Monday, 6 March 2017

राहत्या शहराचे लागेबांधे ०३

भाग ०१ भाग ०२ 
***
आजोळ म्हणजे हमखास मऊ-रेखीव आणि रम्य असलंच पाहिजेत असा एक अलिखित नियम आहे.

मी मात्र निर्णयस्वातंत्र्य येताक्षणी ते गोंधळवणारे प्रवास हाणून पाडायला सुरुवात केली, त्यामागे फार काही मेलोड्रॅमेटिक दुःखी कारणं होती असं नव्हे. ज्या गोष्टींनी फार भारून जाण्याची, आठवणींचे कढ काढून सुखी शहारण्याची, त्याबद्दल स्वतःलाच धन्यधन्य समजण्याची पद्धत शहरी मराठीजनांत आहे; तसल्या गोष्टी मला कधी माझ्या वाटलेल्या नाहीत खर्‍या. निसर्गाबिसर्गाबद्दलचे अतिरेकी कढ तर मला अजूनही भिवया उंचावायला लावतात. डोंगरदर्‍यांमध्ये, रानावनात, माळा-दगडा-धोंड्यात, नदीनाल्यात काय तो निसर्ग ठासून भरलेला; आणि रेल्वेच्या धडधडाटात धावत सुटणार्‍या आणि नळावर कचाकचा भांडणार्‍या माणसांच्यात निसर्ग अजिबात नसतो काय? नसला तर नसू देत मग. गेला टिनपाटात.

निसर्गाचे हे असले माजवलेले देव्हारे तेव्हा मला चिमटीत पकडता येत नसत, पण दिडाव्या दिवसानंतर गावी मरणाचा कंटाळा मात्र यायला लागे. माझे आनंद, मजा, रोमहर्षक अनुभव आणि भित्या - सगळंच कमालीचं शहरी. चाळीत राहत असल्यामुळे शी करायला घराबाहेर जाण्याची सवय होती. त्यामुळे माझ्यावर तथाकथित उच्चभ्रू बालपणाचा ठप्पा मारणं कठीण आहे. पण तरीही रात्री ‘जायचं’ झालं की चक्क हातात कंदील किंवा चिमणी, भरलेलं टमरेल, मिनतवार्‍या करून मिळवलेली सोबत, मधल्या गचपण वाढलेल्या वाटेवरून संभाव्य जनावराला हाकलण्यासाठी काठी आपटत जाण्याची सक्ती आणि धडधडत्या छातीनं कसंबसं घाईनं परतणं - हे सगळंच मला प्रचंड अन्यायाचं वाटे. हे अगदीच शरीरधर्मसंबंधित आणि म्हणून क्षुद्र कारण मानलं, तरीही माझी नाळ त्या गावांशी कधी जुळली नाही हे खरंच. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर गावाहून घरी परतताना आपापल्या पालकांच्या तोंडाला भावंडांनी फेस आणल्याच्या वार्ता कानी येत, तेव्हाही मी काहीशी चकित आणि कोरी करकरीत असे. मला त्यातला खुमार कळतच नसे.

एकतर आम्ही बरेचदा गावी जात असू ते गणपतीला. तेव्हा एस्ट्यांना असलेली गर्दी, पावसाची पिरपिर, चार दिवसांत धोधो जाऊन आईबाबांची रिस्पेक्टिव माहेरं भोज्जा केल्यासारखी उरकून येण्यातली अपरिहार्यता मला समजत नसे; त्यात गणपती, मोदक, हरताळका आणि आरत्या या ओव्हररेटेड प्रकाराबद्दलची माझी एकूण अनास्था आणि ‘तिकडे काकू बाजूला बसते’ ही गूढ आणि संपूर्ण परकी माहिती हे दोन्ही असणारच. पण त्या मोठाल्या घरांचं स्थापत्यशास्त्रही असणार. बाबांच्या माहेरघरच्या एका सोप्यात बसून तिथेच सापडलेली एक शिरवळकरी भुताळी कादंबरी पुरी करताना मला भरलेला दचका एकट्या शिरवळकरांच्या वाटणीचा नाही, हे मला तेव्हाही स्पष्ट ठाऊक असलेलं. त्या घरातल्या सरपटत्या बोळकांडी, बाळंतिणीच्या अंधारखोल्या, माड्या आणि माड्यांखालचे अमीबासदृश काळोख, अखंड ओतला जाणारा पाऊस, येणारेजाणारे लहरी दिवे, पुढीलदारी माजलेलं बांबूचं बेट आणि मागच्या परसातली विहीर... अशा सगळ्या नेपथ्याचाच त्यात खरा मोठा वाटा होता असणार.

नाही म्हणायला क्वचित एखाद्दुसर्‍या अपरात्री अंगणात पहुडून पाहिलेलं, ओथंबून आलेलं, अविश्वसनीय, रत्नखचित आभाळ आठवतं. किरकिरत्या झोपाळ्यानं पुरवलेली झुलती साथ आठवते. रहाटावर पहिल्यांदा एकटीनं पाणी शेंदलं आणि डौलात पोहर्‍याला हात घालून न हिंदकळवता बादली काढून घेतली, तेव्हा ‘जमलं की आपल्याला!’ असा भरून आलेला ऊर आठवतो. पण त्यापाठोपाठ हमखास येणारा 'तुमच्या शहरात असतं का असलं अमुकतमुक?'छाप प्रश्नही आठवतो आणि माझी भिवई वर चढते. जर अशा गोष्टी‍ंशी जोडले गेलेले बरेवाईट लागेबांधेच खरे महत्त्वाचे असत असतील, तर मग खिडकीतून भोचकपणे डोकावून मला हमखास सोबत करणारा म्युन्सिपाल्टीचा सोडियम व्हेपरचा दिवा त्या तसल्या रत्नखचित इत्यादी आभाळापेक्षा का म्हणून कमी लेखायचा, ते मला कळत नाही. शिवाय हे सगळे अनुभव अखेर माझ्या कामी खरेखुरे येतात, ते पेंडशांच्या किंवा दांडेकरांच्या कादंबर्‍या त्रिमित करायलाच फक्त, हे मी काही केल्या विसरू शकत नाही. त्यापलीकडे या विश्वाचा माझ्या जगाशी सुतराम संबंध नाही.

करवंदीच्या जाळ्या, माळावरचे विटीदांडूचे खेळ, नदीला चढणारं पुराचं पाणी, दगड मारून खाल्लेल्या कैर्‍या किंवा जांभळं... हे सगळं ‘कम्पल्सरी लय भारी आणि रोमहर्षक’ म्हणून टिकमार्क करायचीच असेल, तर मी ती छातीठोकपणे आणि प्रामाणिकपणे करू शकीन इतका मला त्या-त्या गोष्टींचा पहिल्या धारेचा अनुभव आहे. पण उन्हाळी सुट्ट्यांमधल्या माझ्या रम्य आठवणी माझ्या शहरांमधल्या लायब्र्यांशी, नाक्यावर पाल ठोकणार्‍या कलिंगडवाल्याशी, कुकराच्या डब्यामधून जपून नि धावत आणलेल्या बर्फाच्या गोळ्यांशी, कुल्फीवाल्याच्या टोपलीतल्या अ‍ॅल्युमिनियमच्या कोनातल्या काडीवाल्या कुल्फ्यांशी, सुट्टीत लागणार्‍या बालनाट्याच्या प्रयोगांशी, आईबाबांनी काही वर्षं आंब्याचा धंदा केल्यामुळे घरादाराला वेढून घेणार्‍या हापूसच्या वासाशी आणि ‘मी एकटीनी रस्ता क्रॉस करून आले आई!’ या धन्यतेसकट आईसफॅक्टरीमधून आणलेल्या आठाण्याच्या बर्फाच्या ठोकळ्यांशी इमान राखून आहेत.

आणि इतर अनेक ‘आहे रे’ गंड बाळगणार्‍या माझ्या एरवीच्या संवेदनाखोर, शरमिंद्या मनाला याची यत्किंचितही खंत नाही. हो, आहेच मी शहरी. मग?

भाग ०४ । भाग ०५

4 comments:

 1. With having entirely opposite childhood and upbringing (like your father, probably?) I'm can't relate to this.
  But I think as some point in life (mine is 40s ;) ) you start admitting your feelings, unapologetically.

  And that's what I liked here!

  ReplyDelete
  Replies
  1. भावना पोहोचल्या! आभार. :)

   Delete
 2. मला आजोळ आवडत असे. वीज जाऊन-येऊन असणं, घर अंधारं-कोंदट असणं, घरात पाय खराब होईल अशी सारवलेली जमीन असणं अशा गोष्टींचा मला त्रास वाटतही नसे. चुलीवर तापवलेलं पाणी घेऊन 'लांबवर'च्या बाथरुमात आंघोळीला जाणं मी सहन करत असे.

  पण एकदा आईनं बोलून दाखवलं. "आजोबांकडे गेल्यावर तू कमी खातेस. म्हणजे जायला लागत नाही." मला १००% खात्री आहे की मी हे ठरवून करत नसे. आईनं सांगेस्तोवर हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं.

  गेली काही वर्षं बागकाम केल्यावर मला निसर्गाची अॅलर्जी नाही हे ही पटलेलं आहे. पण तीन वर्षं पार खेड्यात काढून मला खात्री पटलेली आहे, माझं खरं आयुष्य शहरातच. खेड्यात राहून डिप्रेशन येऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतात; शहर आणि शहरातल्या माणसांमुळे हे ओझं शहरात वाहावं लागत नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. ‍अ‍ॅलर्जी निसर्गाची वा माणसांची नव्हे, तर अमुक एक गोष्टच लय भारी या सक्तीची किंवा गैरसोयींनाच सर्वोच्च स्वर्गसुखं मानण्याच्या मानभावीपणाची. एरवी माझ्या कुंडीत निसर्ग उगवून येतो, तेव्हा मला लय भारी वाटतंच. पण 'मैँ भी हूँ नेचर' ही ठुसठुस शिल्लक राहते, तिचं काय करायचं?!
   बाकी डिप्रेशनबद्दल खरंय. मला तर शहरात रात्रीच्या कोणत्याही प्रहरी पूर्ण शांतता वा पूर्ण अंधार नसतोच, हेही फार आवडतं. हिंदू लोकांना पुनर्जन्माची कल्पना आश्वासक वाटते, त्याच धर्तीवर! ;-)

   Delete