Saturday, 23 December 2017

नकोच

काय हवं?

नावगाव?
घरदार?
मूलबाळ?
शेजसंग?
डागदागिना?
प्यारमोहोबत?
कस्मेवादे?
नको.
नकोच.

एखादा शहाणा शब्द.
थट्टामस्करी मूठभर.
वादवादंग पसाभर.
असण्याची आस.
सोबतीनं वाढणं.
शिळोप्याच्या गप्पा.
ठेचांची कबुली कधी.
धीर मागणं हक्कानं.
देणं सठीसामाशी.
मागता,
- न मागताही.

पुरे झालं.
भरून पावलं.
पाणी पाण्याला मिळालं.

मिळालं?

Monday, 11 December 2017

स्त्रीवाद वगैरे...

वादात पडणं तसं फार शहाणपणाचं नव्हे. पण कधीकधी आजूबाजूला उठलेला मतामतांचा गल्बला इतका तीव्र असतो आणि तरीही आपल्याला जे म्हणायचं आहे, नेमकं तेच सोडून, इतक्या भलभलत्या गोष्टींवर लोक भलभलतं व्यक्त होत असतात, की आपण तोंड उघडणं ही आपली निकड होऊन बसते. पण संदिग्धपणे हवेत तीर मारून मग ते योग्य ठिकाणी जावेत म्हणून प्रार्थना करत बसणं फारच वेळखाऊ नि बचावात्मकही वाटतं. त्यामुळे थेटच मुद्द्यावर येते. सचिन कुंडलकर यांनी त्यांच्या स्तंभलेखनातून स्त्रीवादाबद्दल व्यक्त केलेली मतं, त्याला सुनील सुकथनकरांनी दिलेलं उत्तर आणि या सगळ्यावर उडालेला धुरळा यांमुळे हात शिवशिवताहेत.

गेली अनेक वर्षं मीही स्त्रीवादाबद्दल संमिश्र भावना मनात वागवल्या आहेत.

मी अशा वर्गात वाढले आणि अजूनही वावरते, जिथे मूलभूत संघर्ष करण्याची वेळ फारशी येत नाही. माझ्यावर बाई म्हणून कोणतेही थेट अन्याय झाले नाहीत. मला माझ्या कुटुंबात वा समाजात कोणतीही थेट बंड करावी लागलेली नाहीत. स्वातंत्र्य या गोष्टीसाठी मला कधीही झगडावं लागलेलं नाही. मला अनेकच गोष्टी आयत्या आणि सहज मिळाल्या. मला शिक्षणासाठी झगडावं लागलेलं नाही. माझ्यावर लग्नाची वा इतर जबरदस्ती झालेली नाही. रस्त्यातून जाताना कुणीसं गलिच्छ नजरेनं पाहण्याचा वा हात लावण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे माझ्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही.

या पार्श्वभूमीमुळे वरवर पाहता स्त्रीच्या दडपणुकीबद्दल मी काही बोलणं खरंतर फारसं सुसंगत असणार नाही.

पण वरवर दिसतं आहे, तितकं हे सहजसोपं नाही. मी आणि माझ्यासारख्या अनेक जणी या परिस्थितीपर्यंत येऊन पोचल्या आहेत, त्यामागे कुणीतरी कधीतरी केलेलं बंड आहे. शिक्षण, मतदान, मनासारखा वेश, आपल्या जीवनाबद्दलचे-शरीराबद्दलचे मूलभूत अधिकार... या --ळ्या गोष्टींसाठी कुणी ना कुणी, कधी ना कधी केलेलं बंड आहे. आज ज्याला लोक आक्रस्ताळेपणा म्हणतात, तशा आक्रस्ताळेपणानं आणि कोण काय म्हणेल याची बूज राखता त्याचा उघडपणे केलेला उच्चार आहे. त्याचे तत्कालीन समाजात जे पडसाद उमटले, ते त्या माणसांनी सोसले आहेत वा परतवले आहेत वा त्यातून मार्ग काढत त्यातून एक नवी पायरी गाठली आहे. मला असाही प्रश्न पडलाच एका टप्प्यावर, की मी हे सगळं रोज का स्मरायचं? 'गायमाउली क्षीरमाउली देते, तिला वंदन करून क्षीरमाउलीचं प्राशन करू या'छाप कृतज्ञतेची टिंगल उडवण्यात मीही अहमहमिकेनं सहभागी झाले आहे. मग या कृतज्ञतेचं महत्त्व काय?

तर - एक म्हणजे मी आणि माझ्यासारखे काही जण-जणी इथवर येऊन पोचले, म्हणजे सगळा समाज इथे येऊन पोचला असा त्याचा अर्थ होत नाही. दोन प्रकारे आपण अजूनही मागे आहोत. एक तर सवर्णेतर आणिकिंवा ग्रामीण आणि / किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय ते अतिगरीब समाजांमध्ये माझ्याइतकी सोयीस्कर आणि सुखवस्तू जागा बाईला आजही लाभत नाही. तिथले लढे अजूनही पुष्कळ प्राथमिक पातळीवरचे, धारदार, मानेवर सुरी ठेवणारे आहेत. गरीब ग्रामीण दलित मुलीला आणि गरीब ग्रामीण दलित मुलाला शिक्षण घ्यायचं असेल, तर ते कुणाला कमी कष्टांत मिळेल हे अजूनही स्वयंस्पष्टच आहे. दुसरं म्हणजे - जरी माझ्यासारख्या लोकांनी भौतिक पातळीवर समानतेची एक दृश्य पातळी गाठलेली असली, तरीही हे चित्र वरवरचं आहे. सांस्कृतिक संदर्भ तपासले असता; थोडं खोलात जाऊन, थोडं कडेला जाऊन तपासलं असता; ढोबळ उदाहरणं घेता जरा आडबाजूचे आणि 'ट्रिकी' प्रश्न तपासले असता - माझ्याही सामाजिक स्तरात संपूर्ण समता आल्याचं दिसत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आधुनिकता आल्यावर मी सहजी सिगारेट ओढू शकते. सहजी अर्ध्या चड्डीत फिरू शकते. पण लग्न करता मला एक मूल दत्तक घ्यायचं झालं, तर मला हे सहजासहजी करता येतं का? कागदोपत्री मला मार्ग सहजसाध्य असला, तरी कायदा चालवणारी वा वापरणारी जी हाडामांसाची माणसं असतात, ती मला पदोपदी अडथळे आणतात. त्याहून कमी धीट आणि साधं उदाहरण द्यायचं झालं, तर पुरणपोळी करता येणं हे बाई म्हणून माझ्यावर असलेलं सांस्कृतिक दडपण आहे असं मी म्हटलं, तर मला भलेभले लोक अजूनही तर्कहीन पद्धतीनं, आपल्या विचारातल्या विसंगतीचा विचारही करता फांदाडतात. मी व्यक्ती म्हणून जरी एकविसाव्या शतकात वावरत असले, तरीही माझ्यासोबतचे अनेक लोक - पर्यायानं माझं अंशतः भवताल मधून मधून अठराव्या वा एकोणिसाव्या शतकात पाय ठेवून असतं आणि याची निराळी दडपणं असतात. सूक्ष्म असतात. प्राणघातक नसतात. पण --ता-. त्यांचा बाऊ मी किती करायचा, हा व्यक्ती म्हणून माझ्या शहाणपणाचा भाग आहे आणि तो व्यक्तीपरत्वे अर्थातच बदलेल. पण परिस्थिती संपूर्णतः समतेची आहे काय? तर ती असावी की नसावी, असणं स्वप्नवत आहे की वास्तववादी हे प्रश्न बाजूला ठेवून आपण इतकं मान्य करू; की स्त्रीपुरुषसमता अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत निरनिराळ्या पेचप्रसंगी मला ऐतिहासिक परिस्थितीशी आणि तत्कालीन निर्णयांशी तुलना करून पाहणं क्रमप्राप्त असतं. ती करण्याचे रस्ते मला कृतज्ञतेतून - किंवा कमी भावुक-कमी भाविक शब्द वापरायचा झाला, तर इतिहासाच्या स्मरणातून - मिळतात. त्यामुळे मला ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले, आगरकर, कर्वे इत्यादी लोकांचं स्मरण पुसलं जाणं महत्त्वाचं वाटतं.

आता सगळे जण काही माझ्याइतके शहाणे नि प्रांजळ नसणार. (होय, हसलात तरी चालेल. हा एक सेमी-विनोद होता!) त्यामुळे काही जण या भेदांचा बाऊ करणारे असणार. काही जण या भेदांचं भांडवल करणारे असणार. काही जण त्यातून मिळणार्या सहानुभूतीचा गैरफायदा घेणारे असणार. काही जण ठामपणाला वळसा घालून नुसताच आक्रस्ताळेपणा करणारे असणार. काही जण विचाराचा गाभा समजून घेता निव्वळ शब्दावर बोट ठेवून वाद घालणारे असणार... हे सगळं असणारच. पण मुद्दा असा आहे, की हे फक्त स्त्रीवादी चळवळीतच नव्हे, तर जगातल्या प्रत्येक बदलाच्या चळवळीच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर असणारच! आरक्षणाचा गैरफायदा घेणारे लोक असणार. हुंडाविरोधी कायद्याचा गैरफायदा घेऊन पुरुषांना लुबाडणारे लोक असणार. मानवी स्वभावाचा तो विशेषच आहे. पण त्याचं प्रमाण असं कितीसं आहे? किती सीमित भागात आणि समाजांत आहे? त्यापलीकडे काय दिसतं? खरवडलं असता काय दिसतं? या प्रश्नांचा विचार करता  त्यावर बोट ठेवून आपण नक्की काय सिद्ध आणि साध्य करू पाहतो आहोत?

अर्थातच - प्रश्न विचारण्याला ना नाहीच. तो कोणत्याही माणसाचा अधिकारच आहे. मीही प्रश्न विचारतेच, की लग्न आणि मूल ही जोखडं आहेत, ही भाषा स्त्रीवादानं आता का सोडू नये? पुनरुत्पादन करू पाहणारा एक सजीव म्हणून या गोष्टी मला कराव्याश्या वाटतात, हे स्त्रीवाद्यांनी मान्य करायला काय हरकत आहे? पुरुष या प्राण्याला निव्वळ खलनायक ठरवून आपण निव्वळ भूमिकांमध्ये अदलाबदल करण्यापेक्षा सहजीवनाचा विचार करणारे, वा निदान प्रणयाराधनाबाहेर तरी लिंगनिरपेक्ष होऊ पाहणारे, जीव होण्याकडे आपली वाटचाल असायला नको का? पुरुषाची प्रणयप्रेरणा ही जोवर व्यक्ती म्हणून असलेल्या माझ्या भौतिक वर्तुळावर आक्रमण करत नाही, तोवर मी त्या प्रेरणेला शोषण का म्हणावं? पुरुषाला शारीर इच्छा आहेत आणि त्यानं त्या व्यक्त करणं म्हणजे थेट माझ्यावर बलात्कारच करणं आहे, अशी बोंब ठोकणं मी बंद का करू नये? स्वावलंबन आणि अर्थार्जन हे मी सबलीकरण म्हणून का वापरू नयेत? गेल्या आणि गेल्याच्या गेल्या पिढीत बायांनी केलेला त्याग वा त्यांच्यावर झालेला अन्याय गहाण टाकून मी कुठवर माझं तथाकथित सबलीकरण साधणार आहे? बाजार बाई म्हणून माझ्यावर अन्याय करत असेल, तर माझ्या मित्रावरही तो निराळ्या प्रकारे करतोच आहे हे मी कधी ओळखणार आहे?

हे सगळे प्रश्न मीही विचारतेच आहे. आणि ते कोणत्याही 'वादी' लोकांनी स्वतःला आणि आपापल्या वादाला विचारावेतच. तिथे देव्हारे माजवता उपयोग नाही.


पण कृपा करून काही नमुनेदार लोकांची टर उडवण्याचं निमित्त करून पूर्ण चळवळीलाच मोडीत काढू नये. थोडी जबाबदारी बाळगून लिहावं. सरसकटीकरणाच्या मोहातून अर्कचित्र काढत सुटणं हे लेखक म्हणून किती सवंग आणि आत्मघातकी आहे, हे तर झालंच. पण माणूस म्हणून हे आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेणारं आहे, याबद्दल तरी शंका नसावी

Saturday, 21 October 2017

कुठून?

कुठून सरसरत उगवून येतो माझ्यात
एखाद्यावरचा असा काळ्या कभिन्न कातळासारखा ठाम विश्वास,
एखाद्याच्यात डोकावून पाहण्याची नवथर, तांबूस-कोवळी, लवलवती उत्सुकता,
एखाद्याच्या अंगाला पाठ देत निःशंक रेलण्यातलं अपरंपार निळंशार सुळकेदार धाडस,
काळजीपूर्वक, श्वास रोखून आपण भरत जावेत चित्रात रंग,
नि बघता बघता आपलं बोट सोडून,
स्वतःच्याच लयीत नादावत बेभानपणी रंग अवतरत जावेत कागदावर;
तसे उजळत, पेटत, चमचमत, विझत, मावळत-उगवत, स्थिरावत गेलेले
वाद-संवाद, चर्चा-परिसंवाद, उपदेश-सल्ले, भांडणं-फणकारे आणि मिश्कील मायेचं हसू?
माझी माती सुपीक आहेच.
पण हे बी?
हे तुझंच तर नव्हे?

Thursday, 12 October 2017

फारतर

इच्छांच्या लाटांवर लाटा धडकत राहतात
तिथे खाऱ्या पाण्याचे सपकारे झेलत,
भिजत-थरथरत,
पाय रोवून मी बेमुर्वतखोर उभी राहते
मौनाच्या उंचच उंच काळ्याकभिन्न निर्दय भिंतीसारखे
उभे असते आपल्यातले अवकाश,
त्याच्या पायथ्याशी धापावत
निकराने धडका देत राहते
जळत्या उन्हात, घाम घाम घाम होत,
अंगातली आग भिजल्या कपाळावरून निपटत,
ठिणगी ठिणगी जपत-फुलवत राहते...
पण
लाटा ओसरतात,
उन्हे विझत येतात,
मऊ अंधाराच्या लाटा भिंतींना गिळत जातात...
सगळीभर काळीनिळी भूल पडते
वाऱ्यावरून कुणाच्याश्या मुक्या कण्हण्याची चाहूल लागते -
तेव्हा,
तेव्हा मात्र
एखाद्या तेजतर्रार मांजराला कुशीत घेऊन त्याच्या मानेखाली अलगद खाजवल्यावर,
ते जसे आपल्या अंगात अंग मिसळून देते
तशी अंधाराला पाठ देत मी सैलावत जाते.
अशा वेळी
मला फारतर एखादी कविता लिहिता येते.
बस.

Monday, 25 September 2017

स्वातंत्र्य की सुरक्षितता?

गोंडस आणि वरकरणी तर्कशुद्ध, निष्पक्षपाती वाटणाऱ्या भूमिका पुन्हापुन्हा वाचनात येतात. त्याला असलेली लोकप्रियता दिसते आणि आपलं मत ठासून मांडतच राहणं किती महत्त्वाचं आहे, ते जाणवत राहतं.
आपल्या आजूबाजूचा समाज स्त्रीस्वातंत्र्याच्या बाबतीत संवेदनशील नाही. वैयक्तिक, सामूहिक, सामाजिक आणि अनेकदा संस्थात्मक पातळीवरही हा संवेदनशून्यपणा पुन्हापुन्हा अनुभवाला येतो आहे. सध्या जरा अधिक कर्कशपणे येतो आहे, पण हे आजचंच आहे असं मानण्याचं मात्र कारण नाही.
स्वातंत्र्य हवं की सुरक्षितता हवी हे निर्णय व्यक्तीचे असतात आणि जोवर दुसऱ्या व्यक्तीच्या हक्कांवर अतिक्रमण होत नाही तोवर ते व्यक्तीनं घेण्याला आपण हरकत घेऊ शकत नाही; हा अनेक आधुनिक विचारांचा पायाच आहे. ज्याची फळं तुम्हीआम्ही सगळेच उपभोगतो आहोत. काही जण या स्वातंत्र्याचा गळा स्वतःच्या सोयीसाठी घोटू पाहताहेत. हे फक्त स्त्रियाच अनुभवत नाहीयेत. माहिती अधिकार कार्यकर्ते, काही निर्भीड पत्रकार, विद्यार्थी आंदोलक आणि अशा लढायांच्या वेळी कायमच सर्वप्रथम बळी पडणाऱ्या स्त्रिया - हे सगळेच जण यातली दाहक असुरक्षितता अनुभवताहेत. आज हे लोक जात्यात आहेत, उद्या कोण असेल ठाऊक नाही. अशा वेळी - स्वातंत्र्याहून सुरक्षितताच महत्त्वाची असते, क्रूर श्वापदांच्या जगात तत्त्वनिष्ठ-तर्कशुद्ध मागण्या लावून धरता येत नाहीत, आपण आपल्या भवतालाचं भान बाळगून आपली पावलं जोखली पाहिजेत... अशा प्रकारची मतं मला उघड-उघड प्रतिगामी मतांपेक्षाही जास्त कावेबाज किंवा जास्त मूर्ख यांपैकी एक वाटत राहतात. आणि दोन्हीपैकी कोणत्याही पारड्यात असली, तरीही ती धोकादायकच असतात यात शंका नाही. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा असा संकोच होत असताना तिच्या पाठीशी आपलं बळ ठामपणे उभं करण्याऐवजी असे अत्याचार ही जणू नैसर्गिक परिस्थितिकीच आहे आणि तिला होता होईतो धक्का न लावता आपण मार्गक्रमण करणंच योग्य आहे असं आपण सुचवतो आहोत, हे यांना कळत नसेल काय? त्यांनाच ठाऊक. हे फक्त व्यक्तींच्या बाबतीत नाही, तर संस्थात्मक पातळीवरूनही होतं आहे. विद्यार्थिनींना मुक्त सुरक्षित अवकाश देण्यासाठी धडपडण्याऐवजी त्यांना वेळांचे निर्बंध घालून चार भिंतींत कोंडू बघणाऱ्या आणि त्याविरुद्ध आवाज उठवल्यावर उलट त्यांचीच मुस्कटदाबी करणाऱ्या शैक्षणिक संस्था, विवाहसंस्था ही जणू एखाद्या शिखरावर तेवत असलेली आणि प्रसंगी काही क्षुद्र व्यक्तींच्या हिताचा बळीही देऊन युगानुयुगे राखायची पवित्र ज्योत असावी अशा आविर्भावात वैवाहिक बलात्काराबद्दल मूग गिळून बसणारी न्यायसंस्था, पुरुषी नजरेच्या अधिक्षेपी नजरेला अटकाव करण्याऐवजी बुरखा वा घूंगट (आणि हो, भोवतालाच्या 'भाना'ची शपथ!) घालून सुरक्षितता संस्थात्मक करू पाहणाऱ्या धर्मसंस्था - हे सगळेच तितकेच दोषी आहेत.
मी अशांच्या मताशी कदापि सहमती व्यक्त करू शकणार नाही. कारण मला माझं निवडीचं स्वातंत्र्य प्यारं आहे. स्वातंत्र्य की सुरक्षितता यांत निवड करण्याचंही.

Thursday, 21 September 2017

पर्याय

माझ्यापाशी पर्याय असत नाहीत.
पहाट विझत येतानाच्या धुवट उजेडात स्वैपाकघराच्या ओट्यापाशी उभी राहून,
मी बाहेरची अर्धवट झोपेतली झाडं न्याहाळत असते अर्धवट जागी होऊन,
लालचुट्टूक बुडाची, निळ्याकबऱ्या मानेची नाचरी पाखरं न्याहाळत,
मला कधी ठाऊकच नसलेली त्यांची नावं बिनदिक्कत भुर्र उडवून लावते,
तेव्हा.
पिटुकल्या निरुपद्रवी भासणाऱ्या वा अक्कडबाज मिशा पिळत धाक दाखवणाऱ्या धिप्पाड शब्दांच्या पोटात शिरत,
धुकं पेलत-वारत-चाखतमाखत,
हिंमत होईल तितकं आत-आत उतरत,
अर्थाच्या तळाशी जाण्याची धडपड करते,
तेव्हा.
ध्यानीमनी नसताना कुणी कमालीच्या धीरानं सत्याच्या डोळ्याला डोळा भिडवतं,
नि ते बघायची थरकाप उडवणारी वेळ येते,
तेव्हाही.
मागे वळून पाहिलं तर भेट होईल आपली, हे ठाऊक असतं मला.
पण तेव्हाही माझ्यापाशी पर्याय असत नाहीत.

Sunday, 3 September 2017

कामं संपली की...

कामं संपली सगळी,
की मी मस्त दहा वाजेपर्यंत झोपणार आहे काही दिवस.
काही म्हणजे काही न करता नुसती लोळत, सिनेमे बघत, पुस्तकं चाळत पडून राहणार आहे दिवसचे दिवस.
मनात आलं, तर उठून आफ्रिकेतही जाईन फिरायला.
पण आखणार नाही काहीसुद्धा.
काही बेत नाहीय... असं म्हणत राहायची चैन करणार आहे मी काही दिवस...
काही दिवस जातील असे.
जातात.
काही न करत.
मग हळूहळू
त्यात सगळं निरुपयोगी, कंटाळवाणं, थंड, रूटीन् वाटायला लागतं.
आपण टाइमशीट भरणारे क्षुद्र कारकुंडे जगाच्या भाराखाली पिचून कणाकणानं रोज मरतो आहोत आणि तरी आपल्या कामानं कुणाला काही घंटासुद्धा फरक पडत नाहीसं.
असे दिवसावर दिवस साचत जातात.
मग हळूच एक दिवस थोडा तिरपागडा, हट्टी, शनिवार उगवतो.
मुहूर्तच असा असतो, की उगाच उसळती मजा येत राहते काहीसुद्धा न करता.
काहीतरी किडा करावा असं वाटायला लागतं.
मग काहीतरी मजेशीर किडा उकरून काढते मी.
त्यासाठी, त्यानिमित्तानं जमवलेली थोडी माणसं.
थोडी ठेवणीतली - हक्काची माणसं घासूनपुसून पुन्हा वापरायला.
सगळं मिळून नीट बयाजवार भातुकली मांडते मी, लगीनही आखते भावलीचं.
मग ही... गडबड.
किती कामं...
जेवणखाण, खरेदी, कापडचोपड, मानपान, पत्रिका, पाठवण्या...
ह्यांव नि त्यांव.
किती कामं...
हा... नुसता कुटाणा.
मजा येते विजेसारखं लवलवायला.
झिंग असते वेगाची, कर्तेपणाची, निर्मितीची, कृतकृत्यतेची...
ती भोगताना खुणावत असतात न घेतलेल्या सुट्ट्या, न काढलेल्या झोपा, न वाचलेली पुस्तकं आणि न पाहिलेले सिनेमे.
मग म्हणते मी परत,
कामं संपली की...

Wednesday, 19 July 2017

आता उच्चारही करवेना

आता उच्चारही करवेना
असं नि इतकं -
अगदी राहवेना झालंय बघ.
मुळांपासून फळांपर्यंत.
तहान नव्हे ही.
नुसत्या पाण्यानं शमणार नाही.
नुसत्या उन्हानं फुलणार नाही.
मुळं मातीत रुजतील,
विसावतील, पसरतील,
दहा दिशांनी बहरतील....
तेव्हाच शांत वाटेल,
तगमग निवेल.
कातरवेळची हुरहुर शमेल,
लालकेशरी दिवा तेवेल. 

Tuesday, 27 June 2017

केल्याने भाषांतर

भाषांतरित पुस्तकं वाचून वैताग झाला आणि फेसबुकी एक लहानसं टिपण लिहिलं. त्यावर जी चर्चा झाली, ती अनेक प्रकारे फलदायी झाली. म्हणून मूळ टिपण, चर्चेअंती पडलेली भर आणि थोडे निष्कर्ष - अशी त्याच टिपणाची दुसरी आवृत्ती इथे देत आहे.
***

अलीकडे काही भाषांतरित पुस्तकं वाचली. काही लहानपणी वाचलेली, पुन्हा नव्यानं वाचताना खटकली. काही ताजी पुरस्कारप्राप्त पुस्तकं. पण वाचताना खडेच खाल्ल्यासारखं वाटलं. या सगळ्याच पुस्तकांचे विषय, आशय, कथानकाचा ओघ.. हे सगळंच निस्संशय सुरेख होतं. पण 'हे भाषांतर आहे' असा अदृश्य घोष मागे सुरू असावा आणि वाचताना काही केल्या मूळ भाषेतल्या वाक्यरचनांचा, शब्दप्रयोगांचा आणि वाक्प्रचारांचा विसर पडू नये, त्यानं सतत लक्ष्य विचलित व्हावं आणि रसभंग व्हावा.. हे अनुभवाला आलं. भाषांतरं कुणा सोम्यागोम्यानं केलेली नव्हती. भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करणारे, भाषांतरित मजकुराबद्दल पुरस्कार मिळवणारे, भाषांतरानं साहित्यात मोलाची भर घालणारे लोक. त्यांची नावं टाळण्याचा माझा विचार नाही. पण खरं सांगू का, मुद्दा तो नाहीच. मुद्दा असा आहे, की शब्दाला प्रतिशब्द, संगणक ज्याला अचूक म्हणेल असं व्याकरण, वाक्प्रचारांचं सही-सही माध्यमांतर... यापलीकडे जाऊन आपण जे समग्र भाषांतर करतो आहोत, ते भाषांतरित भाषेच्या प्रकृतीशी जुळणारं झालं आहे का - याकडे हे लोक लक्ष्य का देत नाहीत

कधी-कधी भाषेच्या प्रकृतीकडे लक्ष्य देणं आवश्यक नसतं, अभिप्रेतही नसतं, भाषांतराचे उद्देश निराळे असतात. अशी भाषांतरं आणि सुसाट-सैराट पाडलेली भाषांतरं यांतला फरक मला कळतो.

हा मुद्दा थोडा विस्तारानं लिहिणं आवश्यक. भाषांतर करताना मूळ भाषेशी इमान राखायचं, की अनुवादभाषेशी, हा एक महत्त्वाचा निर्णय असतो. या निर्णयाबरहुकून दोन टोकं कल्पिली जाऊ शकतात. मूळ भाषेशी इमान राखून केलेली भाषांतरं हे एक टोक. अनुवादभाषेच्या भिंगातून मूळ भाषेची आणि / वा मूळ लेखनशैलीची आणि / वा ते ज्या वातावरणात आकाराला आलेलं असतं, त्या वातावरणाची-संस्कृतीची, अर्थात त्या इतिहास-भूगोलाची, वैशिष्ट्यं हे भाषांतर दाखवत असतं. या प्रकारात अनुवादभाषेत कोणत्या प्रकारचे शब्दप्रयोग प्रचलित आहेत, तिची प्रकृती कशी आहे या गोष्टींना तितकंसं महत्त्व दिलेलं नसतं. अनुवादभाषेशी प्रामाणिक राहून केलेली भाषांतरं हे दुसरं टोक. मूळ भाषा आणि / वा लेखनशैली आणि / वा संस्कृती आणि वातावरण यांना शक्य तितक्या प्रकारे समांतर असणारे अनुवादभाषेतले नमुने वापरत अनुवादभाषेत प्रचलित असणारे वाक्प्रयोग करत केलेलं भाषांतर. व्यक्तिरेखा, बोली, सांस्कृतिक अवकाश व त्यातली एककं या सगळ्यांचंही रूपांतर करणारं भाषांतर हे या टोकाला असतं. हे अर्थातच मूळ भाषा न जाणणार्‍या भाषांतर-वाचकाचा सर्वात जास्त विचार करतं. या दुसर्‍या टोकाच्या भाषांतराचे वाचक आळशी आणि / वा अनभिज्ञ असतात आणि त्यामुळे मूळ भाषेतल्या कृतीच्या काही वैशिष्ट्यपूर्ण अंगांना ते पारखे होत असतात, हे गृहीतकच आहे. तो या भाषांतराच्या आस्वादातला सर्वाधिक मोठा तोटा आहे.

पण सगळीच्या सगळी भाषांतर या दोन टोकांवर वसत नाहीत. ती कोणत्याही एका टोकावर वा या दोन टोकांच्या अध्येमध्ये कुठेही असू शकतात. क्वचित थोडी स्वैर होतात, अशा वेळी स्वैर अनुवाद वा भावानुवाद यांसारखी नावं लेऊन आपण घेतलेली फारकत जाहीर करतात. निदान प्रामाणिक अनुवादक तरी हे करतातच.

यांतल्या मधल्याच एका प्रकाराबद्दल मी बोलते आहे. मूळ भाषेची वैशिष्ट्यं दाखवणं हा उद्देश नसून अनुवादभाषेशी प्रामाणिक राहण्याकडे ज्या भाषांतरांचा कल आहे, मात्र ती थेट रूपांतरं नाहीत - अशी भाषांतरं मला इथे अभिप्रेत आहेत. अशा भाषांतरामध्ये अनुवादभाषेकडे लक्ष्य द्यायला हवं की नको? माझ्या मते, निस्संशय हवंच हवं.

माझा हौशी भाषांतराचा अनुभव असं सांगतो, की एकेका सुट्ट्या वाक्याचं भाषांतर कधीही करू नये. पूर्ण परिच्छेद वाचून त्याचं भाषांतर सलग लिहून काढावं. मग ते मूळ मजकुराशी ताडून पाहावं. असं करताना मूळ मजकुरातले काही शब्द सुटून गेलेले जाणवतील. ते आपण लिहिलेल्या मजकुरात कसे आणता येतील ते पाहावं. त्या शब्दाची जात भाषांतरित मजकुरात तशीच्या तशी येणार नाही, याचं भान राखावं. आपल्याकडून मुळातल्या मजकुराहून काही अधिक लिहिलं गेलं असेल, तर ते कठोरपणे कापावं आणि मग तो मजकूर त्या बैठकीपुरता बाजूला ठेवावा. पुन्हा दुसऱ्या बैठकीत तो मजकूर वाचावा. तो भाषांतरित आहे असं वाटलं, तर तो बाद... पुनश्च हरि ओम्. असं करत करत काही परिच्छेद, मग पूर्ण प्रकरण, मग पूर्ण कथानक वा लेख वा मजकूर करावा. दर टप्प्यावर त्याची सलगता तपासणं, भाषांतरित भाषेच्या स्वभावाला धरून असणं, जिथे तडजोड करणं अपरिहार्य असेल तिथे आवश्यक त्या टिपा जोडणं... असं करत करत मूळच्या मजकुरापासून फार लांब नसलेला पण भाषिक दृष्ट्या नव्यानं जन्माला आलेला, स्वतंत्र जिवाचा मजकूर तयार होतो. हे करताना वेळ खूप जातो. किंबहुना अमुक इतपत धीम्या गतीनं काम न केलं, तर ते घिसाडीच होतं. पण स्वतःला आवर घालणं साधलं, तर नवनिर्मिती केल्याचा आनंद मिळतो.

हे माझ्यासारख्या संपूर्ण हौशी लेखक असलेल्या,  अव्यावसायिक व्यक्तीला कळतं. मग या भल्या-भल्या मंडळींना कळत नसेल? का बुवाव्यावसायिक निकड या गोंडस नावाखाली केलेली धंदेवाईक घिसाडघाई अशा प्रकारच्या गचाळ कामांना कारणीभूत ठरत असेल, तर ती व्यावसायिकता नक्की कोणत्या भाषेतल्या साहित्याला न्याय देते आहे? 

***

संदर्भ:





Sunday, 21 May 2017

बाई

भल्या भल्या देखण्या अप्सरा
नवल करत बसतात,
त्यांना काही केल्या उमगत नाही,
माझ्या देखणेपणाचं गुपित कशात?
मी काही चिकणीचुपडी गोडगुलाबी नार नाही
बांधाही माझा छत्तीस-चोवीस-छत्तीसच्या मापात नाही.
पण त्यांचा विश्वास बसत नाही.
मला खोट्यात पाडतात.
मी आपली सांगू जाते,
बघा,
माझे भरदार ताशीव हात
माझ्या पुठ्ठ्याची घडीव गोलाई
माझ्या पावलातला नाचरा ताल
माझ्या ओठांची मुरड
बाई आहे मी.
नखशिखांत बाई.
चारचौघींसारखी नव्हे,
आगळीवेगळी भन्नाट बाई.
मी येते,
एखाद्या डौलदार झुळकीसारखी सहज तोर्‍यात
जमलेले बाप्ये आ वासतात
खडबडून उभे राहतात,
नाहीतर मग गुडघे टेकतात
फुलाभोवती फिरतात भुंगे
तसे माझ्याभोवती रुंजी घालतात
मी म्हणते,
जाळ आहे माझ्या नजरेत
माझं हसूही लख्ख चमचमतं
कंबरेला हा अस्सा एक झोका -
बघ - पावलागणिक हसू उधळतं
बाई आहे मी.
नखशिखांत बाई.
पण चारचौघींसारखी नव्हे,
आगळीवेगळी बाई.
बाप्यांनाही नाही उमजत
काय आहे तरी काय हिच्यात?
मारे करतात प्रयत्न,
पण त्यांनाही नाही कळत माझ्या देखणेपणामागचं गुपित
मी आपली सांगू-समजावू बघते -
तर्री नाही दिसत.
मी आपली सांगते,
बघा माझा कुर्रेबाज कणा
माझ्या हसण्यातल्या उन्हाचा झळझळीतपणा
माझ्या वक्षांचा डौलदार उभार
चाल कशी ऐटबाज तेजतर्रार
बाई आहे मी.
नखशिखांत बाई.
पण चारचौघींसारखी नव्हे,
आगळीवेगळी बाई.
नीट बघा,
मग कळेल तुम्हांला -
माझी मान कधी झुकत नाही.
उगाच तारस्वरात किंचाळणं तर सोडाच,
साधा आवाजही कधी चढत नाही.
पण मी नुसती समोरून गेले जरी -
तरी अभिमानानं छाती रुंदावते तुमचीही.
सांगते ना,
माझ्या टाचा कशा टेचात वाजतात
केसांच्या बटा अश्शा तोर्‍यात डुलतात
तरी हात कसे तत्पर
भणाणवार्‍यात दिव्याला आडोसा द्यायला -
त्यांनाही ठाऊक असतं,
त्यांच्यावाचून निभणारच नाही.
कारण?
बाई आहे मी.
नखशिखांत बाई.
चारचौघींसारखी नव्हे,
माझ्यासारखी मीच -
आगळीवेगळी बाई.

मूळ कविता : माया अ‍ॅंजेलौ

***
मुग्धा कर्णिकांनी केलेल्या अनुवादामुळे माया अँजेलौ यांची Phenomenal woman ही कविता माझ्या वाचनात आली. अतिशय आवडली. पण मग तिथल्या काही प्रतिक्रियांमुळे असं लक्ष्यात आलं, की त्यातले शारीर उल्लेख अजूनही अनेकांना खटकतात. असं का व्हावं मला कळेना.

कविता एका स्त्रीच्या आत्मभानात दडलेल्या तिच्या सौंदर्याबद्दल बोलणारी. त्यात डौलदार वक्ष येतात. भरदार बाहू येतात. कंबरेचा घाट येतो. काळजी घ्यायला सज्ज असलेले तळवे येतात. लख्ख स्मिताची चमक येते... अनेक शारीर वैशिष्ट्यांची वर्णनं येतात. पण त्यातून कविता शरीरापल्याडचं काहीतरी सांगू बघत असते.

असं कितींदा तरी होतं, की काही माणसांच्या सहवासात आपल्याला अतिशय प्रसन्न-जिवंत-संपूर्ण वाटतं. त्या माणसांबद्दल आपल्याला लैंगिक आकर्षण वाटत असतं, असं नव्हे. किंबहुना ते वाटत असतं की नाही, हा मुद्दाच तिथे बिनमहत्त्वाचा, गैरलागू असतो. त्यांच्या देहबोलीतून प्रतीत होणार्‍या शांत, संवादी, सहज स्वीकाराला उत्सुक असलेल्या आत्मविश्वासानं आपण त्यांच्याकडे खेचले जातो. त्या वलयात आपणही सामील व्हावं, त्यांच्यापाशी असलेल्या झळझळीत उन्हाचा स्पर्श व्हावा, इतकाच हेतू असतो. हे उघडपणे बोलून दाखवलं जातं असंही नाही. नकळत, अभावितपणे, सहज होणारी मानवी प्रतिक्रिया. उदाहरण देऊ? गुलजारच्या अनेक चित्रपटांमधल्या नायकाची प्रतिमा ही त्याचं स्वतःचंच रूप असल्यासारखी असते. त्या प्रतिमेकडे पाहताना मला अनेकदा हे अनुभवाला येतं. ते पुरुष पुरुष म्हणून रूढार्थानं, सर्वार्थानं आकर्षक असतात की नाही, हे तितकंसं महत्त्वाचं उरत नाही. त्यांच्यातला सहजस्वीकार, शांत आत्मविश्वास, रुंद खांद्यांनी आणि जाड काड्यांच्या चश्म्यानं पेलून धरलेला चिंतनाचा भाव, विनोदाचं वावडं नसलेली हसरी मिश्कील जिवणी, मिशांनी आलेला धीरगंभीरपणा... अशा अनेक शारीर वैशिष्ट्यांनिशी हे नायक सिद्ध होत असतात. पण त्या शरीरबोलीतून दिसत मात्र पलीकडचं काहीतरी असतं. मला आपलंसं करत असतं. त्या पुरुषांशी मैत्री करावी, त्यांच्याशी गप्पा माराव्या, जागरणं करकरून - नशाही करकरून त्यांच्यासमोर मन मोकळं करावं, त्यांच्यावर विसंबून बिनदिक्कत झोपून जावं... असं वाटायला लावणारे हे पुरुष.

त्यांच्याबद्दल बोलताना त्यांची शारीर वैशिष्ट्यं कशी टाळायची? नि का? त्याबद्दल बोललं म्हणजे मला पुरुषदेहावाचून दुसरं काही सुचत नाही असा संकुचित अर्थ होतो का?

मला अगदी उलट वाटतं. आपल्या देहाचा संकोच नसलेलं कुणीही - मग स्त्री, पुरुष, वा मेघना पेठेचे शब्द उसने घ्यायचे तर, हिजड्याचं पिल्लू - कुणीही असो - स्वतःसोबत शांत, सुलझलेलं असेल; तर ते सर्वार्थानं सुंदरच दिसतं. लोभस वाटतं. खेचून घेतं.

हाच भाव व्यक्त करणारी ही कविता. ज्यांना ती समजते, भोगता येते, पचवता येते, त्यांच्याकरता साभार -

Phenomenal woman

Maya Angelou

Pretty women wonder where my secret lies.
I’m not cute or built to suit a fashion model’s size   
But when I start to tell them,
They think I’m telling lies.
I say,
It’s in the reach of my arms,
The span of my hips,   
The stride of my step,   
The curl of my lips.   
I’m a woman
Phenomenally.
Phenomenal woman,   
That’s me.

I walk into a room
Just as cool as you please,   
And to a man,
The fellows stand or
Fall down on their knees.   
Then they swarm around me,
A hive of honey bees.   
I say,
It’s the fire in my eyes,   
And the flash of my teeth,   
The swing in my waist,   
And the joy in my feet.   
I’m a woman
Phenomenally.

Phenomenal woman,
That’s me.

Men themselves have wondered   
What they see in me.
They try so much
But they can’t touch
My inner mystery.
When I try to show them,   
They say they still can’t see.   
I say,
It’s in the arch of my back,   
The sun of my smile,
The ride of my breasts,
The grace of my style.
I’m a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That’s me.

Now you understand
Just why my head’s not bowed.   
I don’t shout or jump about
Or have to talk real loud.   
When you see me passing,
It ought to make you proud.
I say,
It’s in the click of my heels,   
The bend of my hair,   
the palm of my hand,   
The need for my care.   
’Cause I’m a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That’s me.

***

या कवितेचे अनेक अनुवाद अनेकांनी केले. मागे ब्लॉगवरच खेळलेल्या खोखोची आठवण व्हावी, असे भरभरून केले. त्यांपैकी सगळ्यांत जास्त आवडला, तो आशुतोष दिवाण यांनी केलेला हा अनुवाद. हा अनुवाद वाचल्यावर मला माझी अनुवादाची धडपड केविलवाणी आणि फोल वाटायला लागली. शब्दशः भाषांतर न करता मूळ कवितेतल्या भावाला सर्वाधिक नेमकेपणानं पकडणारे, अस्सल म्हराटी शब्द त्यांना साधले आहेत -

संपूर्ण

सटव्या
बघतच राहतात माझ्याकडे
ना धड सुबक ठेंगणी
नार शेलाटी
"खोटारडी मेली!"
नितळ दंड
लुसलुशीत ढुंगण
एक नुस्ती मुरड ओठांची
खुळावते तरण्याना
मी हायेच बाय तसली
कंबर लचकावत
डोळा घातला
खोलीत शिरताना
की म्हातारे ताठत्यात
अन् तरणे गोंडा घोळत्यात
जिमीनीवर सरपटत
हायच बाय मी तसली
खुळ्यांना कळतच नाय
की हायच काय मुळी हित्तं
त्येना काय नुस्तं वरचंच दिस्तंय
खरं आतली धगच करतीया
कनाट्याच्या मण्याला
थानांच्या हलकाव्याला
धरु धरु
कसंबी करून
सगळ्याच बाप्यांना
हायच बाय मी तसली
लघी धावत्यात
खुळ्याकावय्रासारखं
क्येस धराया
हात पकडाया
गोंजाराया
कसंबी करून
घाबरं घबरं.
खरं मला काय पडलीय
गरज
कांगावा करायची
मान खाली घालायची
लाजखोरी लागट.
माझ्या गाठी माझ्यापाशी.
मी हायच बाय तस्ली.
जनीपास्नं.

***

मुग्धा कर्णिकांनी केलेला हा अनुवाद. त्यानं माझ्यापर्यंत कविता पोचवली. त्याचं महत्त्व आगळं.

मी एक आगळीच जबरदस्त स्त्री

सुंदर स्त्रियांना नवल वाटतं- काय असेल माझं गुपित
मी नाही गोडगोड किंवा बांधाही नाही फॅशन मॉडेलच्या मापात
पण मी सांगू लागते त्यांना, तेव्हा खोटंच वाटतं त्यांना.
मी सांगते,
माझ्या बाहूच्या आवाक्यात सारं येतं.
माझ्या पुठ्ठ्याच्या रुंदाव्यात,
माझ्या पावलाच्या झेपेत,
माझ्या मुडपलेल्या ओठातही.
मी आहे स्त्री
अपवादात्मक.
जबरदस्त आगळी स्त्री
मीच ती.
मी शिरते एखाद्या दालनात
फारच अनोख्याबिनोख्या उंची...
आणि जाते तिथल्या एखाद्या पुरुषाजवळ
ते सारे पुरुष उभेच रहातात
पण जणू गुडघे टेकलेलेच असतात.
गोळा होतात सारे भोवती
जणू मधाचं मोहोळ उठतं.
मी सांगते,
माझ्या डोळ्यात असते ठिणगी,
आणि लखलखतात माझे दात.
माझ्या कंबरेत असतो हेलकावा
आणि पावलांतून उमडतो हर्ष.
मी आहे स्त्री
अपवादात्मक.
आगळी जबरदस्त स्त्री
मीच ती.
पुरुषही नवल करतात,
काय पाहातो आपण हिच्यात...
प्रयत्न करतात सारे
पण नाहीच हाती लागत त्यांच्या
माझ्या अंतरीचं गुपित.
मी त्यांना दाखवून देऊ पाहाते.
पण ते म्हणतात नाहीच कळत त्यांना काही.
मी सांगते,
ते गुपित आहे माझ्या वळणदार कण्यात,
माझ्या स्मितातून सांडणाऱ्या उन्हात
माझ्या वक्षाच्या डौलात
माझ्या ऐटबाज रुबाबात.
मी आहे स्त्री
अपवादात्मक
आगळी जबरदस्त
मीच ती.
कळतंय ना आता,
माझं मस्तक नसतं कधीच झुकलेलं.
मी नाही किंचाळत किंवा उड्या मारत
मला फारसं मोठ्याने बोलायची गरजच नसते.
तुम्ही मला शेजारून जाताना पाहिलंत
तर तुम्हालाही अभिमान स्पर्शून जाईल.
मी सांगते,
माझ्या चपलांच्या टाचा टेचात वाजतात,
माझे केस लहरतात,
माझ्या खोलसरगोलसर हाताच्या तळव्यात,
गरज असते मी काळजी वाहण्याची.
कारण मी आहे स्त्री
अपवादात्मक
आगळी जबरदस्त स्त्री
मीच आहे ती.

***

विजयानं केलेला हा अनुवाद -

अप्सरा माझ्या सौंदर्याचं नवल करतात
त्यांच्या शरीराची ठाशीव मापं माझ्यापुढे उणी ठरतात
माझ्या स्पष्टीकरणाला त्या नाक मुरडतात
मी खोटंच बोलतेय यावर ठाम असतात
मी सांगत जाते,
ते आहे माझ्या हातभर अंतरावर
माझ्या डेरेदार नितंबांच्या घेरावर
आणि पावलांचा तालावर
मी आहे स्त्री
अशी अजबच
कारण मी आहे मी
मी प्रवेशते
एखाद्या भव्य ठिकाणी
तिथल्या प्रत्येक पुरुषाला वाटतं
मी प्रवेशतेय त्यांच्या हृदयात
ते उभे राहतात
किंवा
बसतातही गुढग्यांवर
मात्र माझ्याच सभोवती जमतात
अगदी मधमाश्यांचं मोहोळच उठवतात
मी सांगत राहते,
ते माझ्या डोळ्यांच्या दीप्तीत चमकतंय
माझ्या दातांच्या हिरकणीत हसतंय
कंबरेच्या लयीत झुलतंय
पावलांच्या आनंदी तालावर नाचतंय.
मी आहेच स्त्री
आगळी.
अजब स्त्री,
कारण मी आहे मी
पुरुषांनाही नवल वाटत राहतं
माझ्यात नक्की काय पाहत रहावं वाटतं?
प्रयत्नांची सीमा गाठतात
पण तरी नाहीच मिळत त्यांना
माझ्या अंतराची एक झलक
मी करते खुली गुपितं
जी त्यांनी तरीही नाहीच दिसत
मी सांगतच जाते
माझ्या पाठीच्या कण्यात ते उभारलंय
माझ्या हास्याच्या उन्हात झळकतंय
माझ्या गिर्रेबाज वक्षात दडलंय
आणि संपूर्ण डौलात सामावलंय
मी आहे स्त्री
आगळी,
अजब स्त्री.
कारण मी आहे मी.
थोडं थोडं येतंय तुमच्या लक्षात
का नाही माझी मान कधी झुकत
मी ना कधी किंचाळत ना तडतडत
अगदी बोलतही नाही जोरजोरात
शेजारून जाताना
माझं असणंच तुम्हांला स्पर्श करतं
मी सांगते,
ते इथेच तर आहे
माझ्या टाचांच्या टेचात
केसांच्या महिरपीत
हाताच्या तळव्यावर
आणि माझ्या हळुवार स्वभावात
कारण मी स्त्री आहे आगळीच
अजब स्त्री,
कारण मी आहे मी.

***
इतकं रामायण लिहूनही अनेक जण या कवितेतल्या पुरुषांसारखेच पालथे घडे राहिले. त्या बाईचं शारीरिक सौंदर्य इतकं महत्त्वाचंय का, का आहे, हा इतर अनेक सामान्य रूपाच्या कर्तृत्ववान बायांचा अपमान नाही का, ही कविता बाईच्या लैंगिक आकर्षणाबद्दल नि सामर्थ्याबद्दल बोलते, ते कसं सवंग आहे... एक ना दोन.

त्यांना सांगण्यासारखं माझ्यापाशी काही नाही. आत्मभानानं झळाळून उठलेल्या माणसाचं सौंदर्य रूढ कल्पना आणि चाकोर्‍या आणि चौकटी ओलांडून कसं फुसांडत बाहेर पडतं आणि त्यासाठी त्याला शरीराचंच माध्यम कसं अपरिहार्य ठरतं - ही अनुभवण्याचीच चीज आहे.

इत्यलम.