Tuesday 31 March 2020

कुठल्या जन्मीचं हे पाप?

दोन्ही बाजूंना ॲस्बेस्टॉसाच्छादित एकेरी घरांच्या ओळी, मध्ये जेमतेम एका गटाराच्या रुंदीची पायवाट. त्यातच दोन्ही बाजूंना घरांच्या दरवाज्यांपाशी बैठे नळ आणि नळाच्या तोंडाखाली कपडे धुवायची फरशी. तिथून वाहणारं फेसाळ पाणी पायवाटेवरूनच उताराकडे धावत निघालेलं. क्वचित कुठे पायवाटेला पाखा काढून दिलेलं पन्हळी पोटगटार. त्यावर नेमका कोन साधून ठेवलेला एखादा चिरफाळलेला प्लॅस्टीक टब. उंबऱ्यातच नीटसपणे बसकण मारून कपडे धुणाऱ्या वा भांडी विसळणाऱ्या कुणीकुणी. कुठे वर लटकावलेलं टमरेल. कुठे डालड्याच्या डब्यातली तुळस. पाऊस असेल, तर त्यातच दोहों बाजूंच्या पत्र्यांवरून गळणाऱ्या आणि काही केल्या न चुकवता येणाऱ्या पागोळ्या. स्टोव्हचा फरफरता आवाज. मशेरी भाजल्याचा दमदार खकाणा. गटारीच्या कडेला पेपरावर बसवलेल्या उकिडव्या पोराचा परिमळ. चपाती शेकल्याचा खरपूस वास. कुठे रॉकेल आणि उकळत्या चहाचा तरतरीत गंध. 
माझ्या तत्कालीन घरात आणि या घरांच्यात तसा सांपत्तिक फरक नव्हता फार. पण आईबाप दोघंही पांढरपेशे आणि सवर्ण. त्यामुळे मला शाळेत सोडायला या घरांमधल्या एका मावशींची नेमणूक असे. मी तयार होऊन मावशींना हाक मारायला जात असे आणि मग तिथून त्या मला शाळेत सोडायच्या. जवळच्या तसल्याच घरांच्या बैठ्या चाळीत आमचं घर. तिथेही हा वास यायचाच. त्यात रविवारी सुक्या जवळ्याची नि क्वचित कोंबडीच्या रश्शाची मसालेदार भर.
हा वास मला परका वाटलेला नाही कधी. मग घरं बदलत गेली तरीही कायम तो आसपास असेच. कधी कुणा मैत्रिणीच्या घरी तो भेटायचा. मी आपली मैत्रिणीच्या घरी केबलचा सिनेमा दिसतो या कौतुकयुक्त अचंब्यात चूर. कधी बसस्टॉपवर जायचा शॉर्टकट अशाच वासांच्या बोळकांडीतून जाणारा. तेव्हा घरी यायच्या वेळा तिन्हीसांजा ओलांडून रात्रीत शिरत गेलेल्या आठवतात. तेव्हा या वासांच्या बोळीत तांदूळ निवडत बसणाऱ्या आजींची, कुठे चक्क आंब्याच्या पेट्या सुट्या करून चुलीला जळण करणाऱ्या कुणा फाटक्या अंगाच्या माणसाची, कुठे बिनपिठाच्या अंगानं भेटल्यामुळे अनोळखी भासणाऱ्या गिरणीवाल्या भय्याची सोबत व्हायची रात्रीबेरात्री. आपल्याला कायम येणाऱ्या वासांना आपलं घ्राणेंद्रिय स्वीकारूनच टाकतं तसं होऊन कित्येक वर्षं मला हा वास वेगळाही करता येत नसे. सवर्णांच्या सुखवस्तू घरांच्यात राहणं होऊ लागल्यावर रस्ता बदलला आणि नाकाचंही वळण बदललं. 
मग एकदा भंगारवाल्यांच्या वस्तीतून शॉर्टकट मारायच्या मोहानं शिरले नि या वासानं एकदम वेढून टाकलं. हातात चुरगळलेली नोट घेऊन निघालेल्या नि गुर्गुरणाऱ्या कुत्र्याच्या भीतीनं अंग चोरत भिंतीला घसपटत जाणाऱ्या एका बारक्या झिपरीचा हात धरला मी आणि नाक्यावरच्या वाण्यापर्यंत तिची सोबत घेतली. हात सोडताना इवलं हसली बया. तिला ओळखीचा वाटला असेल माझा वास? 
याच वासातून आलेय मी. थोडं खोलवर हुंगलं, तर माझ्या कलोनखाली अजुनी सापडेल तो. पण राहतेय मी सुखानं चार खोल्यांच्या घरात. संडासातही लिंबाच्या वासाचं परफ्यूम फवारून. तरी का सरावत नाहीत डोळे अजून रस्त्यांवरून मुक्यानं जाणारे हे तांडे बघताना? कुठल्या जन्मीचं हे पाप?

No comments:

Post a Comment