Thursday, 21 May 2009

आणखी एक धार्मिक वगैरे वगैरे


संवेदचं हे एकदम विचारप्रवर्तक वगैरे पोस्ट वाचून मी ही कमेण्ट खरडायला घेतली, पण ती इतकी मोठी झाली, की तिच्या आकाराची लाज वाटून शेवटी मी हे पोस्टायचंच ठरवलं.
खूप वायफळ तात्विक चर्चा करायची झाली, तर ’आपल्या’ धर्मात ’धर्म’ हा शब्द कर्तव्य या अर्थानी कसा वापरलाय आणि त्यामुळे प्रत्येकाचा धर्म निराळा कसा असतो असं कायच्या काय खरडत बसता येईल. पण त्याला काही अर्थ नाही. त्या अर्थानी आपण धर्म हा शब्द वापरायचं केव्हाच सोडून दिलंय. आपण देव आणि धर्म या गोष्टींची सांगड घालतोच घालतो. ’तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ या बिनतोड युक्तिवादात वापरलाय त्याच अर्थानं चांगलं (धर्मानं!), नियमबियम पाळून वागायचं मार्गदर्शन करणारी एक संस्था याच अर्थानं आपण तो वापरतो. आपापल्या अपराधीपणावर उत्तरं शोधायला, पांघरुणं घालायला, नियम सुधारून (वाकवून?) घ्यायला, इतरांना (आणि स्वत:लाही) धाक घालायला लोक तो बर्‍याचदा वापरत असतात.त्या अर्थानं मी आहे का धार्मिक? बहुतेक नाही.मला पुराणातल्या बर्‍याचश्या गोष्टी माहीत असतात, देव आणि दैवतांचा इतिहास याबद्दल कुतुहल वाटतं. धर्माचा इतिहास संस्कृतीच्या पाऊलखुणा सोबत घेऊन येतो, तो वाचायला मला आवडतं. त्यात लोकांनी आपापल्या फायद्यातोट्यासाठी, कधीकधी नि:स्वार्थीपणे, कधीकधी निव्वळ मूर्खपणानं मारून ठेवलेल्या मेखी (की मेखा?) समजून घ्यायला धमाल येते.
पण देवापुढे - अगदी तिन्हीसांजेलासुद्धा - आपसूक वगैरे माझे हात नाही जोडले जात. खूप उदास असताना, खूप काळजीत असताना, खूप हैराण झालेलं असतानाही, ’आता देवच काय ते बघून घेईल’ असं चुकूनही माझ्या मनाशी येत नाही. देवाची प्रार्थना करावी असं सकाळी - रात्री कधीच वाटत नाही. अंधाराची किती भीती वाटली, तरी रामाबिमाचं नाव माझ्या तोंडात कधीच येत नाही. असली काहीतरी एण्टिटी असेल, इथपासूनच मला टोटल अविश्वास आहे, तर मग ती आपल्याला मदत करेल, असं कसं वाटणार?म्हणजे मी धार्मिक नसणारच. असं का असेल?आमचं घर काही तितकं अतिरेकी आधुनिक नव्हे. म्हणजे आमच्या घरी नाही, पण बाबांच्या घरी - गावाला, आणि आजोळीही, गणपती बसतो. आम्ही त्याकरता शक्य असेल तेव्हा गावाला जातो. घरात लहानसा का होईना देव्हारा आहे. नेहमी बाबा, आणि बाबा नसले तर आई देवाची पूजा करते. तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावते. फार गडबडीत नसेल, तर कधीमधी रामरक्षा पुटपुटते. शनिवारी बाबांचा उपास असतो. चतुर्थीला घरात खिचडी होते. पाळी चालू असताना आई बाजूला बसत नाही, पण मुद्दामहून देवाला शिवायलाही जात नाही. घरी कधी हळदीकुंकू वगैरे झाल्याचं आठवत नाही. पण हळदीकुंकू घ्यायला आईची ना नसते. आजी घरात असेल, तेव्हा ती हातात एखादी बांगडी चढवून ठेवते. कुठे फिरायला वगैरे गेलो, तर आम्ही तिथली देवळंही बघतो. हात जोडतो, तीर्थप्रसाद घेतो. माझी आणि माझ्या बहिणीची पत्रिका बनवलेली आहे.
असं सगळं असताना देव किंवा त्याला लागून येणारा धर्म मी इतका बेदखल का केला असेल? याचं कारण शोधताना मला नेहमी एक गंमत आठवते.आपल्याला मतं फुटायला लागतात त्या काळात कधीतरी, म्हणजे दहावी-अकरावीत असताना असणार, माझा मावसभाऊ घरी आला होता. आडव्या-तिडव्या वाचनामुळे, आणि अंगातल्या उद्धटपणामुळे, माझे ज्वलंत - जहाल - स्त्रीवादी - निधर्मी वगैरे विचार तेव्हा जोरात होते. ते मोठ्यामोठ्यानं मांडायची खुमखुमीही होती. सगळ्यांना त्यांचा मूर्खपणा - अन्यायीपणा दाखवून वगैरे द्यायला पाहिजे, असलं काहीतरी अचाट तेव्हा वाटायचं. असल्याच कसल्यातरी वादात मी मोठ्यामोठ्यानं ’देव नसतोच’च्या बाजूनं आणि माझा भाऊ ’देव असतोच’च्या बाजूनं तारस्वरात भांडत होतो. कुठल्यातरी एका पॉईंटला त्याच्या बाजूनं आर्ग्युमेंट्स संपली. ’तुला इतकं वाटतंय ना, देव नाही असं? मग होऊन जाऊ दे. देव्हार्‍यातला देव घे आणि त्याला पाय लावून दाखव. पाहू तुला जमतं का?’ असं आव्हान त्यानं दिलं. मीही ’हात्तेरेकी, त्यात काय, घे!’ असं म्हणत शिस्तीत जाऊन देव्हार्‍यातली देवीची लहानशी पितळी मूर्ती घेऊन जमिनीवर ठेवली, त्यावर पाय दिला आणि त्याच्याकडे विजयी मुद्रेनं पाहिलं. तो अर्थातच निरुत्तर झाला. ’तू आचरट आहेस बाबा खरंच. जरापण भीती नाही...’ असलं कायतरी तो बडबडला आणि तो वाद माझ्यापुरता जिंकून संपला. परत पत्ते सुरू झाले. संपलं.


आई घरातच होती. कशातच मधे न पडता फारसं लक्ष न दिल्यासारखं करत पडल्यापडल्या शांतपणे ऐकत होती. तिनं सगळ्या वादात माझी बाजू घेतली नाही आणि त्याचीही नाही. मला थांबवलंही नाही. नंतर काही प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही. कदाचित प्रतिक्रियेच्या या अभावामुळेच, तिला जणू कळलंच नाहीये, मी काय पराक्रम केला ते, अशा थाटात मी तिला मारे सगळी गोष्ट सांगायला गेले. तर ऐकून म्हणाली, पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास. तुझ्यापुरता. लोकांचा आहे ना. लोक त्या मूर्तीसमोर हात जोडतात. त्यांच्या विश्वासावर पाय ठेवलास. तूच कर विचार, चूक की बरोबर त्याचा.


विषय संपला. तिला काहीच फरक पडला नाही. नेहमीसारखा संध्याकाळचा दिवा लावणं, हात जोडणं यात काही फरक नाही. माझ्यावरही अजिबात राग दर्शवला नाही. तिच्यापुरता खरंच विषय संपला. तिनं मूर्ती साधी धुतलीही नाही लगेच. काय जनरल आठवड्या-पंधरवड्यानं देव्हार्‍याच्या साफसफाईची वेळ आली, तेव्हाच दिव्यासकट सगळ्या मूर्ती स्वच्छ झाल्या, हे मी मुद्दाम लक्ष ठेवून पाहिलं.


परत मी कधी देव आहे की नाही, या गोष्टीवरून तावातावानं वाद घातल्याचं आठवत नाही. पाळी चालू असताना उद्मेखून देवापाशी दिवा लावायला जाणं आणि ’मुद्दामहून अगोचरपणा नकोय’ वगैरे क्षीण विरोध करणार्‍या आईशी वाद घालणं वगैरे आचरट प्रकारही परत करावेसे वाटले नाहीत. मग ’माझा विश्वास नाही, मी देवापुढे हात जोडणार नाही’ असल्या घोषणाही कधी केल्या नाहीत. हात न जोडून जसा फरक पडत नाही, तसा जोडल्यानंही फरक पडत नाही इतपत तर्क आणि सहिष्णू वृत्ती माझ्यात शिरली असावी. सगळं आपापल्या समाधानाशी आणि विश्वासाशी येऊन थांबतं, हे कुठेतरी जाणवलं असावं.
म्हणूनच अंनिसच्या कामाबद्दल कधी भारावलेपणा वाटल्याचं आठवत नाही. फारशी खोली नसलेलं, लोकांची पिळवणूक बंद करण्याचा प्रयत्न करणारं एक काम, इतपतच महत्त्व त्याला द्यावंसं वाटलं. कायद्यापलीकडे शोषण होत नाही ना, इतकं पाहून लोकांना आपापले विश्वास-श्रद्धा जपायचा हक्क आहे, त्यांना आवश्यक असेल त्या - झेपेल त्या निष्कर्षावर त्यांनी स्वत:च आलं पाहिजे, अशी एक धारणा होऊन बसली. कितीतरी वेळा तर देवावर विश्वास नसलेले लोकही आपला अविश्वास असाच वारसाहक्कानं, विचार न करता कंटिन्यू करत असल्याचं दिसलं. तेव्हा ’आईनं सांगितलं म्हणून मी करते मनोभावे’ या साच्यातला गुरुवारचा उपास आणि असला देवावरचा अविश्वास यांत काय फरक, असं वाटून गंमत वाटली. मग कधीतरी ’धर्मशास्त्राचा इतिहास’, ’विवाहसंस्थेचा इतिहास’ वगैरे वाचलं, तेव्हा तर करमणूकच झाली. आणि या सगळ्या व्यवस्थेतलं शोषण - संधिसाधूपणा असं पुराव्यासह समोर ठेवलं तरीही ज्याला यातल्या कर्मकांडावर विश्वासायचं आहे, ज्यांना त्यातून अनामिक दिलासा मिळतो, ते सगळ्या पुराव्यांकडे डोळेझाक करूनही विश्वास ठेवणारच, याची खात्रीही पटली.हिंदू असल्याचा अभिमान वगैरे तर मला कधी नव्हताच. हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हेच बोंबलायला माहीत नाही, तर अभिमान कसला कपाळाचा? त्यातल्या विशेषत: बायकांकरता खास बनवलेल्या चालींची मात्र शरम वाटायची. पण तसल्या मखलाश्या जगातल्या कुठल्याच धर्मानं करायच्या ठेवलेल्या नाहीत, हे कळलं, त्या कुठल्यातरी टप्प्यावर मी निधर्मी आहे असं स्वत:ला सांगणं मी सोडून दिलं. आकाशातला बाप, प्रेषित किंवा विहीरीत प्रेत टाकून देणं या गोष्टी नाहीतरी मला परक्या वाटतात. तितक्या हिंदू धर्मातल्या संकल्पना मला परक्या वाटत नाहीत म्हणजे हा माझा धर्म. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म आता मला कधी क्रूर, कधी मजेशीर, आणि नेहमीच सर्वायवलचं रहस्य जाणणारा वाटतो. त्यात अभिमान कसला नि लाज कसली? गंमत आहे.पण म्हणजे मी धार्मिक आहे की काय? काय माहीत.

11 comments:

 1. कुठल्याही भोंगळ तत्त्वज्ञानापासून कठोर कर्मकांडापर्यंत आणि चार्वाकापासून ते बुद्धापर्यंत सगळ्यांनाच आपलं म्हणणारा आणि टिकून राहणारा हा लबाड धर्म....

  ....आपली जनरल एक माणूस म्हणून जी हतबद्धता, कोडगेपणा, जमवुन-निभावुन न्यायची वृत्ती असते ती इथून कठून तर उगवली नाही नां?

  ReplyDelete
 2. hmm...rokhthokh post awdla..maze vichar ase ajibatch nahiyet, tari jasa lihlays te awdla! :)

  ReplyDelete
 3. Exactly hech expected hota Samved chya post madhe te tujhya post madhe vachayla milala. Hindu dharma kay aahe aani kasa aahe yapekshya me tyacha palan karte ki nahi kinva tyabaddal mala kay vatata he ekdam spashta shabdaat madala aahe.
  It made me think, 'me dharmik aahe ka?' mahit nahi.
  Pan dev uchalun tyala paay laavaychi himmat majhi tari jhali nasati. Kadachit tyat aai-dadanchi bhiti ch jast asel, pan jhali nahi aani aata hi honar nahi.
  -Vidya.

  ReplyDelete
 4. संवेदच्या पोस्टवर खूप मोठी प्रतिक्रिया ३ भागांत लिवून आलो. ती त्याने पब्लिश केल्यावर वाचून रिचव. त्यात तुझाही उल्लेख आहे. ते झाल्यावर पाहू तुझ्या लेखाचं!

  ReplyDelete
 5. पहिल्या पायरीबद्दल अभिनंदन :).
  बाकी कट्टरतेला विरोध करताना आपणही दुसर्‍या टोकाचे कट्टर होत जातोच. एकादशीला मुद्दाम ठरवून चिकन खाण्यात काही अर्थ नाही. एखादी गोष्ट जिद्दीने नाकारणं म्हणजे एका अर्थी तिच्या अस्तित्वाला दुजोरा देणंच. बाकी लबाड म्हणण्यापेक्षा हा धर्म सोयीचा अधिक वाटतो. असो. अज्ञेयवाद त्यातल्या त्यात अधिक जवळचा वाटतो. देव म्हणा किंवा ज्याला सोयीस्करपणे बरेचसे लोक 'देवावर-विश्वास-नाही-पण-विश्वचालक-शक्तीवर-आहे' अशा शक्तीबद्दल म्हणा -
  voyant trop pour nier, et trop peu pour s'assurer (Seeing too much to deny and too little to ensure) असं सयुक्तिक नसलं तरी 'मानवी' भाष्य करणारा.

  ReplyDelete
 6. lihayala lagalis(ch) te awadala ani post suddha avadalach. tujhya postvarun ulat javun ata samwed ch post pahin. prawasat hote tevhadhyat barich lihalihi jhaleli distaey te baghun gaar vatatay:D

  ReplyDelete
 7. मेघना, पोस्ट आवडलं आणि नंदनची प्रतिक्रीयासुद्धा! रोखठोक लिखाण फारच आवडतं मला, त्यातून माझे विचार काही फारसे वेगळे नसल्यामुळे हे पोस्ट फारच जास्त आवडलं.

  ReplyDelete
 8. humm...

  it would have been something more...

  ReplyDelete
 9. कुठलीही सार्वजनिक गोष्ट, अगदी देशाच्या राजकारणापासून ते सार्वजनिक स्वच्छतागृहापर्यंत, सगळ्याची तीच रड. प्रत्येक जण वापरतो आपापल्या सोयीनं आपापल्या सवयीनं. त्याचे अधिकार मात्र काही मोजक्या लोकांकडे आणि त्याची स्वच्छता करणारे पाट्या टाकणारे निरूत्साही चारदोन लोक. एक सामाजिक संस्था म्हणून धर्मची ही तीच गत.

  हजारो वर्षांचा सोयीची ठिगळं लावलेला आपला धर्म वैयक्तीक पातळीवर विचारपूर्वक स्विकारणं कठीण खरं पण मग कळपानं राहणार्‍या आपल्या सारख्यांना सामाजिक पातळीवर तो नाकारणं तरी कसं शक्य आहे?
  नुसतंच नाक दाबून आत घाण वास येतो आम्ही आता उघड्यावर बसणार असं म्हणण्यात तरी काय शहाणपण?

  (सॉरी प्रथम वाचनानंतरची ही रायवळ प्रतिक्रिया आहे फारसा खोल विचार न करता दिलेली)

  ReplyDelete
 10. कट्टरतेला विरोध करताना आपणही दुसर्‍या टोकाचे कट्टर होत जातोच. एकादशीला मुद्दाम ठरवून चिकन खाण्यात काही अर्थ नाही. एखादी गोष्ट जिद्दीने नाकारणं म्हणजे एका अर्थी तिच्या अस्तित्वाला दुजोरा देणंच. >>> नंदन शी सहमत.


  पाय ठेवलास म्हणजे काय थोर साहस केलंस? पितळेची वस्तू ती. ती काय खाणारे तुला? तुझा नसेल विश्वास.>>ह्म्म आईने तुला नीट सांगितलच की समजावून. तुझी आई ग्रेट आहे :) आणि म्हणून मग तू धार्मिक नाहीयेस हे तुला सगळ्या जगाला ओरडून सांगाव असं नाही वाटलं ह्यात आलच की सारं. देव आहे नाही माहित नाही पण मी मानत नाही हे जितकं खरं तितकच कुठली तरी अनामिक शक्ती आहे हे खरपण ह्यालाच काही जण देव म्हणतात त्यात काही बिघडत नाही.

  छानच लिहिलयस.

  ReplyDelete