Friday 7 June 2019

काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात

काहीही झालं तरी चूक तुमचीच असण्याच्या काळात
जन्माला आलेले असता तुम्ही
तेव्हा सगळे उपरोध आत वळवून घेण्याला पर्याय असत नाहीत.
पेट्रोल जाळलंत तरी तुम्ही पुढच्या पिढ्यांचे गुन्हेगार
लाकूड जाळलंत तरीही तुम्हीच मागच्या पिढ्यांचा वारसा जपायला नालायक ठरलेले
बेजबाबदार.
काहीच न जाळता नुसते निवांत बसतो म्हणालात
निसर्गाबिसर्गाच्या सान्निध्यात,
तरीही थोडेफार थोरोबिरो होऊन गेलेले असतात पूर्वीच.
तुम्ही ओरिजनॅलिटी नसलेले
बिनडोक नकलाकार.
विकास हवा म्हणालात,
तर तुमच्यावर पर्यावरणाच्या निर्घृण खुनाचे आरोप होतात.
विकास नको म्हणालात,
तर कमोडवर बसून साधं निवांत हगण्यालाही हिप्पोक्रसीचे छद्मी रंग येतात.
प्रेमात पडून पटवा प्रियकर.
करा लग्न, आणा मूलबिल,
थाटा संसार.
तुम्ही चाकोरीतून चालणारे
धोपटमार्गी पगारदार.
नको च्यायला लग्नबिग्न.
दुनियेला मारतो म्हणा, फाट्यावर.
जेनेटिकल मैदानात उतरायचा धीरच न झालेले तुम्ही.
दुनिया तुम्हांलाच भेकड म्हणणार.
युद्ध टाळा
काश्मिरात नको म्हणा, हिंसाचार.
संशयाचं गगनचुंबी वारूळ उठलंच समजा
तुमच्या देशभक्तीवर.
म्हणा कधी समजुतीनं,
'नाचू दे की विसर्जनात मनसोक्त
ऊर्मी असतात यार...'  
थोबाडाला काळं फासून कर्मकांडाच्या गाढवावर
तत्काळ तुम्ही उलटे सवार.
दिवस असे अखेरीचे येतात,
की उभं राहावंच लागतं तुम्हांला.
एकीकडून गेल्या शतकांचा राक्षसी ताकदीचा लोंढा
आणि एकीकडून जुलैचा वायझेड वारापाऊस अंगावर घेत,
हातातली कडी आणि फुटबोर्डावरचा पाय निसटू न देण्याची पराकाष्ठा करत.
स्टेशन येईस्तो,

असलीनसली सगळी ताकद एकवटून उभं राहण्याला पर्याय असत नाहीत.
काय करणार?
एका पायावर, तर एका पायावर.

No comments:

Post a Comment