काहीबाही

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने...

08:55:00

इन्टरनेट, फेसबुक, स्मार्ट फोन्स या त्रयीनं मराठी सारस्वतात काही महत्त्वाचे बदल घडवले. त्या बदलांचा वेध घेणारी लेखमाला 'दिव्य मराठी'मध्ये लिहिली. तिचे चारही लेखांक इथे एकत्रित स्वरूपात देत आहे. ते लिहितानाच लक्ष्यात येत गेलं की ही शब्दमर्यादा या विषयाला आक्रसवते आहे. याहून तपशिलात लिहायला हवं आहे. मग ते एकत्र करतानाच त्यात भर घालत गेले. मूळ प्रकाशित स्वरूपात ते वाचायचे असल्यास, मजकुरातल्या पोटशीर्षकांमध्ये लिंका सापडतील

एंजॉय. आणि हो, हॅप्पी मराठी डे! ;-)

***


साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत इन्टरनेट आणि कॉम्प्यूटर हे 'इंग्रजी जाणणार्यांसाठी फक्त' आणि 'वाईट्ट काहीतरी' आहे, अशी एक खूणगाठ सर्वसामान्य लोकांनी मारलेली दिसे. 'त्याच्यामुळे नोकर्या जातील' इथपासून 'त्याच्यावर पोरं पॉर्न बघतील' इथपर्यंत अनेक संशयगंड इंटरनेटशी जोडलेले दिसत. तिथून सुरुवात करून 'हात तिथे स्मार्टफोन' येईपर्यंत आपण प्रवासाचा ('प्रगतीचा' असं लिहून मग घाईघाईनं खोडलं आहे, हे चाणाक्ष वाचकांनी ध्यानी घ्यावं) भलताच मोठा टप्पा पार केला. यादरम्यान इंग्रजीनं तिचं प्रोटॅगॉनिस्टी स्थान गमावलं नाही. पण तिची मध्यवर्ती जागा हळूहळू काही अंशी तरी बाजूला सरकत गेली आणि देशी भाषांनी परीघाकडून केंद्राकडे अडखळतं पाऊल टाकलं. (पूर्णवेळ मराठी वाहिन्यांनी जम बसवण्याचा आणि मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकण्याचाही हाच काळ, हा योगायोग खास नव्हे.)

या झेंगटात मराठीचं काय झालं आणि होतंय, ते बघण्याचा हा प्रयत्न आहे.

पण तत्पूर्वी थोड्या चौकटी आखून घेणं आवश्यक. कारण साहित्य आणि भाषा या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत हे आपण तत्त्वतः कबूल केलं असलं, तरी व्यवहारात आपण कायम माती खाल्लेली दिसते. साधी गोष्ट घ्या. इन्टरनेटवरच्या -ललित लेखनाला 'विकिपिडीय' असं विशेषण वापरतात. पण ते त्या लेखनाला हिणवण्यासाठीच. वास्तविक मराठी विकिपिडिया वाढेल तितका उत्तमच आहे की! माहिती उपलब्ध करून देणारं लेखन महत्त्वाचं नाही? सगळं लेखन कसं 'शुद्ध साहित्यिक' असणार आणि का असावं? पण आजमितीस तरी त्याला 'साहित्यिक' लेखनाइतकी प्रतिष्ठा नाही, हे सत्य आहे. या ऐतिहासिक गफलतीची छाया आपल्या तपासकामावरही पडणार आहे, याचं भान असू द्यावं हे उत्तम. दुसरं म्हणजे, हे शासकीय भाषाविषयक धोरणाबद्दलचं मतप्रदर्शन नाही. सर्वसामान्य लोकानुनयी जालीय माध्यमांत काय चालतं, त्याबद्दलची ही ढोबळ निरीक्षणं आहेत. आकडेवारी हवी असेल, तरीही निराशाच होईल. इथे काही ठळक शेरेवजा निरीक्षणं तेवढी मिळतील. ती व्यक्तिनिष्ठ - आणि त्यामुळे पुरेशी ठाशीव आणि रंगीत! - असतील, याची मात्र ग्यारंटी.

तर - इन्टरनेटवर मराठीतून लेखनवाचन घडवणारी प्रमुख ठिकाणं म्हणजे ब्लॉग, फोरम उर्फ सं(वाद)स्थळ, विकिपिडिया, छापील नियतकालिकांच्या -आवृत्त्या आणि फेसबुक. पैकी नियतकालिकांचं खरं माध्यम काही इन्टरनेट नव्हे, ती छपाईतच रमलेली. ती आपण सोडून देऊ. बाकी ठिकाणची मायमराठीतली देवाणघेवाण बघू.

इंटरनेटवर लिहिलेली दैनंदिनी उर्फ डायरीनोंद म्हणजे ब्लॉग. मराठीत ब्लॉग खाजगीकडून सार्वजनिक झाले, हौशी लेखकांत लोकप्रिय होऊन पुढे फेसबुकानं जवळपास गिळंकृत केले; तरीही ब्लॉग या शब्दाला चपखल मराठी प्रतिशब्द जन्मून रुळला नाही. एकूणच मराठीची इंग्रजीशरण (किंवा संस्कृतशरण. एकूण शरण येणं काही चुकलेलं नाही!) भूमिका पाहता हा अतिशय बोलका तपशील आहे. पुढे फोरमसंस्कृती आल्यावर त्यात थोडा फरक पडला. पण तसं नको - फोरम म्हणजे काय हेही इथेच समजून घेऊ आणि मग पुढे जाऊ. जिथे सभासदांना एकमेकांशी लेखी आणि मर्यादित जाहीर संवाद, चर्चा, वाद, गप्पाटप्पा करता येतील, अशी वेबसाइट म्हणजे संवादस्थळ उर्फ फोरम. पण त्याबद्दल आपण पुढे सविस्तर पाहणार आहोतच. तूर्तास ब्लॉगला मराठीत ब्लॉगच म्हणतात, हे ध्यानी ठेवून पुढे जाऊ. ब्लॉगांच्या दिवसात इंटरनेटवर लिहिणं म्हणजे खरोखर डायरी लिहिण्यासारखंच होतं. कारण तुम्ही सार्वजनिकपणे लिहाल ढीग, पण वाचतो कोण?! सगळ्या वृत्तपत्रांच्या -आवृत्त्याही तोवर निघालेल्या नव्हत्या. त्यामुळे इन्टरनेटवर मराठी वाचक नामक जमात अगदी कःपदार्थ होती असं म्हटलं तरी चालेल. जे कुणी लेखक-वाचक होते, ते मुख्यत्वेकरून एनाराय असल्यामुळे भाषेकडून उपासमार झालेले असत. महाराष्ट्राबाहेरच्या महाराष्ट्रमंडळसदृश संस्थांच्या कार्यक्रमांना 'हौशी' नामक जे विशेषण लावतात, त्यात एका विशिष्ट दर्जाचं आणि दर्जापेक्षाही मुदलात ती कृती करायला मिळण्याच्या उत्सवी अप्रूपाचंच सूचन असतं. तेच विशेषण या लेखनाला लावलं तरी चालेल. त्यादरम्यान काही फोरम्सही अवतरली होती, पण तिथे पाककृतींची देवाणघेवाण - तीही रोमन मराठीतून - हाच मुख्य भाग असे. साहित्यिक लेखन मर्यादित आणि हौशी क्याटेगरीत मोडणारं होतं. ते आपल्या थेट भवतालातल्या कुणी वाचण्याची शक्यता इतकी कमी होती, की ते लेखन आणि वास्तव आयुष्य यांत एक अदृश्य भिंत असे. बरहासारखा युनिकोडीय फोनेटिक कळपाट आला आणि मराठी-देवनागरीतून टंकनाचा प्रश्नही सुटला. नंतरच्या सगळ्या फोरम्सवरही मराठी-देवनागरीतून लिहिण्याची सोय होती. पण संपादनाचा प्रश्नच नव्हता. सुरुवातीला असे प्रयत्न झाले. त्यावरून वादंगही झाले. असे संपादनाचे प्रयत्न झाले, की लोक तत्काळ फुटून नवीन ठिकाणी जात. मराठीतल्या बहुतांश संस्थळांचा इतिहास पाहिला, तर ही फुटाफुटीची साखळी तपासत पार उगमापर्यंत जाऊन पोचता येतं. पण ते जिज्ञासूंनी स्वतंत्र विद्याशाखीय अभ्यास म्हणून करावं. तूर्तास आपण पुढे जाऊ! टोपणनावांसह वा टोपणनावांशिवायही इन्टरनेटवर लिहिणं आणि आपल्या थेट वर्तुळापासून नामानिराळं राहत इथे पूर्णतः निराळं, आभासी, असं एक व्यक्तिमत्त्व (किंवा अनेक व्यक्तिमत्त्वं) तयार करणं सहजशक्य होतं. ज्यांना इन्टरनेट सहज उपलब्ध आहे अशा किंचित्लेखक आणि चिकित्सक वाचक असलेल्या मर्यादित मराठी लोकांचं एक जाळं विणलं जायला सुरुवात झाली, ती इथपासून. महाराष्ट्रमंडळांमधल्या हेव्यादाव्यांची आणि गटबाजीची चांगली रुंद किनार याही विश्वाला आहे हे अनुभवी वाचकांना सांगायला नकोच!

ब्लॉग आणि पाठोपाठ स्थिरावू लागलेली फोरम्स यांत जालविशिष्ट अशी परिभाषा घडायला लागली. त्यात इंग्रजी संकल्पनांकडून केलेली उसनवार तर होतीच (लॉगाउट - गमन, पर्सनल मेसेज - व्यक्तिगत निरोप); पण मराठीत आजवर घडलेली लघुरूपं घडण्याची (व्यक्तिगत निरोप - व्यनि, पाककृती - पाकृ, मायक्रोवेव - मावे, मुद्रितशोधन - मुशो) ही सुरुवात होती. मागे एकदा भाई भगतांनी 'फिल्मोत्सव' असा एक मिश्र समास केला, तर भलीथोरली चर्चा झाली. पण इथे मात्र 'वीकान्त' (वीक एंड) आणि 'धन्स' (धन्यवाद + थँक्स) यांसारखे शब्द बघता-बघता रुळले. थिल्लर - थैल्लर्य, उनाड - औनाड्य, बोअर - बौर्य... असला चिटवळपणा करताकरता; सटल्टी या इंग्रजी शब्दासाठी साटल्य हा शब्द वापरण्यात आला आणि रुळलाच. डिस्क्लेमर - व्याप्तिनिर्देश, डेटा - विदा असे शब्दही घडवून वापरले गेले. पुढेमागे कदाचित तेही रुळतील. आधुनिक मराठीतून जवळजवळ नाहीसे झालेले 'अंमळ'सारखे काही शब्द पुन्हा वापरात आले. 'तद्माताय', 'आईच्या गावात' आणि 'बशिवला टेम्पोत' यांसारख्या दिवाणखान्यातही देता येतीलशा चतुर शिव्या निघाल्या. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' यासारख्या साध्यासरळ प्रयोगाला 'तुम्ही ठार मूर्खासारखं बोलताय, पण वाद घालायला वेळ नाही, मोठे व्हा.' असा खवचट अर्थ मिळाला. 'रच्याकने' हे 'बाय वे'चं किंवा 'दिवे घ्या' हे 'टेक इट लाइटली'चं भाषांतर हशा पिकवून गेलं, पण वापरलंही गेलं... अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा, की शासकीय परिभाषाकोशांना जे करण्यात अपयश आलं होतं, ते करण्यात इथल्या मंडळींना मर्यादित प्रमाणात तरी यश आलेलं दिसतं. ते म्हणजे मराठी प्रतिशब्द किंवा इंग्रजी शब्दाचं मराठी रूप घडवून, सरसकट वापरून ते रुळवणं. अर्थात ही रूपं इन्टरनेटवरच्या वर्तुळापुरतीच मर्यादित होती. पण त्या वर्तुळानं मात्र ही परिभाषा बोजड असूनही सहज आपलीशी केली. शब्द बोजड आहे का नाही, हे( फक्त) महत्त्वाचं नसून तो वापरण्याची एखाद्या समूहाची उत्कट इच्छा आणि त्यासाठी समभाषिक पैस उपलब्ध असणं यांचाही शब्द घडण्या-रुळण्यात महत्त्वाचा वाटा असतो, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवणारी ही घटना आहे. तिच्याकडे अजून भाषाभ्यासकांचं म्हणावं तितकं लक्ष्य गेलेलं दिसत नाही.

इन्टरनेटचा आणि पुढे स्मार्ट फोनचा परीघ जसजसा विस्तारत गेला, तसतसं या गटांचं आभासी खाजगीपण आक्रसत गेलं. तरीही फेसबुकाचं आगमन होईस्तोवर या दोन्ही विश्वांमधली सीमारेषा बरीच शाबूत होती. फेसबुक आलं आणि हे बघताबघता बदललं. राजकीय-सामाजिक घमासान चर्चा पूर्वीही संस्थळांवर होत होत्या. पण मुख्य धारेतले लेखक-पत्रकार-सितारे फेसबुकासह इंटरनेटवर लिहिते झाले आणि या चर्चांचा पोत बदलत गेला. एकीकडून सर्वसामान्य माणसानं फेसबुकावर वावरायला सुरुवात केलेली असल्यामुळे सेल्फ्यांचा, एकोळी स्टेटसांचा आणि पाडू कवितांचा सुकाळ झाला. तर दुसरीकडून लेखनाचा अनुभव असलेले लोक मैदानात आल्यामुळे 'हौशी वासरांत लंगडी गाय' सिंड्रोम कमी होण्याची शक्यता निर्माण झाली.

आणिक एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुख्य धारेतल्या लोकांनी इथल्या नियमांची घेतलेली दखल घेतली आणि त्यांच्यावर या विश्वाचे परिणाम झाले. भाषिक आणि रचनात्मकही.फेसबुकपूर्व कालखंडात साहित्यिक वर्तुळ आणि रसिक यांच्यात एक सुस्पष्ट अशी सीमारेषा असे. भाषण, मुलाखत, स्वाक्षरी, नव्या पुस्तकाला प्रस्तावना अशा काही विशिष्ट प्रसंगीच ही सीमारेषा ओलांडली जाई. एरवी वाचकांनी वाचायचं आणि क्वचित लेखकाला खुशीपत्रं पाठवायची इतकाच संवादाचा परीघ होता. साहित्यिक, वृत्तपत्रीय आणि कुंपणावरचे - असे सर्व प्रकारचे लेखक याच नियमाला धरून वावरत. फेसबुकाच्या लोकप्रियतेसरशी हे खाडकन बदललं. सहजी मिळू लागलेली कनेक्टिविटी आणि स्मार्ट फोनचा वाढता वापर फेसबुकाला फायद्याचे ठरले. त्यात भर म्हणून, आपापल्या कुटुंबकबिल्याशी, खऱ्याखोट्या मित्रपरिवाराशी जाहीरपणे 'कनेक्टेड' असण्याची एक लाटच लोकांच्यात आली. खाजगीपणा जपण्याला पूर्वी असलेलं महत्त्व कमी कमी होत गेलं. यांमुळे फेसबुकावर जनतेचा महापूर लोटला. त्यातच पूर्वी ब्लॉगांकडे फिरकलेली साहित्यिक-पत्रकार-संपादक मंडळी होती. त्यांची काहीशी बनचुकी, सफाईदार अभिव्यक्ती आणि इन्टरनेटवरच्या लोकांची अपरंपरागत अभिव्यक्ती यांचा टाका भिडला. ठिणग्या उडाल्या

पूर्वी लेखक थोडं ग्लॅमर राखून असत. कारण संपर्क करणं इतकं सहजसोपं नव्हतं. दुर्मीळपणा नाही म्हटलं तरी थोडं ग्लॅमर बहाल करतोच. पण इन्टरनेट-मोबाइल-फेसबुक या त्रयीमुळे लेखकाशी संपर्क साधणं अतिशय सोपं झालं आणि हे ग्लॅमर ओसरलं. मध्यंतरी कुणीसं म्हटलं होतं - 'आता वर्तमानपत्रांच्या पुरवण्या वाचतो कोण? त्यात आपले मित्रच लिहितात आणि ते त्यांचे लेख फेसबुकी डकवतात. तिथेच वाचन होतं!' हे गमतीनं केलेलं विधान खरं ठरवत साहित्यिक एकदम पब्लिक झाले. लोकांकडून तत्काळ मिळणार्या 'तुम्ही कित्ती भारी लिहिता हो!'-छाप कौतुकाची चव त्यांना कळली, सवय झाली, चटक लागली… 

मात्र, लेखकाचे शब्द संस्कारित करून वाचकापर्यंत आणणारे साखळीतले जे दुवे होते, त्यांचं मात्र बिनसलं. धंद्याची गणितं आणि साहित्यसेवा अशा दोन्ही गोष्टी सांभाळून पुस्तकनिवड करणार्या प्रकाशक नामक प्राण्याची मोहोर पूर्वी होतकरू लेखकांना गरजेची वाटत असे. आता ती अनेकांना वाटेनाशी झाली. मुख्य माध्यमातली तोकडी, महागडी जागा आता आंतरजालावर चकटफू उपलब्ध होती. लेखन प्रकाशित करण्यासाठी एक क्लिक करण्याचा काय तो अवकाश होता. एका प्रकारे हे मक्तेदार्या मोडणं होतं आणि त्याचे सकारात्मक उपयोग होतेच. पण दुसरीकडून या भानगडीत मुद्रितशोधन आणि संपादन या दोन पायर्या गाळल्या गेल्या. 'मुद्रितशोधनाचं काय मोठं, आम्ही त्यासाठी शुद्धिचिकित्सक (मराठीत: स्पेलचेकर!) वापरू, असा यंत्रप्रेमी पवित्रा घेऊन कुणी त्यातून वाट काढली. तर कुणी 'संवादावर घाला घालणारा बामणी कावा नाय पायजे' अशी डरकाळी फोडत प्रमाणलेखनाला थेट 'फाट्यावर मारलं'.

प्रमाणलेखनासारख्या 'फडतूस' गोष्टीची खिल्ली उडवण्यासाठीच फेसबुकावर जन्माला आलेला -मॅन नामक अफलातून सुपरहीरो यासंदर्भात पाहण्यासारखा आहे. 'त्र' हे मराठी जोडाक्षर कसं लिहायचं हे धड माहीत नसल्यामुळे साधारण त्यासारखं दिसणारं कळपाटावरचं अक्षर दडपून लिहिलेले अनेक निरोप फेसबुक आणि व्हॉट्सॅपवर फिरत असतात. त्याला उद्देशून केलेली ही खवचट टिप्पणी. फेसबुकावरच उदयाला आलेले 'फ्लेक्स' हीदेखील भाषिक घडा'मोडी'संदर्भात पाहण्याची महत्त्वाची गोष्ट. राजकीय समर्थनसंस्कृती जोपासणारे, नाक्यानाक्यावरचे फ्लेक्स हे या प्रकरणाचं स्फूर्तिस्थान. यमकाचा प्रभावी वापर करणार्या, शुद्धलेखनाची हटकून ऐशी की तैशी करणाऱ्या घोषणा लिहिलेल्या त्यावर असतात. 'बघतोस काय रागाणं, **** केलंय वाघाणं', '***भाऊ जोमात, बाकी सगळे कोमात', 'होऊ दे खर्च, फेसबुक आहे घरचंअशा घोषणा लिहून 'पप्पु , पिंकी , छोटी , चिंटु , ताई , मुन्नु, बबलु...' असे शुभेच्छुकांना आणि उत्सवमूर्तीला टॅग करणारे, रूढ सौँदर्यदृष्टी धाब्यावर बसवून, डोळे दिपवून टाकणारी भडक सजावट करणारे स्यूडो-फ्लेक्स फेसबुकावर तूफान चालले.

साडेतीन-टक्क्यापल्याडच्या संस्कृतीनं शुद्धलेखनी संस्कृतीला दिलेला हा धक्काच होता. लिहिल्या शब्दावर काहीएक संस्कार असावा लागतो, ही समजूत मोडीत काढत लेखनाची गाडी फेसबुकावर, संवादस्थळांवर आणि ब्लॉगांवर सुसाट सुटली.

मुख्यधारेतल्या लोकांनी या आक्रमणाला कसा प्रतिसाद दिला ते पाहणं मनोरंजक आहे. 'संपादनाचा संस्कार नसेल, तर लेखक अपुरा असतो' अशी रास्त, पण दुर्लक्षित बोंबाबोंब करण्यावाचून अनेकांना पर्याय उरला नाही. पण ताजा टवटवीत नजरिया घेऊन आलेले आणि साचे मोडत लिहिणारे लेखक त्यांनाही हवेसे होतेच. आंतरजालावर आत्मविश्वासानं लिहू लागलेली अनेक नवीन नावं आज वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांतून दिसतात, ती त्यामुळेच. गेल्या काही वर्षांत निघू लागलेल्या जालीय विशेषांकांतून दिसू लागलेली प्रथितयश जुन्याजाणत्या लेखकांची नावं; या विशेषांकांची वर्तमानपत्रांनी आणि मराठी साहित्य परिषदेसारख्या पारंपरिक संस्थांनीही घेतलेली दखल; मुख्यत्वेकरून जालावरच ज्याची जाहिरात केली जाते, असं वॉटरमार्क पब्लिकेशन्ससारखं प्रकाशन; दिवाळी अंक, अनेक सुट्या कथा, पुस्तकं यांचे जालावरून करून दिले जाणारे परिचय, परीक्षणं आणि रसग्रहणं; फेसबुकावरच्या लोकप्रियतेचा वापर करून घेऊन आपली पुस्तकं हातोहात खपवणारे हुशार प्रस्थापित लेखक; 'मौज'सारख्या प्रस्थापित दिवाळी अंकात आणि 'आजचा सुधारक'सारख्या आडबाजूच्या ललितेतर अंकातही दिसणारी जालीय लेखकांची दिसणारी उपस्थिती; 'अमुक एक लेखक फेसबुकावर लिहितात' अशी जाहीर समारंभातून करून दिली जाणारी वक्त्यांची ओळख... हे सगळं पाहता, बोळा निघाला, हे खरं.

पण म्हणजे सगळं आलबेल झालं, असं मात्र नव्हे.

एक तर संपादन या अतिशय महत्त्वाच्या संस्काराबद्दल मोठंच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. लेखक कोणत्या संदर्भचौकटीत लिहितो आहे, त्याचा इतिहास-भूगोल, त्याचे समकालीन लेखक आणि त्याचा समाज, इतर भाषांमध्ये चाललेलं समांतर काम, पूर्वी झालेले वा झालेले प्रयोग, त्या साखळीमध्ये लेखकाचं स्थान, लेखकाला करायचं असलेलं विधान, प्राप्त मजकुरात ते किती परिणामकारकपणे साधलं आहे त्याचं मूल्यमापन, त्यानुसार लेखकाला सुचवण्याच्या रिकाम्या वा प्रमाणाबाहेर भरलेल्या जागा, त्याचा अहंकार गोंजारणं, त्याच्या मर्यादा आणि बलस्थानांची जागती जाणीव असणं, त्याला लिहितं करणं वा त्याला अतिरेकी-सवंग लिहिण्यापासून थांबवणं... हे सगळंच संपादनात अनुस्यूत होतं - आहे. लेखन प्रसिद्ध झाल्यावर समीक्षकानं जे करायचं असतं त्यातलं बरंच काम आधी पार पाडणं, आणि त्याहून मोठं बाळंतपण म्हणजे प्रत्यक्ष निर्मितिप्रक्रियेचा महत्त्वाचा भाग होणं - हे संपादक करतो. पण इथे त्यालाच फाटा मिळण्याची शक्यता निर्माण झाली. दीर्घ कालपटावर हे सगळ्यांनाच नुकसानकारक असणार आहे. पण अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या वाटेतला तथाकथित अडसर ठरणारी एक पायरी दूर झाल्याच्या मिषानं या गोष्टीचं समर्थनच करण्यात येतं. 'हवा कशाला संपादक? लेखकानं लिहावं आणि प्रकाशित करावं की!' असं आजही मोठ्या जोशात म्हटलं जातं. जणू शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधला अडत्या होण्यापलीकडे संपादक काहीच करत नसावा!

दुसरी महत्त्वाची गोष्ट. भाषा ही आत्यंतिक लोकशाही पद्धतीनं चालणारी प्रणाली आहे, असं म्हटलं जातं. ते खरं आहेच. कितीही सर्क्युलरं काढा, शासकीय कागदपत्रांतून आणि वृत्तवाहिन्यांतून शब्द लोकांच्या कितीही माथी मारा - शब्द लोकांच्या मुखी तेव्हाच रुळतो, जेव्हा तो लोकांना आपलासा वाटतो. त्या अर्थी भाषा हे लोकशाही प्रकरण आहेच. पण या लोकशाहीकरणाचा तोल साधण्यासाठी इंग्रजी, फ्रेंच इत्यादी भाषांमध्ये कोशांच्या अद्ययावतीकरणाचं आणि ते लोकाभिमुख ठेवण्याचं काम जसं तत्परतेनं आणि सजगतेनं केलं जातं, तसं मराठीत केलं जात नाही हेही सत्य आहे. परिणामी लोकशाही व्यवस्था आणि अंदाधुंद वापर यांच्यामधली सीमारेषा पुसट होत जाते. ज्यांना प्रमाणलेखनासारखे नियम पाळायचेच नाहीत, त्यांचं ते राजकीय विधान आहे असं समजू आणि सोडून देऊ. पण ज्यांना ते पाळायचे आहेत, त्यांच्यासाठीही निरनिराळे अद्ययावत कोश, त्यांच्या डिजिटल आवृत्त्या आणि मोबाइलच्या वापरासोबत आता आवश्यक झालेली ॅप्स उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बहुतांश जालीय वापरकर्ते बाबा आदमच्या जमान्यात मोल्सवर्थने लिहिलेला एक कोश संदर्भासाठी वापरत असतात. शब्दार्थासाठी तो मार्गदर्शक ठरतोच. पण प्रमाणलेखन? ते त्यात पाहण्याची काहीच सोय नाही. तो प्रमाणलेखनाच्या अद्ययावत नियमांना धरूनही लिहिला गेलेला नाही. पण कोणत्याही अद्ययावत कोशाअभावी लोक तो वापरत असतात. प्रमाणलेखनाच्या अपुर्या, जुनाट नियमांच्या चौकटीत अनेक अनिर्णित बाबींचा निर्णय कसाबसा लावून घेत असतात. फक्त भरमसाठ लोकांनी एखादा शब्द बहुसंख्य वेळा वापरलेला असल्यामुळे गूगलकडून मिळणारे चुकीचे सल्ले शिरोधार्य मानून चालत असतात. हे फक्त प्रमाणलेखनापुरतंच नाही. , , , यांसारख्या अक्षरांचे उच्चार आणि त्यांचं लेखन लोकस्मरणातूनही जात चाललं आहे. त्यामागेही हा अंदाधुंद वापर, अनास्था आणि कोणत्याही जबाबदार मार्गदर्शक सूत्रांचा अभाव हीच कारणं आहेत.

बोलल्या गेलेल्या शब्दापेक्षा लिखित शब्दाला अधिक वजन असतं. असं असताना इन्टरनेटनं बहाल केलेल्या अपरिमित अभिव्यक्तिस्वातंत्र्यामागची आपली ही अराजकावस्था आपल्या भाषेवरती काहीच परिणाम घडवून आणत नसेल? या घुसळणीतून काही थोडकं अमृत हाती येतं आहे, हे मान्य आहे. त्यातून भाषेची ताकद वाढणार आहेच. पण त्यातून काही हलाहलही बाहेर येतं आहे. बहुतांश वाचकांना मोबाईलच्या पडद्याशी जोडून घेत, कधी नव्हे इतका लिखित मजकूर त्यांना वाचायला लावणारी ही माध्यमक्रांती भाषेच्या इतिहासातल्या आणखीही एका महत्त्वाच्या गोष्टीच्या मुळावर उठलेली आहे.

कोणती आहे ती गोष्ट?


भाषा म्हणजे बोलणं, ऐकणं, लिहिणं आहे; तसंच वाचणंही आहे. वाचनसवयीचं काय झालं आहे माध्यमक्रांतीच्या काळात?

चश्मिष्ट नजरेनं बघून, मान खेदानं हलवतह्यॅ:! आजकाल कुणी वाचतच नाही...’ अशी हळहळ व्यक्त करणार असाल, तर सबूर! ही हळहळ पार कालिदासाच्या काळापासून गुटेनबर्गाच्या काळापर्यंत होती. आजही असेल. वाचणारे लोक कायमच कमी होते. आपले मेंदू वाचनासाठी उत्क्रांत झालेलेच नाहीत. आपल्यावर कुठून हल्ला होणार आहे याची काळजी करण्यात चूर राहणार्या अष्टावधानी आदिम मेंदूला धरून-बांधून घालत, नजर बळंच एका बिंदूवर रोखत, चित्त एकाग्र करत, वाचन करायचं आणि ते सखोल समजून घ्यायचं म्हणजे कष्टाचं काम. ते करणारे लोक कमी असायचेच.

सध्याचं चित्र वरकरणी मात्र याउलट दिसतं. फोनमध्ये डोकं खुपसून बसलेल्या लोकांपैकी एक तृतीयांश लोक बोलत असतात, असं आपण गृहीत धरू. उरलेल्या दोन तृतीयांश लोकांपैकी अर्धे लोक काही ना काही पाहत असतीलसिनेमा, यूट्यूब, चित्रफिती, फोटो किंवा चित्रंअसंही आपण अंमळ वाढीव अंदाजातच धरून चालू. तेही लॅपटॉप, टॅब आणि कॉम्प्युटर वापरणारे लोक वगळून. पण उरलेले एक तृतीयांश लोक काय करत असतात असं तुम्हांला वाटतं?

ते वाचत असतात.

दचकलात? पण थांबा. वाचन म्हणजे साहित्य असं धरून चालला असलात, तर तुम्ही भाषा आणि साहित्य एकाच मापात मोजणार्यांच्यात मोडाल. त्यामुळे हे सगळे लोक साहित्य वाचत नसतात, हे आधी स्पष्ट करून घ्या. पण मग ते नक्की वाचत तरी काय असतात? ते कोणत्या ना कोणत्या प्रकारचा मजकूर वाचत असतात. ‘वाचत असतातहेही जरा चुकीचंच वर्णन आहे. व्हॉट्सॅप, ट्विटर, फेसबुक, एसएमएस, इमेल, नेटवरचं सर्फिंग.... अशा सगळ्या माध्यमांतून त्यांच्यापर्यंत पोचणारा मजकूर तेप्रोसेस् करत असतातउर्फ गुर्हाळत असतात. तो मजकूर पाहणं, वाचणं, समजून घेणं, त्यावर प्रतिक्रिया लिहिणं, तो मजकूर साठवणं, पुढे ढकलणं, त्यावर चर्चा करणं किंवा वाद घालणं, आपल्या बोलण्याचा सूर आणि आपली देहबोली पलीकडच्या व्यक्तीला कळत नसल्याचं विसरून वाद वाढवणं आणि मग तो निस्तरताना नवीन मजकुराला जन्म देणं, गैरसमज टाळण्यासाठी आधुनिक कथ्याचा (narrative) अविभाज्य भाग असलेल्या स्मायल्यांची पखरण करायला शिकून घेणं... अशा निरनिराळ्या प्रक्रिया, म्हणजे हा मजकूर गुर्हाळणं.

हे मजकुराचं गुर्हाळ सध्या प्रचंड वाढलेलं आहे. यात चिंता करण्यासारखं काय आहे, असं तुम्हांला वाटेल; पण आहे. पूर्वीच्या कागदी वाचनक्रियेमध्ये गृहीत धरलेली एकाग्रता, सलग वाचनाचा आताच्या तुलनेतला दीर्घ कालावधी, मेंदूने सर्जनशीलपणे पचवलेली सखोल माहितीहे या गुर्हाळातून हळूहळू कमीकमी होतं आहे. एका लिंकेवरून दुसऱ्या लिंकेवर, एका ॲपवरून दुसऱ्या ॲपवर, एका उपकरणावरून दुसऱ्या उपकरणावर... अशी आपली धरसोड खूप वाढलेली आहे. परिणामी आपल्या आकलनामध्ये, सखोल विचारक्षमतेमध्ये आणि एकाग्रतेमध्ये लक्ष्यणीय घट झाल्याचं संशोधकांनी नोंदलं आहे. कारणं अनेक आहेत. आपल्या जगण्याची वाढलेली गती, तंत्रज्ञानाची वाढलेली उपलब्धता आणि वेग, मजकुराच्या मांडणीतही झालेला बदल... पूर्वी कागदी पानावरचा मजकूर वाचताना खुद्द त्या मजकुरात वा आजूबाजूला क्लिक करण्यासाठी कसलीही प्रलोभनं नसत. फोनमधून सतत कसली ना कसली नोटिफिकेशन्स वाजत नसत. फार काय, स्वतःचा अंगभूत असा प्रकाश पुरवून कागद थोड्या वेळानं आपल्या डोळ्यांना दमवतही नसे. त्यामुळे साध्या राहणीखेरीज दुसरा पर्यायच नसलेल्या, गरीब घरातल्या सालस आणि शहाण्या पोराप्रमाणे, आपला मेंदूही समोर दिसेल ते मन लावून वाची. पण आता? आताच्या मेंदूंचे पालक जणू भलतेच श्रीमंत आहेत! ते त्यांना अनेक आकर्षक, चकचकीत, भुलवणार्या गोष्टी अष्टौप्रहर पुरवत असतात. नाही रमलं मन, घे बाबा दुसरं काही हाती! परिणामी मेंदूबाळं लाडावून बिघडलेली आहेत आणि त्यांचं हॉरिझॉन्टल थिंकिंग उर्फ आपल्या प्राथमिक शाळेतल्या बाई ज्यालाकशातच धड लक्ष्य नसणंम्हणत, ते वाढलेलं आहे!

इतक्यानं झालं नाही. एखादी बातमी, विधान, चित्र, शेरा वाचल्यावाचल्या त्याबद्दल ताबडतोब काहीतरी म्हणणं किंवा करणंउदाहरणार्थ फॉरवर्ड - आपल्याला सक्तीचं वाटायला लागलेलं आहे. या सक्तीमुळे कोणत्याही गोष्टीचा सांगोपांग, सखोल, चौफेर विचार करणं हळूहळू मागे पडतं आहे. सगळी माहिती लगेच हवी आणि आपण त्यावर आपलं मतही आपण तत्काळ मांडलं पाहिजे अशी काहीतरी जबरदस्ती आपल्याला भासू लागली आहे. खरंतर अशी सर्वंकष अद्ययावत माहिती सतत मिळत राहणं आवश्यक नाही, ते शक्यही नाही. तरीही आपण अथक मजकूर चरत राहतो, हे वास्तव आहे.

याचे फायदे नाहीत असं नाही. माहितीचा, तसाच ती वेगात रिचवण्याचाही, उपयोग असतोच. मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या मजकुरातून आपल्या कामाची गोष्ट चुटकीसरशी हुडकून काढणं, वेळ दवडता उत्तरापाशी पोचणं, कमीत कमी श्रमात अधिकाधिक माहिती रिचवू पाहणं... असा, ज्यांना 'स्मार्ट' म्हणता येतील - असा कौशल्यांसाठी या प्रकारच्या वाचनाचा उपयोग होतोच. पण गेल्या कित्येक पिढ्यांमध्ये कमावलेली मौल्यवान कौशल्यं आपण त्याबदल्यात गमावतो आहोत त्याचं काय? व्यत्यय आणता वाचन करू देणारी किंडलसारखी उपकरणं, इंटरनेट ठरावीक वेळापुरतं सक्तीने बंद करणारी ॲप्स, रात्री मोबाइल बंद करून दर्जेदार झोप कशी घ्यावी हे शिकवणाऱ्या कार्यशाळा... या सगळ्या उपायांना आलेला बहर पाहता आपल्या या सततच्या कनेक्टिविटीचा आपल्याला तोटा होतो आहे हे उघड आहे. पण त्याचं मूल्यमापन करणं दूरच, आपण काही गमावतो आहोत याचं भानही आपल्याला नाही.

पण आपण जरी या वस्तुस्थितीची दखल घेतलेली नसलेली, तरी पारंपरिक छापील माध्यमांनी मात्र ती घेतलेली दिसते. या आकर्षणांशी लढणं आणि आपलं अपील कायम राखणं त्यांना भागच आहे. ही वाचनसंस्कृतीच्या अस्तित्वाचीच लढाई आहे, हे जगभरातल्या पुस्तकवाल्यांनी ताडलेलं दिसतं. -प्रती, ती वाचणारी ॅप्स आणि वाचकाग्रहामुळे हल्ली स्वस्त होऊ लागलेली कागदी पुस्तकं... अशा नाना प्रकारे पारंपरिक माध्यमं जपू पाहण्याचे होत असलेले प्रयत्न पाहिले, तर ते नीटच लक्ष्यात येतं.

मराठी पुस्तकविश्व याकडे कसं पाहतं?

मराठी पुस्तकांच्या -प्रती उपलब्ध व्हायला लागल्या आहेत. पण त्या सरसकट सगळ्या पुस्तकांच्या बाबतीत उपलब्ध असतात का? त्या कागदी प्रतींपेक्षा स्वस्त असतात का? टंकाच्या बाबतीत एकवाक्यता आहे का? सगळ्या प्रकाशनांचा त्याला पाठिंबा आहे का? वाचकांचा पुरेसा प्रतिसाद आहे का? प्रताधिकारमुक्त मजकूर डिजिटली उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होतात का? सगळ्या प्रश्नांच्या उत्त्तरादाखल नकारघंटाच वाजवावी लागते.

याचे परिणाम काय होतील? आपली सलग, सखोल, एकरेषीय, विषयात खोल बुडी मारू देणारी, एकाग्र वाचनक्षमता संपेल?

इथे विषयाला थोडा फाटा फोडून मला एका निराळ्याच चढाओढीची आठवण करून द्यावीशी वाटते आहे. चित्रपट आणि नाटक या दोन माध्यमांतली तुलना तुम्हांला आठवते? चित्रपट हे अगदी अलीकडेशंभरेक वर्षांपूर्वीचजन्माला आलेलं माध्यम. याउलट नाटक. सगळ्या मानवी संस्कृतींमध्ये निरनिराळ्या घाटांमध्ये खेळला जाणारा हा 'मेक बीलिव्ह'चा खेळ. पण चित्रपटाचा जन्म झाला आणि अगदी त्याच्या जन्मापासूनचआता नाटक मरणारअशी भीती व्यक्त केली गेली. प्रत्यक्षात तसं झालं का? नाटक गेलं-संपलं-मेलं अशा हाकाट्या उठल्या, आणि नाटकानं पुन्हा उसळी घेतली. एकदा नाही, हे पुन्हा-पुन्हा घडलं, घडत राहिलं.

हेच कागदी वाचनाच्या बाबतीतही घडणार नाही कशावरून?

प्रत्यक्ष जिवंत नटांना पाहण्यातला, आपल्या डोळ्यांदेखत नाट्यनिर्मिती होताना अनुभवण्यातला रोमान्स् आणि कागदाला स्पर्श करत, चेतलेली - शांतवणारी अक्षरं नजरेनं पीत एका संपूर्ण निराळ्या जगात बुडी घेण्यातला रोमान्स् यांत साम्यस्थळं आहेत, बलस्थानंही आहेत. ती रूपेरी वा डिजिटल पडद्यात नाहीत, पण त्यांची स्वतःची निराळी ताकद आहे. बदलत्या जगात काही प्रमाणात तीही आवश्यक आहे. दोन्ही माध्यमांनी परस्परांसह नांदावं, अशीच परिस्थितीची गरज आहे. वाचनक्षमतेच्या बाबतीतही हे होणार नाही कशावरून?

आपली वाचनक्षमता इतक्या सहजासहजी संपणार नाही.

अशा प्रकारच्या भित्या पूर्वीही आपल्याला चाटून गेल्या आहेतच. लेखनकलेचा शोध लागल्यावर सॉक्रेटिसानं अशी भीती व्यक्त केली होती, की भाषेला अक्षरात बंदिस्त करणारं हे कसब माणसाला आळशी बनवेल. विचार करणं, समजून घेणं, स्मरणशक्तीत साठवून ठेवण्यासाठी श्रम करणं या गोष्टी हरपून जातील. पण असं झालेलं दिसत नाही. लेखनकलेच्या शोधाचा वापर आपल्या मेंदूला पूरक अशा प्रकारे करून घेत माणसांनी आपला कौशल्यसंच विस्तारलेलाच दिसतो. अशाच प्रकारची भीती छपाईचा शोध लागला, तेव्हाही व्यक्त झाली होती. लेखनकलेमधलापर्सनल टचसंपून जाईल आणि हे माध्यम कोरडं, यांत्रिक होऊन जाईल, असं लोकांना वाटत होतं. पण त्याचाही वापर अतिशय सकारात्मक पद्धतीनं झाला. पुस्तकं सर्वदूर पोचली. डिजिटल माध्यम आल्यानंतरप्रोजेक्ट गुटेनबर्गसुरू करण्यात आला आणि जगभरातली प्रताधिकारमुक्त पुस्तकं जालावर मोफत उपलब्ध करून देण्याला सुरुवात झाली.

थोडक्यात असं दिसतं, की बदल हा कायम नकारात्मक गोष्टीच घेऊन येईल याची काही खातरी असत नाही. तोटे असतात, पण आधी दृष्टिपथात आलेले फायदेही असतातच. सध्या वाढणारे जाडजूड कादंबर्यांच्या खपाचे आकडे आणि सहज लाखांच्या घरात शब्दसंख्या नेऊन ठेवणार्या मोठाल्या फ्यानफिक्शन्स पाहता वाचनक्षमता संपत असेल, यावर विश्वास ठेवणं जरा जडच जातं, हेही आहे. असंही शक्य आहे, की एकाग्रतेत पडणारा हा फरक निराळ्या कारणामुळे पडत असेल. स्टेशनपासून घरापर्यंत जातानाच्या बसप्रवासात एखादी कादंबरी वाचायला घेतली, तर एकाग्रता होणं कठीण. पण मुंबई-पुणे प्रवासात छान आरामदायी सीट मिळाली की कादंबरीत सहज मन रमतं. कितीतरी जणऑफिसातल्या लॅपटॉपवर गोष्ट वाचू शकत नाहीत. मात्र तीच गोष्ट घरातल्या कॉम्प्यूटरवर शनिवारच्या मोकळ्या दुपारी, निवांत वेळी आवडीनं वाचतात. प्रश्न फक्त मानसिक बैठकीचा, मूडचा असेल, असं सहज शक्य आहे.

असं खरंच आहे का, हे येता काळ सांगेलच. अशा प्रकारे माध्यमबदलासह आपली एकाग्रता कमीजास्त करणं, वाचनकौशल्य लीलया बदलणं आपल्याला जमलं; तर फार बरं होईल. कारण येत्या काळात डिजिटल वाचनाशी आणि लेखनाशीही सांधा जुळवून घेणं ही काळाची गरजच आहे


इंटरनेटवरचं वाचन कागदी वाचनापेक्षा वेगळं आहे. अनेक व्यवधानांपैकी एक असलेलं, डिवचणारं, बरेचदा अर्ध्यात सोडून दिलं जाणारंअसे या वाचनाचे अनेक दोष आहेत. तरीही सखोल कागदी वाचनाची सवय गमावता त्याबरोबरीनं इंटरनेटवरच्या भाषावापरावर आपली पक्की मांड असणं आपल्याला अत्यावश्यक आहे. माध्यमाला निव्वळ नावं ठेवून वा त्यापासून पळून भागणार नाही.

इंटरनेटच्या वापराचे दोन प्रकार आहेत. एक आहे अबोल वापर. ज्यात तुम्ही पुस्तकं, सिनेमे, गाणी उतरवून घेता. कथा-कविता-ब्लॉगनोंदी वाचता. त्यावर काहीतरी बरीवाईट प्रतिक्रिया लिहिता. पत्रं लिहिता. पत्रांना उत्तरं देता. यात माणसांशी संवाद आहे. पण तो कमी, धीम्या गतीचा, श्वासाला सवड देणारा, गरज पडेल तेव्हा थांबवता येईलसा आहे. दुसरा आहे बोलका वापर. फेसबुक आणि इतर संवादस्थळं. तिथे तुम्ही पहिल्या प्रकारातल्या सगळ्या गोष्टी करतच असता, पण त्याखेरीज मुख्यत्वेकरून माणसांशी बोलत-वादत-उत्तरत-व्यक्त होत असता. तिथे संवादाचा वेग प्रत्यक्ष संभाषणाइतकाच - कधी कधी त्याहूनही जास्त - असू शकतो. कारण समोरच्याचं ऐकायला थांबायचीही गरज नसते. एकाच वेळी अनेक माणसं संवादात अक्षरशः 'उतरत' असतात. मात्र त्या संवादात प्रत्यक्ष भेट होत नसल्यामुळे कोणतंही उत्तरदायित्व नसतं. कितीही काटेरी वाद घालायला लोक बिचकत नाहीत. समोरच्याला काय वाटेल, या साध्या मानवी विचाराची बूज राखत नाहीत. या प्रकारच्या माध्यमातून मैत्र्या केलेल्या लोकांना विचारलंत तर ते सांगतील, की इथे तावातावानं व्हर्चुअल वाद घालणं किती सोपं असतं आणि माणसाला प्रत्यक्ष भेटल्यावर-बोलल्यावर या वादांची काटेरी धार किती कमी होते!‍ या बोलक्या आणि काटेरी वापरामध्ये आपण प्रचंड मजकूर गुर्हाळतो. आणि त्याहून गंभीर म्हणजे तिथल्या आपल्या प्रतिक्रिया अधिक तीव्र, वेगवान, काहीशा प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या आणि एकांगीही होत जातात.

अर्थातच हा वापर आपल्या मनःस्वास्थ्यासाठी धोकादायक आहे आणि तो वाढण्याची स्पष्ट चिन्हं आहेत.

नेक्स्ट बिलियन यूजर्सया संकल्पनेबद्दल तुम्ही काही ऐकलं आहे का? नेक्स्ट बिलियन यूजर्स उर्फ भावी अब्जावधी वापरकर्ते म्हणजे देशी भाषेतून माहितीची भूक असलेला, इंटरनेटवर येऊ घातलेला ग्राहकवर्ग. तरुण, साक्षर, खिशात फार पैसे बाळगून नसणारा, फोनवरूनच इंटरनेट वापरणारा, नेटवर्कच्या चणचणीची सवय असलेला आणि देशी भाषा वापरणाराअसा हा वर्ग. त्याला आधी इंटरनेटकडे आणि मग आपल्याकडे ओढण्यासाठी गूगलपासून फेसबुकपर्यंत आणि यूट्यूबपासून इतर अनेक कंपन्यांनी कंबर कसली आहे. वाय-फाय पुरवणारे थांबे देण्यापासून तेऑफलाईन व्यवहार करायची सोय करून देण्यापर्यंत अनेक गोष्टी त्या वर्गाला आकर्षून घेण्यासाठी केल्या जाताहेत. या वर्गाच्या भाषिक आवडीनिवडींचे लाड पुरवले जाणार नाहीत, असं शक्य तरी आहे का?

त्यांचे सवंग भाषिक लाड पुरवणं, ते पुरवताना लोकांना स्वतःबद्दलची अधिकाधिक माहिती द्यायला उद्युक्त करणं आणि मग ती माहिती रीतसर वापरणं, असं या सतत वर्धिष्णुव्यवहाराचं रूप आहेहा व्यवहार वाढता असणं, हे आपल्या भाषाप्रेमाचं वगैरे द्योतक आहे? छे छे. ग्राहक म्हणून असलेली आपली ताकद ज्या आग्रहातून येते, त्याला भाषाप्रेम म्हणणं कठीण आहे. भाषिक अस्मिता अधिक इतर भाषांबद्दलची असुरक्षितता असं त्याचं वर्णन करता येईल. हा आग्रह प्रत्यक्ष व्यवहारात अवतरताना मोठं मजेशीर रूप घेऊन अवतरतो. ग्राहकांना मजकूर मायबोलीतून - भलेही चुकीच्या, वाईट आणि वेळी फक्त लिपीबदल केलेल्या फसव्या मायबोलीतून - मिळतो. एकजात सगळ्या हिंदी-इंग्रजी जाहिरातींची भीषण मराठी रूपांतरं पाहिली किंवा 'मराठी पाट्यां'च्या नावाखाली देवनागरी अक्षरांचा आग्रह पाहिला, तरी हे लक्ष्यात येईल. पण त्यानं लोक सुखावतात. हेच सुखावलेले लोक आपल्या आवडीनिवडींबद्दल बोलून, वाद घालून, राजकीय चर्चा करून आपल्याबद्दलचा विदा (data) इंटरनेटवर खुला करून ठेवतात, ठेवणार आहेत. हेच तर दुकान मांडून बसलेल्या कंपन्यांना हवं आहे. हा ग्राहकवर्ग म्हणजे माहितीचं एक भलं मोठं घबाड आहे. ते हाती लागावं, म्हणून देशी भाषांचं गाजर दाखवलं जातं आहे.

या सगळ्यात महत्त्वाची आहे, ती भाषेची मध्यवर्ती भूमिका. वाढत जाणार्या बोलक्या वापरात लोक भाषेकडे नक्की कसं पाहतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. व्यक्ती, समाज, राजकीय समूह म्हणून असलेलं आपलं मन:स्वास्थ्य या बोलक्या भाषावापराशी थेट निगडीत असणार आहे.

पण अडचण अशी आहे, की भाषा म्हणजे नक्की काय याबद्दलची स्पष्टता फारशी कुणापाशीच नाही.

प्रमाणलेखन पाळायचं की नाही, त्याला प्रमाणलेखन म्हणायचं की शुद्धलेखन, साहित्य सुबोध असावं की दुर्बोध, मराठी शाळा टिकवाव्यात की नाही, साहित्यसंमेलनांवर सरकारनं खर्च करावा की नाही, साहित्यसंमेलनाची निवडणूक असावी की नसावी, बेळगावची आणि विदर्भाचीही नक्की गोची काय आहे, शिवाजीच्या स्मारकावर किती कोटी खर्चावेत, रामदास आणि दादोजी कोंडदेव कोण होते, गडकरी थोर होते की नव्हते... असे असंबद्ध भासणारे; इतिहास, समाज, शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था अशा अनेक परीघांमध्ये घुसणारे; एकमेकांशी संपूर्णतः विसंगत वाटणारे जे वाद आपल्या सांस्कृतिक अवकाशात खेळले जात असतात, ते याच भाषाविषयक अनागोंदीचे निर्देशक आहेत. या वादांमधली गृहीतकं पाहिली तर असं लक्ष्यात येतं, की भाषा, भाषिक अस्मिता आणि रोजगार निर्मिती करण्याची भाषेची क्षमता या तीन निरनिराळ्या गोष्टी आहेत, याचं भानच मुळी आपल्यापाशी नाही. मराठी प्रमाणलेखनाचे नियम संस्कृतशरण नकोत, असं म्हटलं; तर तुम्हांला भाषाच अवगत नाही असा आरोप होतो. बेळगावबद्दल थोडी अपारंपरिक भूमिका घेतली, तर तुमच्या मराठीपणाबद्दलच शंका घेतली जाते. मराठी प्रतिशब्दाचा आग्रह धरला, की तुम्ही लग्गेच संकुचित विचारसरणीचे ठरता. पोराला इंग्रजी शाळेत घालण्याचं समर्थन केलं, की तुम्ही भाषाद्रोही ठरता.... या काळ्या-पांढर्या  'निकाली' वादांचं कारण असं; की स्पष्टता नाही, अस्मिता मात्र टोकदार. त्यात भर पडते आहे ती या अननुभवी ग्राहकांची. हे सगळं फेसबुकासारख्या ज्वालाग्राही ठिकाणी! कयामत का दिन दूर नही!

पण याला एक सकारात्मक बाजूही आहे. अभिव्यक्तीच्या या कुंभमेळ्यात सामील होण्याला कुणालाही कोणत्याही प्रकारचा उघड मज्जाव नाही. प्रस्थापितांच्या भाषेवर पक्की पकड असण्यापासून ते इंटरनेटची जोडणी परवडण्यापर्यंत अनेक छुप्या मक्तेदार्या कार्यरत आहेत. पण त्यांचा तोंडावळा मात्र उघडपणे जात, धर्म, वर्ण, लिंग अशा प्रकारच्या जुनाट ठप्प्यांचा नाही. या गुंत्याची तुलना शहरीकरणाशी केली, तर हे नीट समजून घेणं थोडं सोपं जाईल का? कदाचित.

आधुनिक काळात औद्योगिकीकरण आणि शहरीकरण आलं ते हातात हात घालून. या जोडीनं जात्यधारित भेदभावांना उघडपणे तरी थारा केला नाही. शहरातल्या आयुष्याला काळी बाजू आहे, शोषणाचे अधिक छुपे आणि भेदक संदर्भ आहेत. पण खेडेगावातल्या पिढीजात भवतालात जगणंच अशक्य झालेल्या माणसांना बरंवाईट जगण्याची संधी महाशहरांनी देऊ केली, हेही खरं आहे. समूहाशी असलेला जोडलेपणा खुडून घेतला असेल, पण समूहाचा दबाव उधळून लावत व्यक्ती म्हणून मोकळेपणा दिलाच. हा मोठाच रेटा होता. अगदी तसाच रेटा इंटरनेट-फेसबुक-स्मार्टफोन्स या त्रयीनं आणि तिथल्या घुसळणीनं भाषाव्यवहाराला देऊ केला. तशीच अनागोंदी; प्रस्थापित आणि होतकरू समूहांचे तेच संघर्ष; तसाच मर्यादित स्वातंत्र्याचा आभास; ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातंया म्हणीनुसार या अराजकाचा फायदा उचलणार्या बड्या कंपन्या आणि त्यातून मिळवलेल्या भावनिक मुद्द्यांवरून आपल्यात सहजी फूट पाडणारे राजकारणी.

आपली भाषा या सगळ्यात घुसळून निघाल्याशिवाय राहील?

प्रतिशब्दघडणीवरून घातले जाणारे वाद वा लोकांची भाषा किती भ्रष्टझाली आहे...असे फोडले जाणारे टाहो हे वरवर दिसणारं एक टोक तेवढं आहे. त्यापेक्षा गंभीर असे अनेक बदल होताहेत, होणार आहेत. या बदलांकडे आपल्याला डोळसपणे पाहता येईल?

लोकमत खेळवण्यासाठी इंटरनेट (फेसबुक नि व्हॉट्सॅप) हे माध्यम कमालीचं परिणामकारक आहे. अमेरिकी आणि भारतीय राजकारणात त्याचे यशस्वी प्रयोग पाहिल्यावर, संकुचित देशीवादाला खतपाणी घातलं जाताना आणि लोकांच्यात दुही माजताना जगभर पाहिल्यावर, आता तरी नेट आणि भाषा यांच्या साट्यालोट्याला असलेलं महत्त्व आपल्याला ध्यानी घेता येईल?

भाषा हे साधन आणि हत्यार दोन्ही आहे हे सत्ताकांक्ष्यांनी ओळखलं आहे, राबवलंही आहे. त्याचा आपल्याविरोधात वापर होऊ नये, इतकी पक्की मांड आपल्याला अस्सल आणि आभासी भाषेवर बसवता येईल?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असली तर बरं. नपेक्षा दिवस मोठे कठीण ठाकले आहेत.


***
चित्रश्रेय: दिव्य मराठी, रसिक