Sunday 6 May 2018

एकच अणकुचीदार दगड

एखादा अणकुचीदार दगड उचलून
तिरीमिरीत भिरकावीन तुझ्या कपाळावर
लालबुंद रक्ताची धार लागेल
चकित होऊन पाहत राहशील तू काही क्षण

ते क्षण कुलूपबंद करून ठेवीन
समजूतदार, अचल, स्थितप्रज्ञ भव्य कपाळ घेऊन
जेव्हा जेव्हा उभा ठाकशील,
त्या त्या सगळ्या वेळांना
मी त्या चकित भावांचा स्क्रीनशॉट ठेवणीतून काढून बघत राहीन

पुन्हा पुन्हा विचारशील एकच प्रश्न
मी उत्तरणारच नाही
हळूहळू तडे जातील तुझ्या बर्फगार सज्जनपणाला
तीक्ष्ण रागाच्या चमकत्या धारदार कळ्या उमलतील

हलकेच पुढे होऊन खुडून घेईन त्यांच्या पाकळ्या माझ्या ओठांनी
रागलोभप्रेमद्वेषमत्सरविरक्तीस्थितप्रज्ञाआसक्ती...
सगळ्यांच्या सीमा एकमेकींत मिसळत जातील

एकच एक उत्कट रसायन उकळू लागेल आपल्या दोघांच्याही प्रदेशांत
धडका घेईल आपल्या भिंतींवर
सगळे शहाणपणाचे बंधारे कोसळू लागतील कडकडा

महापूर येईल लालबुंद
वाहून जातील संभ्रमांची शहरंच्या शहरं
खळाळत्या पाण्याचा आवेग सगळं पोटात घेईल.

एकच अणकुचीदार दगड
बस.

6 comments: