ओट्यावरचं पाणी निपटून ओटा काळा नितळ करावा.
निवडून, धुऊन, निथळून घेतलेला चवळईचा ताजा पाला सुरीनं बाऽऽरीक चिरावा.
चिरताना कायच्याकाय आठवत राहतं -
इराणी स्वैपाकघरातलं पालेभाज्यांचा भुस्सा करण्याचं ते मजेशीर चक्रीवालं यंत्र,
खारवलेली लिंबं आणि दह्यात मुरवलेल्या मटणाच्या फोडी घालून एकजीव शिजणारी ती रटरटती भाजी,
तिच्यात बुडवून खायला त्या पावासारख्या, पण मर्यादेनंच फुलून आलेल्या गुबगुबीत खमंग खमिरी रोटीचा तुकडा...
आपण कुठे खाल्लीय ती कधी?
कधीतरी एखाद्दा आसुसून बोललो असू त्याबद्दल.
पण तिचा वास येतो मला एकदम...
कधी चहाचं आधण पुरतं उकळण्याआधीच घाईनं त्यात किसलेलं आलं पडतं.
मग उकळी, झाकण, मुरवण...
सगळं बयाजवार करूनही चहाला आल्याचा वास कसा तो नाहीच येत.
'हं. करा घाई.' असं ऐकूच येतं मला तुझ्या आवाजात.
मग चहा होतो तिखट्ट...
कधी मिक्सरचं भांडं धुऊन पुसून आवरताना
बुडाशी ते पुरतं स्वच्छ वाटत नाही.
मग कितीही दमणूक झाली असली तरी त्याच्याच एका पकडीनं ते सगळं प्रकरण सुटं केलं जातं,
खरवडून, घासून, पुसून..
सगळं लख्ख होऊन जागच्या जागी जातं.
आपलं आपल्याला कौतुक वाटत नसतंच काही.
पण मग कौतुकाची निसटती नजर कुणाची ती?
माझी की तुझी?
कधी कोथिंबीर निवडताना हाताची बोटं हुंगली जातात कुणाच्या नकळत.
'मेहके हुए धनिये का ज़िक्र करनेवाली कविता' आपल्या प्रेयसीसाठी लिहू इच्छिणारा पाश आठवतो पाठोपाठ.
आणि मग -
कोथिंबिरीच्या वासासाठी महिनोन् महिने आसुसणं तुझं.
भास, आठवणी, इच्छा, आणि या सगळ्यांचं एखाद्या पिशाच्चासारखं असण्या-नसण्याच्या सीमेवरचं -
चिमटीत न येणारं, निसटत राहणारं, घायाळ करणारं..
अपुरेपण.
सगळं खदखदत राहतं एकजीव होऊन
माझ्या स्वैपाकघरात.
No comments:
Post a Comment