Sunday, 26 May 2019

कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांत उडतात फुलपाखरं

कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांत उडतात फुलपाखरं.
पण तीक्ष्ण ससाणेदार नख्या वागवत अणकुचीदार,
सफाईदारपणे वाट काढतात ऐन साडेनवाच्या फास्टमधल्या गर्दीतून
काखोटीत दागिन्यांचं झुंबर लखलखवत.
शिव्या देतात हसतहसत
धारदार घासाघीस करतात.
उतरत्या दुपारी विझत
गेलेल्या फलाटावर कोंडाळं करून
एखाद्दुसऱ्या टपोऱ्या टग्याची मनमुराद मस्करी करत,
भजी-चपाती चाबलतात खिदळत कागदातून
कानातले विकणाऱ्या पोरी.
सावळ्या तरतरीत नाकातल्या मोरणीचा एकच खडा
कापत जावा एका विशिष्ट कोनातून
आसपासच्या नजरा लक्ककन आरपार,
तसा पोरींचा विजेसारखा वावर.
नव्यानं चाकरीला निघालेल्या पोरसवदा बायांच्या नजरेत पैदा करतो किंचित असूया, तुडुंब आदर.
ऋतूंमागून ऋतू.
उन्हाळे पिकत जातात.
आटत्या दिवसांचे हिवाळे नांदतात.
अंगापिंडानं भरतात.
पावसाळ्यामागून पावसाळे,
कोवळ्या कोंबांना खरबरीत पोताच्या सालींचे ताठर चिवट वेढे पडतात.
कानातले विकणाऱ्या पोरींच्या डोळ्यांतली फुलपाखरं
अल्पजीवी निसर्गचक्रासमोर मुकाट तुकवतात माना.
मावळत जातात.
पोरसवदा बायांच्या चाकऱ्या बर्करार.
तिथे फोफावत जातो कोरडाठाक काटेरी आत्मविश्वास दाणेदार.
कानातल्यांची फॅशन बदलते.
कानातले विकणाऱ्या कोवळ्या पोरींच्या डोळ्यात फडफडतात नवी फुलपाखरं.
नख्या अधिक अणकुचीदार.
गर्दी पाऊलभर अधिक क्रूर.
अळीच्या पोटात फुलपाखरांच्या पिढ्यांमागून पिढ्या रिचत जातात.
उमलत राहतात.

Friday, 24 May 2019

फूटपाथ नसलेल्या रस्त्यावरून

फूटपाथ नसलेल्या रस्त्यावरून ऑलमोस्ट अंगावर येणारी जगड्व्याळ बस
वटारल्या गेलेल्या डोळ्यानी जोखून बघत कुंपणभिंतीला घसपटत चालताना
हातातली छत्री उलटी होऊ नये म्हणून मुठीकडून जोर लावावा,
अंगावर चिखलाचा सपकारा बसू नये म्हणून भिंतीत जिरावं होता होईतो,
की पुढ्यातल्या भोकाची खोली आणि झाकणाची जाडी
मापून घ्यावी नजरेनीच जमेल तितकी
पाऊल पुढे टाकण्यापूर्वी,
हे ठरवावं लागेल आता रोज.
स्टेशनातल्या ब्रिजवर पुरेसा हवेशीर कोपरा हेरून पाण्याची भडास थांबेतो थबकणं,
फ्लायओव्हरच्या कोपर्‍याखाली आसरा घेणं,
की ऑफीसची सॅक भिजली तर भिजली गेली भोकात जान सलामत तो लॅपटॉप पचास म्हणत थेट सूर मारणं,
यांतलं काय कमी प्राणघातक ठरेल,
हेही.
कधीतरी तर पोचूच ही बेगुमान खातरी मनाशी धरून आडमुठेपणी उभ्या राहिलेल्या बयेच्या गर्दीत घुसावं
आणि पोटातला चहा मुक्कामी पोचेस्तो बाईच्या जातीसारखा समजूतदार दम धरेलशी आशा करावी,
मागचापुढचा विचार न करता पाणी ढोसण्याची चैन करण्याबद्दल स्वतःला बोल लावावा,
की शरणागती पत्करून कुणाच्यातरी चुलतचुलत सोबतीला लटकत गाठावी एखादी मर्यादशील मोरी,
हेही.
पहाटे उठून प्रलयाचा आवाज ऐकताना वर्किंग फ्रॉम होमचं ड्राफ्टिंग करावं मनातल्या मनात,
लाईट गेले की नेटचं कनेक्शन ढपणार म्हणून आधीच हेरून ठेवावा एखादा भरोशाचा शेजारी,
की भिजलो तर भिजलो च्यायला मिठाचे बनलोय का आपण न्यूज च्यानेलवाले डोक्यावर पडलेत साले म्हणत घ्यावं आलं किसायला,
हेही.
असू दे आत्ता दर शुक्रवारी कपात.
असू दे विहिरींच्या तळांच्या नि टॅंकरच्या फोटोंची लयलूट पेपरात.
असू देत नाक्यावरच्या वस्तीत रोज नवे भिकारी ओतले जात.
हवा उन्हानं खरपूस तापत चार्ज होत चाललीय दिवसेंदिवस.
तिचा करंट खाऊन मरायचं
की तिच्यावर स्वार होत  घ्यायचा शहराच्या जळजळीत स्पिरिटचा घोट,
हे ठरवावं लागेल आता. 
रोज.

Wednesday, 15 May 2019

मॉर्निंग वॉकला येणार्‍या समस्तांना

मॉर्निंग वॉकला येणार्‍या समस्तांना
खुणावत असते कसलीशी कडक नशा तेजतर्रार.
हवेत हलका गारवा,
महापालिकेनं मुद्दाम पाळलेली हिरवीगार झाडं,
सिमेंटचे आज्ञाधारकपणे वळणदार रस्ते,
नजरेत रंग घुसवणारी व्यायामाची अणकुचीदार यंत्रं,
आणि एक टुमदार मल्टिपर्पज देऊळ कोपर्‍यात -
सगळं काही बयाजवार.
सुस्नात, अनवाणी, आणि / किंवा नुसत्याच भल्या पहाटे येऊन
गरगर चकरा मारू लागणार्‍या अनेकांच्या पावलांनी, 
भरू लागतो खळ्यात एक मिरमिरणारा, फसफसणारा उत्साह.
बाहू फुरफुरू लागतात,
पायांना वेग येतो,
हरीच्या नावे फुटतात आरोळ्या,
डोळ्यांत चढतो आरोग्याचा खून.
माशांना कणीक, कुत्र्यांना पाव.
पक्ष्यांना धान्य, मुंग्यांना साखर.
आरोग्याच्या उपासकांना भाज्यांचे निरुपद्रवी रस कडूजहार.
दारिद्र्यरेषेच्या वर राहणारे यच्चयावत सुखवस्तू सजीव
देतात तृप्तीची ढेकर.
बांधून ठेवलेल्या गाड्यांचे लगाम सुटतात.
सवार्‍या निघतात.
होतात चढत्या उन्हानिशी वाढत्या रहदारीत बघता बघता फरार.
मॉर्निंग वॉकला येणार्‍या समस्तांना
खुणावत असते कसलीशी कडक नशा तेजतर्रार.

Saturday, 11 May 2019

आजचा दिवस काठोकाठ

काशी उठते.
फोन वाचते.
थोडे लाइक
थोडे इमोजी.
धापा टाकत
बाई येते.
सुबक पोळ्या.
कोरडी भाजी.

थोडा वॉक.
थोडा योगा.
एखाद्दोन
सूर्यनमस्कार.
सॅलड, स्वीट.
ताक हवंच.
टप्परवेअर
टिफिन तयार.

फॉर्मल शर्ट.
किंचित डिओ.
घड्याळ कशाला.
नाजूक स्टड.
वॉटर बॉटल.
हेडफोनचार्जर.
आलाच फोन
बाहेर पड.

एसी वाढवा
किती उकडतंय.
किती पोल्यूशन
ट्रॅफिक किती.
जीपीएस बघा
लालबुंद.
पोचू ना वेळेत
पोटात भीती.

कार्ड स्वाइप.
फोन मेल्स.
क्लाएंट व्हिजिट.
दिवस गच्च.
टपरीवरती
कटिंग मारू.
आठ रुपयांत
चव उच्च.

दिवस सरला
संपवा पाणी
तीन लिटर्स
मस्ट मस्ट.
इतक्या लौकर
निघता कुठे.
मॅनेजरीण
आली जस्ट.

थोड्या बाता.
थोडं काम.
माफक गॉसिप.
एकच थाप.
शेलक्या शिव्या.
अस्सल शाप.
थोडं पुण्य.
बरंच पाप.

रात्र पडते.
काशी निघते.
टेक्स्टत टेक्स्टत
पोचते घरी.
गरम जेवण.
कुरियर आलंय.
गळका टीव्ही
घर भरी.

थोडं शॉपिंग.
थोडं नेटफ्लिक्स.
गळला फोन.
टेकली पाठ.
मेडिटेशन.
उद्यापासून.
आजचा दिवस
काठोकाठ.

Thursday, 9 May 2019

सोडियम व्हेपरच्या काविळलेल्या प्रकाशात

सोडियम व्हेपरच्या काविळलेल्या प्रकाशात
वाहत्या रस्त्याकडेला बसकण मारून
काहीतरी विकू पाहणाऱ्या
एकांड्या भय्याची
कीव करू नये कुणी कधी,
एकही गिऱ्हाईक फिरकलं नाही
त्याच्याकडे तासंतास,
तरीही.

दाराशी वसलेल्या झाडांचेच
आयते आकाशकंदील करून
संध्याकाळी लखलखून टाकणाऱ्या
दांडग्या दुकानांच्या
वॉचमनसारखा,
संपूर्ण शरणागतीचा भाव
त्याच्याही चेहऱ्यावर नांदत असला,
तरीही.

ती लक्झरी परवडणार नाही,
अनेकांच्या घामांचा स्पर्श घडून
रोज पवित्र होणाऱ्या,
डोळ्याला भिडणारा डोळा
निर्विकारपणे न्याहाळत
आपखुशीनं फोनच्या सुरईत शिरणाऱ्या,
आणि कानांत गुडद्या सारून
परतीची वाट स्वहस्ते बंद करणाऱ्या
कुणालाही.

ट्रेनच्या दारात लटकताना,
आपल्यासोबत वाहत येणाऱ्या सूर्याचा
नजर खिळवून टाकणारा भीषणरम्य मृत्यू पाहून,
समोरच्या अनोळखी नजरेत
आपली नकळत विस्फारलेली हसरी नजर मिसळून देणाऱ्या
सगळ्यांच्याच आयुष्यात,
येणार असतात तिन्हीसांजा.
काल, आज आणि उद्याही.

Wednesday, 8 May 2019

शहरापाशी जादूचे रस्ते असतात

शहरापाशी जादूचे रस्ते असतात.
गाड्या आणून ओता त्यांवर
कितीही.
जागा वीत राहते पार्किंगसाठी.
झाडंबिडं वठू लागतात एका रात्रीत
निमूट.
कापून काढली जातात.
बिनबोभाट.
रस्ते सिमेंटची आवरणं लेऊन सजून बसतात.
सणासुदीला रांगोळ्यांचे ढीग मिरवतात.
रांगोळी विकणाऱ्या लोकांचे संसारही.
दुसऱ्याच दिवशी सफाई कामगार झाडून टाकतो
भल्या पहाटे
रांगोळी आणि रांगोळीवाल्याची चिरगुटं.
आपोआप.
पाऊस येतो.
रस्ते न्हाऊन घेतात
सचैल.
भरतीचा मुहूर्त साधून गटारं तुंबून घेतात.
भंग्याचा वार्षिक बळी नच मिळाला
तर एखाद्या चुकल्यामाकल्या पांढरपेशा वाटसरूवर भागवतात.
भुकेला मांड्याचा कोंडा करतात.
रस्ते बघत राहतात
निर्विकार.
गोकुळाष्टमीला मैदान होतात.
प्रचारसभेला सभागृह होतात.
क्वचित कधी अनावर पावसाळ्यात
ओढे होतात, नाले होतात, नदी होतात...
एरवी पडून राहतात
इमानी पाळीव ॲलेक्सासारखे
शहराच्या वळचणीला
निपचीत.
उशाला जादू घेऊन.
शहरापाशी जादूचे रस्ते असतात.