Tuesday 14 March 2017

राहत्या शहराचे लागेबांधे ५

***

कधीकधी स्वप्नातून धसकून जाग येते आणि जाग आलीय की नाही याचाही धड पत्ता लागत नाही. अशा अर्धजागृतीच्या रेषेवर घुटमळत असताना, उठून शू करायला जायचं असतं खरंतर. पण नक्की कोणत्या दिशेनं गेल्यावर या वास्तूची बाथरूम सापडेल त्याबद्दलही संभ्रम. पोटात अनामिक भीती. पूर्ण अंधार नसतो तसा रात्रीच्या कोणत्याच प्रहरी. पण उत्तररात्रीच्या अर्धधूसर उजेडात सगळेच आकार ओळखीचे वाटत राहतात आणि जिवंतही. अशा वेळी उठून मी खिडकीपाशी येते आणि मनाचा हिय्या करून बाहेर डोकावून पाहते.

बाहेर सगळं स्तब्ध असतं. सोसायटीतल्या रात्रीच्या ट्यूबलाइट्सचा प्रकाश. एखाद्या उजाड वस्तीतली माणसं परागंदा होऊन नुसत्या भिंती उराव्यात आणि पौर्णिमेच्या रात्री दुधात न्हाऊन जिवंत व्हाव्यात, तसा नजारा. झाडंही रंगहीन, आत्ममग्न, स्वतःत मिटून गेलेली. त्या चित्रात मनुष्यप्राणी नसतो एकही. मध्यरात्रीच कर्तव्याची फेरी मारून वॉचमन आपल्या आडोशाला जाऊन निद्राधीन झालेला. कुत्रीही गायब. फारच नशीब जोरावर असेल, तर शहरी खिडकीतून दिसू शकेलसा चंद्राचा एखादा लखलखीत धारदार तुकडा. निरव शांतता. त्या निर्मनुष्य जगाकडे निर्हेतुक निरखून पाहताना धपापणारा ऊर हळूहळू सावकाश शांत होत जातो. पहिल्या मुसळधार पावसानंतर रोरावत ओढे होणारे शहरातले रस्ते रात्री पाऊस थांबल्यावर जसे नितळ काळेशार डांबरी होत, दिव्यांची सोनेरी तिरीप मिरवत, मऊ मऊ होतात; तसं काहीतरी माझ्याही आत होत जातं.

अशा वेळी मला हटकून परदेशस्थ मित्रांची आठवण येते. व्हॉट्सॅप आणि जीमेल आणि फेसबुकानं पूल बांधून दिलेल्या आपल्या जगात संपूर्ण रात्र अशी कधी नसतेच. आपल्या ऐन उत्तररात्री आपण ही निरव शांतता आणि एकान्त चघळत खिडकीच्या चौकटीला निवांत रेललेले असताना, जगाच्या पल्याड वसलेले आपले मित्र मात्र कुठल्यातरी भलत्याच प्रहरातलं ऊन झेलत कामाचे रगाडे काढत असतील, म्यानेजरशी भांडत-तंडत असतील, अभ्यासाच्या नोंदी करत असतील, पोरांना शाळेतून आणत असतील, झाडांना पाणी घालत असतील, केरवारे करत असतील, दिवेलागण निवळवत असतील, रांधत असतील, जेवतखात असतील, गाणी ऐकत असतील, घरी परतायचं खरंखोटं स्वप्न डोक्यात विणत असतील.... असं एक धावतं चित्र माझ्या डोळ्यासमोर साकारत जातं. खरंतर त्यांच्या आणि माझ्या मनातले राहत्या शहरांचे लागेबांधे निरनिराळे असतात. त्यांची लहानपणं निराळ्या गावांत उगवलेली. सांप्रतकालीन आयुष्य भलत्याच ठिकाणी रुजून फोफावलेलं. परतीच्या स्वप्नांचे पाय जमिनीवर असतातच असंही नव्हे. तरीही कधीतरी एकत्र घालवलेल्या काळाच्या तुकड्याचा आधार घेत - नाक्यावरचा चहावाला परवाच म्युन्सिपाल्टीवाल्यांनी उठवला.’, ‘मांडवीकरांच्या चाळीची रिडेवलपमेंट होत्ये वाटतं. तुझी मावशी नाही का राहत हल्ली तिथे?’, ‘जेएनयूचे राडेच चाल्लेत यार...’, ‘नाही ना, जामच पाऊस लागला अवेळी. यंदाच्या आंब्याचं काय खरं दिसत नाही’, ‘अमक्या नाटकाला गेलेवते, तुझी एक्स दिसली...’, ‘रेल्वेलायनीलगतचा कॅशिया बहरला बरं का यंदा!’, ‘त्यांचं नवीन पुस्तक आलं बाजारात. घेऊन ठेवायचंय?’… असे आणि याहून गंभीर अनेक बरेवाईट अपडेट्स पुरवत मी त्यांच्या मनातलं चित्र अपडेटेड ठेवून असते.

सद्यकालीन ग्लोबल मैत्र्यांमध्ये या असल्या उधार्‍यांना नक्की किती महत्त्व द्यायचं असतं? मला कळेनासं होतं. क्षणापूर्वी एकान्त भोगणारं माझं निवांतपण एकदम एकटेपणाचा अधांतरी आवंढा गिळतं.

असा ब्रह्ममुहूर्त साधूनच मोबाईलचा जुगनू चमकतो. पलीकडून कुणीतरी माझ्या दिशेनं सोडून दिलेला संभाषणाचा तुकडा पेटतो, चमचमतो, विझतो.

असतं काहीतरी साधंसंच. शिळोप्याचं. सुखदुःखाचं बोलणारं-विचारणारं. पण मी चटकन उत्तरत नाही.

मला मी परगावात काढलेले दिवस आठवतात. ताजवर आणि व्हीटी स्टेशनावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या बातम्या टीव्हीवर बघताना उडालेला माझा काळजीग्रस्त थरकाप आठवतो. मी गावात नसताना कशी काय तयार झाली सी-लिंक, असा झालेला चरफडाट आठवतो. पलीकडून दिसतंय तितकं भीषण नाहीय काही. उगाच तिथे बसून इथली चित्रं रंगवू नकोस. मूर्ख...अशी मित्रानं भरलेली तंबी आठवते. पुढ्यात मांडलेल्या दिवसामध्ये वावरणारी माझी मीच मला दिसते. हापिसात काम उरकत, चौथ्या सीटसाठी भांडत-करवादत, दिवस संपायची वाट पाहायला लावेल अशा दिवसातून वाट काढत असलेली. अशा बहुतेक वेळांना तग धरता येते ती एकाच आशेवर - कलत्या उन्हाच्या साथीनं घरी परतता येईल. पर्समधली किल्ली शोधायला पर्स उलथीपालथी करावी न लागता कुणीतरी दार उघडेल आणि आपण तंगड्या पसरून, सुखाचा सुस्कारा सोडत, पंख्याखाली बसू. हातात चहाचा आयता कप मिळेल. तो वाफाळता कप गालावर-कपाळावर टेकवत आपण निवांत होऊ...

परदेशातल्या मित्रांसाठी आपण असाच इमॅजिनरी चहाचा कप झालो आहोत, असं काहीतरी मजेशीर मनात दाटून येतं. एखादा चुकार कावळा कावकावतो. दूधवाल्याच्या सायकलची कॅरियर खडखडाट करते. मग मी गजर अर्ध्या तासानं पुढे सरकवते आणि निवांत ताणून देते... 

***

ओव्हर अ‍ॅन्ड आउट. ;-)

1 comment: