Friday, 11 January 2008

विरासत

तशी पूर्ण कोरी पाटी असूच शकत नाही, हे कबूल. पण तरी दर वेळी ’यांनी आमच्यावर अत्याचार केले, आणि आम्ही षंढासारखे त्यांचं वैभव पाहतो आहोत’ हा चरा वागवायलाच हवा का सोबत?

’आमच्यावर’मधल्या धर्माचा संदर्भ देणार्‍या आणि केव्हाच मरून गेलेल्या लोकांशी नातं जोडणार्‍या या धाग्याबद्दल मी पूर्णपणे उदासीन असल्यामुळेही असेल - आवारातली हरणं आणि मोर वाखाणायला मी मोकळी होते. उलटल्या शतकांतल्या हिंदू-बिंदूंवरच्या अत्याचाराचा माफकसुद्धा सूड काढण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती. पण मग उलट्या टोकाकडून समाजवादी गळेकाढू कौतुकं होऊ नयेत आपल्याकडून, म्हणून सतर्क राहण्याची, स्वखुशीनं पत्करलेली एक जबाबदारी होतीच.
म्हणजे पूर्ण कोरी पाटी नव्हेच.

उतरत्या उन्हाचा सोनेरी रंग, गार वारा आणि चक्क हलकासा पाऊस. बाहेरून काहीच अंदाज येऊ नये इतकं विस्तीर्ण प्रांगण आत शिरल्यावर एकदम सामोरं येणारं. पुन्हा तोच घाट. आता काहीसा परिचित झालेला... आत मात्र त्या वास्तूच्या पोटात उतरणारा काळोखा अरुंद लांबलचक रस्ता. मनावर कसलंसं दडपण आणणारा. आणि मग एक संपूर्ण मोकळी मोठ्ठी खोली. मधोमध एक साधीशी कबर आणि तिथे घुमणारी कुजबुज.

अकबरानं ही कबर त्याच्या जिवंतपणीच बांधायला घेतली होती हा अनोखा तपशील बाहेर पडताना कळला आणि मग त्या साध्या अनलंकृत कबरीचे नि त्यावरच्या दिमाखदार वास्तूचे सगळे संदर्भ उलटे-पालटे झाले. या वेळी कुणीतरी परत ’थडगं तर आहे’ अशी संभावना केल्यावर अकबराच्या वतीनं मी विनाकारण चिडले आणि ’आळंदीला नाही का थडगं ज्ञानेश्वरांचं? की ती तेवढी हिंदूंची असल्यामुळे पवित्र समाधी?’ असा उद्धट खोचक प्रश्नही विचारला.

पण नावं काहीही द्या. समाधी. कबर. किंवा थडगं. व्हॉटेव्हर...

आणि ताजमहाल?

त्या वास्तूचं सगळं सौंदर्य तिनं साधलेल्या तोलात आहे. दोन्ही बाजूंच्या गुलाबी दगडातल्या चिरेबंदी घुमटांनी तोलून धरलेली ती मधली हिर्‍यासारखी नाजूक, नजर लक्कन कापणारी वास्तू. तिच्या मृदू रूपावर नजर ठरत नाही. तसाच तिच्या आसपासचा आदबशीर शांततेचा पैस. तिन्ही दिशांच्या महाद्वारांतून मुख्य द्वारापाशी आणून सोडलेला गतीचा आवेग तिथे जणू अदबीनं रेंगाळतो. आणि मग चुपचाप, हलक्या पावलांनी काळोखात पाय बुडवून हलकेच महालापुढच्या विस्तीर्ण प्रांगणात येतो. इतका वेळ उजेडाचं रोखून धरलेलं भान अचानक जणू उधळून दिल्यासारखं होतं आणि आपण त्या मर्यादशील काळोख्या घुमटाखालून एकदम प्रकाशात उडी घेतो. तिथे खेळवलेलं पाणी, हिरवीचार झाडं, रंगीत फुलं आणि मधल्या विस्तीर्ण प्रांगणात उधळलेली खूप सारी माणसं. हा सगळा उधळलेला आवेग पुन्हा एकवर एकवटतो - फोकस्ड होतो - तो थेट या वास्तूच्या पायांशी जाऊन थांबल्यावर. अनवाणी पावलांनी तिथले काहीसे अंधारे जिने चढून जाताना परत एक दिमाखी शांतता आपल्यावर राज्य करत जाते. इतका वेळ सैलावलेले-उधळलेले-खिदळणारे आपण त्या चार उंच मिनारांच्या, तिथून निराळ्याच दिसणार्‌या भव्य, जरबदार आणि तरीही आपल्याश्या वाटणार्‌या जादुई रूपाकडे पाहताना गप्पगप्पसे होत जातो. पायांखालची किंचित चरबरीत लाल-पांढरी फरशीही आता मऊ सोनसळी स्पर्शाची, मोतिया रंगाची झालेली. संगमरवरात कोरलेली नाजूक जिवंत कमळं आणि एखाद्या गूढ काव्यमय नक्षीसारख्या उर्दूतून कोरलेले आयते.

आत शिरताना आपण निव्वळ शांत-स्तब्ध झालेले. मृदावून गेलेले. कुणाच्याही समाधीपाशी जाताना व्हावी अशी मनाची गंभीर आबदार अवस्था. आणि हे सारं निव्वळ वास्तूच्या परिणामानं साधलेलं. त्या बापड्या मुमताज वा शाहजहानबद्दल काडीचा आपलेपणा वा ओळख नसतानाही.

दी ताज. तेजोमहल. थडगं. व्हॉटेव्हर...

धर्म, राज्यकर्ते, जुलूम-अत्याचार, कल्याणकारी राजवट, प्रीती, विखार...

काय राहतं मागे? कला? स्फूर्तिस्थान? धर्मप्रेमाचं प्रतीक?

की निव्वळ वारसा? सगळं सामावून घेणारा? शरणागत प्रवाही स्वागतशील संस्कृतीचा? तोच तेवढा खरा फक्त बहुधा..