Saturday, 21 October 2017

कुठून?

कुठून सरसरत उगवून येतो माझ्यात
एखाद्यावरचा असा काळ्या कभिन्न कातळासारखा ठाम विश्वास,
एखाद्याच्यात डोकावून पाहण्याची नवथर, तांबूस-कोवळी, लवलवती उत्सुकता,
एखाद्याच्या अंगाला पाठ देत निःशंक रेलण्यातलं अपरंपार निळंशार सुळकेदार धाडस,
काळजीपूर्वक, श्वास रोखून आपण भरत जावेत चित्रात रंग,
नि बघता बघता आपलं बोट सोडून,
स्वतःच्याच लयीत नादावत बेभानपणी रंग अवतरत जावेत कागदावर;
तसे उजळत, पेटत, चमचमत, विझत, मावळत-उगवत, स्थिरावत गेलेले
वाद-संवाद, चर्चा-परिसंवाद, उपदेश-सल्ले, भांडणं-फणकारे आणि मिश्कील मायेचं हसू?
माझी माती सुपीक आहेच.
पण हे बी?
हे तुझंच तर नव्हे?

Thursday, 12 October 2017

फारतर

इच्छांच्या लाटांवर लाटा धडकत राहतात
तिथे खाऱ्या पाण्याचे सपकारे झेलत,
भिजत-थरथरत,
पाय रोवून मी बेमुर्वतखोर उभी राहते
मौनाच्या उंचच उंच काळ्याकभिन्न निर्दय भिंतीसारखे
उभे असते आपल्यातले अवकाश,
त्याच्या पायथ्याशी धापावत
निकराने धडका देत राहते
जळत्या उन्हात, घाम घाम घाम होत,
अंगातली आग भिजल्या कपाळावरून निपटत,
ठिणगी ठिणगी जपत-फुलवत राहते...
पण
लाटा ओसरतात,
उन्हे विझत येतात,
मऊ अंधाराच्या लाटा भिंतींना गिळत जातात...
सगळीभर काळीनिळी भूल पडते
वाऱ्यावरून कुणाच्याश्या मुक्या कण्हण्याची चाहूल लागते -
तेव्हा,
तेव्हा मात्र
एखाद्या तेजतर्रार मांजराला कुशीत घेऊन त्याच्या मानेखाली अलगद खाजवल्यावर,
ते जसे आपल्या अंगात अंग मिसळून देते
तशी अंधाराला पाठ देत मी सैलावत जाते.
अशा वेळी
मला फारतर एखादी कविता लिहिता येते.
बस.