Saturday, 28 May 2022

पुढचं सोपंय.

आपल्या गंडांमध्ये गुरफटून, 
जखमा चाटत
एखाद्या अंधाऱ्या गुहेत दडून असतो आपण,
फुंकर घालायलाही कुणाला आसपास फिरकू न देता,
डोळ्यांत तेल घालून
स्वतःच स्वतःभोवती गस्त घालत,
तेव्हा
जगात वाजतगाजत वाहत असतात
मिरवणुका आणि कार्निव्हलं आणि वराती, 
पेट्रोमॅक्सच्या बत्त्या, दहा-दहा हजारांच्या माळा, गुलालाचे हत्तींएवढाले ढग, आणि काळीज हादरवणाऱ्या डॉल्बीच्या भिंती चालवणाऱ्या डान्सेश्वरांसकट.
त्याच वेळी 
एक शून्य शून्य डायल करता यायला हवा.
बास.
मग पुढचं सोपंय.

Wednesday, 25 May 2022

ऋषीला सलाम...

त्याचं सहज वावरणं, अभिनय न भासणारा अभिनय त्याच्या रूपापुढे झाकोळून गेल्याची जी भावना शशी कपूरच्या जाण्यानं सर्वत्र व्यक्त झाली, तिनं मी दचकले. ऋषी कपूर हा माझा फार लाडका नट. त्याच्या कामाबद्दल आपण कधीच काही बोलत नाही हा माझा जुना सल. आता तोही व्यक्त करायला आपण त्याच्या जाण्याची वाट बघत बसणार का काय, असं मनात येऊन दचकायला झालं. म्हणून -

'दामिनी' आठवतो संतोषीचा? निरनिराळ्या कारणांनी चर्चा होते त्यावर. घणाघाती संवाद, मीनाक्षीचा भावखाऊ अभिनय, बलात्कारित महिलेवर व्यवस्थेकडून होणारा अन्याय, सिनेमाचं तत्कालीन बोल्डपण... पण ऋषी कपूरबद्दल कुणीच बोलत नाही. काय सहज, बोलका वावर आहे त्याचा त्यात. सुरुवातीची उत्साही, तरुण, दामिनीकडे ओढ घेणारी देहबोली; आणि पुढे घरातल्या परिस्थितीपुढे हळूहळू खचत, शरमत, निराश होत जाणं; प्रतिष्ठा आणि मूल्य यांतल्या द्वंद्वात अनिश्चित होत जाणं; आणि शेवटी कोर्टातल्या प्रसंगात "मैं कसूरवार हूं, गुनहगार हूं." या निःसंदिग्ध, ठाम कबुलीपर्यंत पोचणं... काय प्रवास रेखाटलाय या इसमानं! झुकते खांदे, विझलेले डोळे ते थेट सनीसारख्या सांडावर गुरकावण्याची हिंमत राखणारा संताप, दामिनीबद्दलच्या प्रेमातून आलेला. पार्श्वभूमीला सतत त्याची श्रीमंत, उच्चभ्रू, क्लासी अकड. कमीजास्त होत राहणारी, पण सतत असलेली.

मी दर वेळी या व्हर्ल्नरेबल माणसाच्या प्रेमात पडते सिनेमा बघताना. अशा किती भूमिका सांगाव्यात? त्याच्या गुलाबी-गोऱ्या गाजरकायेपल्याड जिवंत, निमिषार्धात झर्रकन भाव पालटणारा, अभिनयाचा वासही येऊ न देता सहज अभिनय करणारा एक जातिवंत नट कायम दडलेला दिसतो. खाडकन दर्शन देऊन चकित करतो आणि पुन्हा आपल्या चिकण्या चेहऱ्याआड लुप्त होतो.

त्यानेच कुठल्याशा नृत्याच्या कार्यक्रमात म्हटलं होतं मागे, "नाच काही फक्त हातापायांनी करायचा नसतो. चेहराही नाचात सामील असला पाहिजे..." किती खरंय हे या माणसाच्या बाबतीत! नव्वदीतल्या कितीतरी नृत्यगीतांमधला ऋषी कपूरचा चेहरा मिटवून पाहा, गाण्याचं काय होतं ते. गाण्यातली जान निघून, विझून जाते क्षणार्धात!

आपल्या सेकंड इनिंगमध्ये सुदैवानं ऋषीला चिकणेपणापलीकडे जाणाऱ्या भूमिका मिळताहेत. पण म्हणून त्याच्या ऐन देखणेपणातल्या कारकिर्दीवर अन्याय होता नये. शेवटी 'नटसम्राट'सदृश भावखाऊ व्यक्तिरेखांमध्ये अभिनय करतातच भले भले नट. पण ज्या भूमिकांत अभिनयाला भाव खाण्याची अजिबात संधी नसते अशा साध्यासरळ नाचगाणी-पळापळी कामांत वावरूनही आपल्यातला नट जपलेल्या ऋषीला सलाम. वेळ निघून जाण्यापूर्वी...



(शशी कपूर गेल्यानंतर लिहिलेली पोस्ट. आता ऋषी कपूरही गेलाच. :()

कायमचे सिनेमे

खूप सिनेमे आवडतात. सिनेमे खूप आवडतात. पण कधीही कुठूनही मधूनच बघायला घेऊन मज्जाच येईल असे सिनेमे मोजकेच. असे सिनेमे आपल्याला कित्तीही जवळचे असले तरी सिनेमे म्हणून लई भारी असतील, असं नाही. पण आपण त्यांच्यासह वाढलेले असतो, लागेबांधे असतात, त्यांतल्या पात्रांशी जुळलेलं असतं काहीतरी. त्यामुळे ते जवळचे. असे दहाच निवडायचे झाले, तर मी कुठले निवडीन?

विचारही न करता पहिला आठवतो, तो 'दामिनी'. त्यांतले संवाद मी उलट सुलट पाठ म्हणू शकते, वाकवू-वापरू शकते. भाबडा न्याय असूनही त्यातल्या कितीतरी प्रसंगी थोडंसं भारी वाटतंच. वस्त्रहरणप्रसंगी सभेतल्या दिग्गजांकडे न्याय मागणाऱ्या कृद्ध द्रौपदीची आठवण करून देणाऱ्या न्यायालयातल्या चित्रचौकटी खिळवून ठेवतात. भाव खाऊन जाणाऱ्या मीनाक्षी-सनी यांच्याइतकाच सूक्ष्म, बोलका, जिवंत अभिनय करणाऱ्या ऋषी कपूरचं, कुलभूषण खरबंदांचं, अंजन श्रीवास्तव-सुलभा आर्य-रोहिणी हट्टंगडी यांचं जाम कौतुक वाटतं. आणि मुख्य म्हणजे ठरावीक काळ हा सिनेमा बघून उलटला, की मला त्याची आतून आठवण व्हायला लागते!

तर हा माझा पहिला सिनेमा. दामिनी.

 


'गोलमाल है भाय सब गोलमाल है, टॅड्यॅव्...' वाजायला लागतं आणि 'हेराफेरी'तल्या त्या सीनमधल्या नटांच्या ॲंटेना आपसूख बाहेर येतात! याला गाण्यानं कमावलेली पुण्याई म्हणतात.अशी पुण्याई कमावून मेटा होण्याचं नशीब फार कमी सिनेमांना लाभतं. 'गोलमाल' त्यांतला एक. त्यातल्या जमून आलेल्या उत्पल दत्त + अमोल पालेकर या अद्वितीय रसायनाबद्दल काहीही नि कितीही म्हटलं तरी म्हणण्यासारखं काहीतरी उरेलच. 'आनेवाला पल'सारखी नितांतसुंदर गाणी, 'लडकी दहीवडा खानेसे इन्कार कर रही है?'सारखे टोटल अर्थहीन संवादही अजरामर करून जाण्याची ताकद असलेली संहिता, पात्रांना शोभून दिसणारं नि दीर्घकाळ लक्ष्यात राहणारं नेपथ्य, दरवाज्यात इकडून तिकडे झुलून मोक्याच्या वेळी दार अडवणाऱ्या नि मुळ्याचे पराठे खायला घालून ठार करू शकणाऱ्या अगडबंब आत्यासारखी पात्रं... काय नाहीय 'गोलमाल'मध्ये? वर लखीच्या शोधात घरभर संतापानं वाघासारखं फिरता-फिरता फुलदाणीतली फुलं उचलून त्यात बघण्याची उत्पल दत्तांची स्फोटक ॲडिशनही आहे! हा सिनेमा पाहिला, नि झोपाळ्याच्या कडेशी कुल्ला वाकडा करून बसायच्या तयारीत राहणारे बिचारे उत्पल दत्त आणि हरामखोर सफाईदारपणे झोपाळा झुईंकन मागे नेणारी दीना पाठक बघून हसता-हसता माझा मूड जादूची कांडी फिरल्यासारखा सुधारला नाही, असं अद्याप एकदाही घडलेलं नाही.

 


सहसा लहानपणी पाहिलेल्या सिनेमांची छाप पुसली जात नाही. पण 'खोसला का घोसला' हा त्याला अपवाद. तो पुष्कळ उशिरा पाहिलेला असूनही पुन्हापुन्हापुन्हापुन्हा बघण्याइतका आवडला, आवडतो. 'नॉट अ पेनी मोअर...'ची सदाबहार गोष्ट. पण काय भारतीयीकरण केलंय! घरातल्या तरण्याताठ्या पोरांच्या अंगाला उलटत्या दिवसांनिशी आक्रसतं होऊ लागलेलं घर. तसाच आईबापाचा धाकही आटू लागलेला. बापाचं सगळ्यांना जागा करून देईलशा मोठ्या घराचं स्वप्न - भारतातल्या यच्चयावत मध्यमवर्गीय बापांनी रिटायरमेंटकरता पाहिलेलं. पण एक एजंट बापाची जन्माची कमाई लुबाडतो आणि पोरं आईबापाच्या पुन्हा जवळ येतात. नाना खटपटी करून टोपी घालणाऱ्यालाच टोपी घालतात! या सगळ्यांत फुकाचा भावुकपणा नाही. लहानशाच पण जोरकस फटकाऱ्यांनिशी रेखाटलेल्या खणखणीत व्यक्तिरेखा. कमालीचं डिटेलिंग. संवादांत जब्बरदस्त पंचेस. लक्ष्मणच्या कॉमन मॅनचं वास्तवचित्र असावं असा अनुपम खेरचा खोसला लक्ष्यात ठेवावा, की दारूच्या नशेत आपल्याच शानदार बंगल्याच्या बागेच्या कडेला जाऊन धार मारणारा बोमन इराणीचा असंस्कृत खलनायक लक्ष्यात ठेवावा? की जन्मभर दारिद्र्यात निष्ठेनं नाटक करणाऱ्या नटाच्या हाती अकल्पितपणे अमाप पैसा आल्यावर त्याला फुटलेला घाम जिवंत करणारा नवीन निश्चल? छे! तारांबळ उडते..

 


जुळ्या भावंडांच्या अदलाबदलीचा क्लासिक ट्रोप. पण काय एकेक ॲड-ऑन्स आहेत त्यात! रजनीकांत-अंजू आणि रजनीकांत-मंजू यांच्यातले यच्चयावत सीन्स छप्परतोड आहेत, मुद्राभिनय आणि टायमिंग या दोन्हींत. नि लेखन. अहाहा! 'मैं मदिरा नही पिती जी' काय, किंवा 'मेरा घर कहाँ है, यहाँ है' काय; वर 'आज संडे है, तो दिन में दारू पीने का डे है' बोनस. 'छोडो ना.. छोडो ना...' म्हणून नौंटकी करून, सनीनं सोडून दिल्यावर वर शहाजोगपणे 'ये क्या? छोड दिया?' असं कंप्लीट हरामखोरपणे सुनावणारी श्रीदेवी. खरोखर श्रीदेवीनंच केलेला धन्य मेकप मिरवणारी हट्टंगडींची द ग्रेट अंबा, अन्नू कपूरचा दीनवाणा नोकर, बत्तिशीवरून जिवणी खेचत बोलणारा अनुपम खेर, नि ऑफकोर्स 'बल्ल्मा'वाला शक्ती कपूर. बाकी कुठल्याही जुळ्यांच्या सिनेमात न आलेली धमाल मला अजुनी 'चालबाज' बघताना येते, त्यात लेखन आणि अभिनेते आहेतच. पण खरी हुकुमाची राणी आहे, ती बदमाशीचे नाना विभ्रम आणि कारुण्याची देहबोली सहजगत्या चितारून जाणारी श्रीदेवी. तिला काढा, गतप्रभ झणी... असो!

 


चाची चारसोबीस. 'वो, जो निली चड्डी लिये खडा है, वो? फिकर मत करो, उसको वो होगी नही', 'ब्लाउज गिरा तो इतनी आवाज?-ब्लाउज में मैं थी ना!', 'यही है ना आप के केहने का 'फुल्ल्ल' मतलब?', 'अनारकली की तऱ्हा अंगडाई क्या लेता है बे?', 'चाची बिक रही है? मुझे किसीने बताया नही?', 'इसमें छेद कर के, नली डाल के पीना', 'चाची सार्वजनिक शौचालयमें स्वयंवर रचा रही थी', 'फॉर्टीएटसी? साइज है या बस का नंबर?'... असले एकाचढ एक, वेळी अश्लीलपणाच्या रेषेवर थबकलेले, गुलजारचे संवाद. द ग्रेट तब्बो. 'एक वो पल भी थे...'सारखं रेखाच्या आवाजातलं खल्लास गाणं. ओमपुरी-अमरीशपुरी-नाझर-जॉनीवॉकर-परेश रावल.... कमलाहसनच त्यांच्यापुढे अंमळ बटबटीत वाटतो. पण पोरीसोबतच्या सीन्समध्ये काय रंग भरलेत त्यानं!

अहाहा. कितीही वेळा बघू शकीन.


'विरासत', 'वेन्स्डे', 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'बावर्ची', 'परिचय', 'घायल', 'भेट', 'कमीने', 'हुतुतू', 'हेराफेरी', 'अशी ही बनवाबनवी', 'सवत माझी लाडकी', 'एक डाव धोबीपछाड', 'वास्तुपुरुष', 'प्रिटी वुमन'... अशा कितीक सिनेमांवर लिहायला मजा आलीस्ती. पण साचा व्हायला लागेल की काय, या भीतीनं थांबत्ये. एक साक्षात्कार झाला. प्रेमकथा किंवा विनोद आवडतो, पण त्यांपेक्षाही अन्यायाचं निवारण हे सूत्र असलेले सिनेमे पुन्हा पुन्हा पाहायला फार आवडतात मला. त्याकरताच फक्त अमिताभचा डबल रोल असलेल्या 'आखरी रास्ता'वर टिपण लिहायचा मोह झाला होता. आवरला. 'अंदाज अपना अपना' हा अनेकांचा आवडता सिनेमा मला आवडत नाही, यावर शिक्कामोर्तब झालं. 'जाने भी दो..' आवडतो खरा. पण आपण फक्त दोनदाच पाहिलाय, हेही ध्यानात येऊन अचंबा वाटला. अतिशय अतिशय अतिशय आवडतात, पण पुन्हा पाहायची हिंमत होत नाही, असेही अनेक सिनेमे असल्याचं लक्ष्यात आलं. 'सैराट', 'मसान', 'शिंडलर्स लिस्ट', 'मासूम'... ही काही उदाहरणं...

या खोसाठी विचार करायला मजा आली एकुणात.

 

नॉस्टाल्जिया

'लोकसत्ते'च्या गुरुवारच्या 'रंगतरंग' पुरवणीत एक सदर असे. एखादं आडवाटेचं सिनेगीत, त्याचं चित्रण आणि सूर, शब्द आणि अभिनय यांबद्दलचं रसग्रहण. जेमतेम दोन-अडीचशे शब्द. एखादा फोटो. त्या सदराची फार आठवण झाली. फारदा. म्हणून.

‍~

अजून नायक-नायिकेत प्रेमाचा इजहार व्हायचाय. आकर्षणाचा एक दिसे-न दिसेसा धागा तेवढा आहे. पण सुंदर नि तरुण असले, तरी नायक-नायिका तसे सुटवंग नाहीत. नायकावर दिवंगत बहिणीच्या तीन पोरांची जबाबदारी अचानकच येऊन पडलीय. नायिका श्रीमंत बापाकडून पळून नायकाकडे चक्क गव्हर्नेस म्हणून राहिलेली. एखादं वत्सल कुटुंब असावं तसं त्यांचं योगायोगानंच जमून आलेलं युनिट.

गाण्यात हे सगळं दिसत राहतं. पोरांसकट नायक-नायिकेनं केलेली धमाल. पावसात भिजणं. खेळणं. भटकायला जाणं. शेकोटीभोवती गाणी गाणं... आणि त्याच्या पृष्ठभागाशीच दोघांमधलं हे आकर्षण. त्यांच्यातला सेक्शुअल टेन्शनचा अवघडलेपणा, चोरटे कटाक्ष, ते पकडले गेल्यावरचा अवघडलेपणा आणि स्वतःशीच फुटणारं बारीकसं हसू, मनोराज्यं आणि त्या मनोराज्यांच्या फॅण्टसीची जाणीव... हे सगळं या गाण्यात आहे. त्याला खेळकर, हलक्याफुलक्या, मस्तीखोर वातावरणाचं सुरेखसं आवरण आहे.

नुकत्याच एखाद्या मस्त पिकनिकची सुरुवात झाली असावी नि त्या सकाळच्या तासातच पुढच्या मजेची चुणूक जाणवून फुलारून जायला व्हावं तसं हे गाणं. पॅशनचं टोक न गाठणारं. सकाळच्या कोवळ्या उन्हाच्या प्रहरातलं.

~

काही गाणी आपल्याला निखळ नॉस्टाल्जियापोटी आवडतात, पण आता चारचौघांत बघायची वेळ आलीच तर लाजल्यासारखं होतं. ‘जाती हूं मैं’ हे तशातलं गाणं. बिछान्यात करायच्या गोष्टी दाखवू शकत नसल्यामुळे त्या जागी गाण्याचा वापर करायचा ही हिंदी सिनेमाची लाडकी ट्रिक त्यातही आहे. पण असल्या इतर गाण्यांपेक्षा हे गाणं चार पावलं पुढेच आहे. तसे त्याचे शब्द प्रामाणिक आहेत. ‘खुद पे नही है भरोसा’, ‘जादू तेरे जिस्म का’, ‘कदम बहक जायेंगे’ वगैरे वगैरे नायक-नायिका दोघंही सुरुवातीपासून सांगत असतात. पण दुर्दैवानं दृश्यांवर मर्यादा असतात. त्यामुळे गाण्याच्या कोरिओग्राफरवर नि कॅमेरामनवर भलतीच मोठी जबाबदारी येऊन पडल्याचं जाणवतं. गुदगुल्या, कढीची पाळ फुटली रे फुटली, शिवाशिवी, कॅच-कॅच, ठो दे रे ठो दे रे, लंगडी इत्यादी खेळांचा त्यांनी फार कल्पक वापर केलाय. पण तरी त्यातल्या नाचाच्या काही स्टेप्स आणि कॅमेर्याच्या पोझिशन्स बघून दचकायला होतं. उदा. २ मिनिटं ११ सेकंदांनी काजोल आडवी झोपते, समोर शारुख. काजोलच्या पायांशी कॅमेरा आणि ती झोपेत आपण गुडघा पोटाशी घेतो तसा घेते, पुन्हा सरळ करते. क्षणभर आपण बिचकतो. आगं, आगं! च दिसेल की! पण तिला प्रेमाचा ताप नीट चढलेला असल्यामुळे तिचं आपलं चालूच. मग कळतं, ओह. ही स्टेप आहे होय नाचाची. ३ मिनिटं १३ सेकंदं. आपण नाकात बोट घालून हळूच बेंचच्या खाली पुसून टाकायचो, तशी एक अॅक्शन शारुख करतो. हे मागे-पुढे करत चांगलं तीनदा पाहिल्यावर कळतं, तो ओठांवर बोट टेकून त्या बोटाची पापी काजोलला देत असतो. ३ मिनिटं २३ सेकंदांनी काजोल शारुखच्या जाकिटात डोकं खुपसते. बरं, खुपसते तर खुपसते. कॅमेर्याचा अॅंगल? तिच्या कमरेपाशी? अं? माणसानं सोसायचं म्हणजे तरी किती? इतक्यानं संपलं नाही. ज्या तबेल्यात हे गाणं घडतं, त्यात ओठांचा एक भला मोठा चंबू डकवलेलं एक होर्डिंग शेवटच्या कडव्यात अवतरतं आणि दोघे त्याच्यासमोर नाचतात. मग शारुख वरून खाली पडतो आणि पालथा पडून फक्त कुल्ले वर करणे, खाली करणे इतकंच करतो. वेळ ४ मिनिटं ४७ सेकंद. राजेश रोशनची ठसकेबाज चाल आणि शारुख-काजोलसारखे जिवंत लोक पडद्यावर असतात, म्हणून का हे आपण सोसलं असेल असं आता मनाशी येतं. पण गाणं मात्र सकाळी ऐकलं की दिवसभर तोंडात राहतंच!

~

हे गाणं जाम सुपरडुपर हिट होईल अशी निर्माता-दिग्दर्शकाचा होरा होता म्हणे. पण ‘बडी मुश्किल है’च खूप गाजलं आणि हे बाजूला राहिलं. पण अनेक अर्थांनी जमून आलेलं गाणं आहे हे. एकतर माधुरीचा जामानिमा. हिरवीकंच चुनरी आणि तपकिरी रंगाचा लेहंगा. त्याचा देखणा घेर आणि चुण्या. नि कहर म्हणजे माधुरीचा मुद्राभिनय. ‘हात-पाय-धड इत्यादी गोष्टी नाचात नंतर येतात, खरं नृत्य असतं ते या वीतभर चेहर्यावर’ असं मागे एकदा ऋषी कपूर कुठेसा म्हणून गेलाय, त्याची आठवण येते हा नाच पाहताना. काय विभ्रम उमटतात बाईच्या चेहर्यावर. ‘जोराजोरी’ करणार्या याराचा धटिंगणपणा, लटका नकार, त्या जबरदस्तीबद्दल मनापासून उमटलेला आनंद आणि त्याबद्दलची लाज, पण त्याबरोबरीनं खट्याळ मिश्किली... आणि या भावांना चपखल हस्तमुद्रांची जोड. प्रचंड उर्जा, फेसाळत्या तरुण नदीचा ओघ, बघणार्यावर भूल टाकणारं भावदर्शन. माधुरी या गाण्यात अक्षरशः जादू करते. खरी भारी गोष्ट म्हणजे, या गाण्यात माधुरी आहे, पण ‘बघा बघा, मी नाचत्ये, माझा नाच बघा...’ असा आविर्भाव मात्र तेव्हाच्या तिच्यात जन्मायचा आहे. ते तिच्या नाचात दिसतं. अहं, ती नाचते नेहमीच सुंदर, आत्मविश्वासानंच. पण या नाचात सहजता आहे, अभिनिवेश नाही. या गाण्याच्या हाताळणीतही माधुरी ‘लार्जर दॅन सिनेमा’ होऊन बसलेली दिसत नाही. ती सिनेमाच्या गोष्टीतलं एक समरसून गेलेलं पात्र आहे. तिचा नवरा असलेला दीपक तिजोरी आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा खलनायक शारूख खान, दोघेही या गाण्यात दिसतात. शारूख तर जवळजवळ माधुरीइतकंच फुटेज खातो. पण त्याचा तिरशिंगराव चेहरा नाही लक्ष्यात राहत. लक्ष्यात राहतो तो दीपक तिजोरीभोवती रुंजी घालणार्या माधुरीचा सहज वावर. तोही पठ्ठ्या ‘हो मग, नाचतेच माझी बायको सुंदर! पण तिची राखण करण्यात माझा पुरुषार्थ सामावलेला नाही.’ हे ठाऊक असणार्या माणसासारखा सहज आत्मविश्वासानं वावरतो. त्याच्या आणि माधुरीच्या दोनचारदाच होणार्या मोहक नजरानजरीत या गाण्याचा आत्मा आहे. असं वाटतं, विजेसारख्या लवणार्या नि सगळं पणाला लावून शृंगार उधळणार्या या नृत्यांगनेच्या नृत्याचं सगळं सार्थक या तिनं निवडलेल्या पुरुषाच्या एका नजरेत आहे... बाकी सगळं झूठ.

~

वास्तविक मला 'अंदाज अपना अपना'चे कढ येत नाहीत, तसंच यातल्या चाली म्हणे ओपीच्या गाण्यांवर डल्ला मारून केल्यात, म्हणून मला फारसा त्रासही होत नाही. ओपी माझ्या नॉस्टाल्जियाचा भाग नाही, पण 'अंदाज अपना अपना'तली गाणी मात्र आहेत. त्यातल्या सगळ्या गाण्यांना विलक्षण साधासोपा गोडवा आहे, तसाच त्यातल्या सगळ्या पात्रांनाही. या गाण्यात आमीर आणि सलमान या दोघांनाही रवीनाला पटवण्यात रस आहे. पण रवीना आणि करिश्मांनी आपापली टारगेट्स नक्की करून घेतली आहेत! अशा खास फिल्मी गोंधळातलं हे गाणं. त्यातल्या करिश्माची नखं नि ओठ गुलाबी रंगाच्या एकाच छटेनं रंगवलेले बघून थोडं क्रिंज व्हायला होतं, पण तिच्या वळवून घातलेल्या 'डबल वेण्या' नि त्यावरच्या लाल रिबिनी, तसंच सलमान खानवर चढायची बाकी असलेली खास सलमानखानी उद्दामपणाची झिलई... हे सगळं क्यूटही वाटतं. गाणं प्रेमिकेला आळवणारं असलं, तरी त्यातला रोमान्स 'हॉट' वा व्याकूळ नव्हे. त्यात कमाल खेळकरपणा आहे. लहान मुलांची ढोलकी गळ्यात घेऊन, चिवट्याबावट्या रंगाच्या शर्टात सलमाननं मारलेल्या माकडउड्या, आमीरनं नाइटड्रेसला मॅचिंग घातलेली सांताक्लॉजी टोपी आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या भावांसह त्या टोपीचं टोकही फुलारणं वा मरगळणं, करिश्माच्या तोंडच्या शब्दांवर रवीनानं केलेला लाडिक मूकाभिनय, सिनेमातल्या खलनायकांनीही गाण्याच्या ठेक्यावर धरलेला ताल, आणि करिश्माच्या सगळ्या नृत्यमुद्रांना असलेली शाळकरी निरागसपणाची डूब. या सगळ्यानं ते गाणं अतीव भाबडं आणि गोड होऊन गेलं आहे.

~

इतका देखणेपणा आवडतो तिचा, तर तिला कॅलेंडरवर छापा, सिनेमात कशाला, हे सोनाली बेंद्रेच्या अभिनयहीन सौंदर्याबद्दलचं माझं मत 'सरफरोश'नं मला इंचभर मागे घ्यायला लावलं, अशी तिची गोष्टीतली पूरक भूमिका. तिचा तो उतावळा, बडबडा स्वभाव या गाण्यात अचूक दिसतो. पावसाळ्यातलं एस्सेलवर्ल्ड, सोनालीचं लक्ष्य नसताना तिच्याकडे बघून हळूच दिलखेचक हसणारा आमीर, आणि ते न कळल्यानं त्याला हर तऱ्हेनं प्रेमाचे इशारे देणारी बिचारी सोनाली. तिचं हताश होणं, तरी न थकता त्याला मस्का लावायला बघणं, त्याच्या वागण्यातले इशारे जोखून धीटपणे त्याच्या गळ्यात पडणं, आणि सरतेशेवटी त्यानं पत्ते ओपन केल्यावर हातातल्या लाह्या भिरकावून देत भाव न खाता धाडदिशी त्याला मिठी मारणं.. अशा हिंदी सिनेमातल्या शालीन नायिकेसाठी तौबा-तौबा ठरवलेल्या गोष्टी ती करते, तेव्हा ती कमाल चिकणी दिसते. आमीरच्या गालाची पापी एका लहान मुलाकरवी घेववून त्याला स्कॅण्डलाइज् करणारा तिचा खट्याळ नि मग खट्टू चेहरा लक्ष्यात राहतो. 'होशवालों को'मधला टेक्स्टबुक क्लासिक रोमान्स या गाण्यात नाही. उलट या गाण्यात आमीर स्कार्फमध्ये नाक शिंकरतो, डेलियाचं एक नाजूक फूल चावून खातो, प्रेमिकेनं प्रियकराला मारलेल्या चपराकी बघून प्रेमापासून पळून जाण्याचा आव आणतो... सिनेमाशी फटकून नसलेलं, आपलं स्वतःचं कथानक असलेलं, पात्रांचे स्वभाव अधोरेखित करणारं हे गाणं अजूनही बघावंसं वाटतं खरं.

~

गाणं सुरू होण्याआधी दोनेक मिनिटं या गाण्याची नांदी चाळीखालच्या नाक्यावरच्या टपरीवर घडताना दिसते. तीत या गाण्याची अर्धी गंमत आहे. वाळलेलाच टॉवेल वाळत घालायला बाल्कनीत येणार असलेल्या नायिकेपासून ते नायिकेनं कठड्यावर वाजवलेल्या 'धिनकधिन्धा-' या तबल्याच्या बोलांपर्यंत, आणि नायिकेच्या बापाच्या निरुपद्रवीपणापासून ते नायिकेनं फेकलेल्या फ्लाइंग किसचा झेल नायक कसा 'अझरसारखा' पकडेल इथपर्यंत... ही सगळी भविष्यवाणी नाना पाटेकरचं वल्ली असलेलं पात्र टपरीवर बसल्या-बसल्या अचूक वर्तवतं, त्याबरहुकूम सगळं यथासांग घडतं, आणि एखादा क्यू मिळावा, तसे गाण्याचे बोल उमटतात – ‘सर्दी खॉंसी ना मलेरिया हुआ, ये गया यारों इस को, लव्ह लव्ह लव्ह – लव्हेरिया हुआ’! एखाद्या नाटकाच्या कविमनाच्या सूत्रधाराला शोभेलशा भूमिकेत नाना पाटेकर 'थोडासा रूमानी'त दिसला होता, त्यानंतर यात. मग पुन्हा दिसला, तो थेट सात वर्षांनी ‘हुतुतू’मध्ये. ‘लव्ह, लव्ह, लव्ह’ या शब्दांवर त्यानं केलेली धडधडत्या हृदयाची हस्तमुद्रा डोक्यात घट्ट रुतून राहिली तोवर. गरीब वस्तीत नायक, नायिका आणि त्यांचे आप्त राहत असावेत हे ज्या सिनेमांमध्ये दिसलं, त्या सिनेमांच्या अखेरच्या फळीपैकी हा सिनेमा. पुढे अझीझ मिर्झांच्या सिनेमातले नायकही अधिकाधिक उच्चमध्यमवर्गीय होत गेले. ‘नुक्कड’छाप चाळ आणि बैठ्या घरांची गरीब शहरी वस्ती हिंदी सिनेमातून अंतर्धान पावली. एका सहृदय, गरीब, मुस्लीम चहावाल्यासकट परिपूर्ण अशा त्या वस्तीचे अवशेष या गाण्यात दिसतात. जूहीचा तो पिवळाधम्मक, फुग्याचे हात असलेला प्लेन ब्लाउज आणि तपकिरी रंगांची बारीक नक्षी असलेला घेरदार स्कर्ट यांची त्या काळात फॅशनच आली. शारूख मात्र तत्कालीन स्ट्रगलर नायकांसारखा फॉर्मल शर्टात, हातात ‘इंटर्व्यू’साठीची फाईल घेऊन. पण या वेशभूषांपेक्षाही लक्ष्यात राहिले, ते दोघांचेही कमालीचे फ्रेश, कोवळे, अनाघ्रात चेहरे. त्यांचं कोवळं प्रेम, सगळ्या वस्तीनं त्या प्रेमाचा उत्सव मनवणं, त्यांनी घटकेत लाजणं-घटकेत एकमेकांना बाहुपाशात घेणं-पुन्हा लाजून गोरमोरं होणं.. हे सगळं फार मनोरम होतं. समूहाचा इतका समरसून सहभाग पुढे शारूखचा घट्ट मित्र असलेल्या आशुतोष गोवारीकरच्या ‘लगान’मध्ये दिसला. 


   (गाण्यापूर्वीची बातचीत आणि मग गाणं)

~

या गाण्यात उर्मिलानं प्रचंड अंग दाखवलंय हे खरंच आहे. पण हे गाणं बघताना मला चोरट्यासारखं होत असे, ते त्यामुळे नाही हे कळायला वेळ लागला. शृंगारामधली पशुवत झटापट ही या गाण्याची थीम. एकदा नव्हे, अनेकदा जॅकी आणि उर्मिला एकमेकांचा अंदाज घेत, दात विचकत, गुरगुरत फिरणाऱ्या दोन श्वापदांसारखे वर्तुळाकार फिरतात, एकमेकांना अक्षरशः टक्करतात, भिडतात, एकमेकांच्या नरडीचा घोट घेत असल्यासारख्या मुद्रा करतात, विसावतात, आणि पुन्हा नव्यानं तोच खेळ करत राहतात. जनावरांच्या जोडीनं थोड्या-थोड्या अंतरानं फिरून माजावर येत असावं, तशी काहीशी या गाण्याची रचना आहे. त्या आदिम खेळाच्या पार्श्वभूमीला रेहमानचं संगीत. सस्पेन्स, उत्कंठा, उत्तेजना, किंचित भीती, आणि थरार, उकल.. अशी रहस्यकथेखेरीज आणखी एका प्रकारच्या ट्रोपमध्ये साजेशी ठरणारी वळणं घेणारं, काळजाचा ठोका चुकवणारं, बेहोश करणारं. बाकी उर्मिला या गाण्यात जशी दिसलीय, तशी ती आख्खा 'रंगीला'भर दिसलीय. 'दामिनी' जसा संतोषीनं आपल्या प्रेमिकेकरता कोंदण म्हणून निर्मिला, तसंच रामूचं उर्मिलाच्या बाबतीत झालं असेल का? काय ठाऊक. सोनेरी वाळूच्या ढिगावर विसावलेलं तिचं कातीव शरीर आणि नशीली नजर बघताना रामूच्या नजरेचंच अप्रूप वाटतं. 'श्रीमान आशिक' आणि 'चमत्कार'मधल्या बाईतूनच ही बाई निघाली? विश्वास बसत नाही. नि तरी अत्यंत ममव प्रकारे 'एक तर ते तोकडे कपडे, नि गार पडलेली वाळू. मला भयानक सर्दी. कुडकुडून जीव नकोसा झालेला.' हे उर्मिलाच्या मुलाखतीतलं वाक्यही आठवतं आणि स्वतःचीच मजा वाटते.


~

कधीही पाऊस कोसळायला लागेल अशा गच्च दाटून आलेल्या आभाळाची आठवण करून देणाऱ्या, रेखाच्या जड, मादक आवाजातलं हे संथ गाणं आपल्याला उदास करतं. पण ही उदासी कडवट नाही, डार्क चॉकलेटसारखी बिटर-स्वीट आहे; कारण त्यात विशाल भारद्वाजनं रेखाटलेला सिद्धहस्त, 'गुलज़ार' फ्लॅशबॅक अलगद विरघळून गेलाय. इतक्यानंही कुणी मोहात न पडला, तर एक परवलीचं वाक्य - गाण्यात तब्बू आहे. तिचं लग्न मोडकळीला आलेलं. कमलहासनची - तिच्या नवऱ्याची - मुलाखत बघणाऱ्या तिच्या टीव्हीवर एकाएकी 'मुंग्या' दिसायला लागतात. आणि मग थेट त्याच्यासोबतची पहिली 'अपघाती' भेट दिसते. एका पावसाळी संध्याकाळची. तिचा उद्दाम निष्काळजीपणा, त्यानं केलेलं दुखापतीचं नाटक, भेटीगाठींचं प्रेमात आणि मग तिनं पळून जाऊन त्याच्याशी केलेल्या लग्नात झालेलं पर्यवसान, लेकीचा जन्म, आणि त्याच रेस्टॉरन्टात बसून लेकीला सांगण्यात आलेली प्रेमाची गोष्ट. एक पूर्ण वर्तुळ या गाण्यात रेखाटलं जातं. नायक, नायिका आणि गाण्यातच जन्माला आलेली त्यांची धिटुकली लेक या सगळ्या पात्रांचे स्वभाव एकेकाच दृश्याच्या जोरकस फटकाऱ्यानिशी खुलवत, तपशिलांचे रंग भरत. गाण्यात दिसत राहिलेली मुंबई जितकी लोभस आहे, तितकीच त्यातली तब्बू. नाचाचे चार हात करायला लावले तर लाज आणणारी ही नटी नुसत्या देहबोलीतून किती बोलते! कमलहासनच्या मागे बाईकवर बसून जाताना ती हलकेच मान मागे टाकते आणि डोळ्याच्या कोपऱ्यातला पाण्याचा थेंब टिपते. आसमंतातली गहिरी पावसाळी संध्याकाळ, प्रियपुरुषाच्या मागे बसून बाईकवरून सुसाट वारा पीत रस्ते कापत जाणं... एकूणच आसमंत खुशीत असतो आपल्यासारखा, जणू आपल्याकरता, तेव्हा डोळ्यात येणारा पाण्याचा थेंब. रेखा त्या क्षणाला आवाज पुरवते, 'एक आसूं सुनहरा जलता हुआ...'

या शब्दांत सगळ्या गाण्याच्या अत्तराचा अर्क आहे, बस.

~

या गाण्याला रेहमानखेरीज दुसऱ्या कुणी न्याय देणं शक्यच नव्हतं. लडाखच्या चंद्रभूमीतली, रोजमर्रा आयुष्यापासून जणू चार अंगुळं वर, अलिप्त, परकी असल्यासारखी चित्रीकरणाची स्थळं. उद्ध्वस्त बौद्ध मठ, वाळवंट, निर्मनुष्य तलाव. एका जिवाला दुसऱ्या जिवाची अनामिक ओढ लागल्यावर बाकी सगळं फिजूल ठरावं हे ठसवणारा प्रदेश. मनीषा एखाद्या अप्राप्य, शापित अप्सरेसारखी अफाट सुंदर, आत्ममग्न, गूढ, आणि काहीशी निर्दय. शारुख तिच्याकडे अपरिहार्यपणे ओढला जाणारा. त्याच्या आवेगी नृत्यमुद्रांतून त्याचा देह बोलतोच, पण त्याचे डोळे? उफ्फ्.

एका दृश्यात तिची पिवळीधम्म वस्त्रं ज्वालेसारखी फडफडतात आणि शारूख त्यात एखाद्या पतंगासारखा खेचला जातो. मागे जळतं शुष्क झाड. कधी ती त्याला जाळ्यात ओढणारी. हलके हलके तो गुरफटत गेलेला आणि तिचा कठोर, अलिप्त चेहरा त्याच्या मिठीतही. शब्द? 'तेरी बाहोंमें उलझा उलझा हूं...' किती आर्तता असावी एखाद्याच्या आवाजात?

लालबुंद वस्त्रात लपेटलेले दोन देहाकार आणि एकमेकांत मिसळूनही न मिळणारी तृप्ती. आवेग शमत नाही. तो शमतो गाण्याच्या शेवटाकडे.

आता शारुख या आकर्षणाच्या, ओढीच्या, प्रेमाच्या, वेडाच्या उंबरठ्यावर, स्वतःशीच घुमणाऱ्या वेड्या पिरासारखा. आता ती त्याच्याभोवती रुंजी घालते आहे. पण त्या दोघांनाही एकमेकांच्या भ्रमणकक्षेत असण्यापल्याड कसलंच भान नाही. मग जे मीलन होतं, ते पांढरंशुभ्र. त्या चेहऱ्यांवर असीम शांतता आहे. देहाकार न दाखवणारा क्लोजप. गाण्याचा शेवटचा शब्द? 'ग़ालिब'.


~

हे गाणं नक्की कशाकरता बघायचं ते ठरवता-ठरवता इतकी तारांबळ उडते, की गाणं लूपवर बघा-ऐकायची सोय होण्यापूर्वी लोक नक्की कसं बुवा मॅनेज करत असतील असा प्रश्न मला जेन्युइनली पडतो. रविवारी अंथरुणात लोळत झोपाळलेल्या डोळ्यांनी हे गाणं 'रंगोली'त इतक्यांदा बघितलंय, की नटनट्यासिनेमे यांचं वेड लागण्यापूर्वीच त्याचं गारूड माझ्यावर होऊन गेलं आहे.

पहिल्या कडव्यात तिला त्याचा रुसवा काढण्याचं फारसं टेन्शन नाही. जर्रा मस्का लावला की झालं, असा तिचा एकूण नूर आहे. पण तो कुठला पटायला! साहेब चांगलेच उचकलेत. अगदी तिला तोंड वेंगाडून दाखवण्याइतके. दुसऱ्या कडव्यात ती चेष्टेचा नूर सोडून 'आसं काय, सोड की!'वर येते. तरी त्याची भिवई चढीच. मग तीही भडकते. इतकी लाडीगोडी लावून ऐकत नाही म्हणजे काय? तिचा विद्ध चेहरा बघून कसा चट विरघळतो गडी! तिच्या भरदार अंबाड्याभोवती रुंजी घालणारा तो एखाद्या कमळाभोवती भुंग्यानं रुंजी घालावी तसा भासतो. पण तीही थोडं ताणूनच धरते. 'क्या करना है जी के?' तेव्हा कुठे 'परत असं केलंस तर बघ!' - 'नाही, नाही! बस?' वर गाठ सुटते नि डळमळलेला तोल पुन्हा प्रस्थापित होतो.

काय त्या गाण्यात वारा सुटलाय. तिच्या बटांबद्दल तर म्या पामरानं बोलूच नये, पण त्याच्या कपाळावरची झुलपं भुरभुरतात तेव्हा काळजात लक्कन हलतं. काय ती 'सनम'वर आशानं घेतलेली मोहक गिरकी, नि काय ते लाडिक आवाजात त्याला फशी पाडू बघणं, देवा! तिचा तो बोट-नेकचा नि पाठीवर एका बाजूला बटणपट्टीसदृश डिझाइन असलेला लांब हाताचा ब्लाउज, प्लेन साडी, स्मार्ट पर्स आणि मनगटी घड्याळ बघून मला कायम कोडं पडे. ही नोकरदार आहे की काय? ती त्या सिनेमात नुसती नोकरदार नव्हे, धडाडीची पत्रकार असते हे कळल्यावर मला एकाएकी त्या सगळ्या प्रकरणाबद्दल आदरच वाटायला लागला. बघता बघता आणखी एका कारणाची भर. तारांबळ - म्हटलं नव्हतं?


फार फार मजा आली ही मालिका लिहिताना. निवडायला, नेमक्या तितक्याच शब्दमर्यादेत बसवायला, तरी आपल्याला गाण्याबद्दल वाटणारं सगळं नेटकं व्यक्त करायला. तरी कित्ती गाणी राहिलीच. असो. कुणाला रस असेल तर खो घ्या प्लीज. तूर्त असल्या विरंगुळ्याची फार फार गरज आहे. 

‍~

(करोनाकाळात केलेला फेसबुकीय टाइमपास)