Tuesday 6 February 2018

पुस्तकी टिपणे : ०१

पुस्तके विकत घेऊन वाचण्याला एक अंगचेच मूल्य अलीकडे चिकटवले जाते आहे. मी त्याच्याशी अजिबात म्हणजे अजिबात सहमत नाही. थोडे मऊपणाने बोलायचे, तर तो उधळेपणा आणि थोडे कठोरपणे बोलायचे तर पैसे फेकून साहित्यप्रेम विकत घेण्याचा प्रकार वाटतो.

मी स्वतः खूप पुस्तके विकत घेतली, अजूनही घेते. पण 'स्वतःच्या मालकीच्याच' पुस्तकाने भान हरपायला लावले, असा काही अनुभव नाही. कितीतरी वेळा खूप आवडलेले पुस्तक लायब्रीतून तीन-तीन चार-चार वेळाही आणून वाचल्याची आठवण आहे. त्याची हाताळलेली बांधणी, कुणीकुणी केलेल्या खुणा या गोष्टी तर मनोरम असतातच. पण वाचकापासची मर्यादित जागा आणि पैसे नि पुस्तकांचा अमर्यादित पैस यांचे भान त्यात राखलेले असे. कितीतरी पुस्तके मित्रमैत्रिणींची असत, असतात. त्यांच्याकडे असली काय आणि आपल्याकडे असली काय, एकच की - असे म्हणून आपले स्वतःचे पुस्तक विकत घेणे उद्धटपणाचे आणि परके करणारे वाटून शरमून हात माग घेतल्याचीही मला आठवण आहे. लोकांना पुस्तके उधार देण्याच्या बाबतीतल्या खडूसपणाचे किस्से सांगण्याची एक टूम आपल्याकडे आहे. मीही तिच्या लाटेवर वाहवून माझ्या खडूसपणाला खतपाणी घालून घेतले आहेच, खोटे का बोला. पण माणसे आपलीशी झाली की आपल्याला आवडणाऱ्या पुस्तकांच्या शिफारशी त्यांना करणे, त्यांच्या मागे ती वाचण्यासाठी लकडे लावणे, त्यांची आवडती पुस्तके त्यांचेकडून उसनी आणणे, ती महिनोन् महिने ठेवून घेत वाचणे आणि त्या माणसांच्या आवडीनिवडींचा अंदाज करत बसणे, पुस्तके जोवर उभयपक्षी चिंध्या होत नाहीत वा गायब होत नाहीत तोवर सहनशीलपणा दाखवणे आणि दाखवायला भाग पाडणे, क्वचित कधी पुस्तक गेले तरी माणूस आहे की या दिलाशाने शांत राहणे... अशा अनेक लिळा कालपरत्वे अंगवळणी पडत गेल्या आहेत. विद्यार्थिदशेत तर पुस्तके इतक्या सहजी विकत घेणे शक्यच नसे. तो एक साजरा करण्याचा विशेष प्रसंगच. तेव्हाही पुस्तक आपल्या मालकीचे आहे की कसे, याला फार मूल्य नसून वाचनाच्या आवडीला आणि सवयीला ते होते. तेही मूल्य कितपत ग्राह्य मानावयाचे याबद्दल विचारविनिमय संभवतोच, पण काही हजार वर्षांच्या अनुभवाने फायदेशीर ठरलेली आणि कमालीची रंजक असलेली सवय इतक्या सहजी सोडणेही जडच जाईल.

पण विकतच घ्या? का बुवा? त्यातून बाजारालाच खतपाणी घालावयाचे ना? लेखक-प्रकाशकांनी जगावे कसे, असा गळा कृपया काढू नका. असली चिकटमूल्ये येण्यापूर्वीही लेखक-प्रकाशक-संपादक सगळे सुखनैव जगत होते, पेनेबिने न मोडता-लेखकीय आत्महत्या न करता-बैलबिल म्हणवून न घेता जगत होते, स्वाक्षऱ्या देत होते. त्यांनी लेखन हाच आपल्या उपजीविकेचा प्रथमपर्याय करावा आणि आपण तो पुस्तके विकत घेऊघेऊ चालवावा इतकाच पर्याय आहे काय? अशा कितीशा लेखकांना आपण वाचक म्हणून जगवू शकू अशी आपली समाज म्हणून वाचनभूक नि क्रयशक्ती आहे आणि अशा प्रकारच्या अवलंबित्वातून येणारा वाचकानुनयाचा धोका ओलांडूनही लेखक म्हणून आपले सत्त्व टिकवून ठेवण्याची किती लेखकांची क्षमता आहे? त्याहून महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत असेच घडावे ही काय जबरदस्ती आहे? 

माझा पुस्तके विकत घेण्याला विरोध नसून पुस्तके विकत घेण्याच्या तद्दन भौतिक कृतीला चिकटवलेल्या मूल्याला विरोध आहे हे चाणाक्ष वाचकांच्या तरी ध्यानात आले असेलच अशी आशा मनी धरून थांबते.

2 comments: