सगळं तसं वाह्यात संतापजनकच.
तुपकट लग्नसमारंभी उत्साह. नाटकाच्या वेळाशी अजिबात देणंघेणं नसल्यासारखी निवांत सरबराई. खाणं-पिणं, साड्यांचे लफ्फेदार पदर, गजरे-अत्तरं आणि भेटीगाठी. आता आलोच आहोत तर बघून टाकू नाटकपण, असा एकंदर नूर आणि आव मात्र संस्कृतीच्या जपणुकीची धुरा वाहायची असल्याचा. साधे मोबाइल्स सायलेण्ट मोडवर टाकण्याचं सौजन्य नाही. मग 'नाटकानंतर भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे', 'मंडळाचे सदस्य श्री. अमुक अमुक यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं' आणि 'आपल्यासोबत राहुल द्रविडचे आई-वडीलही नाटकाचा आस्वाद घ्यायला आलेले आहेत...' हे सगळं नाटकाच्या अनाउन्समेण्टसोबत हातासरशी उरकून घेणं आलंच.
अशा ठिकाणी हे इतपत चालायचंच, असं हजार वेळा स्वतःशी घोकूनही माझा चरफडाट थांबत नव्हता. त्यात पडदा उघडला, तरी चार-दोन चालूच राहिलेल्या दिव्यांची आणि नि:संकोच उघडमीट करणार्या दाराची भर.
पडदा उघडल्यावरही ही चिडचिड निवळावी असं काही घडेना. बोट ठेवायला तशी जागा नव्हती. चोख पल्लेदार आवाजातले संवाद. सहज वावर. विषयाला साजेसं नीटनेटकं नेपथ्य. आता प्रेक्षागृहात तशी शांतताही. पण कशात काही जीव म्हणून नव्हता. सगळं लक्ष एकवटून त्यात जीव रमवण्याचा प्रयत्न करूनही काही साधेना. हे सगळं कमी झालं म्हणून मधेच एकदा लाइट गेले. एकदा नटाची मिशी सुटली आणि सरळ माफी मागून तो ती लावायला आत निघून गेला.
मी आशा जवळपास सोडून दिलेली.
त्या प्रयोगाबद्दल खरं तर पुष्कळ वाचलं-ऐकलं होतं. त्याच्या विषयाचा वेगळेपणा. आशयाची ताकद. सापेक्षतावाद आणि जागतिक शांततेसारखे ऑलमोस्ट किचकट आणि गंभीर विषय असूनही एकाच पात्रानं ते पेलण्यातला करिष्मा.
पण सगळं समोर मांडलेलं असूनही कलेवरासारखं निष्प्राण. सोन्यासारखी रविवार सकाळ, ट्रॅफिकमध्ये तपःसाधना करून काढलेला दीड तास, न केलेला नाश्ता आणि काहीही कारणाविना डोळ्यांदेखत खचत गेलेल्या अपेक्षा. पाट मांडून रडावं की कसं, असं वाटायला लागलेलं. इतकी निराशाजनक परिस्थिती बदलू शकते असं मला कुणी म्हणालं असतं, तर मी त्याला सरळ आनंद नाडकर्णींकडे शुभार्थी म्हणून काम करायला रवाना केलं असतं.
नेमकं काय बदललं विचाराल, तर ते नाही सांगता येणार. डोक्यात जाणार्या मागच्या बाईच्या कुजबुजीपासून पंख्याच्या कुईकुईपर्यंत सगळं तसंच होतं. पण एकदम हवेनं कात टाकली जणू. नटाचा आवाज नेम धरून मारलेल्या एखाद्या भाल्यासारखा आपला वेध घेणारा. त्याची तगमग त्याच्या बोटांच्या अस्वस्थ हालचालींमधून, त्याच्या ओठांच्या सूक्ष्म कंपामधून, त्याच्या डोळ्यांत तरळलेल्या पाण्यातून एखाद्या एक्स्ट्रीम क्लोज् अपसारखी अंगावर येणारी. त्याच्यावर खिळलेले डोळे इकडेतिकडे जाईनात. त्याच्या स्वरातल्या चढ-उतारासोबत श्वास खालीवर व्हायला लागलेला आपलाही.
आसमंत जणू कसल्याश्या अनामिक ताकदीनं भारलेला. नटाचं शरीर-त्याचा चेहरा-त्याचा आवाज. बस. इतकंच उरलेलं सगळ्या जिवंत जगात. सगळ्या नजरा त्या बिंदूशी कसल्याश्या गूढ ताकदीनं खेचलेल्या. ताणलेल्या. त्याच्या एका इशार्यावर जणू हे बांधलेले-ताणलेले नाजूक बंध तुटतील, अशा आवेगानं विस्फारलेल्या.
नट?
तो या खेळातलं बाहुलं असेल निव्वळ?
एखाद्या मांत्रिकानं प्रचंड ताकदीनं विश्वातलं अनामिक काही एखाद्या वर्तुळात बांधावं आणि त्या ताकदीचा ताण त्याच्या रंध्रारंध्रात जाणवावा - समोरची ताकद कधीही स्वैर उधळेल आणि उद्ध्वस्त होईल सगळं. कधीही काहीही होऊ शकतं आहे - हा ताण त्याच्या नसानसांतला. आणि तरीही त्याचा तिच्यावरचा ताबा सुटत नाही. तिच्यावर जणू स्वार झालेला तो. तिला हवी तशी नाचवतो आहे आपल्या तालावर. आपल्या शरीरातल्या कणान् कणाच्या ताकदीवर.
भारलं आहे या झटापटीनं आसमंतातल्या सगळ्या चेतन-अचेतनाला...
तो या अनामिक ताकदीला लीलया खेळवतो.
हसवतो. रडवतो. जीव मुठीत धरायला लावतो. सुटकेचा नि:श्वास सोडायला लावतो...
मंतरलेले आपण जागे होतो, तेव्हा पडदा पडणारा. नि:शब्द शांतता. आणि रक्तातली प्रचंड दमणूक.
प्रेक्षागृहातली ही जादू ओसरून लोक भानावर आलेले. 'हे काय घडून गेलं' या आश्चर्यानं बावचळलेले. खुळचट हसणारे. हळूहळू हालचाल करून आपल्याच हातापायांतली ताकद आजमावणारे. पांगणारे.
नट?
चुपचाप मिशी उतरवत होता. रंग पुसत होता. फुललेला श्वास आवरत होता.
म्हटलं नव्हतं? सगळं तसं वाह्यात संतापजनकच.