Wednesday, 23 December 2020

गाठोडं

धुऊन विटके-मऊ झालेले जुनेपाने कपडे

अनेकदा वाऱ्या करतात.

पुढून मागे.

वरून खाली.

तळ्यात-मळ्यात.

कपाटातून गाठोड्यात.

गाठोड्यात तसेच गप्प पडून राहतात महिनोन् महिने.

मग गाठोडं नजरेआड.

कधीतरी वर्षसहामहिन्यांनी बाहेर येतं ते धुळकटलेलं धूड.

पण पुन्हा उलगडून पाहताना

हाताळून मऊ होताना

आपल्यातलं काही शोषून घेतलेलं ते सूत

नाही हातावेगळं करता येत.

मग टोचरे हुक उचकून, बाह्या उसवून, चुण्या उलगडून,

होता होईतो धडके तुकडे मिळवून

पुन्हा रचायचे नव्यानं

जिवाला गोड लागेस्तो.

आतून एक मऊशी ओढणी.

मधे एखाद्या धडक्या शालीची जोड.

वर फिरून नव्यानं मांडलेला डाव.

पुन्हा नव्या नवलाईच्या भांडणापासून 

भांडणं संपून जाईस्तो.

असं का नाही करता येत आपल्याला कायम?


राहत्या शहराचे लागेबांधे ६

टळटळीत दुपारी आसमंतावर पेंग चढत असताना तळ्यावरून चालत निघावं. तळं म्हटल्यावर जे काही डोळ्यासमोर येतं त्याला छेद देणारी दृश्यं असतात. वाहत्या रस्त्याकाठी झाडांची सावली नि फरशीचा थंडगार कट्टा धरून काहीही न करत बसलेले, वृद्ध दिसणारे, थकलेले लोक. कुणी डब्यातली सुकी चपाती चाबलणारा. कुणी उशाला हात घेऊन थोडी डुलकी घेणारा. कुणी कळकटलेली कापडी पिशवी बाजूला ठेवून चंची सोडून बसलेला. रस्त्यानं वाहणाऱ्या दुपारच्या शिळमोड्या रहदारीची दखल न घेत,  तळ्यालाही पाठ देत, निव्वळ अंगाखालची गार फरशी, डोक्यावरची सौम्य सावली, आणि कुणी ऊठ म्हणू न शकेलशी ती फुटपाथाकडेची सत्तेची जागा, इतक्याच विश्वात अंग टाकून बसलेले लोक. वळण घेऊन, पण तळ्याच्या कुशीनं आपण पुढल्या चौकात आलो की रहदारी कूस बदलल्यासारखं करते. इथून स्टेशन जवळ हे न सांगताही लक्ष्यात यावं, अशी किंचित बकाली आणि सूक्ष्म लगबग. त्या लगबगीला एक प्रकारचा, नो-नॉन्सेन्स चाकरमान्याचा ताठा असतो. हेच उलट दिशेनं वळलो, तर दुपार अजूनच अजगरी होत जाते. नाट्यगृहाची रंगीन संध्याकाळ उगवायला अवकाश. बुकिंग क्लार्कही जेवायला गेलेले. सकाळचे तजेलदार आणि भगवट योगवर्ग हवेतून पुसले जाऊन सगळीभर शिळवटलेली सुस्ताई धरलेली. अशा वेळी तिथल्या कट्ट्यावर तुम्ही तासभर चिंतन करत टेकलात तरी तुम्हांला कुणी नीघ म्हणत नाही. पण का कुणास ठाऊक, इथले कट्टे खुणावतात ते दिवेलागणीनंतरच्या हलक्या झगमगाटात. समोरून येणाऱ्या कुणाला हात करावा, गुलुगुलु करणाऱ्या कुणा जोडप्याला शिताफीनं गाठून सतावावं, सलगीचं कुणी भेटलं तर गप्पा टाकाव्यात, नाटकाची गर्दी तुरळक उगवू लागली की किंचित असूयाग्रस्त होत, नाक उडवत सटकावं. क्वचितच कधीतरी सगळी अत्तरी गर्दी आत ओतली गेली की बाहेरच्या गप्पा खुलतात. अशा वेळी हटकून सूर आतले लागतात. ती वेळ ओलांडली, की मग अकरानंतरचा नाममात्र गारवा अनुभवायला बाहेर पडून, वजनावर मिळणारी कुल्फी खाणारे, हौशी लोक. त्यांच्याकडे बहुतकरून गाड्या असतात नि त्यांची पोरं घरंगळत्या लोकरगुंड्यांसारखी फुटपाथवर सैरावैरा उधळून दिलेली असतात. वाहत्या गाड्यांनी समजून चाकं हाकावीत. हेही ओसरतं नि मग चुकार पोलिसी गाडी, काही एक्स्ट्रारंगीत लिप्स्टिक्स, काही पाठ टेकायला जागा बघणारे गरीब. पण ते तळ्याच्या या बाजूला फार करून दिसणार नाहीत. त्यांचं राज्य पलीकडच्या बाजूला. भाजीमार्केटच्या गलबल्यासमोरचा फुटपाथ वा चर्चच्या समोरचा काठ. तिथे अक्षरशः पालं पडलेली नसतात, इतकंच. एरवी फाटक्यातुटक्या चिरगुटांचं आणि केस कराकरा खाजवत बसलेल्या गरिबांचं राज्य या काठांना व्यापून असतं. ते उठतं ते रात्री भेळवाल्यांनी हातपाय पसरण्याच्या सुमारास. भेळवाले सुरू होतात बोटिंगवाल्याच्या खोपटाच्या अल्याडपल्याड. बशीभर तळ्यात बोटिंग करायला जाण्याचं कोण कौतुक असे पूर्वी. त्याच तळ्यात वल्हवायला शिकण्याचे प्रयोगही केलेले. तिथल्या भेळवाल्यांच्या गाड्या पार या फुटपाथवासीयांना ढकलत पलीकडच्या टोकापर्यंत पोचतात हल्ली. ते भेळवाले कुठलं पाणी वापरत असतील, त्यांना नळ आहेत थोडेच, हा प्रश्न ऐकून तळ्याच्या शेवाळलेल्या पाण्याकडे नजर आपोआप गेली नि तिथली भेळ नशिबातून संपली त्यालाही चिकार वर्षं झाली. आता तळापाळीवर जाऊन भेळ खाणे आणि बोटिंग करणे या बेतातली रोमहर्षकता सरली. पहाटेच्या व्यायामफेऱ्यांचं निमित्त करून पोरं टापण्याचे दिवस गेले. दणकून पाऊस झाल्यावर तळं भरून रस्त्यावर सांडलेलं पाणी बघायला पाण्यातून जाण्याचे दिवसही. आणि 'हो गं! आधी तळ्यातच असणार हे, कसा थरथरतो बघ रस्ता बस गेल्यावर!' असा अचंबा अनुभवण्याचेही. पूर्वी तळं पार मार्केटमागच्या कोपिनेश्वराच्या पायऱ्यांपर्यंत नि इकडून मधला रस्ता ओलांडून पार शाळेतून दिसेलसं होतं, नि या बाजूला एकटीदुकटीनं यायचं तर सोबत लागे दिवसाउजेडी यायला, वगैरे आख्यायिका ऐकून खूश वाटण्याऐवजी आता आहे हेही तळं कितीसं उरेल अशी काळजी वाटते. हे फक्त तळं म्हातारल्याचं लक्षण नव्हे. 

Monday, 7 December 2020

जाग

नागवं होण्याच्या भीतीवर धीरानं मात करत
हाताच्या बोटांची सूक्ष्म थरथर मुठीत घट्ट आवळून धरत
उरलीसुरली क्षीण निरी फेडत
कोरडाठाक खंक काठ 
टळटळीत उन्हात उघडावाघडा करत
आपलं आपल्यापाशी पोचता यावं आपल्याला,
अशा जागा असतात म्हणे.
तांबूस पिंगट कोवळा प्रकाश असतो तिथे
सूर्य नुकताच बुडून गेल्यावर 
पाऊल बुडवण्यापुरता उरलेला.
नि
त्या प्रकाशात उडताना सोनसळी झालेल्या बगळ्याची
मऊ मखमली कूस
हात लांबवला तर येईलच हाती,
अशी.
आपण हात लांबवायचा नसतो पण.
नाहीतर जाग येते.