पुस्तक

अगोचरही वास्तवच असतं

15:32:00

वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा
जयंत पवार
लोकवाङ्मय गृह प्रकाशन


आपल्याला ज्याचं लेखन स्पर्शून गेलं आहे, अशा लेखकाशी बोलायची संधी मिळाली की एक प्रश्न मला कायम सतावतो. इतकं भारी लिहिणार्या माणसाशी, आपण बावळटासारखं जाऊन बोलायचं काय? तर तुम्ही कित्ती भारी लिहिता!' हे? छे छे!

पण जयंत पवारांना भेटायची संधी मिळाली, तर असा प्रश्न मला कदापि पडणार नाही. तुमच्या कथेतल्या काका मी येऊ तुमच्याबरोबर?” या डिग्याच्या प्रश्नावर बाबी क्षणभर घुटमळून का होईना, पण चलम्हणाला, याबद्दल मी तुमची कायमची ऋणाईत आहे, हे मला त्यांना सांगायचंच आहे.

आय नो, धिस इज बिट क्रिप्टिक. नीट पहिल्यापासून सांगते. ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा' ही जयंत पवारांच्या कथासंग्रहातली कथा. मुंबईमधली एक गिरणीकामगारी चाळ. तिथे येऊ घातलेला टॉवर. त्या पार्श्वभूमीवरचं तिथलं निम्नमध्यमवर्गीय जगणं आणि भ्रष्ट महत्त्वाकांक्षी जगात त्याची क्रमाक्रमानं, धीम्या गतीनं पण निश्चितपणे, होत गेलेली पडझड, वाताहात, उद्ध्वस्त होत जाणं. त्या चाळीतल्या पौगंडावस्थेतल्या एका मुलाचं - डिग्याचं - सर्वार्थानं अनाथ, बेघर, नामशेष होत जाणं या कथेत लेखक चितारतो. कथेच्या शेवटाकडे परिस्थितीमुळे भिंतीपाशी चिरडत चाललेल्या क्षुद्र, असहाय प्राण्यासारखं त्या मुलाचं कःपदार्थ अस्तित्व बघून मी खचत गेले. त्या मुलानं कथेच्या शेवटी, मरण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न करावा तसं, चाळ सोडून निघालेल्या, एका पिचलेल्या सहृदय शेजार्याला विचारलं, “काका, मी येऊ तुमच्याबरोबर?”

त्या प्रश्नात काय नव्हतं? बुडत्या माणसानं जिवाच्या आकांतानं धरावा, तसा तो दुसर्या माणसाचा दिसेल तो अवयव होता. प्रश्न विचारणारी व्यक्ती मूल असल्यामुळे, त्यात परिस्थितीच्या संभाव्य क्रौर्याचं, अटळपणाचं भान नव्हतंच. अपरंपार निरागसपणा होता, कोवळी आशा होती. महाशहरातल्या निर्दय व्यवस्थेनं आणि क्रूर समाजानं पिचवलेलं आयुष्य जगण्याजोगं करण्याचा त्या मुलाचा तो अखेरचा प्रयत्न होता. आणि म्हणूनच तो प्रश्न अजूनच धोकादायक, दबा धरून बसलेल्या श्वापदासारखा होता. तो वाचला आणि मी भिऊन पुस्तक मिटलं. जर बाबी नाही म्हणाला असता, तर त्याची चूक नसतीच. पण मग मी पुढे वाचू शकले नसते. वास्तविक कोणत्याही तथाकथित वास्तववादी लेखकानं डिग्याच्या आशेला असं कुरवाळलं नसतं. त्यानं डिग्याला निर्दय वास्तवात मरायला सोडून दिलं असतं आणि वास्तव हे असंच असतंअसा कोरडा खुलासाही केला असता. पण बाबीनं मात्र तसं केलं नाही. माणसानं माणसाला हात दिला आणि ती कथा लेखकाच्या हातून सुटून कुठल्याकुठे निघून गेली.

हे या संग्रहातल्या सगळ्याच कथांबाबत होतं. विश्वीकरणाच्या काळातली, अंदाधुंद बदलती, निसर्गापासून आणि पारंपरिक समाजरचनांपासून फटकून निघालेली, वेगवान, गुंतागुंतीची, कमालीची निर्दय अशी परिस्थिती त्यांत आहे. या परिस्थितीत, ज्यांना आवाज नाकारला गेला आहे, अशी व्याकुळ माणसं आहेत. या मुक्या, चिरडल्या जाणार्‍या माणसांच्या गोष्टी पवार सांगतात.

अशा कथांमधल्या पात्रांना सहसा वास्तववादाच्या नावाखाली अटळ निराशा झेलावी लागते. पण पवार मात्र हा रुळलेला वास्तववाद नाकारतात. दोन प्रक्रारे. एक म्हणजे - पात्रांसाठी त्यांच्या मनात करुणा आहे. त्यामुळे जग हे असंच असतं' असा कोरडा खुलासा करता ते सहृदयपणे आशेचं, माणूसपणाचं, चांगुलपणाचं, कुठेकुठे अगदी तोकड्या प्रमाणात पण निःसंशय उरलेलं, झगझगीत जिवंतपण चितारत राहतात. प्रसंगी लेखकाचं स्वातंत्र्य पणाला लावून, वास्तवाला मुरड घालत. त्यातून उमलणारे शेवट करायला ते जराही कचरत नाहीत. किंबहुना हे असे, चकित करणारे, खुल्या शक्यता घेऊन येणारे शेवट हे या कथांचं फार मोठं बलस्थान आहे. दुसरा प्रकार म्हणजे, या सगळ्या कथांमध्ये वापरलेला अद्भुताचा पदर. त्यांत भुतंखेतं आहेत. काही वास्तवाच्या पल्याडची जगं आहेत. तर्काच्या पल्याडचं अद्भुत आहे. दिव्य दृष्टीनं माणसांचं जग निर्विकारपणे निरखणारे देव आहेत.

खरंतर हे तंत्र. पण हे तंत्र गोष्टीच्या आतल्या स्तराला असं काही लगडून येतं, की ते वेगळं काढणं अशक्यच आहे. ते तंत्र तंत्र म्हणून उरतच नाही, ते गोष्टीचा भागच होतं. अतिवास्तवाचं अस्तर लेऊन आलेला वास्तवाहून वास्तव असा भाग.

बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य' या कथेत एका गरीब सुताराचा गाणारा, प्रामाणिक पोर आहे. त्याच्यावर जग अन्याय करतं आणि त्याचा निषेध म्हणून तो घरातल्या लहानशा माळ्यावर आपलं आयुष्य गोठवून घेतो. त्याच्या कथेचा उद्मेखून अलौकिक, भव्यदिव्य आणि सकारात्मक शेवट करताना पवार आपली भूमिका जोरकसपणे स्पष्ट करतात. -

‘...पण वास्तव दाखवून सुन्नपणाशिवाय अधिक काही साधणार नाही. काळाच्या मोठ्या टापूवर परिणाम करत काही मूल्यं रुजवायची असली तर कथाकार म्हणून मला मिथकंच रचली पाहिजेत...'

याचा अर्थ ते वास्तवापासून फारकत घेत कचकड्याच्या गोड गोष्टी सांगतात, असा मात्र नव्हे. कारण कथेची शेवटची ओळ कथाकाराच्या पुढ्यातला पेच मांडणारी आहे. -

बाबलचं मिथक माझ्या हाताशी आहे, पण ते कसं विश्वासार्ह बनवायचं हा माझ्यापुढचा पेच आहे.'

आजच्या व्यामिश्र-निराश करणार्या जगात कथाकारानं त्याच्या पात्रांना न्याय द्यावा तरी कसा, या पेचासह पवार आपल्या कथा घेऊन उभे ठाकतात आणि अद्भुताचा पदर विणत आपल्या कथा रचत जातात. ‘सर निघाले सप्तपाताळाकडे....' या त्यांच्या कथेत एक प्रथितयश साहित्यिक आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या वृद्ध साहित्यिकाच्या आजूबाजूचं जग पूर्णपणे बदललं आहे. पोस्टखात्याचा ढासळलेला कारभार हे बदलत्या जगाचं निव्वळ प्रतीक. पोस्टाच्या ढिसाळ कारभाराचा सोक्षमोक्ष लावायला निघालेले सर पोस्टात जातात आणि तिथल्या साचून राहिलेल्या पत्रांच्या वाटेनं अधिकाधिक खोल उतरत जातात. कुठेच पोहोचू शकलेल्या पत्रांचे ढीगच्या ढीग, दालनंच्या दालनं, मजलेच्या मजले तिथे आहेत. त्या मजकुरात हरवून जाताना सरांना विश्वरूपदर्शन होतं. कधीही आवाज मिळालेल्या, मुक्यानं जगत राहिलेल्या माणसांचा हा नरक निरखताना सर मुक्त होतात.  ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य' ही गोष्ट काहीशी कमी धारदार, बेतीव वाटली. तरीही तिची अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेच. रहस्यकथेमध्ये कायम दुर्लक्षित राहिलेली, ग्लॅमरस नसलेली, गरीब पात्रं आणि दस्तुरखुद्द रहस्यकथालेखक हाही एक दुर्लक्षित मानला गेलेला साहित्यिक - अशी गुंफण करत ही गोष्ट पुढे सरकते. उत्तर नसलेल्या प्रश्नाच्या कड्यावरून वाचकाला लोटून देते. ‘तुझीच सेवा करू काय जाणे' ही कथा म्हणजे मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवांच्या भव्यदिव्य पडद्यामागचा काळाकुट्ट अंधार आहे. गिरणीकामगारांचं बंद पडत गेलेलं आयुष्य, सार्वजनिक गणेशोत्सवांच्या आर्थिक संधीतून त्यांनी आणि त्यांच्या बेकार मुलाबाळांनी शोधलेले कायदेशीर-बेकायदेशीर आधार, त्यात कुचमत-खितपत गेलेली-सडून सत्यानाश झालेली अनेक आयुष्यं आणि तरीही श्रद्धेचा बेगडी चकचकीत मुलामा मात्र तसाच्या तसा अभंग. साक्षात गणरायाच्या तोंडून वदवलेली ही गोष्ट वाचताना सुन्न व्हायला होतं.

वस्तूंशिवाय निरर्थक असलेल्या, चंगळवादी, आधुनिक आयुष्यातली शिवराळ आणि इंग्रजीप्रभावित जिवंत भाषा आणि भारतीय पुराणकथांची आठवण करून देणारी काहीशी पारंपरिक वळणाची देशी भाषा या दोघी अनेकदा या कथांमध्ये एकमेकींना छेद देतात आणि वाचक भंजाळून जातो, विचारात पडतो, वास्तवाच्या संमिश्र पोतामुळे चरकल्यासारखा होतो.

तुझीच सेवा करू काय जाणे'मधील ही काही वाक्ये वानगीदाखल पाहा -

‘... हा दाखला गणेश पुराणाच्या प्रथमाध्यायात मौजूद आहे. अगदे तसेच वर्तन पिरामल यांच्या मुलींचे राहिले. पित्याच्या कोट्यवधींच्या संपत्तीच्या लालसेने त्या भैसाटल्या त्यांनी पित्यास त्राही भगवान केले. मिल चालवण्यास कोणीही बंधू वारस नसल्यामुळे ही मालमत्ता बाजारभावाने विकून तिन्ही मुलींत धनाचे समान वाटप करावे म्हणून त्या हटून बसल्या. त्यांच्या सततच्या तगाद्याने बापाचे डोके मॅडमॅडसे झाले...'

अगोचरही वास्तवच असतं' अशा निःसंदिग्ध प्रतिपादनासह येणार्या, वास्तवाची कोंडी फोडत, वाचकाचं डोके मॅडमॅडसे' करणार्या या कथा - कोणत्याही पट्टीच्या वाचकाने वाचल्याच पाहिजेत, अशा.
***

अनुभव, मार्च २०१७मध्ये पूर्वप्रकाशित
मुखपृष्ठ जालावरून साभार

काहीबाही

राहत्या शहराचे लागेबांधे ५

15:06:00

***

कधीकधी स्वप्नातून धसकून जाग येते आणि जाग आलीय की नाही याचाही धड पत्ता लागत नाही. अशा अर्धजागृतीच्या रेषेवर घुटमळत असताना, उठून शू करायला जायचं असतं खरंतर. पण नक्की कोणत्या दिशेनं गेल्यावर या वास्तूची बाथरूम सापडेल त्याबद्दलही संभ्रम. पोटात अनामिक भीती. पूर्ण अंधार नसतो तसा रात्रीच्या कोणत्याच प्रहरी. पण उत्तररात्रीच्या अर्धधूसर उजेडात सगळेच आकार ओळखीचे वाटत राहतात आणि जिवंतही. अशा वेळी उठून मी खिडकीपाशी येते आणि मनाचा हिय्या करून बाहेर डोकावून पाहते.

बाहेर सगळं स्तब्ध असतं. सोसायटीतल्या रात्रीच्या ट्यूबलाइट्सचा प्रकाश. एखाद्या उजाड वस्तीतली माणसं परागंदा होऊन नुसत्या भिंती उराव्यात आणि पौर्णिमेच्या रात्री दुधात न्हाऊन जिवंत व्हाव्यात, तसा नजारा. झाडंही रंगहीन, आत्ममग्न, स्वतःत मिटून गेलेली. त्या चित्रात मनुष्यप्राणी नसतो एकही. मध्यरात्रीच कर्तव्याची फेरी मारून वॉचमन आपल्या आडोशाला जाऊन निद्राधीन झालेला. कुत्रीही गायब. फारच नशीब जोरावर असेल, तर शहरी खिडकीतून दिसू शकेलसा चंद्राचा एखादा लखलखीत धारदार तुकडा. निरव शांतता. त्या निर्मनुष्य जगाकडे निर्हेतुक निरखून पाहताना धपापणारा ऊर हळूहळू सावकाश शांत होत जातो. पहिल्या मुसळधार पावसानंतर रोरावत ओढे होणारे शहरातले रस्ते रात्री पाऊस थांबल्यावर जसे नितळ काळेशार डांबरी होत, दिव्यांची सोनेरी तिरीप मिरवत, मऊ मऊ होतात; तसं काहीतरी माझ्याही आत होत जातं.

अशा वेळी मला हटकून परदेशस्थ मित्रांची आठवण येते. व्हॉट्सॅप आणि जीमेल आणि फेसबुकानं पूल बांधून दिलेल्या आपल्या जगात संपूर्ण रात्र अशी कधी नसतेच. आपल्या ऐन उत्तररात्री आपण ही निरव शांतता आणि एकान्त चघळत खिडकीच्या चौकटीला निवांत रेललेले असताना, जगाच्या पल्याड वसलेले आपले मित्र मात्र कुठल्यातरी भलत्याच प्रहरातलं ऊन झेलत कामाचे रगाडे काढत असतील, म्यानेजरशी भांडत-तंडत असतील, अभ्यासाच्या नोंदी करत असतील, पोरांना शाळेतून आणत असतील, झाडांना पाणी घालत असतील, केरवारे करत असतील, दिवेलागण निवळवत असतील, रांधत असतील, जेवतखात असतील, गाणी ऐकत असतील, घरी परतायचं खरंखोटं स्वप्न डोक्यात विणत असतील.... असं एक धावतं चित्र माझ्या डोळ्यासमोर साकारत जातं. खरंतर त्यांच्या आणि माझ्या मनातले राहत्या शहरांचे लागेबांधे निरनिराळे असतात. त्यांची लहानपणं निराळ्या गावांत उगवलेली. सांप्रतकालीन आयुष्य भलत्याच ठिकाणी रुजून फोफावलेलं. परतीच्या स्वप्नांचे पाय जमिनीवर असतातच असंही नव्हे. तरीही कधीतरी एकत्र घालवलेल्या काळाच्या तुकड्याचा आधार घेत - नाक्यावरचा चहावाला परवाच म्युन्सिपाल्टीवाल्यांनी उठवला.’, ‘मांडवीकरांच्या चाळीची रिडेवलपमेंट होत्ये वाटतं. तुझी मावशी नाही का राहत हल्ली तिथे?’, ‘जेएनयूचे राडेच चाल्लेत यार...’, ‘नाही ना, जामच पाऊस लागला अवेळी. यंदाच्या आंब्याचं काय खरं दिसत नाही’, ‘अमक्या नाटकाला गेलेवते, तुझी एक्स दिसली...’, ‘रेल्वेलायनीलगतचा कॅशिया बहरला बरं का यंदा!’, ‘त्यांचं नवीन पुस्तक आलं बाजारात. घेऊन ठेवायचंय?’… असे आणि याहून गंभीर अनेक बरेवाईट अपडेट्स पुरवत मी त्यांच्या मनातलं चित्र अपडेटेड ठेवून असते.

सद्यकालीन ग्लोबल मैत्र्यांमध्ये या असल्या उधार्‍यांना नक्की किती महत्त्व द्यायचं असतं? मला कळेनासं होतं. क्षणापूर्वी एकान्त भोगणारं माझं निवांतपण एकदम एकटेपणाचा अधांतरी आवंढा गिळतं.

असा ब्रह्ममुहूर्त साधूनच मोबाईलचा जुगनू चमकतो. पलीकडून कुणीतरी माझ्या दिशेनं सोडून दिलेला संभाषणाचा तुकडा पेटतो, चमचमतो, विझतो.

असतं काहीतरी साधंसंच. शिळोप्याचं. सुखदुःखाचं बोलणारं-विचारणारं. पण मी चटकन उत्तरत नाही.

मला मी परगावात काढलेले दिवस आठवतात. ताजवर आणि व्हीटी स्टेशनावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या बातम्या टीव्हीवर बघताना उडालेला माझा काळजीग्रस्त थरकाप आठवतो. मी गावात नसताना कशी काय तयार झाली सी-लिंक, असा झालेला चरफडाट आठवतो. पलीकडून दिसतंय तितकं भीषण नाहीय काही. उगाच तिथे बसून इथली चित्रं रंगवू नकोस. मूर्ख...अशी मित्रानं भरलेली तंबी आठवते. पुढ्यात मांडलेल्या दिवसामध्ये वावरणारी माझी मीच मला दिसते. हापिसात काम उरकत, चौथ्या सीटसाठी भांडत-करवादत, दिवस संपायची वाट पाहायला लावेल अशा दिवसातून वाट काढत असलेली. अशा बहुतेक वेळांना तग धरता येते ती एकाच आशेवर - कलत्या उन्हाच्या साथीनं घरी परतता येईल. पर्समधली किल्ली शोधायला पर्स उलथीपालथी करावी न लागता कुणीतरी दार उघडेल आणि आपण तंगड्या पसरून, सुखाचा सुस्कारा सोडत, पंख्याखाली बसू. हातात चहाचा आयता कप मिळेल. तो वाफाळता कप गालावर-कपाळावर टेकवत आपण निवांत होऊ...

परदेशातल्या मित्रांसाठी आपण असाच इमॅजिनरी चहाचा कप झालो आहोत, असं काहीतरी मजेशीर मनात दाटून येतं. एखादा चुकार कावळा कावकावतो. दूधवाल्याच्या सायकलची कॅरियर खडखडाट करते. मग मी गजर अर्ध्या तासानं पुढे सरकवते आणि निवांत ताणून देते... 

***

ओव्हर अ‍ॅन्ड आउट. ;-)

काहीबाही

राहत्या शहराचे लागेबांधे ०४

12:15:00

***

माझा एक म्यानेजर मित्र आहे. पहिल्या नोकरीच्या काळात सगळीकडूनच झिलई चढायची असतानाच्या आणि अंगच्या रानवट उद्धटपणाची कोवळीकही ओसरलेली नसतानाच्या दिवसांपासूनचा. 

आमच्यात चकमकी झडत बर्‍याच. पण गप्पाही होत कसल्याही आडव्यातिडव्या, तुरळक आणि घनदाट. गरुडपुराण ते झेन तत्त्वज्ञान आणि फिल्म फेस्टिवल ते जर्मन व्याकरण - अशा रानोमाळ. तेव्हा मित्र म्हणजे एकमेकांना 'भ'कारी हाका घालणारे आणि रात्रीबेरात्री जागवताना साथ देणारे समवयस्क प्राणी इतकीच संकुचित व्याख्या असत असे. म्यानेजरला माझा मित्रबित्र म्हटलं असतं कुणी, तर मी फिदिफिदि हसले असते म्हणणार्‍याच्या तोंडावर; इतकं अंतर आमच्यात. वयाचं, समजुतीचं, हुद्द्याचं, पगाराचं, शिक्षणाचं... पण एक दिवस तो काहीच जाहीर न करता दांडी मारून माहेरी म्हणून गेला आणि उगवलाच नाही. मग नव्या प्रोजेक्टाच्या कामी बदली करून गेला, तो गेलाच. पहिले एखाद-दोन दिवस 'बाई नाही आल्यात' म्हटल्यावर जसा दंगा वर्गात होतो, तसल्या हुल्लडबाजीत सरले. पण नंतर मला एकदम करमेचना, का करमेना हेही कळेना. त्यातल्याच एका दुपारी कितव्यातरी चहाच्या कपावर कुणीच टोकलं नाही, तेव्हा मला एकदम साक्षात्कार झाला आमच्यातल्या मैत्रीचा. एका सहकार्‍याची उधार सिगारेट मुद्दामहून डिवचल्यासारखी शिलगावत मी म्यानेजर मित्राच्या रिकाम्या खुर्चीला नव्यानं हॅल्लो केलं. 

अगदी तस्संच हॅल्लो मला त्या गावानंही करायला लावलं.

सुरुवातीला मी धुसफुस केली बरीच. इथे रहदारीच फार. रस्तेच चिंचोळे. लोकच गावठी. उकाडा किती. भाडी किती फुकटच्या फाकट. घामच कसा येत नाही इथे. एक ना दोन. त्यात भाषा परकी. आपल्या भाषेतून उसवून अशा भलत्याच भाषेत येऊन पडायची माझी पहिलीच खेप होती ती. नुसतीच चिडचिड चिडचिड होई. तिथल्या डांबरी सडकांवर पडणारे फुलांचे राजस सडे बघून आणि तिथल्या चिमुकल्या बागा मनःपूत भोगूनही माझी नजर मृदावत कशी ती नसे. "या गावठाण गावाला करायचंय काय इतकं सौंदर्य... आमच्याकडे..."छाप शेर्‍यांच्या अनेकानेक आवृत्त्या मनात फणकारत राहत. त्यातच नवीन घर लावायचा लबेदा. घरं पाहा. घासाघिशी करा. तारखांचे हिशेब घाला. पागड्या जमवा. रूममेट या नवीनच नातेवाइकाशी जमवून घ्यायला शिका. तुटपुंज्या लायब्र्यांतून मिळणार्‍या पुस्तकांवर भागवून घ्या. घरच्या आणि घरच्या रस्त्यांवरच्या जेवणाच्या आठवणीचे आवंढे गिळा... 

आपल्याला स्वैपाक नामक प्रकार मनापासून आवडतो हा शोध लागायलाही बराच वेळ गेला त्या सगळ्या धामधुमीत. सांडलवंड, उताऊत, जाळपोळ, करपवाकरपवी, नासाडी - अर्थात चिकार. पण तिथल्या भांड्याकुंड्यांच्या दुकानातून हिंडून, परक्या भाषेत लंगडी घालत, मनासारख्या झाकण्या आणि पातेल्या आणि सांडश्या आणि सुर्‍या मिळवायला बेहद्द मजा आली. मधापासून खडीसाखरेपर्यंत आणि पापडामिरगुंडापासून लिंबाच्या लोणच्यापर्यंत साग्रसंगीत भातुकली मांडल्याचं मी खरं नोंदलं, ते घरच्या मंडळींनी केलेल्या भोचक हलवाहलवीनंतर माझ्या कपाळी आठी उमटली तेव्हा.

मग एकदा गॅसचं बटण बंद करायला विसरून गेल्यावरही घरानं जाळलंबिळलं नाही.

एकदा फिरायला जाण्याच्या धांदलीत घराचं दार सताड उघडं टाकून गेल्यावरही कुणी काही चोरलंबिरलं नाही.

एकदा गल्लीच्या तोंडाशी हापिसातला एक सहकारी भेटला आणि मग तिथेच उभं राहून आम्ही पंधरावीस मिनिटं इंग्रजीतून गप्पाष्टक रंगवलं, तेव्हा मला ‘इकडे ओळखीचे लोकपण भेटायला लागले वाटेत गप्पा करणारे, अं?’ असं वाटून चपापायला झालं.

एकदा गावाच्या पार पलीकडच्या टोकाला जाऊन एका नाटकाचा प्रयोग पाहिला आणि दस्तुरखुद्द नसीरला स्वागताला उभं पाहून अपरात्री कधीतरी तरंगत घरी आले, तेव्हा गल्लीच्या तोंडाशी असलेल्या रातराणीकडे लक्ष्य गेलं...

एरवी दारासमोर जुईचा वेल, फाटकातून बाहेर पडताना टपोरलेला सोनचाफा, चार पावलं चालून गेल्यावर नागचाफ्याच्या पाकळ्या अंथरलेल्या, मग सोनटक्क्याचं रान, आणि गल्लीच्या तोंडाशी चक्क प्राजक्त आणि रातराणी  असल्या श्रीमंतीनं माझ्या मत्सरी मनाचा जळफळाटच व्हायचा वास्तविक. तो झाला नाही, तेव्हाच माझ्या लक्ष्यात यायला हवं होतं. पण तिथल्या चुरचुरीत हवेत गच्चीवरून उन्हाळलेल्या वासाचे कपडे गोळा करून आणताना; भाज्याफुलांची दक्षिणपथी नावं आत्मसात करताना; शेजारचा खडूस चश्मेवालां आठेक दिवस गायब होऊन मग एकदम नववधूसकट माणसाळून परतला तेव्हा त्यांना चहाला बोलावताना; रस्त्यावरचे हे एवढाले दैत्याकार मारुतीचे पुतळे बघूनही न दचकता सवयीनं पुढे जाताना; ‘अगदी ‘पृथ्वी’ची आठवण येते किनाई?’ हे म्हणायला विसरून जात रिक्षावाल्यांनी बांधलेल्या थेटरात कितवंतरी नाटक पाहताना… आणि ‘आता घरी जायचं!’ या तहानेनिशी आनंदून मायभाषेत परततानाही -

नाही लक्ष्यात आलं खरं.

एका मैत्रिणीला भेटायला म्हणून त्या गावी पुन्हा फिरकले आणि सहज म्हणून त्या गल्लीत शिरले. एकदम भॉ करून हक्कानं दचकवावं कुणी आणि मग मिठी घालावी, तसं त्या गल्लीनं दचकवलं मला. ‘ते माझं जुनं घर’ असं मैत्रिणीला खालून दाखवताना आवंढाच आला एकदम घशाशी. आवरताना पुरेवाट. 

मग माझा पहिलावहिला संसार मांडून देणार्‍या त्या गावातलं म्यानेजर मित्राचं बिर्‍हाड हुडकून काढलं आणि जाऊन त्यालाही भॉ केलं. चकित झाला, पण आनंदला. काय करावं त्या लबाड माणसानं? मिश्कील हसत मला सिगारेट ‍ऑफर केलीन् की!

मनापासून खुशालत त्याला ‘नको’ म्हटलं आणि मधल्या काळात राहून गेलेल्या गप्पा मारायला घेतल्या त्याच्याशी...