Tuesday, 27 June 2017

केल्याने भाषांतर

भाषांतरित पुस्तकं वाचून वैताग झाला आणि फेसबुकी एक लहानसं टिपण लिहिलं. त्यावर जी चर्चा झाली, ती अनेक प्रकारे फलदायी झाली. म्हणून मूळ टिपण, चर्चेअंती पडलेली भर आणि थोडे निष्कर्ष - अशी त्याच टिपणाची दुसरी आवृत्ती इथे देत आहे.
***

अलीकडे काही भाषांतरित पुस्तकं वाचली. काही लहानपणी वाचलेली, पुन्हा नव्यानं वाचताना खटकली. काही ताजी पुरस्कारप्राप्त पुस्तकं. पण वाचताना खडेच खाल्ल्यासारखं वाटलं. या सगळ्याच पुस्तकांचे विषय, आशय, कथानकाचा ओघ.. हे सगळंच निस्संशय सुरेख होतं. पण 'हे भाषांतर आहे' असा अदृश्य घोष मागे सुरू असावा आणि वाचताना काही केल्या मूळ भाषेतल्या वाक्यरचनांचा, शब्दप्रयोगांचा आणि वाक्प्रचारांचा विसर पडू नये, त्यानं सतत लक्ष्य विचलित व्हावं आणि रसभंग व्हावा.. हे अनुभवाला आलं. भाषांतरं कुणा सोम्यागोम्यानं केलेली नव्हती. भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करणारे, भाषांतरित मजकुराबद्दल पुरस्कार मिळवणारे, भाषांतरानं साहित्यात मोलाची भर घालणारे लोक. त्यांची नावं टाळण्याचा माझा विचार नाही. पण खरं सांगू का, मुद्दा तो नाहीच. मुद्दा असा आहे, की शब्दाला प्रतिशब्द, संगणक ज्याला अचूक म्हणेल असं व्याकरण, वाक्प्रचारांचं सही-सही माध्यमांतर... यापलीकडे जाऊन आपण जे समग्र भाषांतर करतो आहोत, ते भाषांतरित भाषेच्या प्रकृतीशी जुळणारं झालं आहे का - याकडे हे लोक लक्ष्य का देत नाहीत

कधी-कधी भाषेच्या प्रकृतीकडे लक्ष्य देणं आवश्यक नसतं, अभिप्रेतही नसतं, भाषांतराचे उद्देश निराळे असतात. अशी भाषांतरं आणि सुसाट-सैराट पाडलेली भाषांतरं यांतला फरक मला कळतो.

हा मुद्दा थोडा विस्तारानं लिहिणं आवश्यक. भाषांतर करताना मूळ भाषेशी इमान राखायचं, की अनुवादभाषेशी, हा एक महत्त्वाचा निर्णय असतो. या निर्णयाबरहुकून दोन टोकं कल्पिली जाऊ शकतात. मूळ भाषेशी इमान राखून केलेली भाषांतरं हे एक टोक. अनुवादभाषेच्या भिंगातून मूळ भाषेची आणि / वा मूळ लेखनशैलीची आणि / वा ते ज्या वातावरणात आकाराला आलेलं असतं, त्या वातावरणाची-संस्कृतीची, अर्थात त्या इतिहास-भूगोलाची, वैशिष्ट्यं हे भाषांतर दाखवत असतं. या प्रकारात अनुवादभाषेत कोणत्या प्रकारचे शब्दप्रयोग प्रचलित आहेत, तिची प्रकृती कशी आहे या गोष्टींना तितकंसं महत्त्व दिलेलं नसतं. अनुवादभाषेशी प्रामाणिक राहून केलेली भाषांतरं हे दुसरं टोक. मूळ भाषा आणि / वा लेखनशैली आणि / वा संस्कृती आणि वातावरण यांना शक्य तितक्या प्रकारे समांतर असणारे अनुवादभाषेतले नमुने वापरत अनुवादभाषेत प्रचलित असणारे वाक्प्रयोग करत केलेलं भाषांतर. व्यक्तिरेखा, बोली, सांस्कृतिक अवकाश व त्यातली एककं या सगळ्यांचंही रूपांतर करणारं भाषांतर हे या टोकाला असतं. हे अर्थातच मूळ भाषा न जाणणार्‍या भाषांतर-वाचकाचा सर्वात जास्त विचार करतं. या दुसर्‍या टोकाच्या भाषांतराचे वाचक आळशी आणि / वा अनभिज्ञ असतात आणि त्यामुळे मूळ भाषेतल्या कृतीच्या काही वैशिष्ट्यपूर्ण अंगांना ते पारखे होत असतात, हे गृहीतकच आहे. तो या भाषांतराच्या आस्वादातला सर्वाधिक मोठा तोटा आहे.

पण सगळीच्या सगळी भाषांतर या दोन टोकांवर वसत नाहीत. ती कोणत्याही एका टोकावर वा या दोन टोकांच्या अध्येमध्ये कुठेही असू शकतात. क्वचित थोडी स्वैर होतात, अशा वेळी स्वैर अनुवाद वा भावानुवाद यांसारखी नावं लेऊन आपण घेतलेली फारकत जाहीर करतात. निदान प्रामाणिक अनुवादक तरी हे करतातच.

यांतल्या मधल्याच एका प्रकाराबद्दल मी बोलते आहे. मूळ भाषेची वैशिष्ट्यं दाखवणं हा उद्देश नसून अनुवादभाषेशी प्रामाणिक राहण्याकडे ज्या भाषांतरांचा कल आहे, मात्र ती थेट रूपांतरं नाहीत - अशी भाषांतरं मला इथे अभिप्रेत आहेत. अशा भाषांतरामध्ये अनुवादभाषेकडे लक्ष्य द्यायला हवं की नको? माझ्या मते, निस्संशय हवंच हवं.

माझा हौशी भाषांतराचा अनुभव असं सांगतो, की एकेका सुट्ट्या वाक्याचं भाषांतर कधीही करू नये. पूर्ण परिच्छेद वाचून त्याचं भाषांतर सलग लिहून काढावं. मग ते मूळ मजकुराशी ताडून पाहावं. असं करताना मूळ मजकुरातले काही शब्द सुटून गेलेले जाणवतील. ते आपण लिहिलेल्या मजकुरात कसे आणता येतील ते पाहावं. त्या शब्दाची जात भाषांतरित मजकुरात तशीच्या तशी येणार नाही, याचं भान राखावं. आपल्याकडून मुळातल्या मजकुराहून काही अधिक लिहिलं गेलं असेल, तर ते कठोरपणे कापावं आणि मग तो मजकूर त्या बैठकीपुरता बाजूला ठेवावा. पुन्हा दुसऱ्या बैठकीत तो मजकूर वाचावा. तो भाषांतरित आहे असं वाटलं, तर तो बाद... पुनश्च हरि ओम्. असं करत करत काही परिच्छेद, मग पूर्ण प्रकरण, मग पूर्ण कथानक वा लेख वा मजकूर करावा. दर टप्प्यावर त्याची सलगता तपासणं, भाषांतरित भाषेच्या स्वभावाला धरून असणं, जिथे तडजोड करणं अपरिहार्य असेल तिथे आवश्यक त्या टिपा जोडणं... असं करत करत मूळच्या मजकुरापासून फार लांब नसलेला पण भाषिक दृष्ट्या नव्यानं जन्माला आलेला, स्वतंत्र जिवाचा मजकूर तयार होतो. हे करताना वेळ खूप जातो. किंबहुना अमुक इतपत धीम्या गतीनं काम न केलं, तर ते घिसाडीच होतं. पण स्वतःला आवर घालणं साधलं, तर नवनिर्मिती केल्याचा आनंद मिळतो.

हे माझ्यासारख्या संपूर्ण हौशी लेखक असलेल्या,  अव्यावसायिक व्यक्तीला कळतं. मग या भल्या-भल्या मंडळींना कळत नसेल? का बुवाव्यावसायिक निकड या गोंडस नावाखाली केलेली धंदेवाईक घिसाडघाई अशा प्रकारच्या गचाळ कामांना कारणीभूत ठरत असेल, तर ती व्यावसायिकता नक्की कोणत्या भाषेतल्या साहित्याला न्याय देते आहे? 

***

संदर्भ: