मी एका हिंदू ब्राह्मण, शहरी, शिक्षित कुटुंबात जन्मलेली व्यक्ती आहे आणि या सवर्णतेमुळे, बहुसंख्याकपणामुळे, शहरीपणामुळे, शिक्षणामुळे माझ्या कुटुंबाला, माझ्या जातीतल्या लोकांना, मला जे काही दृश्यादृश्य फायदे झाले, त्यांचा परिणाम म्हणून मी 'मी' आहे. दोन्हींकडचे आजीआजोबा, पुढे आईवडील शिकलेले होते, शिक्षणाची किंमत जाणत होते, म्हणून मला शिक्षणाकरता काडीमात्र संघर्ष करावा लागला नाही. मी स्त्रीलिंगी व्यक्ती असल्यामुळे शालेय शिक्षण फुकट झालं, तर माझी आई सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती, म्हणून माझं महाविद्यालयीन शिक्षण अत्यंत कमी पैशांत झालं. आज ज्या भाषेला प्रमाणभाषेचा दर्जा मिळाला आहे, ती भाषा कुटुंबात-परिसरात बोलली जात होती, म्हणून प्रमाणभाषेवर प्रभुत्व कमावता आलं. स्वच्छता, साक्षरता, आर्थिक नियोजन, विवेक या सगळ्या मूल्यांकडे लक्ष्य देणं घरादाराला परवडत होतं, त्यामुळे माझ्यावर तसे संस्कार झाले. वाचन या छंदाला समाजात मान होता, म्हणून वेळ घालवण्यासाठी लागलेला माझा छंद मला आपोआप अभ्यासू ठरवून गेला. हे सगळं घडण्यामागे माझ्या कुटुंबीयांची ब्राह्मण ही जात कायम दृश्य वा अदृश्यपणे उपस्थित होती. थेट शोषण नसेल. पण पूर्वीच्या शोषणाच्या पायावरच हे फायदे बांधलेले होते. पांढरपेशेपणाला समाजात असलेला प्रतिष्ठितपणा माझ्या पथ्यावर पडला. सरकारी व्यवस्थेनं देऊ केलेले फायदे मी मनःपूत भोगले. आज त्याचे फायदे उपभोगते. त्यांच्या जिवावर माझा शाणपणा आज चालू शकतो.
मला, माझ्या मायबापांना, माझ्या आजूबाजूच्या माणसांना कुणाकुणाकडून कायकाय मिळालं आहे, त्याची स्वच्छ जाणीव मी मनाशी बाळगावी. मला त्याचा कदापि विसर पडू नये. आरक्षणांना, समाजवादी धोरणांना, स्त्रीसबलीकरणाला विरोध करण्याइतकं मी उतूमातू नये. आजूबाजूच्या विषमतेची जाण मनात कायम वसावी. तिला प्रश्न विचारण्याची हिंमत राहावी. इतकीच आज प्रार्थना.