संदर्भहीन आनंदाच्या तहानेत
निष्फळ अंतहीन वणवण
परिचित प्रदेशांच्या चकव्यात
तेच सुतक पुन्हापुन्हा,
पुन्हापुन्हा तेच सण
आपण सध्या जगतोय, ते विकत की फुकट? एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीसाठी सहन करतात माणसं आपला चिडचिडाट आणि व्हायसा व्हर्सा? रोज उठून थोबाडावर प्लॅस्टिकचं स्मायली ताणून बसवतो आपण, ते नक्की कुठल्या अन्ब्रेकेबल रबरबॅण्डनी? असले आचरट प्रश्न पाडून कपाळावर किमान साडेचार आठ्या बसवलेल्या तिच्याकडे, निदान दिवसाच्या अखेरीला तरी कुणी शहाणा माणूस दोन गोड शब्दांच्या अपेक्षेनं यायचा नाही, इतपत व्यवस्था दिवसभरानं करून ठेवलेली. ती नखभर कारटी गात टीव्हीवर जीव तोडून, त्यावरही जळजळीत ऍसिडिक प्रतिक्रियांची आतषबाजी चालू असे तिची. चेहरा अर्थात हसराच. पण ’आयुष्यावर हसणे थुंकून देतो...’मधलं कडूजहर हसणं. काय बिशाद कुणी जवळ येऊ धजेल. अशात त्या दिवशी टीव्हीसमोर लोळून समोर गळणार्या कशावर तरी काहीतरी फूत्कारताना, तिच्या रूममेटनं तिच्या कपाळावर तळवा ठेवला फक्त. त्यावर काहीतरी धारदार बोलण्याआधी तिचे डोळे आपसूक मिटले आणि तिसर्या सेकंदाच्या आत तिचं विमान उडालं. निळी स्वप्नील झोप.
जिवंत माणसाचा स्पर्श, माणसाला माणूस लागतं, तुसडेपणा जन्माला पुरत नाही... हे क्लिशेड गुळगुळीत सिद्धान्त तर होतेच. पण पाठोपाठ माणसांच्या गुंतागुंतीत जे जे होऊ शकतं, ते ते सगळं कोपर्यावर दबा धरून बसलं असणार, याचीही कडवट जाणीव होती. ’नाहीतरी माणूस नको म्हणून निभत नाही, मग होऊन जाऊ द्या सगळंच रामायण’ला मान तुकवत तिनं इतके दिवस गोठवून ठेवलेलं आपलेपण स्वैर उधळून दिलं, ते त्या रात्री स्वप्नातच कधीतरी असणार. मग अनेक वाटांनी उधळत गेला दोस्ताना. शॉपोहोलिक होऊन केलेल्या खरेद्या, कविता, सिनेमे, भक्त प्रल्हाद सिनेमे, खादाडी, रात्र रात्र जागून मारलेल्या गप्पा, एकमेकींची आजारपणं, पार्ट्या, ओल्या पार्ट्या, शेअर केलेल्या दुखर्या जागा, बोचरी भांडणं, अबोले, करकरीत शिव्या, रडारड, गप्पा गप्पा गप्पा. तिचा कडवट अनुभवी उपरोध आणि रूममेटचा नवथर कोवळा उत्साह जगण्यातला. दोहोंची धार बोथटत गेली आणि त्यांच्या घराला जरा जरा माणूसपण येत गेलं. परिघात पाऊल न ठेवताही शेजार निभावणं शिकत गेलं घर. पहिल्या पावसाच्या जळजळीत ससंदर्भ गारव्यामधेही त्याची ऊब टिकत गेली.
पहिला पाऊस एकवार,
मग मात्र साठवण-आठवण
परत एकदा पहिल्यासारखे,
होणे नाही, होणे नाही
घरातल्या बोर्डावर कुठलीशी नवी कविता डकवताना आणि त्यावर उत्साहानं उतू जात रसरसून बडबडताना लक्षात आला तिच्या एकाएकी - काहीतरी वेगळं घडतंय घरात. रूममेटचं लक्ष होतं आणि नव्हतंही. रूममेटची नव्यानं राहायला आलेली जुनी मैत्रीण हातातल्या नेलपेण्टच्या नव्या शेडमधे गुंतलेली. तिचा चेहरा काहीच संबंध नसल्यासारखा कोरा करकरीत. रूममेट काहीशी भांबावून दोन टोकांना यथाशक्ती यथोचित प्रतिक्रिया देण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात. म्हटलं तर तिघींच्याही लक्षात आलं आणि म्हटलं तर कुणाच्याच नाही. तिथून पुढे कविता बोर्डावर टाचणं हे नुसतंच हट्टी कर्मकांड होत गेलं घरासाठी. वाढलेल्या मैत्रिणीला सामावून घेत माणसं घड्या बदलत गेली. दिनक्रम ठरीव आणि परीटघडीचे होत गेले. उबेचे परीघ बदलत गेले. आपापल्या किल्ल्या, ठरलेल्या वेळी ठरावीक स्मितहास्य, एकमेकींकरता रांधून ठेवलेलं जेवण, वीकेण्डच्या शॉपिंगला सोबत.
वरवर शांत असल्याचं दाखवणारी ती आतून चवताळत गेली. रूममेटच्या मैत्रिणीचं लहान असणं नोंदलं तिनं. पण लहानपणाच्या हातात हात घालून येणारी असुरक्षितता नोंदूनही तिनं हट्टानं स्वीकारली नाही. तिला दिसला तो फक्त तिनं कमावलेल्या तिच्या स्नेहशील वर्तुळाचा संकोच. अभावितपणे कुणाचातरी पायावर पाय पडावा आणि मागचा-पुढचा विचार करण्याआधी तोंडातून कचकचीत शिवी उमटावी, तसा धुमसत गेला तिचा स्वाभाविक संताप. रात्र रात्र गाणी ऐकत राहणं, नेटवरचं वर्तुळ आणि वेळही अमर्याद आणि अनारोग्यकारकपणे विस्तारत जाणं, घरातली संभाषणं जाणीवपूर्वक अधिकाधिक अनावश्यक आणि त्रोटक करत नेणं, पुन्हा एकदा सूडावून आतल्याआत मिटत जाणं. मोठं होण्याचं नाकारत जाणं. सार्याचा परिणाम झाला नाही असं नाही. रूममेटची दोन टोकांमधली फरफट वाढत गेली. दिवसेंदिवस. तिच्या एकलकोंड्या धुमसत्या वावराला उत्तरादाखल म्हणून रूममेटचं मुक्यानं रडणं दृष्टीला पडलं चुकून, तेव्हा भानावर आली ती चरचरून. निखळ मैत्रीच्या प्रदेशातही हे स्वामित्वाचे दावे असे वेठीला धरू शकतात माणसांना? आपल्यालाही? आपला नितळपणा इतका गमावला आहे आपण? कळेना. कळेना तिला. आपलेच डंख पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिनं करूनही काही पीळ सुटण्यातले नव्हतेच. घरातली हवा कुंदच होत गेलेली.
पाऊस हवा, ऊन हवं
इंद्रधनुष्य कोरं हवं
पायांखालच्या मातीनंही
रोज नवं जन्मून यावं
आम्ही मात्र तेच जुने
आठवण-पेशी मरत नाही
कोवळेपण जळत जातं,
तरी जगणं सरत नाही
रूममेटच्या मैत्रिणीचं रूममेटवर अनेकार्थांनी अवलंबून असणं दिसत गेलं, तसतसा तिचा समजूतदारपणा काहीसा जून होऊन परतत गेला. रूममेट आणि मैत्रिणीचं नातं, नातं न उरलेलं. दोन वाढती माणसं खूप खूप जवळ येतात आणि त्यांचे विस्ताराचे वेग मात्र स्वाभाविकपणे आपापल्या निरनिराळ्या गती सांभाळून असतात, तेव्हा होते तीच कोंडी. एकाचं विस्तारत जाणं, दुसर्याचं आकातांनं तिथंच राहायला पाहणं. पायात पाय रेशीमधागे. ते तुटायला मात्र हवेतच अपरिहार्यपणे. हे लक्षात आलं, तेव्हा ती मुळापासून हादरली. मीच सापडले होते का ऑपरेशन करायला, असा हताश प्रश्न पडला तिला. पण इलाज नव्हताच. मी खलनायिका तर मी खलनायिका, असा कोडगा स्वीकार करत तिनं दोघींच्यात निर्ममपणे पाय घालायला सुरुवात केली.
त्याच काळात कधीतरी पाहिलेली ’सखाराम बाईंडर’ची डीव्हीडी. रविवारची दुपार उलटून गेल्यावर कधीतरी पाहायला सुरुवात केलेली. सुरुवातीला रूममेटची मैत्रीण लक्ष नसल्याचं नाटक करण्यात गुंग. पण तेंडुलकरांनी तिला हाताला धरून मधोमध कधी आणलं, ते तिचं तिलाही कळलं नसणार. सगळा मिळून दीड खोलीचा कारभार आणि घरदार व्यापून उरलेली जगण्याची गरज. लैंगिक इच्छांचे आसूड, संस्कृतीबिंस्कृतीचे कुचकामी लगाम - त्यातून कराकरा दात खात निर्लज्जपणे जगायला उभी ठाकलेली माणसातली पाशवी असुरक्षितता. चंपाला पुरायला मदत करणार्या भेसूर लक्ष्मीचं ’रात्र देवाची असते...’ ऐकलं, तेव्हा करकरीत तिन्हीसांजा झालेल्या. घरात काळोख, बाहेर पेटलेली कातरवेळ. ’आपण सगळेच असतो थोडी थोडी लक्ष्मी...’ हे तिच्या तोंडून सुटलेलं वाक्य ऐकून बधिर होऊन बसलेली रूममेटची मैत्रीण आणि कुणाच्या तरी अंत्ययात्रेवरून परतावं, तशी रूममेट घाईघाईनं आंघोळ करायला गेलेली. घर मुकाट.
तिचा परजलेला निर्दय निर्धार. रूममेटची चिंध्या करणारी तडफड. रूममेटच्या मैत्रिणीचा नुसताच जहरी वेडापिसा संताप. सगळंच कडेलोटाच्या टोकावरचं. त्या दिवशी रूममेट मित्रासोबत निघून गेली सिनेमाला, म्हणून भडकलेल्या मैत्रिणीला समजावता समजावता सार्याचा कडेलोट झाला. ’मला समजावते आहेस इतक्या मानभावीपणे, का? तू एकटी आहेस म्हणून?’ हा रूममेटच्या मैत्रिणीचा प्रश्न. कोंडीत पकडलेल्या रानमांजरीच्या आवेशातला. तो ऐकला आणि तिचं उरलंसुरलं भान संपलं. उरला तो निव्वळ लालभडक विखार. रूममेटच्या मैत्रिणीनं भानावर येऊन कळवळून अनेकदा मागितलेली माफी, रडणं, पश्चात्ताप, समजावणुकी... काहीच पाझर फोडू शकलं नाही तिला. पाहता पाहता दगड होत गेली ती मैत्रिणीच्या बाबतीत. आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला येण्याचं आमंत्रणही दिलं तिनं, ते फक्त रूममेटला. ’आजारी आहे ग ती. इतका काटेरी राग धरू नकोस...’ची विनवणी तिच्यापर्यंत पोचलीच नाही. तिचा स्वत:चाच इलाज नव्हता जणू.
जिवाच्या तळापासून समजून घेता येतं कुणाला, ते आयुष्यात एकदाच काय? पुढच्या सगळ्या सगळ्या वेळांना माणूस समजूतदार होत जातो की निबर? भोगलेली माणसं हळवी-ओलसर होत जातात की सूडावून अधिकाधिक कठोर? संदर्भ पुसले जातात कधीतरी? पुसता येतात? प्रश्नांना अंत नाहीच.
शब्द पालवत, दु:ख मालवत
रोज रोज तेच मरण
परिचित प्रदेशांच्या चकव्यात
तेच सुतक पुन्हापुन्हा,
रोज रोज तेच सण...