काहीबाही

तुम्ही कधी तुमचा एको पॉईंट शोधलाय...?

09:01:00

(शीर्षक: ’...आणि तरीही मी’मधल्या सौमित्रच्या ’एको पॉईंट’ ह्या कवितेवरून.)

"काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य कर ग..."माझी चिल्लर स्वप्नं ऐकून माझा एक मित्र कळवळून म्हणाला होता!

तेव्हा त्याच्याशी वाद घालणं राहून गेलं होतं. पण ते वाक्य आणि त्याच्यामागची त्याची सच्ची कळकळ डोक्यातून पुसली गेली नव्हती, नाही. तसंच त्याचं कुठेतरी काहीतरी चुकतंय, ही खात्रीही.

तर... हे काही प्रश्न मित्राला -

खरं आहे. काहीतरी मोठ्ठं-भव्य-दिव्य करायला हवंय.

पण ’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ म्हणजे नक्की काय रे? त्याच्या व्याख्या केल्या आहेस का तू तुझ्यापाशी नक्की? उदाहरणार्थ अमुक इतक्या माणसांवर सत्ता गाजवू शकलो आपण म्हणजे मोठ्ठं? (हे फारच ढोबळ झालं नाही?! बरं, आपण जरा वेगळ्या शब्दांत मांडू - ) अमुक इतक्या माणसांच्या आयुष्याला आकार देण्याची ताकद मिळाली म्हणजे मोठ्ठं? किंवा अमुक इतके पैसे कमवले आणि उर्वरित आयुष्य अधिकाधिक मिळवत राहण्याची बेगमी केली म्हणजे मोठ्ठं? किंवा जगातल्या अमुक इतक्या ठिकाणी आपलं नाव छापून आलं, आपण अमुक इतक्या लोकांना माहीत झालो, म्हणजे मोठ्ठं? परदेशात शिकण्याची, काम करण्याची संधी मिळाली म्हणजे मोठ्ठं? याआधी कुणीच न केलेलं काही आपल्या हातून घडलं म्हणजे मोठ्ठं?

काय? मोठ्ठं म्हणजे नक्की काय?

खरं सांगू? हे निकष नाहीतच एखादी गोष्ट ग्रॅण्ड असण्याचे. मला चढणारी झिंग, माझं समाधान, माझ्या जिवाला लाभणारी स्वस्थता हे खरे निकष. मग जगातली कितीही मोठ्ठी गोष्ट माझ्यासाठी फडतूस ठरू शकते. आणि जगाच्या लेखी कितीही क्षुद्र असलेली गोष्ट माझ्यासाठी स्वप्नवत ठरू शकते.

माझा जीव किती तीव्रतेने, खोलवर गुंततो आहे...
माझ्या टीचभर आयुष्यातलं काय काय पणाला लागतं आहे...
मी किती बेभान सावधपणे खेळात उतरते आहे...
It matters...

हां, आपल्याला खुणावणारे असले खेळ शोधायलाच लागतात आयुष्यात. त्यातून सुटका नसते. ते शोधण्याचे रस्ते, त्यातल्या अडचणी, पुन्हा पुन्हा घेरत राहणारी निराशा आणि तिला वारत पुढे चालत राहण्याची आपली मस्ती... मिळेल... पुढच्या वळणावर असेल... असे स्वत:ला समजावताना येणारे वैफल्य आणि स्वत:च्या शहाणपणाबद्दल येणार्‍या रास्त शंका... हे सगळे अपरिहार्यच.

’मोठ्ठं-भव्य-दिव्य’ या गोष्टीच्या व्याख्या मात्र आपल्या आपण ठरवायच्या.
आपला एको पॉईंट आपला आपणच शोधायचा.

What say?

काहीबाही

दोन ब्लॅकाउट्सच्या मधल्या प्रवेशासारखी एक संध्याकाळ!

23:08:00

पावसानं गच्च दाटून अधिकच काळोखी, कातर केलेली संध्याकाळ. आधीच कासावीस वेळ. त्यात ही न कोसळणारी गुदमर. समोर पसरलेला लांबलचक हिरवागच्च शेताडीचा पट्टा. त्याला लागून असलेली जडावलेली गप्प गप्प खाडी. साऱ्याच्या निरंतरपणात भर टाकणारे पार क्षितिजापर्यंत वगैरे जाणारे आगीनगाडीचे फिलॉसॉफिकल रूळ आणि ऐन जुलैचा वेडसर वारा. या सगळ्याला अपुरेपण येऊ नये म्हणून की काय - चक्क चुकार बगळ्यांची एक पांढरीशुभ्र माळ.

सोबतीला एकटेपण. आसमंतात भरून राहिलेलं. कधी कोसळेल अंगावर त्याचा नेम नाही, पण तूर्तास तरी दबा धरून असलेलं. पावसासारखंच काळोखी करून.

आपल्या जिवात नेमकं काय चाललं आहे हे कळण्याची सुतराम शक्यता नसलेली गर्दी पार्श्वभूमीला पसरलेली. आपापल्या क्युबिकल्समधे, आपापल्या फोन्सवर, पीसींसमोर मश्गूल. त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एका काचेच्या दरवाज्याचं अंतर. मागे स्वत:ला कामात बुडवून घेतली इमारत आणि आपण असे वारा अंगावर घेत सज्जात उभे.

मागचं-पुढचं सगळं काही क्षणांपुरतं नि:संदर्भ करून टाकत. काळाच्या मागच्या तुकड्यावर जे घडलं आहे त्याची जबाबदारी खांद्यावर पेलत, येणाऱ्या वाटेवर काय असणार आहे याबद्दल उत्सुक, पण पुरते बेखबर. सावध आणि बेसावधही. पूर्ण त्या क्षणाचे होऊन जाऊ पाहणारे. वर्तमानाच्या सतत धावत्या, निसटत्या तुकड्यावर जिवाच्या कराराने पाय घट्ट रोवून उभे असलेले.

धडधडणाऱ्या निर्दय शहराच्या कुशीत मिळून गेलेली ही शांत-निवांत-जिवंत संध्याकाळ.

यापरता अधिक आनंदाचा क्षण काय असू शकतो?

एन्जॉय...