Wednesday, 28 September 2022

होय, मी हे अजून बघितलं नव्हतं - ४

अमोल उदगीरकरच्या 'न-नायक'चा एक निराळा परिणामही झाला. मधल्या काळात प्रियकरप्रेमभंगमैत्रमैत्रभंग या सगळ्या हार्मोनल भानगडींमध्ये मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघणं या आपल्या अवतारकार्यावरून आपलं लक्ष्य भलतंच विचलित झालं असल्याचा साक्षात्कार झालाअपराधीपण आलं. परिणामी 'न-नायकएखाद्या संदर्भग्रंथासारखं हाताशी घेऊन मी राहिलेले सिनेमे बघायला घेतले. या मालिकेतली टिपणं अशी जुन्याराहून गेलेल्या सिनेमा-मालिकांविषयीची असतील.

~

'त्रिभंग' अंमळ उशिरानंच पाहिला. फार आवडला. 


आधी वाटलं, ही शकुंतलाबाई परांजपे-सई परांजपे-विनी परांजपे-गौतम जोगळेकर अशी गोष्ट आहे की. तेच ते जगाच्या रीतींपल्याडचे बेधडक निर्णय घेणं नि निभावणं. जरा खट्टू व्हायला झालं. सई परांजप्यांचा 'साज' खूप आवडलेला असूनही थेट वास्तवाधारित गोष्ट चितारण्यानं खट्टू व्हायला झालं होतं, तसंच. 'मीच लिहिणार माझं चरित्र. कळू दे सगळ्यांना.' हे सिनेमातल्या लेकीचे विद्ध-संतप्त उद्गार ऐकताना विदुषी इरावतीबाईंच्या सान्निध्यात प्रेमाची तहान न भागलेली गौरी देशपांडे, तिच्या परीकथा, आणि मग तिच्या लेकीचं 'A pack of lies' आठवून खंतावायला झालं. पण हेही फार टिकलं नाही. वाटलं, अरे, ही तर काजोलची, तिच्या आजीची नि आईचीपण गोष्ट आहे. "घरात पुरुष लागतो असं आम्हांला कधी वाटलंच नाही, इतक्या स्वतंत्रपणे आईनं वाढवलं आम्हांला. स्त्रीवादाचं नाव प्रत्यक्ष न उच्चारता!" हे काजोलच्या एका मुलाखतीतले उद्गार आठवून वाटलं, किती-किती प्रकारे जवळची वाटली असेल ही भूमिका हिला! हे वाटतं न वाटतं, तोच शांताबाई गोखले आठवल्या. त्यांचं निष्ठेनं नि व्रतस्थ असल्यासारखं, एका निखळ intellectual गरजेतून लिहिणं. त्यांचे घटस्फोट. अरुण खोपकरांसारख्या कलावंताशी असलेलं अल्पकाळाचं नातं. रेणुका शहाणेची कारकीर्द, तिचा घटस्फोट, आशुतोष राणाशी लग्न करून त्याला 'राणाजी' संबोधणं नि डोक्यावर पदर घेऊन हौसेनं वावरणं. 

एकाएकी चमकल्यागत लक्ष्यात आलं, ह्या सगळ्या छटा आहेतच त्या गोष्टीत. या सगळ्या स्त्रियांच्या गोष्टी पोटात घेऊन ही गोष्ट साकारली आहे. त्यातले पुरुष निमित्तमात्र आहेत, साहाय्यक भूमिकेत आहेत, वा परीघावर तरी. कारण ही गोष्ट आपल्या मर्जीनं, वेळी चुकीचे, पण स्वतंत्र निर्णय बेधडकपणे घेणाऱ्या, नि आपल्या नात्यांची नि चाकोरीबद्ध सुरक्षित जगण्याची किंमत चुकवून ते धडाडीनं निभावणाऱ्या सगळ्याच मनस्वी, कर्तृत्ववान बायांची गोष्ट आहे. 

रेणुका शहाणेचं अभिनंदन. 

#त्रिभंग

Tuesday, 27 September 2022

दिवस

फांदीवरून पाखरू निर्ममपणे उडून गेलं, 
तरी डोळ्यांना धारा लागण्याचे दिवस.

उन्हाळलेल्या दिवसांमधले दमदार सोनेरी रंग... 
कुठून मागे राहावेत, सांग.
सांग, कशी आठवावी दयाळाच्या शुभ्र पिसाची जादुई रेष,
कशी ओलांडावी मनानं पागोळ्यांची पोलादी वेस?
कुठून कशा तुरतुराव्यात नाचऱ्या खारी छपरांवरून?
कावळ्यांच्या स्मार्ट स्वाऱ्याही न थबकताच निघून जातात दारावरून.
आभाळ उन्हाविना उदास, गच्च, ओथंबून.

सांग, कधी संपतील हे बोचऱ्या, गप्पगार वाऱ्यांचे दिवस?
फांदीवरून पाखरू निर्ममपणे उडून गेलं, 
तरी डोळ्यांना धारा लागण्याचे हे लांबलचक दिवस.

Friday, 16 September 2022

कितीही असोशीनं

कितीही असोशीनं, 
कसोशीनं,
पागोळीखाली पावलं पुन्हापुन्हा नितळून घेत,
स्वच्छ मनानं हात हाती धरू पाहिले, 
तरीही अखेर -
रस्ते आपले आपल्यालाच चालायचे असतात.
कुणीही झालं, 
कितीही झालं,
तरी आपल्या प्राणांवर नभ धरू शकत नसतं कधीच.
अखेर मुक्काम आपले आपल्यालाच ओळखावे लागतात.
सोडावेही.