Sunday 8 July 2018

रस्ते

रस्ते लक्ष्यात राहणे, रस्ते नीट कळणे आणि ते दुसर्‍याला समजावून सांगता येणे या सगळ्या प्रकाराबद्दलच मला एक जबरदस्त भयगंड आहे.

माझ्या स्वतःच्या जन्मापासूनच्या गावात रस्त्यावरून अत्यंत निवांतपणे कुठूनतरी कुठेतरी जात असताना बहुधा माझ्या सहज आत्मविश्वासामुळे चकून एका निरागस बाईने मला तलावपाळीला कसं जायचं ते विचारलं. मी स्वतः तिथून मिनिमम रिक्षाभाड्याइतक्या - खरं तर त्याहूनही कमी, पण रिक्षावाले तितके पैसे घेतातच. त्यामुळे असो. तर - अंतरावर होते. पण मला रस्ता काही केल्या सांगता येईना. बरं, मला ठाऊक नाही, हे सांगण्याची लाज वाटली. वास्तविक त्या बाईला काय माझ्या तोंडाकडे बघून माझं जन्मस्थळ कळण्याची आणि ती त्यावरून मला फिदिफिदि हसण्याची शक्यता नव्हती. पण गंड हा गंड असतो. त्यामुळे मी घाईघाईनं माझा जन्माचा साथी असलेला मोबाईल काढून एकदम त्यात कुणीतरी पेटलेलं असल्यासारख्या हालचाली केल्या आणि 'सॉरी हं, जरा घाईत ए' असं पुटपुटून चक्क पळ काढला.

अजुनी रस्त्यावर समोरून कुणी पत्ता हुडकणार्‍या भिरभिर्‍या नजरेचं येताना दिसलं की मला एकदम दचकायला होतं.

असेच मुंबईहून पुण्याला जाताना - किंवा खरंतर कुठूनही कुठेही बाय रोड जाताना. पण पुण्याचं नाव घेतलं की अ‍ॅडेड अ‍ॅडव्हांटेज मिळतो. शिव्यांना एक प्रकारचं मुळातून बळ मिळतं. त्यामुळे पुणं. तर ते असो. तर - मुंबईहून पुण्याला जाताना पलीकडून फोन करून 'तू आत्ता कुठे पोचल्येस' हे विचारणारे लोक आणि त्याहून म्हणजे, या आचरट प्रश्नाला छातीठोक आणि अचूक उत्तर देणारे लोक. हे लोक निव्वळ थोर असतात. एकतर वाहन हलायला लागलं, खिडकीतून वाराबिरा लागायला लागला, कानात गाणी खुपसली... की मला लग्गेच पेंग यायला लागते. एरवी दोन-दोन तास बिछान्यात आराधना करावे लागणारे कमनिशिबी प्राणी आम्ही, पण चालत्या वाहनात खिडकी मिळाली रे मिळाली, की निद्रादेवी की कोण ती बाई डायरेक्ट मांडीवर येऊन बसते. परिणामी असल्या प्रवासात पनवेल पार होण्यापूर्वीच मी ढगात असते. फोनमुळे जागं होऊन, बाहेर पाहून, आसमंताचा क्षणार्धात अंदाज घेऊन आपले अचूक अक्षांश-रेखांश मला नाही बा कळत. एकदा तर असली पृच्छा करणार्‍या एका मित्राला मी 'वाकडच्या जवळ आल्येशी वाटत्ये' असं मोघम उत्तर देऊन मोकळी झाले. तो बिचारा वेळेचा अंदाज घेऊन आणायला येऊन थांबला असणार. कारण तासाभरात त्याचा हैराणावस्थेत परत फोन. 'कुठे आहेस???' मी आजूबाजूला बघत्ये, तर लोक फूडमॉलला उतरण्याच्या तयारीत.

आमची मैत्री अजून आहे. पण त्याचं श्रेय मित्राच्या सहनशक्तीला आहे, असंच म्हणावं लागेल.

आपल्या गावातले नसलेले लोक आपल्या चारचाकी गाड्या घेऊन आपल्या गावात येतात आणि आपल्याला गाडीत घालून कुठे कुठे जाऊ बघतात, हाही मला असाच भयंकर घाबरवणारा प्रसंग असतो. मला एकटीला माझ्या अकरा नंबरच्या बसनं न चुकता कुठेही जाऊन पोचण्याचा आत्मविश्वास येण्यासाठी मला त्या ठिकाणी किमान साडेचार वेळा कुणाच्याही मदतीविना जाण्याचा सराव लागतो. त्यात लोकांना आत्मविश्वासानं रस्ते सांगण्यासाठी लागणारा धीर मिळवा. त्याला चारचाकीसाठीच्या रस्तानियमांनी - वन वे वगैरे भानगडी - गुणा. वर थोडं फुटकळ 'तिथे पार्किंगला जागा मिळते का?' या प्रश्नाच्या उत्तरासाठी लागणारं अवधान. हे सगळं नसेल, तर ते असण्याचं उसनं अवसान. नि मग होणार्‍या चुका निस्तरण्यासाठी लागणारा शिवसैनिकी उसना - त्यामुळे अधिकचा नि केविलवाणा - उर्मटपणा.

काय अवस्था होत असेल माझी? ती भोगण्याहून 'मला गाडी लागते' हे उत्तर तोंडावर फेकून देणं सोपं असतं.

फारच लहानपणापासून लोकल ट्रेन्समध्ये वावरण्याची सवय असल्यामुळे स्टेशनावरून फिरताना मी अगदीच पंढरपुरावरून आत्ताच आल्यासारखे गबाळे भाव चेहर्‍यावर घेऊन फिरत नाही इतकंच. आपला बावळटपणा झाकण्यासाठीचा आत्मविश्वास मला आईबापाकडून मिळाला आहे. पण दादर स्टेशनला सोमवारी सकाळी दहा वाजता मला जर कुणी गाठलं, नि कबूतरखाना कुठे असं विचारलं, तर मी मोबाईल-पेटलेलं काहीतरी-हालचाली करण्याचीच शक्यता जास्त आहे. बाकी दादर स्टेशन हा खरा म्हणजे एका संपूर्ण नव्या लेखाचाच विषय आहे. त्यामुळे आपण घाईघाईनं तो बदलू. पण मुद्दा असा आहे, की स्टेशनात नुकत्याच आलेल्या रिकाम्या चालत्या ट्रेनमध्ये उडी मारून घुसणं आणि खिडकीची जागा धरणं मला जमेल. फक्त ती खिडकी बरोबर उलट्या दिशेची निघणार नाही, याची मात्र खातरी नाही, इतकं माझं दिशाज्ञान थोर आहे. व्हीटीच्या दिशेनं तोंड करून उभं राहिल्यावर उजव्या हाताचे प्लॅटफॉर्म्स हे बहुधा क्रमांक एकचे असतात हे घोकून आणि मग शक्यतोवर मूकाभिनय न करता वेळच्या वेळी आठवून वापरण्यातच माझं बहुतांश दिशाज्ञान खर्ची पडलेलं आहे.

त्याहून रिक्षानं फिरण्याचा पर्याय मला मानवतो.

एकतर रिक्षात बसल्यावर आपल्याला रस्ते कळले काय, न कळले काय, परिस्थितीत काही फरक पडण्याचा संभाव असत नाही. रिक्षावाला हाच सर्वज्ञ आणि सर्वाधिकारी असतो. काही लोक रिक्षा 'कुठून कुठे कशी घ्या' हे रिक्षावाल्याला सांगतात, त्याचा अहंकार दुखावला गेल्यावर त्याच्याशी एक परिसंवादवजा भांडण रंगवतात आणि पत्त्यापाशी पोचताना अचूक समेवर भांडण गुंडाळून लिलया उतरून जातात. माझा तयांना नमस्कार आहे. मी असलं काहीही करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण बहुतेकदा मला आपण जिकडे जाणार आहोत, त्या वाटेवर कोणते भाग लागणार आहेत, हेही धड ठाऊक असत नाही. अशा वेळी उगाच रिक्षावाल्याला आव्हान कशाला द्या? निवांत बसून वारा खावा, पाणी प्यावं, रिक्षा थांबली की उतरून जावं. ते आपला विश्वासघात करत नाहीत.

विश्वासघातावरून आठवलं, अजून एक जमात असते. आपल्याला रिक्षावाला लांबच्या रस्त्याने नेऊन दोन-पाच रुपये अधिक उकळणार आहे, हा दृढ विश्वास असलेल्या लोकांची. त्यांना रिक्षात बसल्या बसल्या स्वस्थता म्हणून नसते. ते सतत संशयीपणे बाहेर डोकावून बघत असतात. आता रस्ता ठाऊक असताना तरी हे ठीक आहे. पण नवीन गावात गेल्यावर, रस्त्याची घंटा माहिती नसताना? कशाच्या जोरावर? त्या दोन-पाच रुपयांनी रिक्षावाला मलबार हिलला बंगला का उठवणार असतो? पण नाही. हे सीटच्या कडेवर कसेबसे बूड टेकलेले. नजर बाहेर. मनात संशय.

माझी याच्या बरोब्बर उलट अवस्था असते. अनेकदा तर नवीन गावातला पत्ता समजून घेण्याचे निष्फळ कष्ट सांडण्यापेक्षाही 'रिक्षावाल्याला काय सांगायचं?' एवढा एकच कळीचा प्रश्न विचारून घेतला, तरी आपल्या सर्व समस्या सुटतात, असं माझ्या लक्ष्यात आल्यामुळे रिक्षावाला माझा गुरू आहे, इतकं मी निश्चित केलेलं आहे.

काही लोकांना गावातल्या गावात गाडीतून हिंडताना आपण कुठे आहोत, आत्ता या क्षणी दंगल झाली आणि चालकाला कुणी भोसकला तर आपण आपल्या घरी कसे पोचणार, गाड्याच नसतील तर पायदळ वापरून जवळात जवळ रस्ता कोणता... याची गणितं मनातल्या मनात करण्याची सवय असते. असो बापडी. पण हे लोक आपले सहप्रवासी असायला लागले की पंचाईत येते. माझ्या एका ऑफीस कॅबमधला सहप्रवासी अशांपैकी होता. मी पिकप झाल्या झाल्या अत्यानंदानं हातातली कादंबरी उघडून त्यात गडप होण्यास आतुर असे, तर हा सत्तत मला 'बाहेर बघ. आपण कुठे आहोत, लक्ष्यात येतंय का?' असे आचरट प्रश्न विचारण्यात मग्न. माझा भयंकर चरफडाट होई. 'मला नाही रे बाबा ठाऊक. अमृतसरला नाहीयोत ना आपण? बास मग. पोचीन मी वेळ आली तर धड घरी.' अशी दुरुत्तरं देऊनही काही उपयोग होत नव्हता. शेवटी एकदा चालकाला फितूर करवून घेतला आणि त्याला घुमव घुमव घुमवला. चालकालाही रस्ता ठाऊक नसल्याची बतावणी, माझी नैसर्गिक माठावस्था आणि या इसमाचा उडालेला गोंधळ - यांमुळे त्याचा होता - नव्हता तो आत्मविश्वास गाळात गेला आणि त्यानं कॅब बदलून घेतली.

अलीकडे जीपीएस नावाची मजेशीर गोष्ट आलेली असल्यामुळे असल्या लोकांच्या माथेफिरूपणात भरच पडलेली आहे. 'वेळ पडली तर बघता येईल की नकाशा', असा दिलासा असल्यामुळे मी मात्र माझं दिशाअज्ञान आणि भयगंड झाकण्यासाठीचा उर्मटपणा साग्रसंगीत जपून आहे. माझ्या वाटेला जाऊ नका...  ;-)

4 comments:

  1. अगदीच छान! :-) मलाही रिक्षावाला लांबच्या रस्त्याने नेईल व चार रुपये जास्त लाटेल अशी भीती कायम वाटत असते...पण आत्ता जाणवलं..की इटस ओके......!!
    तुझ्या त्या मित्रा बद्दल सहानुभूती आहे. बिचारा...... तुला सजग करत असे.
    :-)
    बाय द वे, वाकड हून बावधन ला कसं जायचं..? :-)

    ReplyDelete
    Replies
    1. मित्राला न्यायला बोलवायचं.

      Delete
  2. हमखास रस्ता चुकतोच माझा आणी दाहक जाणीव होते की या गावात येउन आपल्याला 25 वर्षृषे झालीत

    ReplyDelete
    Replies
    1. हॅहॅहॅ, तुम्ही एकट्या/टे नाही!

      Delete