Wednesday 24 October 2018

21 Lessons for the 21st Century

21 Lessons for the 21st Century
- Yuval Noah Harari


हे या पुस्तकाचं परीक्षण नाही, परिचयही नाहीच. पुस्तक वाचताना-वाचून डोक्यात आलेल्या गोष्टी एका ठिकाणी नोंदवणं आहे फक्त. मुळात पुस्तकाचा विषयच इतका डेंजर असताना, आपण त्याबद्दल काय बरंवाईट बोलणार, असा एक किंचिद्गंड मला आहेच. पण हरारी म्हणतो आहे ते खरं असेल – आणि नसेल तरीही – हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. एकसिवाव्या शतकातल्या,बदलत्या पर्यावरणाच्या, अणुस्फोटांच्या उंबर्‍यावरच्या आणि अल्गोरिदम्सनी आपलं आयुष्य काबीज करण्याच्या अलीकडच्या काळात आपण नक्की काय करायचंय, हा आपल्या सगळ्यांपुढचाच प्रश्न आहे. काही जणांना असा प्रश्न आहे हे स्वीकारणंच नकोसं वाटत असेल, शक्य आहे. पण म्हणून प्रश्न नाहीसा होत नाही,सगळ्यांसाठी तर नाहीच नाही. त्यामुळे हरारीइतक्या आत्मविश्वासानं आणि अकलेनं जरी नाही, तरी त्याच्या काही शतांश टक्क्यांनी तरी या प्रश्नावर माझाही हक्क आहेच, असं स्वतःला ठणकावून सांगून मी हे ’21 अपेक्षित’ वाचायला घेतलं.

**

अशा प्रकारच्या पुस्तकांबद्दल सहसा अभ्यासकांचं मत काहीसं तुच्छतेचं असतं. अशा प्रकारची पुस्तकं म्हणजे मोठे प्रश्न सोपे करून मांडणारी पुस्तकं. पण याच पुस्तकात एके ठिकाणी लेखक स्वतःच असं म्हणतो, की (माझ्या शब्दांत) ‘विज्ञान करणं महत्त्वाचं आहेच. पण ते सगळ्या माणसांपर्यंत पोचणंही महत्त्वाचं आहे. विज्ञानकथेच्या माध्यमातून? हो, जरूर. का नाही? जबाबदार विज्ञानकथा लिहिणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण विज्ञान आपल्या आयुष्य कधी नव्हे इतकं बदलून टाकणार आहे आणि त्याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहीत असायला हवं’. हे इतकं खरं आणि बरोबर आहे, की आपण अभ्यासकांच्या हस्तिदंती तुच्छतेचा मुद्दा निकाली काढू. म्हणजे विदा आणि पुरावे हवेतच. त्यावाचून कुणी काही बोलू नये, हे मान्य आहेच. (या पुस्तकाचा एक पंचमांश भाग संदर्भ देण्यात खर्ची पडतो हे इथे नोंदायला हवं.) पण ते दिल्यावरही सोप्या भाषेत काही लिहिण्याकडे कुणी तुच्छतेनं पाहत असेल, तर धन्यवाद मंडळी, तुमचा गणपती पुढे जाऊ द्या.

**

हरारीबुवा नक्की काय म्हणतात, त्याचा मला समजलेला सारांश.

माणसासमोर तीन मोठी आव्हानं आहेत. अल्गोरिदम्सच्या अचूकपणावर आणि सर्वव्यापी ताकदीवर भिस्त ठेवून आपलं जग चालवायला त्यांच्या हातात दिलं जाईल आणि आयुष्यभर रोज नव्या गोष्टी शिकण्यासाठी मानसिक-शारीरिक दृष्ट्या तयार नसलेली आपण माणसं बहुतांश निरुपयोगी-बिनमहत्त्वाची-बिनकामाची उरू हे पहिलं तंत्रज्ञानविषयक आव्हान. निरनिराळ्या इझमांच्या गोष्टी स्वतःला सांगत एकमेकांशी लढणारे आपण एखादं अणुयुद्ध करू आणि निसर्गाचं सोडा एक वेळ, पण निदान मानवजातीचा तरी अंत घडवून आणू हे दुसरं राजकीय आव्हान. आणि या दोन आव्हानांना सामोरा जायला वेळही मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित करणारं, प्रदूषणातून पर्यावरणातल्या मोठ्या बदलांना आमंत्रण देणारं आणि त्यायोगे अनेक ज्ञाताज्ञात धोक्यांच्या शक्यता पोटी घेऊन असणारं पर्यावरणविषयक आव्हान.

या तिन्ही आव्हानांचं काय करायचं हे आपल्यापैकी कुणालाच धड कळत नाहीय. मुळात आव्हानांचं स्वरूप जागतिक आहे. पण जागतिक दृष्ट्या काहीएक धोरण ठरवू शकेल अशी एकही ताकदवान संस्था आपल्याकडे आज नाही. आपण राष्ट्र नामक तुकडे आहोत. धर्म, पंथ,तत्त्वज्ञानं, वाद उर्फ इझम्स या गोष्टी किती बेगडी आणि अपुर्‍या आहेत, यावर आपलं एकमत होईलही एक वेळ. पण आज जगभर लोक ज्याच्या आसर्‍याला जाताना दिसताहेत तो बेताल राष्ट्रवादही अपुरा आहे आणि उदारमतवाद या ज्या विचारप्रणालीनं आजवर अजिंक्य राहून निरनिराळ्या शाह्या, वाद, धर्म आणि तत्त्वज्ञानांचा पराभव केला, ती उदारमतवादी भांडवलशाहीचा बुरखा ल्यालेली लोकशाहीही अपुरी आहे.

आपला आतला आवाज ओळखा आणि त्याचा कौल घेऊन काय करायचं ते ठरवा, हे मार्गदर्शक सूत्र आजवर कामी येत राहिलं आहे वेळोवेळी. पण ‘आपण’ असं आपण ज्याला संबोधतो, त्या 'आपलं' कौल देणारं मनही स्वतंत्र नाहीच मुळात, असं जर लक्ष्यात आलं, तर काय करणार?

लक्ष्यात घ्या, मन ही एक जैवरासायनिक यंत्रणा आहे. तिच्यावर आपला ताबा नाही. ताबाच काय, आपल्याला अजून तिचं अस्तित्वही धड शोधता आलेलं नाही. या जैवरासायनिक यंत्रणेवर नाना संस्कार घडले आहेत उत्क्रांतिकाळात. निरनिराळ्या आदिम भावना खोलवर रुजल्या आहेत, आत्मसंरक्षणाच्या जय्यत तयारीत राहताना. त्याखेरीज अनेक कृत्रिम संकल्पनांची पुटं चढली आहेत. आपल्याला हव्या आहेतशा वाटणार्‍या अनेक गोष्टी आपल्याला हव्या वाटायला 'हव्यात' – अशा कृत्रिम संस्काराचा राप चढला आहे मनावर.

आता अल्गोरिदम्सच्या सर्वव्यापी आव्हानासमोर उभं ठाकताना कसं ओळखणार आपण आपल्याला काय हवं आहे ते आणि काय आपल्याला हवं आहे असं आपल्याला 'भासवलं' जात आहे ते?

पोस्ट-ट्रूथचा जमानाय हा.

इथे हरारीबुवा एक क्लासिक वळसा देतात. की –

भिऊ नका गडे हो. पोस्ट-ट्रूथचा जमाना नव्हता कधी? तर कायमच होताच. कायमच राज्यकर्त्यांनी खोटेपणाचा सहारा घेतलाच आहे. त्यात नवं काही नाही.

याच्याशी लढायचं की नाही, हा तुमचा प्रश्न आहे. अल्गोरिदम्सच्या हाती सगळं देऊन टाकून तुम्हांला ‘तुम्ही खूशच आहात’ असं त्यांच्याकडून ‘वाटवून’ही घ्यायचं आहे? ओके. तुमचा प्रश्न. नका लढू. पण लढायचं असेलच आपल्या मनावर, इच्छांवर आणि पर्यायानं आपल्या आयुष्यावर ताबा राहावा म्हणून, तर? कसं?

इथे हरारी चक्क विपस्सनेकडे वळतो. आपण स्वतःच्या जाणिवेला ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे त्यानं इथवर सांगितलेलंच असतं. आता विपस्सनेमधला धर्माचा आणि अध्यात्माचा भाग वगळून, निव्वळ तंत्र म्हणून, त्याकडे कसं बघता येईल नि त्यातून काय साधता येईल, त्याबद्दल तो बोलतो. स्वानुभवाच्या आधारे.

**

Was Vipassana an anti-climax for me? To be honest, yes, for some time. पण ते फार काळ टिकलं नाही. हा माणूस अतिशय प्रामाणिकपणे, अनेक संदर्भ पुरवत, आपल्याकडे आणि आपल्या समूहाकडेही अतिशय नर्मविनोदी परीक्षणात्मक नजरेनं पाहत बोलतो आहे. जगभरातल्या राजकारणाचे, इतिहासाचे, धर्मशास्त्रांचे, पुराणांचे आणि अद्ययावत सामाजिक-आर्थिक-राजकीय-शास्त्रीय मतमतांतरांचे पुरावे नोंदत बोलतो आहे. गोष्टी तपासून पाहण्याचं आवाहन करतो आहे. तपास करायचा झालाच, तर त्यासाठीचं साधन देऊ करतो आहे. हे छान आहे.

वाचनीय तर आहेच, चिंतनीयही आहे. अस्वस्थ आणि आश्वस्त दोन्ही करणारं आहे.

**

अलीकडे वाचनात, बघण्यात आणि ऐकण्यात येत असलेल्या अनेक पुस्तकांचे, विचारांचे आणि गोष्टींचे संदर्भ येऊन या पुस्तकाच्या धारेला लागत होते. The Three Body Problem (Liu Cixin) ही चिनी विज्ञानकथा, मकरंद साठ्यांचं अस्मिताविषयक विवेचन, www.zenhabits.net हा Lio Babauta चा ब्लॉग, Tristan Harrisचं Time Well Spent हे तंत्रज्ञानविषयक म्हणणं, Michael Pollanचं अन्नविषयक विवेचन.... हे सगळंच या पुस्तकाला समांतर असं काही म्हणतं. जिज्ञासूंनी हे जरूर गुगलून पाहावं.

2 comments:

  1. मला पण हे पुस्तक खूप आवडले. क्षणभर भविष्याची भीती पण वाटली. पण मी ५८ वर्षांची असल्याने ओसरली.!!
    गंमत माहीत आहे का मेघना, लेखक ती आहे. याच पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचल्यावर मला तरी असे वाटले.

    ReplyDelete
    Replies
    1. कमेंट उशिरा पाहिली. पण लेखक मात्र 'तो' आहे हांं. पुस्तक मस्तच आहे याबद्दल प्रश्नच नाही.

      Delete