निरर्थक सामान साचत जावं एखाद्या श्रीमंत होत गेलेल्या मूळच्या गरीब माणसाच्या घरात,
तशी पुस्तकं राहतात साठून.
कणाकणानं, क्षणाक्षणानं ससंदर्भत्वावर साचत राहते धूळ. चिऱ्याचिऱ्यानं ढासळत राहतात त्यांचे आयुष्याशी बांधलेले पूल.
साठवणाऱ्यानं कधीमधी उघडून पाहिल्यावर
स्मृतिभ्रंश झालेल्या माणसाला ऐकू यावी पूर्वायुष्यातली एखादी आर्त धून,
विलक्षण ओळखीची भासावी,
पण काही केल्या तिच्या कडा स्मृतीत रेखीव कळीदार होऊ नयेत,
तस्सेच राहावेत धूसर अपरिचयाचे हट्टी ढग चंद्राला ग्रासून.
का हात घालतो आहे हा साधासुधा बिनभावनांचा मजकूरही आपल्या काळजाला,
आणि का येताहेत डोळे उगाच काठोकाठ भरून?
मजकुराच्या शिड्यांनी कधीकाळी अपरिचित विश्वात लीलया संचारू शकणाऱ्या आपल्याच पूर्वजन्माखेरीज,
दुसऱ्या कुठल्याच विश्वात न नेऊ शकणाऱ्या
या मोडक्यातोडक्या वाटा पाहताना,
मनोमन थरकापत असतील का माणसं,
आपलं वठू लागलेलं कुतूहलशून्य मन दिसून?
अशा वेळी पुस्तकांना पडत असतील का स्वप्नं,
ससंदर्भ घराची,
तरण्याबांड याराची,
येत असेल ऐकू कुण्या अनाघ्रात मनाची कोवळी अल्लड धून?
निरर्थक सामान साचत जावं एखाद्या श्रीमंत होत गेलेल्या मूळच्या गरीब माणसाच्या घरात,
तशी भारंभार पुस्तकं राहतात साठून.