Thursday, 20 April 2017

मगल्

फिक्शन इतकी खरी, आतली, वारशाचा हिस्सा असलेली, आपलीच होऊन जाते; तेव्हाच तिचे सहज संदर्भ येत राहतात नव्या फिक्शनीत. हे असे संदर्भ येणं आणि त्याबद्दल यत्किंचितही स्पष्टीकरणं द्यावी न लागता त्यांच्या रूपकांमागचे अर्थ वाचकाला सहजी उलगडावेत, इतकं त्या संदर्भांचं समानधर्मी, सलग प्रदेश देणारं असणं मला कायम मोहक वाटत आलंय. मग ते तारा वनारसेंच्या 'श्यामिनी'मधलं सहज, गृहीत व्यक्तिचित्रण असो; वा बीबीसीच्या 'शरलॉक'मधले डॉयलच्या दिशेनं फेकलेले सलाम असोत. मी तशी पुरती आणि निःसंकोच फॅनफिक्शनीय आहेच. हा तशातलाच एक प्रयोग.
***

हो,
माझ्याआत एक अंधारा कोवळा कंद आहे
केवड्याचा.
तुला कसा सांगणार मी त्याचा ठावठिकाणा?
मलाही तो नीटसा ठाऊक नाही
रूम ऑफ रिक्वायरमेंटसारखा
अवचित कधीतरी तो दरवळून उठतो...
मग मी इथे नसतेच.
एकदम डिसॅपरेशनच.
परत भान येतं,
तेव्हा थकायला झालेलं असतं जाम,
पण आतले सगळेच्या सगळे खड्डे भरून
गोलगरगरीत तृप्त वाटत असतं
आणि तरी उदास हसरं रडू यावं तसं अतृप्तही.
तुझ्याकडेही असणार म्हणा तसला चाळा.
आहेच.
मला पक्कं ठाऊक असलेलं.
पण
आपल्या बॉगार्टांचे आकारही वेगळे आहेत
आणि आपल्या पॅट्रॉनसांचेही
हेही मला पक्कं ठाऊक असलेलं.
आपल्या घरांचे रंगही किती निराळे...
मी ओठ मिटून खांदे उडवून टाकते...
तर्री -
होत राहते आपली गाठभेट
पुन्हापुन्हा पुन्हापुन्हा
सातव्या मजल्यावरच्या व्हरांड्यात.
आणि चुकामूकही.
तेव्हा समजून सखोल हसतो आपण.
दोघेही.
तेव्हा कंदांच्या बहरलेल्या शेतांमध्ये उभं राहून
'देखा एक ख्वॉब तो ये सिलसिले हुए' असं बेशरम गात सुटलेली असतेच मी.
नाही येत तुला ऐकू?
नि मग पावलं ताल धरतात ती?!
तरी कशाला ही स्नेपीय सोंगं?
नि गंधांचे पत्ते विचारण्याचा बहाणा?
कमॉन, यू मगल्.
आन्सर् दी मॅजिक.

3 comments:

 1. बराच वेळ भवति न भवति करतेय. लिहावेत का खरंच शब्दार्थ? एकीकडे 'पण मग काय गंमत आहे?', तर एकीकडे 'अ‍ॅ? हे काय कोडं आहे का? ते सोडवल्यावरच खजिन्याचा मार्ग मोकळा करणारं. उगाच काहीतरी जीएसदृश उच्चभ्रू चाळे!' असे झोके. शेवटी विंदांना स्मरून लिहितेच आहे शब्दार्थ.

  रूम ऑफ रिक्वायरमेंट - ही हॅरीच्या शाळेतली एक जादुई खोली आहे. शाळेच्या सातव्या मजल्यावरच्या व्हरांड्यात गेलात, तर एरवी तिचा दरवाजाही सापडत नाही. त्याच्यावरून तेरा येरझारा घातल्या, तरी सुगावा लागत नाही. पण जर तुम्हांला खरीच तिची गरज असेल, तर तुमच्या गरजेच्या सगळ्या - सगळ्या गोष्टी आणि आकारही धारण करून ती बया तुम्हांला सापडते.

  डिसॅपरेशन - एका ठिकाणाहून गुप्त होणं. आणि दुसरीकडे प्रकट होणं म्हणजे अ‍ॅपरेशन.

  बॉगार्ट - आपल्या अंतर्मनातल्या भीतीनं धारण केलेलं दृश्यरूप. त्या रूपाकडे बघून घाबरलात, तर ते अजून अजून अकराळ-विक्राळ होतं. पण त्याला फिदिफिदि हसलात, की विरून जातं.

  पॅ(पे)ट्रॉ(ट्रो)नस - आपल्या मनातली लय भारी आठवण मनात घोळवत हातातली जादूची छडी रोखायची आणि म्हणायचं- एक्स्पेक्टो... पेट्रोनम! की तुमच्या स्वभावाशी मेळ खाऊन असलेल्या एखाद्या प्राण्याच्या रूपातलं एक गोजिरवाणा जिवंत ढग आकाराला येतो आणि तुमचं काही काळ रक्षण करतो.

  हाउसेस् उर्फ घरं - हॅरीच्या शाळेतले, चार ढोबळ प्रवृत्तिविशेषांनुसार विभागलेले चार गट. त्यांचे राखीव रंग असतात. (पुढे स्पॉयलर आहे. सबूर.)

  स्नेप - हे गोष्टीतलं एक पात्र. प्रेम मनात दडवून वरून खलनायकी रंग धारण करणारं.

  सरतेशेवटी - मगल् म्हणजे ज्याला जादू अवगत नाही, अवगत होणं शक्य नाही, किंवा निदान अजूनतरी ज्याच्यातल्या जादुई शक्तीनं डोकं वर काढलेलं नाही, असा मनुष्यप्राणी.

  ReplyDelete
 2. :) magic! In our life we work,we work hard,we achieve things, we love our parents, friends, partners,we meet new people,make new connections,we strive to become our best selves and feel proud,happy, satisfied.

  But rarely, very very rarely in life we feel that truly magical feeling.truly extra ordinarily magical!Starry and glittery!

  ReplyDelete