खपाऊ पण पकाऊ पुस्तकं

23:31:00


संवेदचा खो बघून खरंच त्यानं म्हटल्यासारखी वॉशिंग्टनची कुर्‍हाड हाती आल्यासारखे हात शिवशिवायला लागले. कुणाला झोडू नि कुणाला नको, असं होऊन गेलं.

मग लक्षात आलं, एखाद्या लेखकाला अशा प्रकारे लक्ष्य करणं सोपं आहे. एका बाजूला ग्रेस, जी. ए. वा तेंडुलकर. एका बाजूला व.पु., संदीप खरे, मीना प्रभू, प्रवीण दवणे, हल्ली अनिल अवचट आणि चक्क पु.ल.सुद्धा. या लेखकांची वेगवेगळ्या कारणांनी वारंवार रेवडी उडवली जाते. कधी दुर्बोधपणाच्या आरोपाखाली. कधी तथाकथित ’बोल्ड’ वा ’अश्लील’ असण्याबद्दल. कधी साहित्यबाह्य कारणं असतात म्हणून, कधी तसं करणं उच्चभ्रू असतं म्हणून, कधी त्यांची लोकप्रियता आणि लिहिण्याचा दर्जा (अर्थात सापेक्ष) यांचं प्रमाण व्यस्त असतं म्हणून, कधी निव्वळ तशी फॅशन असते म्हणून. पण या सगळ्या लेखकांनी कधी ना कधीतरी गाजण्याइतकं चांगलं, दखल घेण्याजोगं लिहिलं आहे. एका पुस्तकाच्या गाजण्यावर नंतर सगळी कारकीर्द उभारली असेलही कुणी कुणी, पण त्यांच्या त्यांच्या काळाच्या चौकटीत त्यांच्या पुस्तकांच्या गाजण्याला सबळ कारणं आहेत. ती दुर्लक्षून पुस्तकांबद्दल न बोलता लेखकांच्या शैलीवर, विषयांवर, लोकप्रियतेवर टीकेची झोड उठवणं, कसलीच जबाबदारी न घेता - विखारी टवाळकीचा / सर्वसामान्य वाचकाच्या बाळबोध अभिरुचीचा / सिनिक जाणकारीचा आसरा घेत बोलणं सोपं आहे.

पण इथे संवेदनं तसला सोपा रस्ता ठेवलेला नाही. अमुक एक पुस्तक, ते का गाजलं नि त्याची तितकी लायकी नव्हती असं मला का वाटतंय असं रोखठोक बोलावं लागेल हे लक्षात आलं, तेव्हा कुर्‍हाडीची धार गेल्यासारखी वाटली. पुस्तक निवडताना तर फारच पंचाईत. इतक्यात गाजलेलं, पण गाजण्याची लायकी नसलेलं पुस्तक कुठलं तेच मुळी मला ठरवता येईना. भाषेच्या नावानं दरसाल गळे काढणारे आपण लोक, आपल्या भाषेत पुरेशी पुस्तकं गाजतात तरी का, असा प्रश्न पडला. ’हिंदू, हिंदू... हिंदू’ अशी आसमंतातली कुजबुज ऐकली मी, नाही असं नाही. पण निदान तुकड्या-तुकड्यांत तरी मला ’हिंदू’ आवडली होती. तसंच ’नातिचरामि’चं. शिवाय ’हिंदू’ आणि ’नातिचरामि’ला झोडण्याची सध्या फॅशन असली, तरी काही वर्षांचा काळ मधे गेल्यानंतरच त्यांचं मूल्यमापन करता येईल असंही मला वाटतं.

अलिप्त अंतर बहाल करण्याइतकं जुनं, खूप गाजलेलं नि मला तितकंसं न आवडणारं - अशा पुस्तकाचा शोध घेताना ’मृत्युंजय’ आठवलं. सुरुवातीलाच कबूल करते - मी लहानपणापासून ’मृत्युंजय’ अतिशय प्रेमानं, अनेक पारायणं करत वाचलं आहे. निदान काही वर्षं तरी त्या पुस्तकाची शिडी करून इतर पुस्तकांपर्यंत - लेखकांपर्यंत पोचले आहे. त्याबद्दल या खोमध्ये लिहिणं काहीसं कृतघ्नपणाचं ठरेल, हेही मला कळतं आहे. पण आता ते इतकं गाजण्याइतकं थोर वाटत नाही हेही खरंच आहे.

का बरं?

माझी चांगल्या गोष्टीची व्याख्या ही अशी - ज्यात गोष्टीचा तंबू एकखांबी नसतो. एकापेक्षा जास्त पात्रांनी मिळून बनलेली ती गोष्ट असते. पात्रं हाडामांसाची, चुका करणारी-शिकणारी, वाढणारी, घडणारी-मोडणारी असतात. काळी किंवा पांढरी नसून राखाडी असतात. गोष्टीला खिळवून ठेवणारे चढ-उतार असतात. नि मुख्य म्हणजे वाढणार्‍या आपल्यासोबत गोष्ट कालबाह्य होत जात नाही. तिचं अपील आपल्याकरता टिकून राहतं.

या व्याख्येत ’मृत्युंजय’ बसते का? नाही बसत.

एक तर ती पुरी गोष्ट नाही. कुणीतरी आधीच सांगितलेल्या गोष्टीचा आपल्या सोयीनं निवडून घेतलेला नि आपल्या सोयीनं भर घालून वा कातरी लावून मांडलेला एक तुकडा आहे. अशी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन सांगितलेल्या गोष्टी मुळातूनच दुय्यम असतात (आणि त्यांना संदर्भमूल्य नसतं) हे आपण मान्य केलं पाहिजे. तेही एक वेळ ठीक. त्यातून काही नवे अन्वयार्थ लागत असतील तर. इथे महाभारताचा कोणता नवीन पैलू सामोरा येतो? कुठलाच नाही. फक्त त्यातल्या एका पात्राला कुठल्याही तोलाचं भान न बाळगता एखाद्या सुपरहीरोसारखं अपरिमित मोठं केलं जातं. त्यासाठी सावंत वरवर अतीव आकर्षक भासेलशी संस्कृतप्रचुर विशेषणांनी लगडलेली भरजरी, अलंकृत भाषा वापरतात. कर्णाच्या आजूबाजूची पात्रं फिक्या-मचूळ रंगांत रंगवतात. इतकी, की कादंबरी वाचल्यावर त्यातलं फक्त कर्णाचं पात्र तेवढं आपल्या डोक्यात स्पष्ट ठसा उमटवून उरतं. थोडा-फार कृष्ण. बस. बाकी काहीही छाप पाडून जात नाही. ही काही चांगल्या कादंबरीची खूण नव्हे. याला फार तर एखादं गोडगोड चरित्र किंवा गौरवग्रंथ म्हणता येईल.

कदाचित मी फारच जास्त कडक निकष लावून पाहते आहे. एक ’एकदा वाचनीय पुस्तक’ या निकषावर आजही ’मृत्युंजय’ पास होईल. पण मग तिला मिळालेला ’मूर्तिदेवी पुरस्कार’? भारतातल्या नि भारताबाहेरच्याही भाषांमध्ये तिची झालेली भाषांतरं? तिच्या दोन आकडी आवृत्त्या? कुणीही मराठी कादंबर्‍यांचा विषय काढला की अपरिहार्यपणे तिचं घेतलं जाणारं नाव? ती वाचलेली नसली तर अपुरं समजलं जाणारं तुमचं वाचन? हे सगळं मिळण्याइतकी तोलामोलाची आहे ती?

सावंत, माफ करा, पण ’मॄत्युंजय’ इतकी मोठी नाही. तरी तिला मिळालेल्या इतक्या अफाट लोकप्रियतेमुळे तिच्यानंतर अशा प्रकारच्या चरित्रात्मक कादंबर्‍यांचं पेवच मराठीत फुटलं. इतिहासाला वा पुराणातली कोणतीही एक व्यक्तिरेखा उचलावी, तिला अपरिमित मोठं-भव्य-दिव्य-लार्जर दॅन लाईफ रंगवावं, तिच्या आजूबाजूला यथाशक्ती प्रेमकथा / युद्धकथा / राजनीतीकथा रचावी आणि एक सो-कॉल्ड यशस्वी कादंबरी छापावी, असं एक समीकरणच होऊन बसलं, हे ’मृत्युंजय’नं केलेलं आपलं नुकसान. तशा पुस्तकांची यादी करायला बसलं, तर मराठी वाचकांची कितीतरी ’लाडकी’ नावं बाहेर येतील...

पण आपला खो एकाच पुस्तकापुरता मर्यादित आहे. ’मृत्युंजय’वर माझ्यापुरता खिळा ठोकून नि कुर्‍हाड मिंट,  राज, गायत्री, दुरित आणि एन्काउंटर्स विथ रिऍलिटी यांच्याकडे सोपवत तो पुरा करतेय. संवेदचा खो तर घ्याच, शिवाय माझी ही खालची पुरवणीही जरूर घ्या.

माझी पुरवणी:

’खपाऊ पण पकाऊ पुस्तकं’ हा संवेदचा विषय वाचताक्षणी माझ्या डोक्यात ताबडतोब त्याला जुळा असलेला विषय आला होता. ’उत्तम पण उपेक्षित पुस्तकं’.

काही पुस्तकांना ती तितकी तालेवार असूनही मिळायचं तितकं श्रेय कधीच मिळत नाही. ती कायम उपेक्षित राहतात. नंदा खरे यांचं ’अंताजीची बखर’ हे ऐतिहासिक कादंबरीचा घाट असलेलं पुस्तक मी या खणात टाकीन. मराठी ऐतिहासिक कादंबरीतली कायमची-भव्य-दिव्य-जिरेटोपी व्यक्तिमत्त्व बाजूला सारून एका क्षुल्लक मराठी हेराच्या नजरेतून ही कादंबरी मराठी रियासतीतल्या एका मोठ्या कालखंडाकडे डोळसपणे (आणि तिरकसपणे) बघते. ती शब्दबंबाळ नाही. तिला उपरोधाचं नि पक्षी विनोदाचंही अजिबात वावडं नाही. त्यातली अस्सल रांगडी नि मिश्कील मराठी भाषा आवर्जून वाचावी अशीच आहे.

पण तिची म्हणावी तशी दखल घेतलेली ऐकिवात नाही. बर्‍यापैकी जुनी असूनही ती मी अगदी अलीकडे वाचली आणि हरखून गेले.

बहुतेक मराठी वाचकाला भव्य नसलेल्या इतिहासाचं वावडं असावं!

You Might Also Like

16 comments

 1. मृत्युंजय वाचलेलं नाही, वाचेन अशी शक्यता फार कमी आहे. मला हल्ली अलंकारिक भाषेतली मराठी पुस्तकं वाचायचा कंटाळा येतो. आणि महाभारतावरच वाचायचं असेल तर दुर्गाबाई किंवा इरावती कर्वे वाचायला अधिक आवडतील.

  खो बद्दल आभार. लिहीतोय.

  ReplyDelete
 2. Dhanyavaad Meghana! Kho pochala ... udya-parava paryant nakki lihen :)

  ReplyDelete
 3. खो स्वीकारतोय. त्याहून पुढची पुरवणीही काही लिहिण्यासाठी निश्चित करतोय. वयाच्या सापेक्ष आवडीतून मलाही आवडलेले 'मृत्युंजय' नंतर नकोसे वाटत जाते. काळाची मर्यादा चिकटली गेली बहुदा, 'मृत्युंजय' ला.

  ReplyDelete
 4. मृत्युंजय आवडणारे आणि मराठी मालिका बघणारे एकाच माळेत ओवता येतील. कारण याच्याकरीता ना स्वत:ची बुध्दी वापरावी लागते ना कल्पनाविलास निर्माण करावा लागतो. वाचकाने जे काय करायचे आहे ते सर्व ते पुस्तकच किंवा मालिका स्वत:च करते.

  ReplyDelete
 5. धन्यवाद मेघना, तू लगेच आणि उत्तम खो खेळलास!! एकाच विषयाला किती पैलु असु शकतात हे हळु हळु (परत) उघड होत आहे.
  मला वैयक्तिकरित्या मृत्यंजय कधीच आवडली नाही. कदाचित मी व्यासपर्व आधी वाचलं असावं त्याचा परिणाम (गंमत म्हणजे आज मी य वर्षांनी व्यासपर्व परत वाचतोय आणि दुर्गाबाई नसल्याची हळहळ जाणवतेय). समहाऊ ते पुस्तक अत्यंत नाटकी आणि काळं-पांढरं झालय.
  असो. तू अंताजीच्या ठाम प्रेमात पडली आहेस हे आता जगन्मान्य झालय!
  मिंट्स, राज, दुरीत मंडळींनी लगेच हो म्हटलं बघून हुरुप आला.
  ..आणि हो, शेवटंच वाक्य जरा बोल्ड करायचंस..कसलं भारीए

  ReplyDelete
 6. खो घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार.
  प्रदीप:
  अगदी मराठी मालिका म्हणण्याइतकी ’ही’ नाही वाटत ’मृत्युंजय’ मला! पण तुमचं म्हणणं पोचलं.
  संवेद:
  समीक्षा लिहायचा मी व्यवस्थित आळस केला. पण त्यातही जमेची बाजू अशी की - एखाद्या पुस्तकाला - लेखकाला अधिकृतपणे शिव्या घालायच्या झाल्या की किती बाजूंनी विचार करावा लागतो त्याची जाणीव झाली. उचलली जीभ लावली टाळ्याला, असं आता चटकन होणार नाही.
  बाकी अंताजीच्या प्रेमात आहे खरी मी!

  ReplyDelete
 7. लेख खूप आवडला.
  लहानपणी मृत्युंजय वाचली होती, पण नंतर ती अगदीच आवडेनाशी झाली. शिवाजी सावंतांनी अनेक ठिकाणी मूळ सन्दर्भ दुर्लक्षून फक्त कर्णाला मोठं करायचा उद्योग केला आहे, तोही अत्यंत वाचाळ, भावविवश आणि कीर्तनी भाषेत (इति जी.ए!!). अ. दा. आठवल्यांची पुस्तकं वाचल्यावर तर हे अजूनच जाणवलं.
  या पुस्तकांनी लहानपणी वाचनाची सुरुवात करून दिली आणि आता ती किती सामान्य आहेत याची जाणीव होते आहे. असं म्हणणं कृतघ्नपणा आहे, पण जे वाटतंय तेही खरं.
  बाय द वे, शेवटचं वाक्य खरंच भारी आहे!

  ReplyDelete
 8. आपले निरीक्षण आपण खूप प्रामाणिकतेने व प्रभावीरीत्या मांडले आहे..ब्लॉगही आवडला आपला!
  अभिनंदन, धन्यवाद व शुभेच्छा!

  ReplyDelete
 9. प्रिय मेघना,
  मला सुध्धा 'अंताजी' / 'अंतकाळ' खूप खूप आवडला / भावला... मी श्री. नंदा खरे यांना फोन करून
  हे पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
  तुमच्या ब्लॉगचा रेफरन्स त्यांना पाठवला आहे.

  ReplyDelete
 10. @अश्विन
  मी आठवल्यांची पुस्तकं वाचलेली नाहीत. आता चुकूनही वाटेला जाणार नाही! ;)
  @अतुल
  ऐला! भारी! धन्यवाद. :)
  अंताजीच्या प्रेमात पडून मी खर्‍यांची सगळी पुस्तकं मिळवायच्या मागे लागले. पण काही पुस्तकं कितीही प्रयत्न केला तरी मिळतच नाहीत. उदा. 'संप्रति', 'वीसशे बहात्तर' (दोन्ही नावांबाबत तूर्तास चूकभूल देणेघेणे). मी खूप दिवस शोधतेय. :(
  @हेमंत
  मनापासून आभार!

  ReplyDelete
 11. प्रिय मेघना,
  मी श्री. खरे यांना तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांबद्दल विचारणा केली - त्यांचे उत्तर सोबत जोडत आहे.
  --------------------------------
  प्रिय अतुल व मेघना,
  खोट खोट लाजत माझ्या इतर पुस्तकांबाबत सांगतो--
  १) ज्ञाताच्या कुंपणावरून -- '९० साली प्रकाशित झालं, ग्रंथाली, out of print. आज मनोविकास नवी आवृत्ती काढायचं बोलताहेत.
  २) वीसशे पन्नास-- बहुधा ग्रंथालीकडे प्रती असतील. मला नागपुरला येऊन भेटा!
  ३) 'अंताजी'-- ग्रंथाली, आज मनोविकास.
  ४) संप्रति--ग्रंथाली, out of print. माझ्या मते माझं सगळ्यांत चांगलं पुस्तकं. Out of print. मला नागपुरला येऊन भेटा!
  ५) जीवोत्पत्ती आणि नंतर-- ग्रंथालीकडे प्रती असतील.
  ६) दगडावर दगड, विटेवर वीट-- ग्रंथालीकडे प्रती असतील.
  ७) नंगाराल्याविण भुई-- ग्रंथालीकडे प्रती असतील.
  ८) कहाणी मानवप्राण्याची -- मनोविकासकडे प्रती आहेत.
  ९) 'अंतकाळ' -- मनोविकासकडे प्रती आहेत.
  १०) !!! E.O.Wilson च्या Anthill या कादंबरीचं भाषांतर (वारूळपुराण), मनोविकास काढणार आहे. माधवराव गाडगीळ प्रस्तावना लिहीत आहेत. दिवाळीच्या आत निघावं.
  सध्या मात्र थिजलेला आहे.
  नागपुरी हिंदी-उर्दूत "हौसलाअफजाही के लिये शुक्रिय१"
  आपला, नंदा
  -------------------------------

  ReplyDelete
 12. ऐशप्पथ! अतुल, धन्यवाद!!!
  मला इमेल आयडी मिळेल का नंदा खर्‍यांचा? त्यांचे आभार मानलेच पाहिजेत. (माझा ईपत्ता: meghana.bhuskute@gmail.com)

  ReplyDelete
 13. Kadhitari madhe ekda tujhya blog var yeun gele ani kahich disal nahi navi. Mag naadach sodun dila. Parva Abhijeet chya blog varun parat ithe ale ani barech navin posts disale. Mag vel milel tenvha vachaycha kaam suru jhala. :) Pan 3yrs chya break nantar vachtana dokyat 100 paiki 15 shadbach jaat aahet asa vaatay. Too much technical writing recently. :) Pan aata jaagevar yetey parat. :) Jenva 100% shabd dokyat jaatil ani mag pudhe majhe vichar suru hotil tenvha parat message karte. Pan tovar tujhe posts yeu det please. Its motivating to see the new posts. :)

  ReplyDelete
 14. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 15. @विद्या
  किती दिवसांनी खरंच!बरं वाटलं तुझी कमेंट पाहून. :)

  ReplyDelete
 16. Hi Meghana, don't know exactly how but a workless afternoon landed me on your blog and and I really liked it. Have you read 'Kuna Ekachi Bhramangatha'? It's by Go Ni Dandekar, I think it totally falls for your suppliment, 'Uttam pan Upekshit' Pustake'..

  ReplyDelete