Friday, 29 April 2022

अजुनी

अजुनी या शहरात
लहानग्याच्या तहानेच्या गप्पा ऐकून आपली पाणपिशवी सहज पुढे करतं कुणी समजुतीनं.
अजुनी भिकारणींचा वैभवशाली इतिहास ठाऊक असलेले पानवाले नांदतात,
वळचणीला ठेवलेली डबलरोटी सुपूर्त करतात तिला मुक्यानंच,
आणि अबोलपणे मान हलवत गिऱ्हाइकाकडे वळतात.
भुकेल्या पोटी एकट्यानंच जेवणाऱ्या कुणाकुणाच्या पुढ्यात,
न आदळता प्रेमानं जेवण वाढतात वेटर्स,
टिपेच्या आमिषाविनाही.
अजुनी आपापसांत मांडवली करत तुंबलेली रहदारी हाकतात,
आपापल्या वाहनांवरून पायउतार होणारे चाकरमान्ये,
हाकारे-पिटारे, विनवण्या-दटावण्या, बाबा-पुता करतात,
रहदारीसकट पांगून चौकातून होत्याचे नव्हते होत जातात निमिषार्धात अजुनी.
अजुनी या शहरात थोडी माणसं नांदतात.

Friday, 1 April 2022

कुठवर

रक्ताच्या नात्यांनी बनलेल्या पुंजक्यापुंजक्यांचं हे शहर
विचारत राहतं तुम्हांला सतत,
तुमचं कुटुंब कुठलं?
जराही ताकद न लावता अमानुष प्रचंडपणाच्या जोरावर लोटत राहतं तुम्हांला अव्याहत,
गुरुत्वाकर्षणाच्याच सहजतेनं, त्याच्या अदृश्य भिंतींपल्याड,
जर तुम्हांला वेळेत उत्तरता नाही आलं. 
पित्याचं अपत्यप्रेम, पत्नीची निष्ठा, पतीचं प्रेम,
आणि ते घनघोर वज्रादपि मातृप्रेम...
स्वतःत मग्न असलेल्या कमळदळासारखीच
आत्ममग्न, आत्मरत,
सगळ्याचीच मुळं.
एकट्या माणसांना रुजायला जागाच न देणारी,
ती संन्यासी, आत्मघातकी, वा लोकनायक नसतील तर.
कुठवर विस्तारत राहील 
रक्तानात्यांच्याच धाग्यांनी विणलेलं हे शहर?