"...आपल्या संवेदना व भावना तीव्र आहेत, आपल्याला अनुभवाच्या अर्थाचा विचार बर्यापैकी करता येतो, कल्पनाशक्तीची व भाषेची देणगीही अगदीच वाईट नाही, मूल्यभाव सूक्ष्म आहे, वगैरे गोष्टींचे भान मला फार लवकर आले. पण त्याच वेळी असेही कळले की निसर्गाने आपल्याला या सर्व शक्तींना सामावून घेणारी व त्यांच्यापलीकडचा अज्ञात प्रदेश उजळवून टाकणारी नवनिर्मितिक्षम शक्ती दिलेली नाही. त्या प्रदेशातल्या अंधूक आकृती क्वचित भासमान होतात; क्वचित त्यांच्या निगूढ गीतांचे सूर ऐकू आल्यासारखे वाटतात. पण तितकेच वाटते, त्या सार्वभौम शक्तीपासून असे वंचित राहण्याचा शाप जर द्यायचा होता, तर आधीचे सर्व दान कशाला दिले? मग ध्यानात आले की त्या दानाच्या बळावर आपल्याला दुसर्याच्या निर्मितीत सावलीसारखी सोबत करता येईल; कदाचित ’झाडू संतांचे मार्ग’ म्हणतात तशा रीतीने कलावंतांच्या वाटा साफ व स्पष्ट करता येतील. तेच आपले श्रेय असेल आणि ते कमी मोलाचे नाही. आपण जीव ओतू तितके ते वाढेल. संपादन-प्रकाशनाच्या कामात मी ते शोधले आहे, अगदी जिवानिशी शोधले आहे आणि त्यातला आनंद घेतला आहे..."
खरे पाहता तुमचे जाणे जाणवावे असा आपला थेट संबंध कधी आलाच नाही. तो येण्याची शक्यताही नव्हती.
तुमचे क्षेत्र साहित्याचे. वाचणारी माणसे कुठल्याही युगात वाचतातच आणि न वाचणारी कधीच वाचत नाहीत हे जरी खरे असले तरी, आमचे युग वाचण्या-बिचण्यासारख्या ’निरुपयोगी’ आणि ’अनुत्पादक’ गोष्टीकडे सहजसाध्य तुच्छतेने पाहणारे. औचित्य सांभाळणे हा तुमचा वृत्तिविशेष. आणि गरज पडली तर नेसूंचे सोडून डोक्याला गुंडाळण्यातही काही वावगे नाही असे मानणारी आमची पिढी. केल्या कामाचेही श्रेय घेण्याचे तुमच्या जिवावर येई. आणि ’नो पब्लिसिटी इज बॅड पब्लिसिटी’ हे तर आमचे ब्रीदवाक्य. अशा दिवसांत तुम्ही सार्वजनिक आयुष्यातून जवळ जवळ निवृत्तच झाला होता यातही नवल करण्यासारखे काही नाहीच.
तरी तुमचे जाणे इतके जाणवत राहावे, असे आणि इतके तुम्ही माझ्या मनात कसे रुजून राहिलात, असे कोडे पडले आहे.
वाचण्याच्या आवडीचे सवयीत आणि पुढे गरजेत रूपांतर होत गेले तसतशी पुस्तके जमा होत गेली माझ्याजवळ. कुण्या वडीलधार्या माणसाने माझी पुस्तके पाहताना सहज म्हटले, ’अरे, ’मौजे’ची पुस्तके बरीच दिसतात की.’ तेव्हा त्या अडनिड्या वयात मी ’मौजे’च्या देखणेपणाची प्रथमच जाणतेपणी दखल घेतली आठवते. नीटस देखणी, नजरेला सुखावणारी मांडणी. पानांचा तो विशिष्ट पिवळसर रंग. (कुणीतरी अडाण्यासारखे ’ही पुस्तके पिवळी पडलेली आहेत’ असे म्हटले तेव्हा त्याची कीव तर वाटली होतीच. पण नकळत ’का बरे आवडतो हा रंग’ असा चाळाही सुरू झाला मनाशी. काही पुस्तकांच्या भगभगीत पांढर्या पानांच्या तुलनेत त्या लोभस पिवळसर पानांत एक अनाक्रमण, आकर्षक साधेपणा असतो. सेपिया टोनसारखा? कुणास ठाऊक...) राजमुद्रेसारखा ’मौजे’चा तो शिक्का. म्हटले तर प्रथमदर्शनी जुनाट वाटेलसा. पण त्या जुनेपणातच खानदान आणि भारदस्त आकर्षण घेऊन असणारा. अर्थपूर्ण आणि सुरेख मुखपृष्ठे. शुद्धलेखनाचा आणि मुद्रणाचा विलक्षण अचूकपणा. (एकदा कधीतरी एका अक्षराला द्यायचा राहून गेलेला काना सापडला होता, तेव्हा मी आधी आश्चर्यानं शब्दकोश पाहून आपल्याला ठाऊक असलेला शब्दच बरोबर आहे ना, अशी खात्री करून घेतलेली आठवते! हो, ’मौजे’च्या पुस्तकातला शब्द कसा चुकीचा असेल?!) आणि या सर्वांवर ताण म्हणजे एकाहून एक सरस दर्जा असलेल्या, चाकोरीबाहेरच्या वाटांवरच्या साहित्यकृती. मराठीच्या साहित्यविश्वात मैलाचे दगड ठरतील अशा तर कित्येक...
तसेच ’मौजे’चे दिवाळी अंक. वर्षानुवर्षे जपावेत असले चिरेबंदी साहित्य असलेले ते अंक. कधी कुणाच्या कविता आवडीनं वाचण्याचा मला कंटाळा. पण ’मौजे’तल्या कविता आवर्जून वाचाव्याशा वाटत गेल्या आणि मग नकळत कविता वाचण्यातला आनंद रुजत गेला मनात...
खरं तर तुमचा माझ्याशी आलेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध काय तो इतकाच. ’सत्यकथा’ ही गोष्ट मला तरी ’स्वातंत्र्यलढा’ किंवा ’आणीबाणी’ या गोष्टींसारखी आणि या गोष्टींइतकीच अपरिचित. फार दंतकथा असणारी, फार दूरची आणि त्यामुळे ’माफक रोमांचक’ या विशेषणापलीकडे न जाणारी.
मराठी साहित्यानं कात टाकण्याच्या त्या दिवसांत म्हणे ’सत्यकथे’नं सार्या चाकोरीबाहेरच्या लेखकांना हक्काचं व्यासपीठ दिलं. सगळ्या वादांत, विरोधाच्या गदारोळात, टिंगलटवाळीतही खंबीर आणि सक्रिय पाठिंबा दिला. प्रसंगी ’प्रस्थापितांचा संकुचित संप्रदाय’ अशी हेटाळणी ऐकूनही अभिजात प्रयोगशील साहित्याचा आग्रह सोडला नाही, तसाच विरोधी मतप्रवाहांची दखल घेण्याचा सर्वसमावेशक सुसंस्कृतपणाही सोडला नाही. म्हणे...
या सार्या ऐकल्या-वाचलेल्या, सांगोवांगीच्या गोष्टी. मला प्रत्यक्ष दिसत राहिला तो ’मौजे’बद्दलचा पुस्तक जगातला सकारण आदर आणि दबदबा. मनोहर जोशी-विजय तेंडुलकर वादातही ’घडला तो प्रकार दुर्दैवी होता. पुरस्कार कुणाच्या हस्ते द्यावा हे मी संस्थेला सांगणं उचित नाही’ इतक्याच मोजक्या शब्दांत तुम्ही सुसंस्कृतपणे व्यक्त केलेली प्रतिक्रिया. निरनिरळ्या कुळांच्या, वयांच्या आणि प्रवृत्तीच्या लेखक-कलावंतांनी तुमच्याविषयी वेळोवेळी प्रकट केलेली आदराची आणि आपुलकीची वादातीत भावना. लेखनासारख्या व्यक्तिनिष्ठ सर्जनप्रक्रियेतही तुमचा मोलाचा हातभार लागल्याबद्दल व्यक्त केलेली सुंदर कृतज्ञता. प्रत्यक्ष साहित्यनिर्मिती न करताही तुमच्या अक्षरश: अजोड कामासाठी तुम्हाला साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळावे हा कुणीकुणी कृतज्ञभावाने केलेला आग्रह. तुमच्या नावे लिहिल्या गेलेल्या कित्येक अर्पणपत्रिका...
या सार्याबद्दल आभार मानणेही काहीसे अपुरे, औपचारिक आणि उथळ वाटेल.
तुमच्या सर्जनाच्या अभिव्यक्तीसाठी इतका वेगळा, विधायक रस्ता शोधलात तुम्ही. आणि किती देऊन गेलात... तुम्हीच तुमच्या एका पत्रात म्हटले आहे तसे चंद्रबिंबाची कळा वाढवून गेलात... तुमचेच शब्द परत एकद उद्धृत करून थांबणे औचित्याला धरून होईल...
"...काल संध्याकाळी चांदणे सुंदर पडले होते. गच्चीवर त्यात बसावे असे फार मनात आले, पण गेलो नाही. अशा नीरव चांदण्यात एकटेपणा सोसत नाही... वाटते, चांदण्याचे दूध मिसळून मऊ झालेल्या शांततेत सर्वांगी न्हाऊन निघावे व विरघळून जावे, किंवा तळ्यातल्या कुमुदाप्रमाणे शरीर-मनाच्या पाकळी-पाकळीने उमलत जावे आणि त्या चांदण्याला किंवा चंद्रबिंबाला अभिमुख होऊन भरून यावे आणि अंतर्बाह्य निवून गात्रागात्रांत ती सुगंधी चापेगौर शीतलता भिनवून घ्यावी, किंवा दुरून एखाद्या मधुर घंटेचा मंद वलयांकित निनाद ऐकावा, किंवा सनईसारख्या गोड व आर्त स्वराचे कण रंध्रारंध्राचे कान करून ऐकावे... आणि हे जडकठोर शरीर त्या सुखात न कळता विरून जावे... आत्म्याची क्षीण ज्योत चंद्रबिंबात विलीन होऊन त्याची कळा वाढली तर वाढावी... आपण उरूच नये..."