लग्नामधली गाणी हा बॉलिवुडमधला एक हुकमी एक्का. भरपूर गजरे ल्यायलेल्या, दागदागिन्यांनी मढलेल्या, खिदळणार्या, लाजणार्या , हसणार्या–हसवणार्या खूप बायका, खूप रंग आणि रोषणाई वापरून केलेल्या सजावटी, आणि सनईचे सूर. ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मधल्या ‘तेरी कुडमायी के दिन आ गये’ बघताना त्यातलं करणजोहरीय सौंदर्यशास्त्राला अनुसरून असलेलं, काहीसं बटबटीत, पण तरीही निव्वळ वेगळेपणामुळे टवटवीत वाटणारं रोल रिव्हर्सल जाणवलं आणि एकापाठोपाठ एक गाणी आठवत गेली. त्यातलेही निरनिराळे प्रकार दिसत गेले.
एक प्रकार म्हणजे सरळच लग्न ठरलं आहे, वा उद्यावर वा आत्तावर येऊन ठेपलं आहे, डोळ्यांत स्वप्नं आहेत, मनात उत्कंठा आणि आतुरता, आणि आईबापापासून विरहाचं दुःख. पण मजा अशी, की बॉलिवुडचा स्वभाव हिंदी आणि त्यामुळे उत्तर भारताला जवळचा. त्यातलं विरहाचं दुःख ‘बाबुल का अंगना’ सोडून जाण्याचं. आईला तितकासा भाव गीतकारही देत नाही. ‘बाबुल की गलीयाँ छोड चली’! अर्थात, अगदी माहेराला महत्त्व असलेल्या महाराष्ट्रातही कितीतरी ठिकाणी वधूच्या आईला लग्न बघायचीही परवानगी नसत असे, म्हणताना... ठीकच म्हणायचं! अशा गाण्यांमध्ये विशेषतः नवर्या मुलीवर शुभेच्छांची नुसती खैरात असते. तिला ‘खुशीयाँ’ मिळाव्यात म्हणून ‘दुवाएँ’; तिच्या पदरात चंद्र, तारे; तिचा चेहरा कसा चंद्राच्या तुकड्यासारखा, तिची कांती कशी दुधासारखी, झूमर असं, झुमका तसा, बिंदी अशी, कंगन तसं, हातावर मेंदी कशी, पायातले पैंजण कसे... एक ना दोन. नवर्या मुलीचं काम नुसतं गोरेपान नितळ खांदे आणि कर्दळीसारख्या पोटर्या उघड्या टाकून नाजूक हातांनी हळद-चंदन लावून घेण्याचं नाहीतर पॅसिव्हली साजशृंगार करून घेत, आरशासमोर बसून लाजत, सुंदर दिसत हळूच हसण्याबिसण्याचं. मेंदीला मोठाच भाव. ‘बहनों ने रोशनी कर ली मेहंदी से जला के उंगलीयाँ’ काय किंवा चक्क ‘मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’. साजण येईल तेव्हा त्याच्याकरता तय्यार राहायचं, बस. अॅक्टिव्ह रोलची जबाबदारी पियाच्या गळ्यात घालून या नवर्या मस्त मोकळ्या झालेल्या असतात. डोळ्यांत विरहाचं माफक पाणी, पण मुख्यत्वे तिकडची स्वप्नं. ‘मेरे बन्नो की आयेगी बारात’पासून ‘बन्नो तेरी अखियाँ सुरमेदानी’पर्यंत आणि ‘मेहंदी है रचनेवाली, हाथोंमें गहरी लाली’पासून ‘नवराई माझी लाडाची लाडाची गो’पर्यंत. ‘छलका छलका रे कलसी का पानी’पासून ‘हम तो भये परदेस’पर्यंत. इथल्या सख्यांच्या, आईबापाच्या विरहाचं दुःख आहे. पण त्याला तरी काय इलाज! ‘मैं तो भूल चली बाबुल का देस, पिया का घर प्यारा लगे...’
‘राजी’तल्या ‘उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना’मध्ये याला अपवाद होता. कारण नवरी मुलगी फक्त नवरी मुलगी नव्हती. पण असे अपवाद नियम सिद्ध करण्यापुरतेच. बाकी बहुतेक वेळा ‘साजनजी घर आये दूल्हन क्यों शर्माये’…
यात नवर्या मुलीला शंभरातून पन्नास वेळा तरी ह-म-खा-स बन्नो हे नामाधिधान लावलेलं असतं. मग तिला सल्लेबिल्लेही दिलेले असतात. ते पोक्त आजीबाईछाप सल्ले असतातच. पण फक्त तितकेच असतात असंच काही नाही. ‘देखो बन्नो मान न जाना, मुखडा उनको ना दिखलाना, पहले सौ बातें मनवाना, केहना बोलो, कर के सलामी, बन मैं करूंगा तेरी गुलामी...’ असाही व्यावहारिक वळसा असतो. वास्तविक नवर्या मुलाला तसं परफॉर्मन्सचं किती प्रेशर असतं. नवर्या मुलीला जाऊन निदान पहिल्या रात्री तरी मेलेल्या माशासारखे भाव सलज्ज डोळ्यात घेऊन पुतळा होऊन बसायचं असतं. करायचं ते नवरा मुलगा करणार असतो. पण ज्याला काही करून मर्दानगी सिद्ध करायची असते, त्याचं काय? त्या बिचार्याला सल्लेबिल्ले देण्याची काही पद्धत बॉलिवुडमध्ये नाही.
नवर्या मुलीच्या मनात नुसतीच प्रियाची ओढ असते असंही नाही. शृंगाराची स्पष्ट आतुरताही असते. ‘जिया जले जान जले’च्या शब्दांत उघडच ‘अंग अंग में जलती हैं, दर्द की चिंगारीयाँ, मसले फूलों की मेहक में तितलीयोँ की क्यारियाँ...’ असं होतं, ते काय उगाच? ‘रुकमणी रुकमणी, शादी के बाद क्या क्या हुआ...’ हा त्याचाच एक अवतार. ‘धीरे धीरे खटिया पे खटखट होने लगी...’ यात कल्पनेला वावबीव तरी कुठे आहे?! थेट मुद्द्याला हात!
अलीकडे ‘लापता लेडीज’मध्ये नवर्या मुलीच्या पोटातली अनिश्चिततेची भीतीही सुरेख चितारली होती. ‘आंगन में पेड वहाँ होगा के नही, होगा तो झूला उसपे होगा की नही…’ इथपासून ते नवरा घोरत तर नसेल... इथपर्यंत.
पण कायम सिनेमाची नायिकाच नवरी मुलगी असेल असंही काही नाही. मैत्रिणीच्या नाहीतर बहिणीच्या लग्नात मिरवणारी आगाऊ नायिका आणि हीरोचा तसलाच आगाऊ कारा मित्र – हा बॉलिवुडमधल्या प्रेमकथांमधला एक हमखास ट्रोप. ‘हम आप के हैं कौन’मधली ‘जूते दे दो पैसे ले लो’ तशातलंच.
पण ‘हम आप के हैं कौन’ असल्या गाण्यांची बॅंकच बाळगून आहे म्हणा. लग्नातल्या गाण्याचा कुठलाही प्रकार सांगा, तो त्यात सापडणारच. आगाऊ बहीण आणि भाऊ यांची चेष्टामस्करी आणि पुढे प्रेमात पडायची तयारी? ‘जूते दे दो पैसे ले लो’. नायिकेचंच लग्न आणि नायक विरहानं व्याकूळ? ‘मुझ से जुदा हो कर’. लग्नासाठी उतावीळ लेक? ‘माईनी माई मुंडेर पे तेरे...’ लग्नातली नवरा-नवरींची चेष्टामस्करी आणि दुवाएँ? ‘वाह वाह रामजी’. चावट आणि वाह्यात मस्करी? आहे की. ‘दीदी तेरा देवर’. अगदी गलोलीनं नितंबावर फुलं फेकून मारण्यापर्यंत सबकुछ. विहीण आणि व्याह्यांमधली चेष्टा? काळजी सोडा, तेही आहे – ‘आज हमारे दिल में...’
तर – ‘हम आप के’चं सोडून देऊ!
आपलं स्वतःचं लग्न जमवण्याच्या भानगडीत इतरांची लग्नं मनापासून अटेंड करणारे स्मार्ट लोक बॉलिवुडमध्ये चिकार. ‘हम दिल दे चुके..’मधलं ‘आँखों की गुस्ताखीयाँ..’, ‘कभी खुशी कभी गम’मधलं ‘बन्नो की सहेली रेशम की डोरी’ (पाहा, इथेही बन्नो आहेच!), ‘प्यार तो होनाही था’मधलं ‘आज है सगाई’…. अशी कित्तीतरी गाणी मिळतील. या गाण्यांमधला मूड प्रसन्न, उजळ, रंगीत असतो. नायिका आगाऊ असते थोडी, पण नायकानं थोडी मर्दगिरी केल्यावर तिच्या डोळ्यांत एकदम लाज उमटून जाते. नायकनायिकांना इतर लोक सतत कट केल्यागत एकत्र आणत असतात. कधी तिच्या नि त्याच्या ओढण्यांची गाठ, कधी त्याच्या कुर्त्याच्या बटणात तिची ओढणी, कधी दोघांना एका फेट्याच्या कापडात एकत्र आण… पूरी कायनात दोनों को... असो!
अजून एक प्रकार म्हणजे असफल प्रेम आणि त्याचं वा तिचं लग्न अटेंड करावं लागणं. या सिच्युएशनमध्ये एकट्या राहिलेल्या इसमाला (वा इसमीला) कम्माल म्हणजे कम्माल अॅटिट्यूड आलेला असतो. एकतर ‘माझं काय व्हायचं ते होवो, तुझं भलं होवो’ असा स्वार्थत्यागाचा उमाळा, किंवा मग नुसते अर्थपूर्ण दुःखी टोकदार कटाक्षच कटाक्ष... पॅसिव्ह अग्रेसिव्ह वागण्याची पार हद्द. या प्रकारातलं मूळपुरुष गाणं म्हणजे ‘अजीब दास्ताँ है ये’. आता झालंय ना त्याचं लग्न? मग का उगा त्याच्या हृदयाला डागण्या देतीस बाई? जा ना गप निघून. पण नाही. असं केलं तर ती नायिका कसली! ‘राजा की आयेगी बारात...’ त्यातलंच. ‘तुमबिन जीवन कैसा जीवन’मध्ये बैलगाडीच्या मागून विद्ध-संतप्त चेहर्यानं चालणारा जया भादुरीचा प्रियकर आठवा. किंवा स्वतः मरणार असल्यामुळे प्रेमपात्राला नीटस नवरा गाठून देऊन वर तिला त्याच्या प्रेमात पाडणारा 'माही वे'मधला शारुख. किंवा मग अलीकडच्या ‘सुना है के उन को शिकायत बहुत है’मधली गंगूबाई... काय तो कफन पेहन के कुर्बान होण्याचा भाव... हाय अल्ला!
याचाच एक पोटप्रकार म्हणजे लग्न करायचं, पण मनात मात्र प्रियकर किंवा प्रेयसी. ‘वीर-झारा’तलं ‘मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ...’ किंवा ‘देवदास’मधलं ‘हमेशा तुमको चाहा’. पण ‘देवदास’ सगळाच तसा... पुनश्च असो!
अजून एक खास प्रकार म्हणजे निव्वळ चावटपणा. ‘मेरे हाथों में नौ नौ चूडीयाँ हैं’मधली ‘कल चोली सिलाई आज तंग हो गई’म्हणत धुंद होऊन नाचणारी श्रीदेवी, ‘इश्शकजादे’मधल्या ‘मेरा आशिक छल्ला वल्ला’तला पैजामे से लडते हुए रात बितानेवाला आशिक… ही काही उदाहरणं. ‘रुकमणी रुकमणी’ त्यांपैकीच, आणि लग्नातलं नसलं तरी डोहाळे पुरवता न येणार्या बावळट साजणाची चेष्टा करणारं ‘दीदी तेरा देवर दिवाना’ही त्यांपैकीच. होता होईतो पुरुषांना बघा-ऐकायला मनाई करून खास स्त्रीवर्गाला गोळा करून शृंगारविषयक चावट चेष्टामस्कर्या करणं हा या गाण्यांचा विशेष हेतू.
अशी कितीतरी गाणी निरनिराळ्या कारणांनी लक्षात राहून गेलेली, आवडलेली. पण या ठरीव साच्यांमधली असूनही त्यांना बगल देऊन जाणारी, वेगळेपणानं ठसलेली गाणी अगदी क्वचित.
‘सत्या’तलं ‘सपनों में मिलती है’ त्यांपैकी एक. ते गाणं अगदी मुंबई पद्धतीच्या लग्नाचं आहे. नवरा-नवरी समोर स्टेजवर आणि प्रेक्षक खाली खुर्च्यांमध्ये बसलेले. पुरुष एकतर निवांत बसलेले तरी नाहीतर पार कायच्या काय हालचाली करून ‘नाच’ म्हणायला जड जाईल, असा नाच करणारे. निखळ पुरुषी ऊर्जा. निळाशार सोनेरी बुंदक्यांचा आणि गुलाबी काठाचा शालू नेसलेली शेफाली छाया त्या गाण्यात बघून घ्यावी. काय तिचा चार्म! मागे येणार्या नवर्याला लटक्या रागानं रिकाम्या रिक्षाची उपमा काय देते, मध्येच लाडात येऊन त्याच्या थोबाडीत काय मारते, कमाल लालित्यानिशी ठुमकते काय... ते सगळं गाणं तिच्याभोवती फिरतं. साथीला आशाचा मुरलेला खट्याळ आवाज आणि बॅकग्राउंडमध्ये कुठेतरी स्वप्नदृश्यातली शालीन उर्मिला.
‘बॉम्बे’तलं ‘केहना ही क्या’ वास्तविक प्रेमात पडू बघणार्या नायक-नायिकांचंच. पण मणिरत्नम आणि रेहमान अशा एक सोडून दोन-दोन परिसांचा स्पर्श त्याला झालेला असल्यामुळे ते कुठल्या कुठे गेलं आहे. भित्र्या हरणीसारखी पण अनुरक्त झालेल्या प्रेमिकेची भिरभिरती-लाजरी नजर... तबल्याचा दिलखेचक ठेका... सोनेरी झालरी लावलेल्या झिरझिरीत ओढण्या ल्यालेल्या बायकापोरी… उंचच उंच अवकाश असलेल्या इमारती... आणि स्वप्नील छायाप्रकाशाचा खेळ.‘बधाई हो’मधलं ‘सजन बडे सेंटी’ असंच मजेशीर. त्यातल्या लग्नात वावरणारे नीना गुप्ता आणि गजराज राव चाळिशी-पन्नाशीच्या आसपासचे. पण नीना गुप्ता गरोदर असल्यामुळे स्वतःच्या पौरुषाच्या कामगिरीवर निहायत खूश असलेला गजराव राव तिला नव्याच कौतुकानं न्याहाळणारा. कधी गच्चीवरून खालच्या तिच्याकडे प्रेमभरानं बघणारा, तर कधी जिन्यावरून उतरणार्या पत्नीच्या पूर्ण स्त्रीदेहाचा दिमाख विस्फारल्या, चकित नजरेनं बघणारा. कधी हळूचकन तिच्या पोटाची अलाबला घेणारा. कधी आईची करडी नजर जाणवून गोरामोरा होणारा... त्यातला त्या दोघांमधला चोरटा पण लोभस शृंगार बघताना खूप मजा आली होती, किंचित भरूनही आलं होतं.‘गँग्स ऑफ वास्सेपूर’मधलं ‘तार बिजली से पतले हमारे पिया’ हे अजून एक रत्न. त्याला लोकसंगीताची डूब आहे आणि लग्नातल्या मेहंदी-संगीत समारंभाचा अस्सल ढोलक ठेका. तशा गाण्याबजावण्यात भांड्यावर चमचा वाजवत ठेका धरतात असं स्नेहा खानविलकरला कुणीतरी म्हटलं म्हणून तिनं गाण्यात ‘टटक टटक टटक टटक...’ असे शब्दच चपखलपणे वापरले आहेत. विधवा सासू आणि विधवा थोरली जाऊ नव्या सुनेच्या स्वागतासाठी कौतुकानं गाताहेत, हवेत आनंद आहे, शब्दांमुळे आलेली हलकी मस्करी आहे, हसर्या मुद्रा आहेत... पण सासर्याच्या आठवणीनं कातर झालेल्या सासूला बघून चमकलेली नवी सून बघता बघता तिला सावरून घेते. तिची त्या घराचं होऊन जाण्यातली परिपक्वता आणि पाठीमागच्या गाण्यातल्या सुरातली विद्धता... त्या गाण्यातली मूळ मिश्किली ओलांडून ते गाणं कुठल्या कुठे उंचीवर निघून जातं. हुमा कुरेशीचं कौतुक करायचं, की रिचा चढ्ढाचं, की स्नेहा खानविलकरचं, शारदाबाईंचं की अनुराग कश्यपचं... कळेनासं होतं.मीरा नायरचा ‘मॉन्सून वेडिंग’ लग्नातच घडणारा. त्यातलं दिल्लीकर श्रीमंती लग्न आणि त्यातले नात्यांचे अस्सल भारतीय गुंते लक्षात राहतातच. पण श्रेयनामावली सुरू असताना वाजणारं ‘कावा कावा’ बघताना आपण सिनेमातल्या कंत्राटदाराचं आणि मोलकरणीचं झेंडूच्या केशरी रंगांत न्हालेलं लग्नही आठवून खूश होत राहतो, ही त्या सिनेमाची प्रसन्न खासियत.
ही काही समग्र यादी नव्हे. तशी ती बॉलिवुडबाबत शक्यही नाही. अजून तासभर गप्पा ठोकत बसलो तर अजून अशीच पन्नासेक गाणी आपण सहज काढू शकू. तूर्त ही आवडलेल्या चंदेरी लग्नगाण्यांची आठवण नुसती...
अशीच एक आठवण एकदा पार्टीतली गाणी या प्रकाराची काढायची आहे, एकदा वयात आल्या-आल्या तारुण्यानं मुसमुसून गात सुटणार्या नायक-नायिकांच्या गाण्यांची... इरादे काय, चिकार आहेत. फिर कभी.