Wednesday 6 March 2019

शहराला परवडत नाहीत डेडिकेटेड रिसोर्सेस


शहराला परवडत नाहीत डेडिकेटेड रिसोर्सेस.

सूर्यास्त पाहायसाठी मग्न तळ्याचा काठ किंवा प्रेमिकांच्या कूजनासाठी डोंगरातले आडोसे नसतात शहरापाशी राखीव.

रेल्वे क्वार्टर्सच्या मागून डोकावणारा नि शहराच्या दिवेलागणीशी क्षीण स्पर्धा करणारा चंद्राचा तुकडा ट्रेनच्या जाळीदार खिडकीतून बघून माफक हरखतं शहर.

झोपाळलेल्या डोळ्यांनी चहा गाळता-गाळता समोरच्या फांदीवरचं पाखरू बघून खुशालतं आणि आ वासून उभ्या असलेल्या दिवसाकडे वळत निमूट पाठ फिरवतं समजूतदारपणे.

समुद्रावरचा वारा खायचा असेल तर मागची रहदारी ऐकणार्‍या कानांच्या पापण्या मिटून घेण्याची अद्भुत कला अवगत असते त्याला.

कबूलाय,

शहराला ठाऊक नसतं सकाळी कचर्‍याचे डबे जिन्यावरून घसपटत घेऊन जाणार्‍या नि कानात हेडफोन्स खुपसून आपल्याच मस्तीत ओल्या कचर्‍याची घाण विसरू पाहणार्‍या तरुण भंगिणीचं नाव.

बॉम्बस्फोटाचं नाट्यपूर्ण निमित्त न होता निव्वळ गर्दीत पाचपन्नास लोक गुदमरून मेल्याचं ऐकलं तरी एक नाटकी उसासा टाकून खांदे उडवत पुन्हा धावू लागतं शहर.

उत्तररात्री रिक्षातून भरधाव जाणार्‍या कुणा आयटीमजुरणीवर केला कुणी एखादा चुकार बलात्कार,

वा अतिरेकी भासणार्‍या कुणा कोवळ्या दाढीवाल्याला बुकलून ठार केलंच दमल्याभागल्या अश्राप गर्दीनं कधी चुकूनमाकून,

तरी फारसं खंतावत नाही शहर.

त्याच्या रस्त्यांपाशी नांदतच असते

धडधडती-वाहती-तुंबती रहदारी,

क्लोरीनयुक्त पाणी घेऊन वाहणार्‍या जलवाहिन्या,

गू गोळा करत समुद्राकडे निघालेली गटारं,

घामानं थबथबत पण अपघाताचा धोका काही शतांशांनी कमी करत जमिनीखालून रस्ता ओलांडणार्‍या लोकांचे जथ्थे,

आणि जुन्याजाणत्या झाडांची आयमाय काढत निळ्या पत्र्यांआड जमीन पोखरणारं मेट्रोचं उखीरवाखीर कामही,

एकसमयावच्छेदेकरून.

फोनवरून व्हेंडरवर भुंकताभुंकता व्हॉट्सॅपवरचा प्रियकराचा आर्त कोवळा मेसेज बघून जिवणीच्या कोपर्‍यातून हलकेच ओलसर हसणार्‍या

आणि पुन्हा नव्या जोमानं भुंकू लागणार्‍या चटपटीत मल्टिटास्किंग बाईसारखं हे शहर.

शहराला परवडत नाहीत डेडिकेटेड रिसोर्सेस.