ‘हुतुतू’मध्ये. ‘लव्ह, लव्ह, लव्ह’ या शब्दांवर त्यानं केलेली धडधडत्या हृदयाची हस्तमुद्रा डोक्यात घट्ट रुतून राहिली तोवर. गरीब वस्तीत नायक, नायिका आणि त्यांचे आप्त राहत असावेत हे ज्या सिनेमांमध्ये दिसलं, त्या सिनेमांच्या अखेरच्या फळीपैकी हा सिनेमा. पुढे अझीझ मिर्झांच्या सिनेमातले नायकही अधिकाधिक उच्चमध्यमवर्गीय होत गेले. ‘नुक्कड’छाप चाळ आणि बैठ्या घरांची गरीब शहरी वस्ती हिंदी सिनेमातून अंतर्धान पावली. एका सहृदय, गरीब, मुस्लीम चहावाल्यासकट परिपूर्ण अशा त्या वस्तीचे अवशेष या गाण्यात दिसतात. जूहीचा तो पिवळाधम्मक, फुग्याचे हात असलेला प्लेन ब्लाउज आणि तपकिरी रंगांची बारीक नक्षी असलेला घेरदार स्कर्ट यांची त्या काळात फॅशनच आली. शारूख मात्र तत्कालीन स्ट्रगलर नायकांसारखा फॉर्मल शर्टात, हातात ‘इंटर्व्यू’साठीची फाईल घेऊन. पण या वेशभूषांपेक्षाही लक्ष्यात राहिले, ते दोघांचेही कमालीचे फ्रेश, कोवळे, अनाघ्रात चेहरे. त्यांचं कोवळं प्रेम, सगळ्या वस्तीनं त्या प्रेमाचा उत्सव मनवणं, त्यांनी घटकेत लाजणं-घटकेत एकमेकांना बाहुपाशात घेणं-पुन्हा लाजून गोरमोरं होणं.. हे सगळं फार मनोरम होतं. समूहाचा इतका समरसून सहभाग पुढे शारूखचा घट्ट मित्र असलेल्या आशुतोष गोवारीकरच्या ‘लगान’मध्ये दिसला. 


   (गाण्यापूर्वीची बातचीत आणि मग गाणं)

~

या गाण्यात उर्मिलानं प्रचंड अंग दाखवलंय हे खरंच आहे. पण हे गाणं बघताना मला चोरट्यासारखं होत असे, ते त्यामुळे नाही हे कळायला वेळ लागला. शृंगारामधली पशुवत झटापट ही या गाण्याची थीम. एकदा नव्हे, अनेकदा जॅकी आणि उर्मिला एकमेकांचा अंदाज घेत, दात विचकत, गुरगुरत फिरणाऱ्या दोन श्वापदांसारखे वर्तुळाकार फिरतात, एकमेकांना अक्षरशः टक्करतात, भिडतात, एकमेकांच्या नरडीचा घोट घेत असल्यासारख्या मुद्रा करतात, विसावतात, आणि पुन्हा नव्यानं तोच खेळ करत राहतात. जनावरांच्या जोडीनं थोड्या-थोड्या अंतरानं फिरून माजावर येत असावं, तशी काहीशी या गाण्याची रचना आहे. त्या आदिम खेळाच्या पार्श्वभूमीला रेहमानचं संगीत. सस्पेन्स, उत्कंठा, उत्तेजना, किंचित भीती, आणि थरार, उकल.. अशी रहस्यकथेखेरीज आणखी एका प्रकारच्या ट्रोपमध्ये साजेशी ठरणारी वळणं घेणारं, काळजाचा ठोका चुकवणारं, बेहोश करणारं. बाकी उर्मिला या गाण्यात जशी दिसलीय, तशी ती आख्खा 'रंगीला'भर दिसलीय. 'दामिनी' जसा संतोषीनं आपल्या प्रेमिकेकरता कोंदण म्हणून निर्मिला, तसंच रामूचं उर्मिलाच्या बाबतीत झालं असेल का? काय ठाऊक. सोनेरी वाळूच्या ढिगावर विसावलेलं तिचं कातीव शरीर आणि नशीली नजर बघताना रामूच्या नजरेचंच अप्रूप वाटतं. 'श्रीमान आशिक' आणि 'चमत्कार'मधल्या बाईतूनच ही बाई निघाली? विश्वास बसत नाही. नि तरी अत्यंत ममव प्रकारे 'एक तर ते तोकडे कपडे, नि गार पडलेली वाळू. मला भयानक सर्दी. कुडकुडून जीव नकोसा झालेला.' हे उर्मिलाच्या मुलाखतीतलं वाक्यही आठवतं आणि स्वतःचीच मजा वाटते.


~

कधीही पाऊस कोसळायला लागेल अशा गच्च दाटून आलेल्या आभाळाची आठवण करून देणाऱ्या, रेखाच्या जड, मादक आवाजातलं हे संथ गाणं आपल्याला उदास करतं. पण ही उदासी कडवट नाही, डार्क चॉकलेटसारखी बिटर-स्वीट आहे; कारण त्यात विशाल भारद्वाजनं रेखाटलेला सिद्धहस्त, 'गुलज़ार' फ्लॅशबॅक अलगद विरघळून गेलाय. इतक्यानंही कुणी मोहात न पडला, तर एक परवलीचं वाक्य - गाण्यात तब्बू आहे. तिचं लग्न मोडकळीला आलेलं. कमलहासनची - तिच्या नवऱ्याची - मुलाखत बघणाऱ्या तिच्या टीव्हीवर एकाएकी 'मुंग्या' दिसायला लागतात. आणि मग थेट त्याच्यासोबतची पहिली 'अपघाती' भेट दिसते. एका पावसाळी संध्याकाळची. तिचा उद्दाम निष्काळजीपणा, त्यानं केलेलं दुखापतीचं नाटक, भेटीगाठींचं प्रेमात आणि मग तिनं पळून जाऊन त्याच्याशी केलेल्या लग्नात झालेलं पर्यवसान, लेकीचा जन्म, आणि त्याच रेस्टॉरन्टात बसून लेकीला सांगण्यात आलेली प्रेमाची गोष्ट. एक पूर्ण वर्तुळ या गाण्यात रेखाटलं जातं. नायक, नायिका आणि गाण्यातच जन्माला आलेली त्यांची धिटुकली लेक या सगळ्या पात्रांचे स्वभाव एकेकाच दृश्याच्या जोरकस फटकाऱ्यानिशी खुलवत, तपशिलांचे रंग भरत. गाण्यात दिसत राहिलेली मुंबई जितकी लोभस आहे, तितकीच त्यातली तब्बू. नाचाचे चार हात करायला लावले तर लाज आणणारी ही नटी नुसत्या देहबोलीतून किती बोलते! कमलहासनच्या मागे बाईकवर बसून जाताना ती हलकेच मान मागे टाकते आणि डोळ्याच्या कोपऱ्यातला पाण्याचा थेंब टिपते. आसमंतातली गहिरी पावसाळी संध्याकाळ, प्रियपुरुषाच्या मागे बसून बाईकवरून सुसाट वारा पीत रस्ते कापत जाणं... एकूणच आसमंत खुशीत असतो आपल्यासारखा, जणू आपल्याकरता, तेव्हा डोळ्यात येणारा पाण्याचा थेंब. रेखा त्या क्षणाला आवाज पुरवते, 'एक आसूं सुनहरा जलता हुआ...'

या शब्दांत सगळ्या गाण्याच्या अत्तराचा अर्क आहे, बस.

~

या गाण्याला रेहमानखेरीज दुसऱ्या कुणी न्याय देणं शक्यच नव्हतं. लडाखच्या चंद्रभूमीतली, रोजमर्रा आयुष्यापासून जणू चार अंगुळं वर, अलिप्त, परकी असल्यासारखी चित्रीकरणाची स्थळं. उद्ध्वस्त बौद्ध मठ, वाळवंट, निर्मनुष्य तलाव. एका जिवाला दुसऱ्या जिवाची अनामिक ओढ लागल्यावर बाकी सगळं फिजूल ठरावं हे ठसवणारा प्रदेश. मनीषा एखाद्या अप्राप्य, शापित अप्सरेसारखी अफाट सुंदर, आत्ममग्न, गूढ, आणि काहीशी निर्दय. शारुख तिच्याकडे अपरिहार्यपणे ओढला जाणारा. त्याच्या आवेगी नृत्यमुद्रांतून त्याचा देह बोलतोच, पण त्याचे डोळे? उफ्फ्.

एका दृश्यात तिची पिवळीधम्म वस्त्रं ज्वालेसारखी फडफडतात आणि शारूख त्यात एखाद्या पतंगासारखा खेचला जातो. मागे जळतं शुष्क झाड. कधी ती त्याला जाळ्यात ओढणारी. हलके हलके तो गुरफटत गेलेला आणि तिचा कठोर, अलिप्त चेहरा त्याच्या मिठीतही. शब्द? 'तेरी बाहोंमें उलझा उलझा हूं...' किती आर्तता असावी एखाद्याच्या आवाजात?

लालबुंद वस्त्रात लपेटलेले दोन देहाकार आणि एकमेकांत मिसळूनही न मिळणारी तृप्ती. आवेग शमत नाही. तो शमतो गाण्याच्या शेवटाकडे.

आता शारुख या आकर्षणाच्या, ओढीच्या, प्रेमाच्या, वेडाच्या उंबरठ्यावर, स्वतःशीच घुमणाऱ्या वेड्या पिरासारखा. आता ती त्याच्याभोवती रुंजी घालते आहे. पण त्या दोघांनाही एकमेकांच्या भ्रमणकक्षेत असण्यापल्याड कसलंच भान नाही. मग जे मीलन होतं, ते पांढरंशुभ्र. त्या चेहऱ्यांवर असीम शांतता आहे. देहाकार न दाखवणारा क्लोजप. गाण्याचा शेवटचा शब्द? 'ग़ालिब'.


~

हे गाणं नक्की कशाकरता बघायचं ते ठरवता-ठरवता इतकी तारांबळ उडते, की गाणं लूपवर बघा-ऐकायची सोय होण्यापूर्वी लोक नक्की कसं बुवा मॅनेज करत असतील असा प्रश्न मला जेन्युइनली पडतो. रविवारी अंथरुणात लोळत झोपाळलेल्या डोळ्यांनी हे गाणं 'रंगोली'त इतक्यांदा बघितलंय, की नटनट्यासिनेमे यांचं वेड लागण्यापूर्वीच त्याचं गारूड माझ्यावर होऊन गेलं आहे.

पहिल्या कडव्यात तिला त्याचा रुसवा काढण्याचं फारसं टेन्शन नाही. जर्रा मस्का लावला की झालं, असा तिचा एकूण नूर आहे. पण तो कुठला पटायला! साहेब चांगलेच उचकलेत. अगदी तिला तोंड वेंगाडून दाखवण्याइतके. दुसऱ्या कडव्यात ती चेष्टेचा नूर सोडून 'आसं काय, सोड की!'वर येते. तरी त्याची भिवई चढीच. मग तीही भडकते. इतकी लाडीगोडी लावून ऐकत नाही म्हणजे काय? तिचा विद्ध चेहरा बघून कसा चट विरघळतो गडी! तिच्या भरदार अंबाड्याभोवती रुंजी घालणारा तो एखाद्या कमळाभोवती भुंग्यानं रुंजी घालावी तसा भासतो. पण तीही थोडं ताणूनच धरते. 'क्या करना है जी के?' तेव्हा कुठे 'परत असं केलंस तर बघ!' - 'नाही, नाही! बस?' वर गाठ सुटते नि डळमळलेला तोल पुन्हा प्रस्थापित होतो.

काय त्या गाण्यात वारा सुटलाय. तिच्या बटांबद्दल तर म्या पामरानं बोलूच नये, पण त्याच्या कपाळावरची झुलपं भुरभुरतात तेव्हा काळजात लक्कन हलतं. काय ती 'सनम'वर आशानं घेतलेली मोहक गिरकी, नि काय ते लाडिक आवाजात त्याला फशी पाडू बघणं, देवा! तिचा तो बोट-नेकचा नि पाठीवर एका बाजूला बटणपट्टीसदृश डिझाइन असलेला लांब हाताचा ब्लाउज, प्लेन साडी, स्मार्ट पर्स आणि मनगटी घड्याळ बघून मला कायम कोडं पडे. ही नोकरदार आहे की काय? ती त्या सिनेमात नुसती नोकरदार नव्हे, धडाडीची पत्रकार असते हे कळल्यावर मला एकाएकी त्या सगळ्या प्रकरणाबद्दल आदरच वाटायला लागला. बघता बघता आणखी एका कारणाची भर. तारांबळ - म्हटलं नव्हतं?


फार फार मजा आली ही मालिका लिहिताना. निवडायला, नेमक्या तितक्याच शब्दमर्यादेत बसवायला, तरी आपल्याला गाण्याबद्दल वाटणारं सगळं नेटकं व्यक्त करायला. तरी कित्ती गाणी राहिलीच. असो. कुणाला रस असेल तर खो घ्या प्लीज. तूर्त असल्या विरंगुळ्याची फार फार गरज आहे. 

‍~

(करोनाकाळात केलेला फेसबुकीय टाइमपास)

Monday, 23 May 2022

थॅंक्स टू हिंदी सिनेमे १

कणेकरांच्या फिल्लमबाजीमध्ये एक पुचाट, सेक्सिस्ट न-विनोद असायचा. बायकोला सिनेमाला नेणेआणि मग हव्या तितक्या साड्या बघ, मागू नकोस!असं म्हणणे. माझ्या शाळकरी वयातही मला त्यात काही विनोदी वाटलं नव्हतं. भिवई वर गेली होती. पण इंग्लिश विंग्लिशमधल्या श्रीदेवीच्या एक से एक साड्या बघताना अधूनमधून सतत सिनेमाच्या संहितेचा काठ सोडून मी आयला, ही किती भारीय!छापाची वळणं घेत होते, तेव्हा मला चाटून गेलेल्या शरमेमुळे मला तो न-विनोद आठवला. सिनेमामधल्या वेशभूषा (नि केशभूषा नि रंगभूषा) नोंदणं याला कायम थिल्लरपणाचे आणि अक्कलवान पुरुषांपेक्षा त्यात काहीतरी कमी दर्जाचं असल्याचे रंग फासलेले असतात नि माझ्या नकळत मी तो संस्कार आत्मसात केला आहे, याचा तो पहिला साक्षात्कार. मग यथाशक्ती तो संस्कार उचकटून फेकणं आलंच. पण मुळात तो होता, हेही कमी धक्कादायक नव्हतं.

तर – श्रीदेवीच्या इंग्लिश विंग्लिशमधल्या साड्या. सुती, पारंपरिक प्रकारांच्या, कमालीच्या साध्या, आबदार नि देखण्या साड्या होत्या त्या. ती आख्ख्या सिनेमात एकदाच तिचा पदर पिनप न करता, मोठ्ठाल्या फुलांच्या, नि झुळझुळत्या, सुट्या, धावत्या पदराची साडी नेसलेली दाखवली आहे. तिच्या वर्गातल्या फ्रेंच मित्राच्या मोहात ती असल्याचं तिच्या लक्ष्यात येतं त्या दिवशी. पुन्हा इंग्लिश विंग्लिशबघताना हा बारकावा मी नोंदला, तेव्हा मी गौरी शिंदेला मनोमन दाद दिली होती. 

स्वदेसमध्ये शारुखने घातलेले फॉर्मल पूर्ण हातांचे शर्ट्सही मला फार आवडले होते. त्याचं चाकोरीबद्ध, उच्चभ्रू नि पांढरपेशं, नि तरी अकडबाज व्यक्तिमत्त्व त्यात खुलून दिसलं होतं. गायत्री जोशीच्या वर्गात ती फळा पुसत असताना, तिथे असलेल्या शारूखच्या मागे सारलेल्या बाह्यांमधून त्याच्या कोपरावरची खळी दिसते. एरवी शारूखच्या इंटेन्स डोळ्यांखेरीज काहीही न आवडणार्‍या मला मीच नोंदलेला तो तपशील थक्क करून गेला. 

सपनेमधली काजोल एरवीही कमाल ताजीतवानी, सौंदर्याच्या रूढ कल्पनांना धुडकावून लावत देखणेपण वागवणारी दिसते. पण हूं लालाल्लामध्ये तिनं घातलेला तो काळ्या रेशमाचा अटकर पोशाख. त्यावर पेहरलेला तो रंगीबेरंगी रुमाल. आणि न राहवून स्वतःला संगीतात झोकून देत थिरकायला लागणारी तिची पावलं. सुभानल्ला! त्या सगळ्या सिनेमामध्ये तिच्या बहुतांश पोशाखांमधून तिच्या मांड्या दिसतात. काजोल वास्तविक सावळी, जाडजूड, जाडसर नि जुळलेल्या भिवयांची बाई. शिडशिडीतपणा, गोरेपणा, प्रमाणबद्धता यांपासून फटकून असलेली. पण चंदा रे चंदा रेमध्ये चेहर्‍यावर संभ्रमित, उत्कट भाव घेऊन झुलणारी काजोल मला जितकी आवडते, तितकाच तिचा पोपटी रंगाचा आखूड झगा, त्यातून दिसणारे तिचे सावळे भरगच्च पाय, नि मोकळे सोडलेले पिंगट केसही आवडतात.


विरासतमधल्या अनिल कपूरचं अपील काही औरच आहे. विरासतच्या वेळपर्यंत तो खरा तितका तरुणही नव्हता. पण त्या सिनेमाच्या पूर्वार्धामधले त्याचे पाश्चात्त्य कपडे नि वाढवलेले केस त्याला जितके शोभून दिसले, तितकेच उत्तरार्धामधले पांढरेशुभ्र कुर्ते, धोतरं आणि अक्कडबाज मिशाही. पायली छुनमुन छुनमुनमध्ये शेवटाकडे तो तब्बूच्या अंगावर पाणी शिंतडतो. ती अंगावरचा भिजलेला पदर सोडवून घेत लाजून, पळतच झोपडीत शिरते. मागोमाग अनिलकपूर क्षण-अर्धा क्षणच रेंगाळतो. आजूबाजूला एक सावध नजर टाकतो. हातातला पितळी गडू चक्क फेकून देतो नि एखाद्या सावजाच्या मागावर असल्यासारखा तिच्या मागोमाग आत शिरतो. तेव्हा तो जसा उफ्दिसला आहे, तशा त्याच्या दिसण्यात त्याचा जब्बर अभिनयाचा जितका वाटा आहे, तितकाच त्याच्या वेशभूषेचाही आहेच.

बॉम्बेमध्ये नखशिखान्त बुरख्याआड असलेल्या मनीषा कोईरालाचा गर्द मोरपंखी निळ्या रंगाचा पोशाख नि त्यातून उठून दिसणारं तिचं कोवळं, नितळ, अनाघ्रात गोरेपण. त्याच पोशाखात ती किल्ल्यावर जाते पावसाळी संध्याकाळी. तूही रेच्या आर्त वादळी नेपथ्यात त्या हिरव्यागर्द पावसाळी, ओसाड किल्ल्याचा; उसळत्या लाटांचा नि हरिहरनच्या आवाजाचा जितका वाटा आहे, तितकाच तिच्या काळ्या-निळ्या वाहत्या वस्त्रांचाही आहे. 

तुमसे मिलकेमधल्या माधुरीचा आखूड बाह्यांचा पांढराशुभ्र खमीस नि प्राजक्तीच्या फुलांच्या देठाच्या रंगाची साधीशी शिफॉनची ओढणी. 

विजेतामधल्या शशी कपूर – रेखाचं ते उच्च मध्यमवर्गीय – मध्यमवयीन सुखवस्तू घर; सुती साड्यांमधल्या रेखाचे संयमी, ठाम सूर; नि पांढर्‍या मलमलीच्या कुर्त्यातला नि बाटीकची लुंगी नेसून निवांत पेपर वाचणारा, मोकळाढाकळा शशी कपूर. त्याच्या त्या कपड्यांनी त्या घराला किती विलक्षण घरपण दिलं आहे! 

ऋषी कपूरच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्याचं पोट किंचित सुटलं होतं. पण त्याच्या त्या मऊ स्वेटर्समध्ये ते मस्त लपून जायचं. त्याच्या ऊबदार, आश्वासक, मिश्कील हसण्याशी त्याच्या पोटाचं नि स्वेटर्सचं काहीतरी नातं होतं खास. 

तितकेच आकर्षक भासायचे ते रवींद्र महाजनींचे, कशीबशी एखाद्याच बंद बटणानं लज्जारक्षण करणारे नि बहुतांश वेळा महाजनींची फिगर दाखवणारे तंग शर्ट्स. शाळेत असताना सूर्यकांत-चंद्रकांत बघून कावलेल्या मला मराठीत इतका झक्कपैकी सेक्सी दिसणारा नटही आहे यानं जामच भारी वाटायचं.

रंगीलामध्ये उर्मिलाचे कपडेही असेच लक्ष्यात राहिलेले. एकतर त्या सिनेमापासून तिनं जणू कात टाकली. सिनेमातल्या सिनेमातली मुख्य भूमिका तिला मिळाली हे कळवायला तिला फोन येतो, त्या वेळची तिची आखूड चड्डी, दोन वेण्या, आणि तिच्या लिपस्टिकची शेडही मला नीट आठवते. किती सुंदर आहे ही मुलगी, असं राहून राहून वाटलं होतं सिनेमाभर. नंतर ती पुष्कळ बारीक, शिडशिडीत झाली. पण त्या सिनेमात ती एखाद्या गुटगुटीत पोरीसारखी दिसते. मादक वगैरे तर वेळोवेळी दिसतेच. पण त्याखेरीज त्या भूमिकेला आपल्या ध्यासामागे सर्वस्व उधळून चाललेल्या धिटुकल्या, मनस्वी पोरीचे रंग आहेत. तिचं देखणेपण येतं ते त्यातून. त्या छटेला तिनं घातलेले फ्रॉक्स, स्कर्ट्स, बारक्या-बारक्या चड्ड्या, नि पेटिकोट्स इतके खुलून दिसतात, की बस! ती सिनेमातल्या सिनेमात शिफॉनच्या साड्या नेसून सेक्सी वगैरे दिसते तेव्हाच ती भूमिका रंगवत असल्याचा नि आत्ता बाहेर येऊन खिदळायला लागणार असल्याचा भास होत, यातच काय ते आलं.

ओम्कारामधला काळाकभिन्न, पिळदार दंडांचा, गंभीर-अबोल चेहर्‍याचा अजय देवगण नि त्याच्या मनगटावरचा तो तटतटलेला ताईत

दुर्गाबाई खोट्यांनी बावर्चीमध्ये नेसलेल्या सुती, घरगुती साड्या नि भोर आई...च्या शेवटी लाजत-मुरकत, पण लाजेवर तश्शी मात करत, फणकारून हसत, पातळ वर ओढून घेत, थिरकवलेली वृद्ध, जाडीभरडी, पण कमालीची देखणी पावलं. 

राजू बन गया जंटलमनमधले जूही चावलाचे साधेसुधे प्लेन ब्लाउजेस, घेराचे लांबलचक स्कर्ट्स, नि उंच बांधलेला, झुबकेदार पोनीटेल. 

संगीतमध्ये माधुरी दीक्षितच्या हनुवटीवरच्या तीन गोंदणठिपक्यांनी तिला बहाल केलेला अभूतपूर्व निरागस गोडवा. 

जाने तू या जाने नामधल्या रत्ना पाठक-शहांचं तोकड्या कॅप्रीज अडकवून, सोफ्याच्या पाठीवर एक तंगडं भिरकावून वाचत लोळणं. 

मासूममध्ये घरगुती सुती कुर्ता-पायजमा घालून पोरींशी मस्ती करणारा लडिवाळ कुटुंबवत्सल नसीर.

 जाड काड्यांचा चष्मा नि अर्ध्या बाह्यांचे शर्ट्स घातलेला, नि एका जाडजूड पुस्तकानिशी थेट गुलजारांची आत्मप्रतिमा होणारा परिचयमधला जितेंद्र...

छे! नाही म्हणता म्हणता मीही भिरकावलाच आहे की तो सेक्सिस्ट संस्कार! थॅंक्स टू हिंदी सिनेमे.

#थॅँक्स_टु_हिंदी_सिनेमे १

  

Friday, 29 April 2022

अजुनी

अजुनी या शहरात
लहानग्याच्या तहानेच्या गप्पा ऐकून आपली पाणपिशवी सहज पुढे करतं कुणी समजुतीनं.
अजुनी भिकारणींचा वैभवशाली इतिहास ठाऊक असलेले पानवाले नांदतात,
वळचणीला ठेवलेली डबलरोटी सुपूर्त करतात तिला मुक्यानंच,
आणि अबोलपणे मान हलवत गिऱ्हाइकाकडे वळतात.
भुकेल्या पोटी एकट्यानंच जेवणाऱ्या कुणाकुणाच्या पुढ्यात,
न आदळता प्रेमानं जेवण वाढतात वेटर्स,
टिपेच्या आमिषाविनाही.
अजुनी आपापसांत मांडवली करत तुंबलेली रहदारी हाकतात,
आपापल्या वाहनांवरून पायउतार होणारे चाकरमान्ये,
हाकारे-पिटारे, विनवण्या-दटावण्या, बाबा-पुता करतात,
रहदारीसकट पांगून चौकातून होत्याचे नव्हते होत जातात निमिषार्धात अजुनी.
अजुनी या शहरात थोडी माणसं नांदतात.

Friday, 1 April 2022

कुठवर

रक्ताच्या नात्यांनी बनलेल्या पुंजक्यापुंजक्यांचं हे शहर
विचारत राहतं तुम्हांला सतत,
तुमचं कुटुंब कुठलं?
जराही ताकद न लावता अमानुष प्रचंडपणाच्या जोरावर लोटत राहतं तुम्हांला अव्याहत,
गुरुत्वाकर्षणाच्याच सहजतेनं, त्याच्या अदृश्य भिंतींपल्याड,
जर तुम्हांला वेळेत उत्तरता नाही आलं. 
पित्याचं अपत्यप्रेम, पत्नीची निष्ठा, पतीचं प्रेम,
आणि ते घनघोर वज्रादपि मातृप्रेम...
स्वतःत मग्न असलेल्या कमळदळासारखीच
आत्ममग्न, आत्मरत,
सगळ्याचीच मुळं.
एकट्या माणसांना रुजायला जागाच न देणारी,
ती संन्यासी, आत्मघातकी, वा लोकनायक नसतील तर.
कुठवर विस्तारत राहील 
रक्तानात्यांच्याच धाग्यांनी विणलेलं हे शहर?

Sunday, 27 March 2022

सगळीकडे कसं शांत शांत आहे

सगळीकडे कसं शांतशांत आहे.
हवेत ना उकाडा, ना गारवा.
ना भगभगलेली दुपार, ना रात्रीचा चांदवा.
ना अवसेचा चमचमता अंधार, ना कातरवेळेचा सांधा. 
या वेळेशी कसलेही लागेबांधे नाहीत. 
हिला साधं नावही नाही. 
सगळं कसं मुकंमुकं आहे.
ना कुणाबद्दल लालभडक धगधगता संताप,
ना कुणाबद्दलच्या नितळ अभंग विश्वासाचा दिलासा.
सगळं जणू विझून गेलं आहे. 
पूर्वीच कधीतरी,
नकळत.
आज आत्ता झाली ती विझल्याची निव्वळ जाणीव. 
नेणिवेच्या तळातून सरसरत वर आलेली. 
प्रेत फुगून वर यावं तशी. 
म्हटलं तर अभद्र खरी.
पण रडू यावं असंही काही मागे उरलेलं नाही.
सगळीकडे कसं शांत शांत आहे.