पाय ठेवायला जराही जागा नसताना
इथल्या अधांतरात हरपून जाऊ नये मी,
म्हणून शोधत राहते कवितेची एखादी अर्धीमुर्धी ओळ
माझ्याआत.
ती सापडेस्तोवर
नाकातोंडात काळोख जाऊन
जीव जातो की राहतो असं झालेलं
इगोबिगो गेले खड्ड्यात-
असायचं आहे
राहायचं आहे
हरवायचं नाहीय -
इतकाच जप
आणि जीव खाऊन शोधणारे थरथरते चाचपडते हात.
बोटांना कवितेच्या ओळीचं सुटं टोक लागतं,
तेव्हाही शांत नाही वाटत लगेच.
जीव धपापत राहतो कितीतरी वेळ
एका टोकाला घट्ट धरून
विणत राहते मी कविता
कुठवर
कुणास ठाऊक.
एक क्षण असा -
हात
कविता
आणि
मी
एकच.
आजूबाजूची अंधारी अनिश्चिती बदलून
पहाटेचा कोवळा प्रकाश उमललेला सगळीभर
पावलांखाली घट्ट ओलसर माती.
मी खोल ताजा श्वास भरून घेते छातीत
आणि कवितेचा दिवा सोडून देते
अंधारउजेडाच्या सीमेवर,
अर्धपिक्क्या गाभुळलेल्या आकाशात.
विरत्या चांदण्यांत
पिवळा प्रकाश सांडत
दूर दूर विरत जाणारी आपलीच कविता पाहताना -
नवं होतं सगळं
परत एकदा.