Saturday, 7 April 2018

इंद्रियांची वेल पसरत पसरत

'हम ने देखी हैं इन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो'वर समाधान मानण्यात आपल्याला रस नाही. त्यात बेक्कार गुळमुळीतपणा आणि थोडा बेजबाबदारपणाही आहे हे आपल्याला पहिल्यापासून मान्यच. असं कसं 'नाम न दो'?

नाही आपण प्रपोज मारलेलं कधीच एकमेकांना. राखीबिखी तर नाहीच बांधणार बावळटासारखी. पण बोलता-बोलता कानातल्याशी अजाणता चाळा करणारी माझी बोटं बघून तुझी नजर जातेच खेचली माझ्या बोटांकडे - तुझ्याही नकळत. मी मोठ्या प्रयत्नानं खांद्यावरून मागे वळून पाहायचं टाळते. किंवा तुझा तो गेल्या शतकातला, धुऊन-धुऊन शेप हरवून बसलेला, विटका नि मऊसूत झालेला राखाडी कुर्ता घालून त्याच्या बाह्या पार कोपरापर्यंत दुमडून घेतोस, तेव्हा मी मवालीपणा करून शिट्टी मारत नाही इतकंच. पण एका कटाक्षात टिपलेले असतात मी तुझ्या हातावरचे कुरळे केस, आतल्या बाजूचं तुलनेनं कोवळं-रेखीव मनगट, कोपरावरची खळी आणि त्यापलीकडचा तुझ्यातला निवांत, सैलसर, गुणगुणता मूडही. बाप्यांना बायांचे फक्त आकार-उकारच पाहायचे असतात असं नाही आणि बायांना बाप्यांचे चीकबोन्स नि रुंद खांदे सोडून इतरही अनेक गोष्टी पाहण्यात कमालीचा रस असतो, हे एकमेकांचं शिक्षण आपणच नाही का केलेलं? बाई असल्यामुळे मला पुन्हा-पुन्हा नजर टाकावी लागत नाही इतकंच. तर्री कसं बुवा 'नाम न दो'?!

पण शरीर असल्याचं अमान्य न करणार्‍या माणसांना एकमेकांशी करार-मदार न करता घट्ट बांधणार्‍या नात्याला तूर्तास तरी मैत्री हेच एक नाव आपल्या भाषेत आहे, म्हणून आपण त्याबद्दल तह केलेला. आपल्याला एकमेकांबद्दल आकर्षण वाटून गेलं आहे, पुढेही अधूनमधून वाटेल आणि तरीही आपापल्या कारणांमुळे आपण त्या वाटांवर पाय टाकत नाही आहोत हे आपल्याला दोघांनाही स्वच्छ माहीत आहे, कबूल आहे, त्यात कोणतेही त्याग-अन्याय-एकतर्फी प्रेम इत्यादी मध्ययुगीन प्रकार नाहीत. या नात्याचं नाव 'मैत्री' असं सबगोलंकारी असलं, तरी त्यातले स-ग-ळे कंगोरे आपल्याला नीट ठाऊक आहेत. ही सऽगळी समजूत प्रस्थापित करण्यात आपण काही गंभीर भांडणं, काही जीवघेणे अबोले आणि काही सहनशील चर्चा खर्ची घातलेल्या नाहीत का?

इतक्या सार्‍या वर्षांच्या गाढ परिचयानंतरही अजूनही माझ्याबद्दलचा पालकभाव तुझ्यात कधी-कधी जागा होतोच. एखाद्या मोठ्या मीटिंगपूर्वी 'अमुक अमुक आगाऊपणा करू नकोस...' असा पोक्त सल्ला देऊन किंवा 'इतक्या रात्री जागी का आहेस? झोप बघू मुकाट.' असा दम भरून मग तू कसनुसा होतोस. आपण तद्दन पुरुषीपणा करून या बाईला पंखाखाली घेतलं की काय, आता ही कशी रिअ‍ॅक्ट होईल, त्यावरून भांडण होईल का, झालं तर कसं निस्तरायचं, चुकलं तर आपलं आहेच, पण काय चुकीचं सांगतोय का मी... असे डझनभर प्रश्न तुला एकसमयावच्छेदेकरून पडून जातात. मग सारवासारव. अशा वेळी तू जनरल पुरुषपणा करत नसून मैत्रीतून येणार्‍या काळजीमुळे असं सांगतो आहेस, त्यात थोडा पुरुष डोकावला तरी तो सहन केला पाहिजे, नि अखेर तू आहेस तर पुरुषच, ते थोडंच नाकारायचंय... हे माझं सहनशील स्वगत. मीही स्त्रीवादी व्यक्ती नंतर आणि माणूस आधी आहे, हे हजार वेळा बजावावं नाही का लागत माझं मलाच? कधी-कधी मलाही हवेसे होतातच आयते सल्ले, आधारबिधार आणि असल्या छत्रछायाही. पण तेव्हा नेमका तू 'बघ बुवा. मला हे असं-असं वाटतंय. तुझं तू ठरव.' असा सुटवंग पवित्रा घेतोस. कसली कांगावखोर चिडचिड होते माझी! आपल्या वागण्यातले असे अनेक लहानसहान कंगोरे आपापल्या बाई-बुवापणामुळे आल्यासारखे भासत असले, तरी त्यात काही अन्यायकारक नाही आणि शरमण्यासारखं तर नाहीच नाही हे स्वतःला सांगण्यात नि स्वीकारण्यात आपल्या दोघांचीही बरीच ताकद खर्ची पडली आहे, अजूनही पडते, हे आपल्या माणूसपणाचं लक्षण की सोईस्करपणाचं? कुणास ठाऊक.

आपल्याला एकमेकांचं कौतुक वाटतं. कधी अगदी रास्त आणि कधी अगदी अवाजवी कारणांनी.  "बावळट आहेस. माझ्यासमोर करतोस ते ठीके. जगात इतका बावळटपणा करून कसं चालेल? विकून खातील तुला.' हा माझा कायमचा त्रागा. तर 'प्लीजच! इतके मूर्ख न्यूनगंड कोण बाळगतं? No. Don’t even try fishing for compliments. मुद्द्याचं बोल.' हा तुझा सडेतोडपणा. एकमेकांचं कौतुक तरी थेट निरोगीपणे करावं? ते करायची पद्धत नाही आपल्यात. त्याऐवजी खवचटपणानं ओढलेले धारदार ताशेरे. जिभेची धार परजून घेण्यासाठी एकमेकांना दगडासारखं वापरणं. सतत छिद्रान्वेषीपणे दोष तेवढे दाखवणं. असे दोष दाखवणं हेच जणू जबाबदार कौतुकाचं अखेरचं लक्षण मानणं. कौतुक करताना मात्र हात राखून आडवळणानं बोललं... न बोललं! कधी घडलंच कौतुक न राहवून चुकूनमाकून एखाद्या निसटत्या क्षणी, तर आधी आश्चर्य आणि मग संकोचून विषय बदलणं. कशातून येतं हे? निव्वळ अतिसज्जनपणाचे गंड, की आपण आपल्या बाई-बाप्येपणाचे संकोच पुरते ओलांडलेलेच नाहीत अजून? तसं म्हणावं, तर 'माझी पाळी येणार आहे. मी जरा रडारड करीन. गप ऐकून घे' असं सांगायला मी अनमान करत नाही. वर 'च्यायला. हे बरंय तुझं. कपाळावर पाटी लावून फिरत जा आठवडाभर. सुरुंग टाळत फिरल्यासारखं दबकत-दबकत वावरायला तरी नको मला. फक्त चॉकलेटं नि मोरपिसं नि रेशमी शाली नि अत्तरदाण्या घेऊन फिरत जाईन तेवढे दिवस.' अशी तुझी आदळआपट. काय की...

पण न बोलता थोडे जास्त सहिष्णूपणे लाडही केले जातातच. मला दिवसभरात इतक्यांदा कुणी कंटाळा-कंटाळा म्हणून कुरकुरून दाखवलं, तर मी 'ए बाबा! घरी जाऊन पाट मांडून रड. माझा वेळ खाऊ नकोस.' असं म्हणून बिनदिक्कत फटकारून टाकीन. पण तुला मात्र 'बाबा रे, पुता रे...' असं गोंजारत, चुटके नि किस्से ऐकवत, गाणी नि कविता देत, टोकत आणि फटकारत तुझा मूड सुधारायला पाहणं. मलाही रडायला खांदा लागणार असतो पुढेमागे आणि तेव्हा काही प्रियकर नि प्रेयस्या नि सहकारी नि भावंडं येत नाहीत कामी, ही व्यावहारिक खातरीच तेवढी असते फक्त त्याच्या मुळाशी? पण असले विनिमयाचे व्यवहार वाजवून घ्यायला आपण काय लग्नाचे नवरा-बायको आहोत थोडेच?

आपण असलोच काही, तर एकदा नाकातोंडात पाणी जाऊन जीव खाऊन धडपडत वर आलेले, बुडतानाच्या भीषण तडफडीचं ज्ञान जागं राखलेले आणि इथे पोटाशी धरणारा कुणी एक असेलच असं नाही हे कडवट सत्य गिळावं लागलेले शहाणेसुरते जीव आहोत, बस.

अर्थात, इतके सोवळेही नव्हेच आपण! एकमेकांच्या तत्कालीन प्रेमपात्रांबद्दल आपले खास पवित्रे असतात. एक विशिष्ट संशयीपणा. आपल्या मित्राच्या वा मैत्रिणीच्या योग्यतेची आहे का ही व्यक्ती, असा संशय सतत पार्श्वभूमीवर जागा असलेला. पण तो दिसू द्यायचा नाही, हा बाणाही. आपल्या मित्रा-मैत्रिणीबद्दलचा दिसे-न-दिसेसा मालकी हक्क आणि त्या व्यक्तीबद्दल थोडा मत्सरही अर्थात. तो दिसू द्यायला मात्र आपली हरकत नसते! 'हेच मी म्हटलं की फिस्कारून दाखवतोस. ती बोलते ते बरं चालतंय, अं?' असे खवचट प्रश्नही. पण आपल्या वर्षानुवर्षांच्या मैत्रीपोटी त्या बिचार्‍या तिसर्‍या (!) व्यक्तीवर अन्याय होऊ नये, म्हणून जागेही असतो आपण कायम. त्यापायी एकमेकांना जाब विचारणं, पुन्हा-पुन्हा विचार करायला प्रवृत्त करणारे प्रश्न विचारणं, त्या-त्या माणसासोबत पुरेसा वेळ दवडायला ढकलणं आणि अखेरीस अती झालं तर मग 'काय त्याची इंटेग्रिटी? कमॉन. वेळेवर माती खाल्लीन नि गेला टिनपाटात!' अशी आडून समजावणी. अशा वेळी थोऽडा का होईना, जीव भांड्यात पडतो आपला? मी अनेकवार उकरून उकरून पाहिलंय. पण मला नाही वाटत...

आपलं हे असं, शक्य तितक्या तटस्थपणे विचार करणं तितकंसं पणाला लागलेलंच नसावं अजूनपर्यंत कधी, असा माझा सावध अंदाज. ते लागेलच आज ना उद्या. तेव्हा आपण एकमेकांना उरू का, उरू ना... असा प्रश्न पडतो. मग घाईघाईनं 'आपण असूच' असे साळसूद दिलासे दिले जातात एकमेकांना, स्वतःला. त्यांतला फोलपणा आणि त्यांची गरज दोन्ही कळतं आपल्याला, म्हणून बरंय...

आपल्या लिंगांचं भान म्यान न करता, एकमेकांना रक्तबंबाळ न करता, लयबद्ध खणखणाट करत पदन्यास करण्याचं किती जणांच्या नशिबात असतं खरोखर?

आपण बाई असलो, बुवा असलो, बाईच्या शरीरातला बुवा असलो, बुवाच्या शरीरातली बाई असलो, किंवा अजूनही अधलंमधलं काही असलो असतो; तरीही असेच असलो असतो आपण थोड्याफार तपशिलांच्या फरकासकट. तोवर तुझ्याकडे पाहणारी माझी नजर कुठल्या लिंगाची आहे, यानं खरंच काय फरक पडतो

***


'तिच्या नजरेतून तो' या सदरात लोकसत्तेच्या 'चतुरंग' पुरवणीमध्ये इथे पूर्वप्रकाशित

8 comments:

 1. Awesome. आज लोकसत्तामध्ये वाचलं आणि google केलं तेव्हा इथवर पोहोचलो.कसं लिहिता तुम्हीं लेखक लोकं हे सगळं. प्रचंड कौतुक वाटतं असं काही वाचलं की... तुमचंही आणि मराठीचं ही। निव्वळ सुरेख.

  ReplyDelete
 2. आरती प्रभूंच्या ज्या कवितेतून शीर्षक ढापलं आहे, ती 'आधार' कविता येणेप्रमाणे -

  जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
  पहाडामागे वारा अडत नाही.
  शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
  फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
  माणसाला उपकार आणि आणि त्याची
  निर्व्याज परतफेड करता येत आहे,
  एखाद्याची महायात्रा पाहून एखादा
  सहजच नमस्कार करतो आहे
  तोवर आम्हांला एकमेकांबरोबर
  अबोला धरण्याचा अधिकार नाही.
  आम्ही आमच्या पडजिभेइतकेच
  सर्वार्थांनी एकमेकांचे आहोत.
  कालाच प्रत्येक क्षण उष्टावतो
  तरी काल ताजा टवटवीत आहे.

  ईश्वराने दिलेले हे अंग प्रत्येक जण
  बारा दिवसांच्या अर्भकाइतक्याच
  हळुवारपणे सर्व तर्‍हांनी धूत राहतो,
  आपापल्या मापाचे पापपुण्य बेतून
  सगळे आयुष्य कारणी लावतो.
  म्हणून कधीतरीची प्रसन्नताही
  मनाची उन्हे करते आणि सारा ताप
  उन्हातला पाऊस होऊन टपटपतो.
  धरेच्या पोटात पाणी आहे,
  घशाखाली त्याची तहान आहे,
  माणसाच्या पोटात आनंद आहे
  म्हणूनच नेहमी भूक लागते,
  इंद्रियांची वेल पसरत पसरत
  झोपेचा गारेगार मोगरा फुलतो.

  शेतकरी पिकाला जपत असतो
  पहिलटकरणीसारखा, रात्रंदिवस
  कायावाचामनाचा पावसाळा करून
  मातीच्या कणाकणातून झिरपतो,
  अशा वेळी आकाशाच्या कोनन् कोनाचा
  स्पर्श त्याला झुळकाझुळकांतून होतो,
  हवेचेही कोनेकोपरे प्रत्यक्ष चाचपतो.
  दाण्यादाण्यातील धारोष्ण दुधाची जाग
  पाखरांच्या पिसापिसातून जाते,
  थव्याथव्यांनी आनंद उतरतो,
  शेतमळा डुलतो, वारा डुलतो,
  शेताचा पिका पिका दरवळ
  झुळझुळत्या झर्‍यासारखा
  शेतकर्‍याच्या मनातून वाहतो,
  सुईणीच्या मुखावरील कष्टासारखी
  रसरसून लखाखते कोयतीची धार.

  जीवनावर प्रेम करणारे सगळे जण
  एकमेकांना नमस्कार करीत करीत
  सुखदुःख वाटतात जिवाभावाने.
  सर्वांना पोटाशी धरून सर्वांवर
  स्वत:च्या आयुष्याची सावली धरतात,
  एखादा अनवाणी चालणारा विरक्‍त पाहून
  सांगतात : सर्वांच्या पायतळी जमीन आहे.
  एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्मृतीवर
  हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
  एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
  आणि मग कधीतरी झोपेतून उठून
  स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
  स्वत:लाच नमस्कार करतात.

  सखीने सजणाल्या दिलेल्या गुलाबाच्या
  गेंदाप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रत्येकानेच
  कधीतरी मन दिले - घेतलेले असते;
  सखी-सजणाच्या संकेतस्थलासारखेच
  हे आयुष्यही एकमेकांचेच आहे.

  या जगण्यात खोल बुडी मारून आलेला
  एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा
  आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
  दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे

  ReplyDelete
 3. Meghana hi Arti Prabhunchi kuthe ahe Kavita? Hi Vindanchi ahe na?

  ReplyDelete
  Replies
  1. नाही. पाहा : नक्षत्रांचे देणे.

   Delete
 4. Mast likhan ahe, kahi goshti dokyawarun gelya ajun ekda wachun baghto ksamajte ka...

  ReplyDelete