Friday 7 January 2011

गालिब, तू कुठे आहेस?

कुणी आत्महत्या करायचं नक्की कधी नक्की करतं?
असतो असा - एकच एक क्षण?
एखादी फिल्मी शाम-ए-गम?
एखादी लांबलचक काळीकुट्ट रात्र?
एखादी भण्ण उदासलेली दुपार?
असतो असा - एकच एक क्षण - नक्की बोट ठेवता येणारा?

एखाद्या बोगद्यातून जात जात जात जात जात जात जात राहावं-
अंतरं कापण्याचं त्राण तर दूरच -
दूरवरचा उजेडाचा ठिपकाही भासमान वाटत जावा.
अशा
ना दिवस ना रात्र
ना आत ना बाहेर
ना जागृत ना निद्रिस्त -
अशा उंबर्‍यावरच्या संदिग्ध ठिकाणी स्वत्त्वाचं भान हरपलेलं असताना कधीतरी -

तुटून जात असेल दोरी.

मग काही अस्पष्ट स्मृती गेल्या जन्मातल्या उत्कट दुःखांच्या
पाऽर मागल्या बाकावरून मान उंचावून उंचावून पाहाव्यातश्या
झगमगत्या
चुटपुटत्या
पाहता पाहता निसटून जाणार्‍या.

मग एक निर्वात पोकळीतलं बधीर आयुष्य.
अंगावर ओरखडाही न उठू देणार्‍या गेंडाकातडीतलं.
लांबलचक, सुखासीन.

त्यात नेमका क्षण कसा शोधणार?

असतो का खरंच असा एकच एक क्षण, नक्की बोट ठेवता येणारा?