Monday, 9 December 2019

नाटक - ३

अनेकदा पडलं आहे मला असं स्वप्न. कसंकुठे वापरू त्याला असा तद्दन लेखकासारखा विचारही केला आहे मी अनेकदा. पण नाही जमलेलं. असं स्वप्न पडलं की काही चांगलं घडतं काकाही वाईट घडतं का... हाही एक नॉस्ट्राडेमसीय विचार अधूनमधून कुरतडत राहतो मनाला. पण बरेच दिवसांत स्वप्न पडलं नाहीकी तोही विचार मागे पडतो. कधीतरी पुन्हा तसं स्वप्न पडतं आणि मी सकाळी जाग आल्यावरही इतकी भारलेलीखूश असते… की हे सगळे फायद्यातोट्याचे विचार मागे पडतात आणि फक्त हातातून सुटून जाणार्‍या स्वप्नाचे सुटेसुटे धागे होता होईतो हातात धरून ठेवायची आनंददायी धडपड तेवढी उरते. अर्थातच तपशील दर वेळी निराळे असतात. स्थळं निराळी. वेळाही निराळ्या. पण काही तपशील मात्र आश्चर्यकारकरीत्या समान. थिएटर असतं कुठलं ना कुठलं. नाट्यगृह हा शब्द मुद्दाम नाही वापरलेला. कारण कधीतरी नाटक दिसतं नुकतंच सुरू झालेलंकधी नाही. मग मला कळत नाहीहे सिनेमाचं थिएटर आहे की नाटकाचं. ओळखीची नसतात ही थिएटर्स. हे गडकरी रंगायतन किंवा हे वडाळ्याचं आयमॅक्स किंवा हे शिवाजी मंदिर... किंवा हे क्रायटेरियन थिएटर – असं छातीठोकपणे सांगता यावं अशी नसतात ती. त्यांच्यातले कितीतरी घटक एकमेकांत मिसळून गेलेले असतातत्यांच्या कडा पुसट झालेल्या असतात. कधीकधी नाटक चालू असतं रंगमंचावर. पण बरेचदा मी घाईनं माझी खुर्ची शोधत असते. मनात कमालीची उत्कंठाआता पडद्यावर काहीतरी सुरू होईल आणि तत्पूर्वी मला माझी जागा हुडकून तिकडे बसलं पाहिजेअसा अदृश्यहवाहवासा धाक. एकटीच असते मी कायम. कधीच सोबत कुणी असल्याचं आठवत नाही. थिएटर कायम गर्दीनं फुलून गेलेलं. पण सगळी अपरिचितांची गर्दी. सगळीभर पसरलेला सोनसळी प्रकाश. वावरणार्‍याला आश्वस्त वाटावं इतकाच उजेड घेऊन तो उरलेल्या अंधारात मिसळून दिलाकी तयार होईल अशा पोताचा. त्यात कध्धीच कुणालाच भीती वाटू नये कसलीहीअशा मऊ स्पर्शाचा. पायर्‍या असतात चिकार. आणि मी त्या घाईनं उतरत वा चढत असते. भिरभिरत्या नजरेनं माझी जागा शोधत. मी जागेवर पोचतेआसनस्थ होते आणि स्वप्न झोपेत विरघळून जातं. सिनेमातल्या एखाद्या स्वप्नदृश्याच्या कडा बाजूच्या धुक्यात विरघळलेल्या असाव्याततसं. माझ्या मनातल्या अनिवार उत्सुकतेबद्दल मनात अनिवार उत्सुकता असूनही मी स्वप्नात कधी माझी जागा शोधल्यावर खुर्चीत बसून पुढचं नाटक वा सिनेमा पाहिलेला नाही. दुसर्‍या कुणाचीतरी गोष्ट ऐकण्याबघण्यातलाआपलं आयुष्य पुस्तकासारखं आणि पुस्तकाइतकंच काही काळ मिटून ठेवू शकण्यातलाचौथ्या भिंतीच्या जागची मोक्याची जागा मिळवण्यातला थरार असेल त्यातकाय की...

***
नाटक १
नाटक २

Thursday, 12 September 2019

विंगेतली घरं

एखादं घर आपलं वाटायसाठी त्या घरात प्रत्यक्ष राहावं लागतं थोडंच? पुस्तकातली घरं तर बोलूनचालून कल्पनेत रंगवलेली आणि त्यामुळे काहीशी स्वप्नील, अतिरंजित असणारचपण सिनेमातली घरंती तर नजरेला स्वच्छ दिसतातनि तरी त्यांतरेंगाळणारा वास कळतोतिथे उकडत असेलकी गार वाटत असेल तेही कळतंआपल्याच घरात एका विशिष्ट वेळी पडणाऱ्या उन्हाच्या मऊ तुकड्यासारखेच तुकडे ती घरंही देऊ करतात.
असल्या घरांच्या आठवणी काढायला बसलंकी मला सगळ्यांत आधी आठवतंते गोलमालमधलं त्या बहीणभावंडांचं घर. कसं अगदी बहीणभावंडांनाच पुरेलसंअटकर मापाचं नि तरी दोघांना स्वतंत्र अवकाश देणारं घर आहे ते. त्यात राहणार्‍या माणसांच्या मापानंच बेतलेले असावेतसे पलंग नि खुर्च्या. नि शिवाय आणीबाणीच्या वेळी त्यांच्या तोतया आईचं हे थोरलं बूड घरात शिरवून देणारी स्वैपाकघराची चपखल खिडकी. आईबाप नसलेल्या त्या भावंडांना त्या घरात अजिबात एकटं-पोरकं वाटलं नसणारअशी खातरजमा ते घर नक्की करून देत असणार.
प्रतिमा कुलकर्णींच्या प्रपंचमधलं घर तसंही त्याच्या खास लोकेशनमुळे ग्लॅमरस आहे. पण त्या घराचं खासपण माझ्या दृष्टीनं त्याच्या लोकेशनमध्ये नाही. तिथे कमालीच्या प्रामाणिकपणानं घर रचून देणारी त्या मालिकेतली जिवंत-चिरंजीव पात्रं त्या घराला खासपण बहाल करून गेली आहेत. अण्णांचा झोपाळाअगदी साधासा दिवाण नि लोड-तक्क्ये असलेली माजघरवजा खोलीपेटीचे सूर मिरवणार्‍या मागीलदारच्या किंचित खासगी ओसर्‍यानाटकाच्या तालमी नि नाना रंगांच्या गप्पा रंगवू देणारे अनेक साधेसुधे-खासगी-काळोखे कोपरे नि आवार. पुढे श्रीयुत गंगाधर टिपरेमध्ये तेच घर वापरल्यामुळे त्या घराची गोडी माझ्याकरता जरा विटलीच. त्याही कारणानं ती मालिका मला पुरेशी आवडली नाही कधी. प्रपंचमधल्या घराच्या ठसठशीत व्यक्तिमत्त्वाच्या मानानं ४०५ आनंदवनमधली सोसायटी आणि तिथले ब्लॉक अगदीच सरधोपट होते.
यश चोप्रांच्या सिनेमांमधली बटबटीत परीकथीय घरं कधीच आवडली नाहीत. पण दिलवाले दुल्हनिया…’मधला तो पंजाबातला वाडा मात्र त्याला अपवाद म्हणायचा. कायम लपून प्रेम करायला गुप्त गच्च्याआपल्या माणसांना भेटायची संधी देणार्‍या ओसर्‍या नि पडव्या नि जिने नि व्हरांडेत्यांतही कुणी वडीलधारं समोर टपकलंच तर सुमडीत आडोसा घेऊ देणारे कोनाडे नि कोपरे... असं सगळं बयाजवार त्या वाड्यात असणारच. वर संध्याकाळी हुरहुरून कुणाकरता उदासबिदास व्हायचं असल्यास मोठ्ठाले कट्टे असलेल्या नि सूर्यास्त नि सूर्यफुलं नि शेतं दाखवणार्‍या हवेशीर खिडक्याही असणार. कोकणातल्या पारंपरिक नेपथ्याला सरावलेल्या मला हे पंजाबी घर नव्हाळीचं होतं नि शिवाय योग्य त्या वयात भेटलंपुढे दिलवाले...ची जादू ओसरून गेल्यावरही तो वाडा लक्ष्यात राहिला तो राहिलाच. हम दिल दे चुके सनममधल्या अतिरिक्त चांदोबाशैलीतल्या त्या गच्च्या-संपृक्त बेगडी घराची भूल मला पडली नाहीयात पुस्तकांच्या अक्षरशः चळतींमध्ये उभं राहून किस केल्यावर बाळ होईल?’ असा अडाणी प्रश्न विचारणार्‍या नंदिनीचा जितका वाटा होता, तितकाच दिलवाले...मधून आधीच आपल्याश्या वाटलेल्या त्या वाड्याचाही होताच.
तितका सुखकारक नि रोम्यांटिक नसूनही खूप आवडलेला बंगला खोसला का घोसलामधला. खरंतर त्या घरातलं सगळंच किती चिमुकलं आहे! घरातली मुलं मोठी झालीत नि त्यांना आता हे जुनं घर पुरेनासं झालं आहे हे त्या घरातल्या मंडळींच्या वावरातून स्पष्ट दिसतं. असं वाटतंया ताडमाड कार्ट्यांचे पाय इथल्या बिछान्यांतून नक्की बाहेर येत असणार नि सकाळी घाईच्या वेळी हमखास एकमेकांवर टकरी होऊन चिडचिडाटही होत असणार. शिवाय आंघोळीला नि कधी-कधी संडासलाही आधी कुणी जायचं यावरून हाणामार्‍या होतच असणार. पण तरी त्या घरात त्या वरकरणी विजोड वाटणार्‍या मंडळींना सांधणारं काहीतरी आहे खास. तिथल्या भिंतींना अमृतांजन आणि घर गळल्यामुळे आलेली नि सुकलेली बुरशी आणि जुना झालेला डिस्टेंपर आणि वर्षानुवर्षांच्या फोडण्या असा सगळा संमिश्र वास असेलपण दिल्लीतल्या थंडीत त्या घरी शिरल्यावर मस्तपैकी ऊबदारही वाटत असेल. ते घर सोडून नव्या टोलेजंग बंगल्यात जाताना सिनेमाच्या अखेरीस मंडळींना नक्की भरून आलं असणार.
अशी कितीतरी घरं. डेल्ही सिक्समधलं ते गिचडीबाज गच्च्या असलेलंकबुतरं नि लोणची नि वाळवणं नि लग्न न करता घरात थांबून राहिलेरी देखणी-अबोल आत्या असणारं घर. हम हैं राही प्यार केमधला तो साधासरळ मध्यमवर्गीय बंगला नि काचेचं छप्पर असलेली गच्चीतली बरसाती. ‘रंगीलामधलं खाली भाडेकरू नि वर मालक असणारं कनिष्ठ मध्यमवर्गीय एकांडं घर नि त्याच्या पायर्‍यांवर रात्री-बेरात्री मिली आणि मुन्नानं मारलेल्या गप्पा. बॉम्बेमधलं मुंबईतल्या जुन्याउंच छताच्या इमारतींचा छायाप्रकाश अचूक पकडणारंतावदानं-गच्चीगॅलरीचिमुकलं स्वैपाघर नि च-ह-क्क-ह चार खुंट्या नि छत असलेला लाकडी पलंग मिरवणारं मुरत गेलेलं घर...
मी ज्या बारा-पंधरा खर्‍याखुर्‍या घरांमधून बाडबिस्तरा हलवला आहेत्यांच्याइतकीच जवळचीघरासारखी झालेली ही घरं. सिनेमे नि पुस्तकं नि नाटकं नि सिर्यलीत कसले रमताअसा गद्य प्रश्न विचारणार्‍या लोकांची घरं उन्हात बांधून मी मिळवलेलीनो मेंटेनन्स, चकटफू घरं.. 

Sunday, 8 September 2019

इतक्यात वाचलेली पुस्तकं

One foot on the ground: A life told through the body
Shanta Gokhale
Speaking Tiger Publication


जेव्हा एखादा लेखक शरीराबद्दल बोलतो, तेव्हा तो ओशाळतोय का, त्याला पोटातून गुदगुल्या झाल्यासारखा आनंद होतोय का, तो उत्तेजित होतोय का, तो मूर्तिभंजन करू इच्छितो आहे का, किती जोरानं आणि कोणती किंमत भरून… हे सगळं त्याच्या सुरामधून उघड-उघड कळत असतं आणि त्यावरून मजकुराचा आवाका नि दिशा ठरत असते. शांताबाईंच्या आत्मचरित्राची चौकटच मुळी शरीर ही आहे. ही चौकट वापरून त्यांचा सूर इतका सहज, मोकळा, अलिप्त, ठाम आणि सूक्ष्मपणे तिरकस आहे; की सांगण्याचं बरंचंसं काम हा सूरच करतो. त्यात अवघडलेपणा अजिबातच नाही. जे सांगितलं जातं आहे, त्यापल्याडचा विचारही करण्याची गरज नाही, मुभा तर नाहीच नाही असा अदृश्य धाक वाचकाला घालणारा चिरेबंदीपणा आहे. 
दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्थळवर्णनाचा अट्टाहास न करताही त्यांच्या कथनातून जिवंत झालेली दादर आणि आसपासच्या परिसरातली सुमारे सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची मुंबई. कसल्याही प्रकारचे भावुक कढ न काढता, शब्दबंबाळ न होता, अपरिहार्यपणे आणि आपसुख उभं राहत गेलेलं असं नेपथ्य फार कमी वेळा बघायला मिळतं. (कथनातून दिसलेल्या मुंबईची आठवण काढायची झाली, तर त्यांच्याच दोन मराठी कादंबऱ्या - त्या वर्षी, रीटा वेलिणकर, आणि त्यांनी अनुवादित केलेली जेरी पिंटोची 'एम ॲन्ड बिग हूम' ही कादंबरी आठवते.)
तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सूक्ष्म, धारदार, भेदक विनोद. स्त्रीपुरुषामधल्या सामाजिक असमतोलाची नेमकी जाणीव, त्याबद्दलची अप्रीती आणि तुच्छता, शब्दाच्या अचूक निवडीचं भान, आणि प्रखर आत्मविश्वासातून येणारा निस्संकोचपणा - हे सगळं त्यांच्या विनोदातून भेटतं. एकत्र कुटुंबातल्या नात्यांतली विसंगती वर्णन करणारा  'अग्गंबाई, वन्सं मुतल्या!' हा किस्सा हा त्याचा निव्वळ एक मासला.
हे पुस्तक मराठीतही असायलाच्च हवं नि ते खुद्द शांताबाईंनीच लिहायला हवं असं अगदी मनापासून वाटतं.
***

नाइन्टीन नाइन्टी
सचिन कुंडलकर
रोहन प्रकाशन


नव्वदीत मराठी मध्यमवर्गीय समाजाचा पोत बदलायला सुरुवात झाल्यावर त्यापूर्वीच्या अनेक गृहीतकांमधली विसंगती आणि छद्म हळूहळू ठळक व्हायला लागली. या पुस्तकातून कुंडलकरांचा रोख त्यांकडे आहे हे स्पष्ट जाणवतं. अशा विसंगती प्रकाशात आणायला, यशस्वीपणे आणि परिणामकारकपणे आणायला, एक प्रकारचा मूर्तिभंजक बिनधास्तपणा लागतो. पण त्याचबरोबर आपण ज्या दोषांवर टीका करतो आहोत, त्याच दोषांच्या सापळ्यात आपला पाय अडकत तर नाही ना, हे सतत तपासून बघणारा सावध डोळसपणाही लागतो. पहिली बाब कुंडलकरांकडे आहे, हे अभिनंदनीय आहे. पण दुर्दैवाने दुसरी बाब मात्र नाही. परिणामी त्यांची अभूतपूर्व कसरत होत असलेली जाणवते. आपल्यापूर्वीच्या पिढ्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी वाचण्याची जवळजवळ सक्ती म्हणावी अशी अपेक्षा केली जाते म्हणून होणारी रास्त चिडचिड आणि त्याच वाचनाच्या सवयीतून मिळालेल्या गोष्टींबद्दलची कृतज्ञता - हे या गोचीचं एक उदाहरण. नॉस्टाल्जिया, स्वैपाक, मूल्यं.. अशा अनेकानेक बाबतींतल्या अगदी अश्शाच गोचीची अनेक उदाहरणं पुस्तकभर विखुरलेली दिसतात.
पण त्याचबरोबर 'ज्याचे कुणी नसते, त्याचा हिंदी सिनेमा असतो' हे आणि अशी अनेक दाणेदार वाक्यंही ते सहज लिहून जातात. चकित करतात. आज तिसरं सहस्रक सुरू होऊन वीस वर्षं व्हायला आली तरीही मध्यमवर्गीय जाणिवांना 'बोल्ड' वाटणाऱ्या अनेक गोष्टींविषयी सहज मोकळेपणानं लिहितात. गॅजेट्स, इंटरनेट, माध्यमं, एकटेपण, शरीर, नैराश्य यांसारख्या अनेक विषयांवर नवं-ताजं बोलतात. परिणामी प्रचंड परस्परविरोधी अडगळसदृश गोष्टींचा खच, त्यातच नेमड्रॉपिंगचा अकारण पसारा, आणि मधूनच लक्कन चमकून जाणारी हिरकणीसारखी काही वाक्यं हा 'नाइन्टीन नाइन्टी'चा साधारण साचा म्हणून उरतो.
बाकी कुंडलकरांच्या ब्लॉगचं आणि सदरलेखनाचं हे संकलन आहे याची कल्पना आहे. पण त्यातून सदरामधल्या काही वादग्रस्त गोष्टी टाळलेल्या स्पष्ट दिसताहेत. मग एकंदर घाटाचा विचार न करता, ब्लॉगवर लिहिलेली एक कथा तशीच घुसडून का बरं छापली असावी? विचार करकरूनही त्यामागचं कारण कळलं नाही.
***

टाहोरा
अनिल साबळे
लोकवाङ्मय गृह प्रकाशन


या कवितांबद्दल काही समीक्षात्मक म्हणण्याची माझी लायकी नाही, इच्छा नाही. निव्वळ त्यांकडे लक्ष्य वेधून घेण्यासाठी हे टिपण.
अगदी साधे, अनलंकृत शब्द. पाऊस. मधमाश्या. अस्वलं. मोर. वासरं. निळ्या भणभणणाऱ्या माश्या. पाणी. भूक. जंगलाशी अभिन्नजीव असणं. शाळा शिकण्यातल्या तडजोडी आणि कोंडमारे. व्यवस्थांनी जंगलाचा गळा आवळत नेल्यावर, व्यवस्थेमधल्या भ्रष्टाचारानं भूक उघडीवाघडी केल्यावर, मायबापाच्या-निसर्गाच्या-जंगलझाडीच्या मायेपासून अपरिहार्यपणे सुटं होत गेल्यावर -  कवितेमधून दुःख उमटू शकणं.
हे सगळं या कवितांमध्ये आहे. एक कविता उद्धृत करते आणि गप्प होते -

समोर कोरा कागद असला तरी
कविता सुचत नाही
पोतंभर पिठाची कणीक मळताना
कविता सुचते... पण तेव्हा
हात पिठात बुडलेले असताना
मला तरी लिहिता येत नाही
अर्धवट भिजलेलं पीठ सोडून कविता.
मऊसूत मळलेल्या कणकेचे
गोल गोळे करताना
शब्द ओठावर दाटून येतात
उतू आलेल्या वरणासारखे
मुलं पोटभर जेवून आश्रमशाळेत बसली म्हणजे
मी धरतो आंब्याच्या सावलीची वाट
पुस्तक छातीवर मांडून
मी घनदाट झोपतो
तीनची बस गोंगाट करीत आली म्हणजे
धडपडत उठतो. तोंडावर पाणी शिंपून
मी चालू लागतो आश्रमशाळेकडे
संध्याकाळी घरी येताना
पायाला चिकटून येतात
भाताची शुभ्रं शितं
नव्या शब्दांसारखी
कविता तर अशीच असते
पोटभर जेवलेल्या मुलांसारखी.

***
The testaments
Margaret Atwood
Penguin Random House UK


मूळ कलाकृती साहित्यातली, तिच्यावर आधारित टीव्हीमालिका, त्या टीव्हीमालिकेतल्या घडामोडी पचवून-वापरून परत लेखकानं आपला शिक्का उमटवत पुढे नेलेलं कथानक - हे आज-आत्ताच घडू शकणारं, माध्यमांमधली अंतरं मिटवून-गिळून टाकणारं अजब वास्तव ॲटवुडच्या या कादंबरीतून भेटलं. आता 'The handmaid's tale'वरच्या मालिकेच्या चौथ्या पर्वाला पुनश्च लेखकाला शरण जाणं भाग आहे, हे लक्ष्यात आल्यावर मनापासून हसायला आलं. ॲटवुड नामक लोभस-लबाड हडळीला मनोमन एक नमस्कार ठोकला.
या कादंबरीची नायिका सर्वसामान्य नाही. पण सर्वंकष सत्तेला रूढार्थाने आव्हान देणारी भव्योदात्त व्यक्तीही नाही. ती माणूस आहे. चिवट आहे. तगून राहायसाठी काय वाट्टेल ते करणारी, त्याचं समर्थन करणारी, आणि आपण समर्थन करतो आहोत हे जाणून असणारी डोळस व्यक्ती आहे. शोषल्या जाणाऱ्या, जीवनासक्त माणसांच्या मनोव्यापारांमधलं प्रचंड क्रौर्य, आपसांतल्या राजकारणांना येणारी धार, मांजरपावलांनी आपल्याआत वस्तीला येत जाणारं हीण हे ॲटवुडचं होम पिच. ते या कथानकाच्या पूर्वार्धात सर्वार्थानं अवतरलं आहे. आपण जगायचं की नैतिकता जगवायची या द्वंद्वात रूढ नीतिमूल्यांचं हास्यास्पद, अर्थहीन, असंगत होत जाणं बघताना हबकून जायला होतं. तो या पुस्तकातला जबरदस्त भाग.
उत्तरार्ध मात्र त्या मानाने काहीसा कमअस्सल. गोष्टीची आपल्यावरची पकड कुठेही ढिली होत नाही, उत्कंठा कमी होत नाही, घटनांचं जाळं अविश्वासार्ह वाटत नाही, वाचताना श्वास रोखला जातोच. ॲटवुडचं ते कौशल्य वादातीत आहे. पण त्या सगळ्या भागाला एखाद्या भाराभागवतीय कुमारवयीन साहसकथेच्या शेवटाचे रंग आहेत. आधीच्या पुस्तकात आणि याही कथानकाच्या पूर्वार्धात मानेवर सुरी ठेवणारी आणि भयानं गोठवून टाकणारी वातावरणातली गुदमर हरपली आहे.
अर्थात - तरीही आज आणि उद्याच्या सीमेवरचे, गृहीतकंच खोलवर तपासणारे अनेक प्रश्न पडतातच. लोकशाही, मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीपुरुषसमता यांसारखी, आज आपण गृहीत धरून चालतो ती मूल्यं खरोखरच कालातीत आहेत? की उद्याच्या युगात ती लोपूही शकतील? नि तरीही माणसं जगू पाहतील मिळालेल्या अवकाशात तितक्याच समरसतेनं? उत्तरांसाठी कदाचित फार थांबायला लागणार नाहीसं दिसतं, हा खरा डेंजरस भाग.


Sunday, 18 August 2019

...पंख पसरून उडून जातो.


तेलाचा हात लावून मळलेल्या कणकेचा मऊ लुसलुशीत गोळा हातावर धरून,
तव्यावरची पोळी आणि दिवसाच्या गरगरत्या चाकाला येऊ लागलेली जिवंत लय
अशा दोन्हींकडे काणाडोळा करत,
दिवस रेंगाळू देतो,
आणि
कावळ्याच्या आर्जवी सुरासमोर शरणागती पत्करून प्रेमळ होतो आपण.
कुणावर तरी का होईना-
निरपेक्ष प्रेम करू शकण्याच्या मोहक कल्पनेलाच शरण जातो.
जमेल तितका लांबवतो प्रेमाचा क्षण.
पण कधीतरी कावळ्यावर उगारतोच लाटणं.
कावळा असू शकत नाही क्षमाशील.
त्यालाही असतं पोट.
डूख धरतो,
चकित करतो,
मनात भीतीचा डंख पेरून जातो.
हळूहळू पोळ्या सुरळीतपणे मऊसूत होत जातात,
खिडकी होते निष्प्राण,
दिवस यंत्रासारखा तालासुरात धावू लागतो.
कावळा विसरतो डूखही.
मानेला अनोळखी झटका देतो,
पंख पसरून उडून जातो.


Friday, 19 July 2019

राक्षस, पोपट आणि लिंगभाव

राक्षसाचा प्राण जसा एखाद्या पोपटात असतोतसा सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण अशा स्त्रीपुरुषांच्या लिंगभावाचा प्राण अनेक बाह्य पोपटांमध्ये विखुरलेला असतोअसं एक निरीक्षण आहे. होरक्रक्सच्या रक्षणार्थ तडफडणार्‍या व्होल्डरमटप्रमाणे हे स्त्रीपुरुष सदैव या जादुई पोपटांच्या संरक्षणाच्या तजविजीत असतात. त्यांची ही यादी. ती अपुरी आहेहे सांगणे न लगे. इच्छुकांनी यथाशक्ती भर घालावी.
पुरुष
  • कमालीचं जहालआतड्यांची जाळी होईल इतक्या प्रमाणातटाळूला घाम फोडेल असं तिखट खाणे. या खाण्याचा आविष्कार सार्वजनिक ठिकाणी झाला आणि सार्वजनिक ठिकाणी विरुद्धलिंगी व्यक्ती उपस्थित असल्या,तर परिणामकारकता वाढते. पण हा मुद्दा तसा यादीतल्या सगळ्याच गोष्टींना कमीअधिक प्रमाणात लागू आहे.
  • टीव्हीवर कोणत्याही प्रकारच्या खेळांचे सामने तन्मयतेनं पाहणे. वेळी त्यासाठी चिडचिडधुसफुसकटकारस्थानंदादागिरीआडमुठेपणाटोमणेचपळ हल्ले… इत्यादी गोष्टींचा वापर करून रीमोट हस्तगत करणे. या सामन्यांपायी टीव्हीवरच्या डेलीसोप्सची गळचेपी होत असल्यास या पोपटाची परिणामकारकता वाढते. पण टीव्हीवरच्या डेलिसोप्समधल्या कुठल्या बाईचं कुठल्या बाप्याशी मागल्या दारानी लेटेस्ट संधान बांधलेलं आहे आणि कुठली नणंद सध्या कोणत्या विषाच्या गोळ्या कुणाला देते आहे याची यच्चयावत आणि अद्ययावत माहिती बाळगून असतानाही आपण त्या गावचेच नाही असं सतत प्राणपणानं सिद्ध करत राहणे हाही पौरुषाविष्काराचा एक पोटभाग असल्यामुळे,तुम्हांला डेलिसोपबद्दल खरा तिरस्कार वाटतो की नाही याच्याशी गळचेपी-आनंदाचा थेट संबंध नाही. एरवी डेलीसोप्स बघता बघता अधिकाधिक कल्पक आणि सर्जनशील शिव्या देऊन विरुद्ध पार्टीला त्यात असलेला रस ही किती भयानक गोष्ट आहे हे सिद्ध करत राहण्याचा एक मार्ग कायम उपलब्ध असतोच. शिव्यांची अभिव्यक्ती हाही पौरुषाविष्काराचा एक पुरातन पोपट आहे हे सांगण्याकरता अनेक जण आसुसले असतील. पण अलीकडे आधुनिकतेवर क्लेम करण्यासाठी या पोपटावर विरुद्धलिंगी पार्टीनंही आक्रमण केलेलं असल्यामुळे तूर्त त्यात न पडणं इष्ट. 
  • बाहेर जाताना कुठे जातो आहोतकिती वाजता परत येणार आहोत याबद्दल घरात अवाक्षरही न सांगणे. जर सांगून जाण्याची नामुष्की ओढवलीच तर सांगितलेली वेळ न पाळणे. त्याबद्दल फोन वा मेसेज करून न कळवणे.
स्त्रिया
  • घरस्वैपाकघरन्हाणीघरटेबलाचा कप्पा इत्यादींपैकी झेपेल त्या टेरिटेरीत आपल्या निकषांवर आधारित स्वच्छता पाळणे आणि मुख्य म्हणजे त्याच निकषांनुसार इतर लोक कसे भयावह अस्वच्छतेत लोळणार्‍या डुकरासमान आहेत,हे डुक्कर हा शब्द प्रत्यक्ष न वापरता निरनिराळ्या साटल्यपूर्ण प्रकारांनी तपासतव्यक्त करतसिद्ध करत राहणे. मला नाही असलं चालत’ हे भरतवाक्य या संदर्भात विशेष परिणामकारक मानलं जातं.
  • रंगांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म छटांचं ज्ञान आपल्याला असल्याचं निरनिराळ्या अगम्य नावांचा वापर करून सिद्ध करणे,त्याचप्रमाणे हे ज्ञान विरुद्ध पार्टीला नाही हे विविध प्रसंगी आणि प्रकारे सिद्ध करून फिदिफिदि वा करुणार्द्र हसणे.
  • बाहेर जाण्यासाठी तयार होताना ठरलेल्या वेळेपेक्षा किमान अर्धा तास आणि कमाल कितीही उशीर करणे आणि त्याबद्दल विरुद्ध पार्टीकडून ऐकवले जाणारे अत्यंत स्टिरिओटाइप्ड-गुळगुळीत टोमणे धन्यधन्य होऊन ऐकणेमानेला एक अर्धवट कौतुक अर्धवट तुच्छता दर्शवणारा झटका देता आल्यास परिणामकारकता डबल. 
  • पाल-झुरळ वा तत्सम प्राण्यांना बघून किळस अधिक भीती अशी एक संमिश्र किंकाळी फोडणे – बादवेकिंकाळी फोडणे आणि चक्कर येणे या गोष्टींचा कमांड परफॉर्मन्स हे अतीव महत्त्वाचे आणि परिणामकारक पोपट आहेतपण ते इतके सनातन आहेतकी तूर्त त्याबद्दल बोलणं हे थोडं औट ऑफ फ्याशन झालेलं आहे. त्यामुळे ते बाजूला सारण्यात येत आहे – आणि / किंवा नारळ फोडता येत नाही हे कौतुकानं सांगणे आणि / किंवा गॅसचा सिलेंडर बदलण्यासाठी विरुद्ध पार्टीला पाचारण करणे. हे तसे एकाच लेव्हलचे पोपट आहेत. याच्याऐवजी तोत्याच्याऐवजी हा... असं सहज चालण्यासारखं आहे.
  • कुठूनही कुठेही पोचल्यानंतर तत्काळ फोन करून आईला,असल्यास सासूलाअसल्यास नवर्‍याला आपण सुखरूप पोचलो आहोत हे कळवणेविरुद्ध पार्टीकडूनही हीच अपेक्षा बाळगणे आणि त्यांच्या यादीतल्या पोपटांच्या यादीबरहुकूम ती कधीच पूर्ण होणार नसली तरीही दर वेळी नव्याने संतापभांडणतमाशा ही साखळी यथासांग वापरणे.
असो. यादी अपुरी असल्याची नम्र जाणीव आहेच. तरी भर घालण्याचे करावे....

Thursday, 4 July 2019

रविवार चढत जातो प्रहराप्रहरानं


शुक्रवारच्या संध्याकाळी फुलून आलेल्या थेटरासारखे चमकतात तुझे डोळे.
माथ्यावरच्या गेंदेदार रत्नखचित झुंबराखाली पडलेल्या चमकत्या, सळसळत्या सोनेरी शलाकेसारखी एकच तिरीप,
बाकी सगळा जिवंत झुळझुळणारा अंधार 
थेटरातल्या गजबजीला मौनात खोलवर खेचून नेणारा.
शुक्रवारच्या संध्याकाळीनं धावत सुटावं उतारावरून कमालीच्या खेळकर मुडात
सुसाट,
खिदळत,
उत्कटपणे,
आणि विरघळत जावं 
शनिवारचा हलकासा वास असलेल्या निवांत काळ्याभोर रात्रीत, 
तशी भिडते तुझ्या नजरेला नजर.
पडते ठिणगी.
वीकान्ताची लाही हाहा म्हणता फुलते
शनिवार सकाळच्या दमदार उन्हाच्या पावलागणिक.
रविवार चढत जातो प्रहराप्रहरानं.

Tuesday, 25 June 2019

दोन विंगांना जोडणाऱ्या सज्जाच्या कडेवर

दोन विंगांना जोडणाऱ्या सज्जाच्या कडेवरच्या ॲंटेनांच्या कुशीत,
पुन्हापुन्हा
चिवटपणे उगवणाऱ्या पिंपळाच्या लालसर कोवळ्या कोंभासारखीच,
'...बस हाथों में तेरा हाथ हो'ची पुन्हापुन्हा उमलून येणारी आस पुसून टाकता येत नाही काही केल्या,
आणि
ओशटपणे पायात पायात येणारं नि हलकटपणे पायात पाय घालणारं जग लाथेसरशी उडवून नामानिराळं होण्याची उबळही जिरवता येत नाही काही केल्या,
तेव्हा
'सगळे मिळून सगळ्यांसाठी जगण्यामध्ये मौज आहे..'च्या ओळी,
साधुवाण्याच्या कथेसारख्याच यांत्रिकपणे
आणि
यच्चयावत कर्मठ, चिवट आणि आक्रमक पण तोडू म्हणता तुटणार नाहीत आणि तुटूही नयेतसं वाटायला लावणाऱ्या,
जिवाजवळच्या माणसांवरचा संतापओठ मिटून गिळत,
घोकाव्या लागतात
पुन्हापुन्हा.
तरीही,
कोण जाणे किती युगं
कुठल्या सुपरहीरो कृष्णाचा धावा करत उभे आहोत मूर्खासारखे,
आपली वस्त्रं अखेर आपल्यालाच सावरायची असताना सिनेमाचा क्लायमॅक्स येईस्तोवर थांबून काय होणार त्याला आणखी एक जबरदस्त सुपरडुपरमेगाहिट मिळण्याखेरीज -
पुरे आता -
अशी कडूजहर अश्रद्ध ॲसिडिक लहर दाटून येते गळ्याशी.
नेमकं तेव्हाच वाजतं दिलखेचक बासरीचं बॅक्ग्राउंड म्युझिक.
आणि अवतरतो एखादा श्यामलवर्णी पावेबाज मुरारी.
पण -
तू सुपरहीरो असलास तर तुझ्या घरी,
मीच आहे शेवटी राधा ऑन द डान्स फ्लोअर.
नि
मुख्य म्हणजे नाचणं तर माझं मलाच भाग आहे,
मग फुटेज तुला कशाला,
चल फूट -
म्हणण्याइतकी जान येते जिवात,
तेव्हा
पिंपळाचं बी कुठून येत असेल वाहत हे सनातन नवल वाटेनासं होतं.
तगमग निवते,
ॲंटेना स्थिरावतो,
व्यत्यय संपतो,
प्रक्षेपण सुरू होतं
सुरळीत.

Saturday, 22 June 2019

गणपतीची तसबीर, खोबरेलाची निळी बाटली...

गणपतीची तसबीर,
खोबरेलाची निळी बाटली,
बीन बॅगांची बेढब बोचकी मधेच.
पसरलेल्या गाद्यांची भारतीय बैठक,
चुंबकाला लटकवलेलं कॅलेंडर,
फ्रीजवर देशाविदेशातली मॅग्नेटचित्रं मधेच.
गुळाच्यापोळ्यामेथीचे ठेपले,
लोणचंमुरांबाघरचंतूप,
सुपरमार्केटातली सुबक हातपुसणी मधेच.
इस्त्रीवाल्याकडून आलेल्या कपड्यांचा नीटस ढीग,
दारावर सुकत चाललेलं गोंड्याचं तोरण,
हॉलमध्ये नांदणाऱ्या चड्ड्याबड्ड्या मधेच.
लहानखुरी सोज्ज्वळ तुळस,
ओट्यावर चिकटवलेली लक्ष्मीची पावलं,
फोफावलेलं तकतकीत मनीप्लांट मधेच.
रात्रीबेरात्रीच्या शिफ्ट्स,
तारवटलेल्या दिवसांमधलं वीकेन्डच्या अंतहीन झोपेचं ओॲसिस,
यूट्यूबवरचं 'घाशीराम कोतवाल' मधेच.
गटारी नाल्याच्या कडेनं उगवत जावी सावकाश निश्चितपणे एखादी स्वयंपूर्ण इकोसिस्टिम,
तसे उपऱ्या आयुष्याच्या कडेकडेनं रुजत गेलेले एकांडे, ॲडॅप्टेबल संसार.
मधूनच वस्तीला येऊन प्रवाहाला सराईत वळणं देऊ पाहणारा सुखवस्तू पाचवा वेतन आयोग मधेच.

Wednesday, 19 June 2019

भरभराटीला येतंय शहर

अंधार-उजेडाच्या सीमेवरचा अस्फुट प्रकाश,
नजर वर करायला लावणारं छत,
कवेत न मावणारे विस्तीर्ण खांब,
मनात दचका भरवणारी शांतता,
दाराशी दक्षिणेची पेटी.
तेहेतीस कोटी असतील नसतील,
पण
देवही चिकार.
काही लाल, काही निळे,
काही पांढरे, काही काळे.
लहान, मोठे, काही स्वयंचलित,
काही चकचकीत शानदार.
काही गरीब साधेभोळे.
पालख्या येतात, पालख्या जातात.
लोक अदबीने बाजूला होतात.
पालख्या निघतात
आणि काही काळ टेकतात,
तेव्हा रस्त्यांच्या दुतर्फा साकारतात टेम्परवारी मंदिरं.
भक्तगण आदबीने जागा करून देतात,
रस्ते बदलतात.
टेम्परवारी बडवे उभे राहतात.
दक्षिणेच्या पावत्या फाडतात.
नवनवीन देवांची पडत राहते भर.
नवनवीन मंदिराची पायाभरणी होते.
उंचच उंच कळस उभारले जातात
शानदार.
देवळांची आणि कळसांची,
ट्रस्टांची आणि बडव्यांची,
देवांच्या निर्मिकांची
आणि देवांच्या शासकांची,
उपासकांची आणि भक्तजनांची,
संख्या दिवसेंदिवस वीत जातेय.
या देवाच्या धर्माला आलेत दिवस मोठे बहारदार.
भरभराटीला येतंय शहर...

Friday, 14 June 2019

नाक्यावरच्या छक्क्याच्या

नाक्यावरच्या छक्क्याच्या
हक्कानं पसरलेल्या हातावर
ठेवते मी
दोन्ही हात छातीपाशी पूर्ण जुळवून,
मान लववून केलेला नमस्कार
फक्त.
चकित होतो चेहरा क्षणभर.
पण मग हसू येतं चेहऱ्यावर
डोळ्यांपर्यंत पोचणारं.
दोन्ही हात उंचावले जातात.
माथ्याला हलका स्पर्श.
सिग्नल हिरवा होतो.
रिक्षावाला भरधाव सुटतो.
पुढच्या कोरड्याठाक दिवसभरात
हसू झिरपत राहतं.
कुणाचं कुणास ठाऊक.

Tuesday, 11 June 2019

चालली घोडी दिमाखात


पट्टे आवळा, जिरेटोप बांधा
टाकली टांग, मारली टाच
नवा दिवस, नवी सकाळ
चालली घोडी दिमाखात

याला घाई त्याला घाई
तिला घाई हिला घाई
साईड मुळीच देणार नाही
माझीच सगळ्यांत मोठी आई

सुटेल सिग्नल मिनिटभरात
हाक गड्या, ये पुढ्यात
घुसव चाक, दिसली फट?
सुटला-सुटला, चालव हात

चपळाईने हेर जागा
बघ चौफेर, नजर ठेव
आला आला पार्किँगवाला
सुट्टी नोट तयार ठेव

चल चल पाऊल उचल
दे रेटा मार धक्का
इतकं हळू भागेल कसं?
भीड सोड हो पक्का
पर्स धर पोटापाशी
त्यात तुझे पंचप्राण
लाव जोर, शीर आत
नेम धरून कोपर हाण

एरवी तुलाच बसेल ढुशी
जाईल तोल, पडशील खाली
मिनिटभराची सुकी हळहळ
'आली कुणी चाकाखाली!'

बंद निसटू देऊ नकोस
अडकेल कुठे, फास बसेल
स्वतःसकट चार जणांत
गोंधळ माजेल, गाडी चुकेल

तोल जाऊन देऊ नकोस
हासड शिवी, झिंज्या धर
पायावरती दे पाय
एरवी कशी येशील वर?

ओलीगच्च एक पाठ
तिला चिकटून एक नाक
शिरलं शिरलं ढुंगण फटीत
मागून बसली एक लाथ

जीव झाला लोळागोळा
अर्धा श्वास राहिला वर
थांब थोडा, सुटेल गाडी
मिळेल हवा, धीर धर

बेंबीपासून खेच श्वास
लाव जमेल तितका जोर
आत घूस, पकड जागा
नाहीपेक्षा बरा डोअर

बसला गचका, सुटली गाडी
झाला तह, रेलली पाठ
नवा दिवस, नवी सकाळ
चालली घोडी दिमाखात

Friday, 7 June 2019

काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात

काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात
जन्माला आलेले असता तुम्ही
तेव्हा सगळे उपरोध आत वळवून घेण्याला पर्याय असत नाहीत.
पेट्रोल जाळलंत तरी तुम्ही पुढच्या पिढ्यांचे गुन्हेगार
लाकूड जाळलंत तरीही तुम्हीच मागच्या पिढ्यांचा वारसा जपायला नालायक ठरलेले
बेजबाबदार.
काहीच न जाळता नुसते निवांत बसतो म्हणालात
निसर्गाबिसर्गाच्या सान्निध्यात,
तरीही थोडेफार थोरोबिरो होऊन गेलेले असतात पूर्वीच.
तुम्ही ओरिजनॅलिटी नसलेले
बिनडोक नकलाकार.
विकास हवा म्हणालात,
तर तुमच्यावर पर्यावरणाच्या निर्घृण खुनाचे आरोप होतात.
विकास नको म्हणालात,
तर कमोडवर बसून साधं निवांत हगण्यालाही हिप्पोक्रसीचे छद्मी रंग येतात.
प्रेमात पडून पटवा प्रियकर.
करा लग्न, आणा मूलबिल,
थाटा संसार.
तुम्ही चाकोरीतून चालणारे
धोपटमार्गी पगारदार.
नको च्यायला लग्नबिग्न.
दुनियेला मारतो म्हणा, फाट्यावर.
जेनेटिकल मैदानात उतरायचा धीरच न झालेले तुम्ही.
दुनिया तुम्हांलाच भेकड म्हणणार.
युद्ध टाळा
काश्मिरात नको म्हणा, हिंसाचार.
संशयाचं गगनचुंबी वारूळ उठलंच समजा
तुमच्या देशभक्तीवर.
म्हणा कधी समजुतीनं,
'नाचू दे की विसर्जनात मनसोक्त
ऊर्मी असतात यार...'  
थोबाडाला काळं फासून कर्मकांडाच्या गाढवावर
तत्काळ तुम्ही उलटे सवार.
दिवस असे अखेरीचे येतात,
की उभं राहावंच लागतं तुम्हांला.
एकीकडून गेल्या शतकांचा राक्षसी ताकदीचा लोंढा
आणि एकीकडून जुलैचा वायझेड वारापाऊस अंगावर घेत,
हातातली कडी आणि फुटबोर्डावरचा पाय निसटू न देण्याची पराकाष्ठा करत.
स्टेशन येईस्तो,

असलीनसली सगळी ताकद एकवटून उभं राहण्याला पर्याय असत नाहीत.
काय करणार?
एका पायावर, तर एका पायावर.

दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात

दिवसाची शुभ्र कळी उमलू लागतानाच्या अस्फुट मोतिया प्रहरात
आसमंतात दरवळत असतो
मंद एसी लावल्यासारखा ताजा कुरकुरीत गारवा.
तेव्हा ओट्यापाशी उभी राहून
आंघोळीपूर्वीच्या सोवळ्यात स्वैपाक उरकून घेणारी बाई
करत राहते आटापिटा
कपाळावरचा घामाचा थेंब निसटून
कणकेच्या परातीत पडू नये म्हणून.
शिळ्या घामाची पुटं धुऊन
नवाकोरा ताजा घाम लेऊन
जिना उतरते
आणि नाक्यावरच्या एकमेव रिक्षापर्यंत पोचण्याच्या अलिखित शर्यतीत जिंकून
धावत्या रिक्षात निमिषभर थारावते
तेव्हा गारव्याची हलकी शीळ ऐकू येतेच तिला
रिक्षाच्या फर्र आवाजावर मात करत.
टवटवलेले तुकतुकीत पेन्शनरी घोळके,
आपल्याच लयीत मग्न होऊन रस्ते झाडणारे
आणि लयीचा बळी देण्याचं बाणेदारपणे नाकारून
बसस्टॉपवरच्या इस्त्र्यांवर मिश्कील उर्मटपणे धूळ उडवत जाणारे
मिजासखोर झाडूवाले,
घाईला झुकांडी देत
तळ्यातल्या पाण्यावर जमलेली
संथ मलईदार निवांतता
सगळं बघता बघता विसर्जित होत जातं
भाजीवाल्यांच्या आरोळ्यांत,
हॉर्न्सच्या हाणामार्‍यांत,
ट्रॅफिक हवालदारांच्या शिट्ट्यांत.
करकचून लागलेले ब्रेक्स,
'पोटाला दे गं माय...
पोहे-उपमा-खिच्डी-गरम्म….’
‘…तेज गाडी जानेवाली है...
राइट साइड डोअर कोपरा पकडून,
पर्स शिताफीनं आतल्या विश्वासाच्या हाती सोपवून,
ओढणी अंगासरशी आवरून घेऊन,
बाई गाडीला पाठ टेकते तेव्हा सूर्य वर आलेला असतो दळदार.
मऊ ऊन मनापासून पिऊन घेत
फोनची बोंडं कानात खुपसते,
सैलावते अर्ध्यापाऊण तासापुरती
कपाळ टिपून घेते एकदाच नीट.
इथून पुढच्या घामावर
पहिला हक्क शहराचा असतो...

Wednesday, 5 June 2019

बुडाला यावा फोड असं या विश्वीचं आर्त

बुडाला यावा फोड असं या विश्वीचं आर्त आपल्या बेसूर गळ्यातून काढत,
भजनाचा सूर माइकच्या बोंडकात घुसून पोचलेला पार टिपरीत.
सिऱ्यलीचा आवाज हातपाय झाडत बुडतो त्यात गळ्यापर्यंत.
काकू फणकारतात.
चहू बाजूंनी चालून येणारे आवाज उडवून लावतात मानेच्या एका झटक्यात.
ते हटता हटत नाहीत.
काकू चवताळतात.
रिमोटच्या बटणावर जोर काढतात.
सिऱ्यलीतल्या सात्त्विक सुनेच्या सोशीकपणाचं स्तोत्र.
तिची पार तार लागलेली.
व्हॉल्यूमची रेष जाईल तितकी वर नेतात काकू रिमोटच्या बटणावर चढून.
कुकराच्या शिट्टीची दीर्घ किंचाळी साथ देते दारावरच्या बेलला त्याच जोशात.
भजन अधिक सिऱ्यलस्तोत्र अधिक कुकरशिट्टी अधिक डोअरबेल अशा सगळ्या बेरजेत,
हातचा एक घेतात.
आल्ये, आल्ये, आल्ये - तारस्वरात किंचाळतात.
एकीकडे पाठीची रग दवडतात.
पायाशी दीड तास मोडून मोडलेल्या गवारीची परात.
विसरून ठेचकाळतात, कळवळतात.
दार उघडताना काकांवर करवादतात.
काका सरावानं कानाच्या पापण्या घेतात फाटकन मिटून.
आसमंतातल्या आवाजांच्या वातीवर चपळाईनं चढतात,
वात चवड्याखाली चिरडतात, विझवतात.
दाढेच्या खोपच्यात सारतात तंबाखूची गोळी.
दिवस म्यूट होतो.

Sunday, 26 May 2019

कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांत उडतात फुलपाखरं

कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांत उडतात फुलपाखरं.
पण तीक्ष्ण ससाणेदार नख्या वागवत अणकुचीदार,
सफाईदारपणे वाट काढतात ऐन साडेनवाच्या फास्टमधल्या गर्दीतून
काखोटीत दागिन्यांचं झुंबर लखलखवत.
शिव्या देतात हसतहसत
धारदार घासाघीस करतात.
उतरत्या दुपारी विझत
गेलेल्या फलाटावर कोंडाळं करून
एखाद्दुसऱ्या टपोऱ्या टग्याची मनमुराद मस्करी करत,
भजी-चपाती चाबलतात खिदळत कागदातून
कानातले विकणाऱ्या पोरी.
सावळ्या तरतरीत नाकातल्या मोरणीचा एकच खडा
कापत जावा एका विशिष्ट कोनातून
आसपासच्या नजरा लक्ककन आरपार,
तसा पोरींचा विजेसारखा वावर.
नव्यानं चाकरीला निघालेल्या पोरसवदा बायांच्या नजरेत पैदा करतो किंचित असूया, तुडुंब आदर.
ऋतूंमागून ऋतू.
उन्हाळे पिकत जातात.
आटत्या दिवसांचे हिवाळे नांदतात.
अंगापिंडानं भरतात.
पावसाळ्यामागून पावसाळे,
कोवळ्या कोंबांना खरबरीत पोताच्या सालींचे ताठर चिवट वेढे पडतात.
कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांतली फुलपाखरं
अल्पजीवी निसर्गचक्रासमोर मुकाट तुकवतात माना.
मावळत जातात.
पोरसवदा बायांच्या चाकऱ्या बर्करार.
तिथे फोफावत जातो कोरडाठाक काटेरी आत्मविश्वास दाणेदार.
कानातल्यांची फॅशन बदलते.
कानातले विकणाऱ्या कोवळ्या पोरींच्या डोळ्यात फडफडतात नवी फुलपाखरं.
नख्या अधिक अणकुचीदार.
गर्दी पाऊलभर अधिक क्रूर.
अळीच्या पोटात फुलपाखरांच्या पिढ्यांमागून पिढ्या रिचत जातात.
उमलत राहतात.

Friday, 24 May 2019

फूटपाथ नसलेल्या रस्त्यावरून

फूटपाथ नसलेल्या रस्त्यावरून ऑलमोस्ट अंगावर येणारी जगड्व्याळ बस
वटारल्या गेलेल्या डोळ्यानी जोखून बघत कुंपणभिंतीला घसपटत चालताना
हातातली छत्री उलटी होऊ नये म्हणून मुठीकडून जोर लावावा,
अंगावर चिखलाचा सपकारा बसू नये म्हणून भिंतीत जिरावं होता होईतो,
की पुढ्यातल्या भोकाची खोली आणि झाकणाची जाडी
मापून घ्यावी नजरेनीच जमेल तितकी
पाऊल पुढे टाकण्यापूर्वी,
हे ठरवावं लागेल आता रोज.
स्टेशनातल्या ब्रिजवर पुरेसा हवेशीर कोपरा हेरून पाण्याची भडास थांबेतो थबकणं,
फ्लायओव्हरच्या कोपर्‍याखाली आसरा घेणं,
की ऑफीसची सॅक भिजली तर भिजली गेली भोकात जान सलामत तो लॅपटॉप पचास म्हणत थेट सूर मारणं,
यांतलं काय कमी प्राणघातक ठरेल,
हेही.
कधीतरी तर पोचूच ही बेगुमान खातरी मनाशी धरून आडमुठेपणी उभ्या राहिलेल्या बयेच्या गर्दीत घुसावं
आणि पोटातला चहा मुक्कामी पोचेस्तो बाईच्या जातीसारखा समजूतदार दम धरेलशी आशा करावी,
मागचापुढचा विचार न करता पाणी ढोसण्याची चैन करण्याबद्दल स्वतःला बोल लावावा,
की शरणागती पत्करून कुणाच्यातरी चुलतचुलत सोबतीला लटकत गाठावी एखादी मर्यादशील मोरी,
हेही.
पहाटे उठून प्रलयाचा आवाज ऐकताना वर्किंग फ्रॉम होमचं ड्राफ्टिंग करावं मनातल्या मनात,
लाईट गेले की नेटचं कनेक्शन ढपणार म्हणून आधीच हेरून ठेवावा एखादा भरोशाचा शेजारी,
की भिजलो तर भिजलो च्यायला मिठाचे बनलोय का आपण न्यूज च्यानेलवाले डोक्यावर पडलेत साले म्हणत घ्यावं आलं किसायला,
हेही.
असू दे आत्ता दर शुक्रवारी कपात.
असू दे विहिरींच्या तळांच्या नि टॅंकरच्या फोटोंची लयलूट पेपरात.
असू देत नाक्यावरच्या वस्तीत रोज नवे भिकारी ओतले जात.
हवा उन्हानं खरपूस तापत चार्ज होत चाललीय दिवसेंदिवस.
तिचा करंट खाऊन मरायचं
की तिच्यावर स्वार होत  घ्यायचा शहराच्या जळजळीत स्पिरिटचा घोट,
हे ठरवावं लागेल आता. 
रोज.

Wednesday, 15 May 2019

मॉर्निंग वॉकला येणार्‍या समस्तांना

मॉर्निंग वॉकला येणार्‍या समस्तांना
खुणावत असते कसलीशी कडक नशा तेजतर्रार.
हवेत हलका गारवा,
महापालिकेनं मुद्दाम पाळलेली हिरवीगार झाडं,
सिमेंटचे आज्ञाधारकपणे वळणदार रस्ते,
नजरेत रंग घुसवणारी व्यायामाची अणकुचीदार यंत्रं,
आणि एक टुमदार मल्टिपर्पज देऊळ कोपर्‍यात -
सगळं काही बयाजवार.
सुस्नात, अनवाणी, आणि / किंवा नुसत्याच भल्या पहाटे येऊन
गरगर चकरा मारू लागणार्‍या अनेकांच्या पावलांनी, 
भरू लागतो खळ्यात एक मिरमिरणारा, फसफसणारा उत्साह.
बाहू फुरफुरू लागतात,
पायांना वेग येतो,
हरीच्या नावे फुटतात आरोळ्या,
डोळ्यांत चढतो आरोग्याचा खून.
माशांना कणीक, कुत्र्यांना पाव.
पक्ष्यांना धान्य, मुंग्यांना साखर.
आरोग्याच्या उपासकांना भाज्यांचे निरुपद्रवी रस कडूजहार.
दारिद्र्यरेषेच्या वर राहणारे यच्चयावत सुखवस्तू सजीव
देतात तृप्तीची ढेकर.
बांधून ठेवलेल्या गाड्यांचे लगाम सुटतात.
सवार्‍या निघतात.
होतात चढत्या उन्हानिशी वाढत्या रहदारीत बघता बघता फरार.
मॉर्निंग वॉकला येणार्‍या समस्तांना
खुणावत असते कसलीशी कडक नशा तेजतर्रार.

Saturday, 11 May 2019

आजचा दिवस काठोकाठ

काशी उठते.
फोन वाचते.
थोडे लाइक
थोडे इमोजी.
धापा टाकत
बाई येते.
सुबक पोळ्या.
कोरडी भाजी.

थोडा वॉक.
थोडा योगा.
एखाद्दोन
सूर्यनमस्कार.
सॅलड, स्वीट.
ताक हवंच.
टप्परवेअर
टिफिन तयार.

फॉर्मल शर्ट.
किंचित डिओ.
घड्याळ कशाला.
नाजूक स्टड.
वॉटर बॉटल.
हेडफोनचार्जर.
आलाच फोन
बाहेर पड.

एसी वाढवा
किती उकडतंय.
किती पोल्यूशन
ट्रॅफिक किती.
जीपीएस बघा
लालबुंद.
पोचू ना वेळेत
पोटात भीती.

कार्ड स्वाइप.
फोन मेल्स.
क्लाएंट व्हिजिट.
दिवस गच्च.
टपरीवरती
कटिंग मारू.
आठ रुपयांत
चव उच्च.

दिवस सरला
संपवा पाणी
तीन लिटर्स
मस्ट मस्ट.
इतक्या लौकर
निघता कुठे.
मॅनेजरीण
आली जस्ट.

थोड्या बाता.
थोडं काम.
माफक गॉसिप.
एकच थाप.
शेलक्या शिव्या.
अस्सल शाप.
थोडं पुण्य.
बरंच पाप.

रात्र पडते.
काशी निघते.
टेक्स्टत टेक्स्टत
पोचते घरी.
गरम जेवण.
कुरियर आलंय.
गळका टीव्ही
घर भरी.

थोडं शॉपिंग.
थोडं नेटफ्लिक्स.
गळला फोन.
टेकली पाठ.
मेडिटेशन.
उद्यापासून.
आजचा दिवस
काठोकाठ.