बाई - विजयाबाईंचा कॅलिडोस्कोपिक वेध

08:55:00बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास
संपादन : अंबरीश मिश्र
राजहंस प्रकाशन


एखाद्याचं आत्मवृत्त ('लमाण' - डॉ. श्रीराम लागू) किंवा निरनिराळ्या व्यक्तिसापेक्ष कोनांतून इतरांनी रेखाटलेलं त्याचं व्यक्तिचित्र ('तें आणि आम्ही') या दोन्ही घाटांची पुस्तकं मराठी नाट्यवर्तुळात आहेत. खुद्द विजयाबाईंचं आत्मचरित्र 'झिम्मा' काही वर्षांपूर्वीच प्रकाशित झालं आहे. 'बाई' मात्र या बाबतीत काहीसं संमिश्र आहे. पुस्तकाचे तीन विभाग आहेत. बाईंचं घराणं, बाईंची गँग आणि बाईंचा स्नेहपरिवार. त्यात निरनिराळ्या गोष्टी आहेत. विजया राजाध्यक्ष आणि महेश एलकुंचवार यांनी विजयाबाईंची घेतलेली एक दीर्घ मुलाखत आहे. किशोरी आमोणकर यांनी बाईंवर लिहिलेलं एक टिपण आहे. विजयाबाईंच्या सहकलाकारांनी (भास्कर चंदावरकर, महेश एलकुंचवार), त्यांच्या आप्तांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत. त्यांत काटेकोर, अलिप्त परीक्षण आहे; तसाच आत्मीय भावही आहे. विजयाबाईंच्या शिष्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत. तशीच स्वतः विजयाबाईंनी वेळोवेळी रेखाटलेली व्यक्तिचित्रं आणि काही कामाची टिपणंही आहेत. हा संमिश्र घाट हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. त्यामुळे त्याला एखाद्या कॅलिडोस्कोपचं रूप आलेलं आहे.


विजयाबाईंचं कोणतंही लहानसं काम, त्यांचं भाषण किंवा त्यांची लहानशी मुलाखतही पाहणार्‍या माणसाच्या नजरेतून त्यांची बोटं सुटत नाहीत. त्या बोलत असतात, ते अर्थातच अतिशय महत्त्वाचं, नेमकं असंच असतं. पण ऐकणार्‍याची नजर त्यांच्या हातांच्या बोटांवर खिळून राहते. तंत्रविद्या जाणणार्‍या एखाद्या गूढ स्त्रीनं आपल्याला तिच्या वर्तुळात खेचून घेण्यासाठी कराव्यात, तशा त्या हालचाली. भारून टाकणार्‍या, झांजावणार्‍या, समारंभी लवाजमा असलेल्या दिमाखदार खेळाची आठवण व्हावी, असं विजयाबाईंचं व्यक्तिमत्त्व त्यांतून दिसत राहतं. बघणार्‍याची नजर खिळवून ठेवणारी, 'लार्जर दॅन लाइफ' भासणारी, हीच जादू चिमटीत पकडणारं असं या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. जांभळ्या किनखापी पार्श्वभूमीवर तीव्र गुलाबी रंगाची झळाळती उधळण करणारी 'बाई' ही ठसठशीत प्रवाही अक्षरं. त्यातलाही 'बा' पूर्ण न दिसणारा आणि त्यामुळे पहिल्या कटाक्षात 'आई' या शब्दाची आठवण करून देणारा.सुभाष अवचटांचं हे मुखपृष्ठ आपलं काम चोख करतं. पुढे पुस्तकातही किरमिजी रंगाच्या ठसठशीत खुणा मांडणीतून भेटत राहतात आणि पुस्तकाला देखणं रूप देतात.


या पुस्तकाला एखाद्या भावगीताचं सुनीतसौंदर्य आहे असा दावा करणार्‍या संपादक अंबरीश मिश्र यांची प्रस्तावना वाचताना मात्र थोडं बिचकायला होतं. 'झिम्मा'नंतर हे पुस्तक अधिक काय देऊ शकेल या प्रश्नाचं उत्तर या प्रस्तावनेतून हाती लागेल अशी अपेक्षा असते. पण दुर्दैवानं ती पुरी होत नाही. पुस्तकातल्या अनेक लेखांची एक आढावावजा जंत्री तेवढी प्रस्तावनेत आहे. काही वेळा भाबडा भक्तिभाव मजकुरात डोकावतो हे खरं. सुदैवानं तो अळूवडीच्या सारणाप्रमाणं पानभर पसरत नाही या भीषण उपमेपलीकडे ही प्रस्तावना जात नाही.  


भास्कर चंदावरकर यांचा दीर्घ लेख अतिशय तटस्थ म्हणावा असा. विजयाबाईंच्या नाट्यकारकिर्दीचा आढावा घेताना त्यांची नजर अगदी वेगळ्या गोष्टी टिपते. बाईंच्या नाटकांमधली बदलत गेलेली दृश्यात्मकता किंवा निरनिराळ्या राजकीय जाणिवांची नाटकं करताना त्यांनी त्यातून काय मिळवलं आणि काय दिलं याचा हिशेब. त्यांना आलेल्या अपयशाची नोंद जशी या लेखात आहे, तसंच त्यांच्या झगझगीत यशामागे कोणता हट्ट असेल आणि त्यानं काय नुकसान झालं असेल, त्याबद्दलचा अंदाजही. या लेखात एक अतिशय सूचक वाक्य येतं : … ही संपूर्ण निर्मितिप्रक्रिया मी सुरक्षित अंतरावरून अनुभवलेली आहे…. मी जेव्हा ते सुरक्षित अंतर सोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मलाही त्याची झळ लागलेली आहे! याच वाक्याचं बोट धरून पुढे त्याचा विस्तार करत जावा, असा महेश एलकुंचवार यांचा बाईंबद्दलचा लेख. एक नाटककार आणि एक दिग्दर्शक यांच्यातल्या समृद्ध देवाणघेवाणीची चुणूक या लेखातून मिळते. एकमेकांसोबत काम करण्यातून प्रचंड समृद्ध करणारं काही गवसणं, त्यानं भारून जाणं, काही ना काही निमित्तांनी लांब जाणं, निराश होणं, प्रगल्भ व्यक्तीनं त्यांतल्या अपरिहार्यता स्वीकारून देवाणघेवाण सुरू ठेवणं… असे अंतराच्या खेळाचे अनेक तुकडे या लेखातून दिसतात. हे दोन्ही लेख पुरेशा तटस्थपणे बाईंकडे पाहतात. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर अजून काम करायला हवं होतं, असं सुचवतात आणि मग त्याखेरीजही जे साधलं त्यातला मोठेपणा स्वीकारतात.


दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे बाईंची मुलाखत. अशा प्रकारची दीर्घ मुलाखत हे या प्रकारच्या पुस्तकाचं वैशिष्ट्यच मानायला हवं. बाईंच्या कामामागच्या प्रेरणा, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांतून हाती आलेलं यशापयश, त्यामागची कारणं आणि त्यांचे परिणाम….असे अनेक प्रश्न आणि त्यांतून उलगडत जाणारे बारकावे या मुलाखतीत आहेत. 'मी खर्‍या अर्थी प्रोफेशनल कधी झाले नाही. मी सतत आई, सून, बायको आणि हे सगळं सांभाळून काम करणारी बाई राहिले' असं चकित करणारं एक वाक्य या मुलाखतीत येतं. दिवसाचे सोळा-सोळा तास काम करणारी, चारेक तास झोप घेऊन तालमीच्या हरेक दिवसाची टिपणं काढणारी, नाटक स्वीकारल्यावर त्यात सर्वस्वानं झोकून देणारी, नाटकात योग्य वातावरण उभं राहावं यासाठी आपल्या सांस्कृतिक मर्यादा ओलांडत माणसं समजून घेऊ पाहणारी ही बाई जर स्वतःचं मूल्यमापन असं करत असेल, तर तिचा परिपूर्णतेचा ध्यास काय तीव्रतेचा असेल, असा प्रश्न वाचताना पडतो. मात्र या मुलाखतीबद्दल एक मोठी तक्रारही आहे. सहसा अशा मुलाखती ध्वनिमुद्रित केल्या जातात आणि नंतर त्यांची अक्षरप्रत (transcript) तयार केली जाते. तशाच प्रकारची ही मुलाखत आहे. मात्र बोलण्याच्या ओघात माणूस एकाहून अधिक भाषांमध्ये बोलतो, बोलताना संदर्भ थोडे मागेपुढे होतात, समजून घेतले जातात. अक्षरप्रत तयार करताना त्या मजकुरावर प्राथमिक संस्करण करणं अपेक्षित असतं. ते न केल्यास - युअर फिजीक हॅज टू रिअ‍ॅक्ट टू इमोशन. आय फील अ माईंड दॅट इज सेन्सिटिव्ह कॅन रिअ‍ॅक्ट. हे फार महत्त्वाचं आहे. अभिनयाच्या दृष्टीनं, अभिनयाच्या शिक्षणाच्या दृष्टीनं, डोंट सी, लुक, आय काँटॅक्ट महत्त्वाचा. कारण देअर इज नथिंग लाइक अ‍ॅक्टिंग, इट इज रिअ‍ॅक्टिंग. डोट हिअर, लिसन, डोंट टॉक... - या प्रकारचा मजकूर तयार होतो. वाचताना त्यामुळे रसभंग होतो. विशेषकरून पुस्तकात इतर तीन अनुवादित लेख असताना, या मुलाखतीवरून मात्र अनुवादकानं एकही हात न फिरवण्याचं नक्की काय कारण असेल, असा प्रश्न सतत पडत राहतो.


तिसरा भाग म्हणजे पीटर ब्रुकनं सादर केलेलं महाभारत पाहून खुद्द विजयाबाईंनी त्यावर लिहिलेलं टिपण. हे टिपण म्हणजे या पुस्तकाचा मानबिंदू आहे. सलग १२ तास चालणार्‍या त्या महाभारतातले झगमगाट टाळणारे, पण साधेपणातून महाकाव्याचा भव्य-उदात्त भाव जागा करणारे, अनेक विलक्षण नाट्यक्लृप्त्या वापरून जिवंत केलेले प्रसंग पाहून विजयाबाई लिहितात : .. रंगभूमीचं काल्पनिक जग स्वतःचं असं एक वास्तव आणि सत्याचा एक वेगळाच अर्थ निर्माण करतं. कदाचित त्यात नेहमीचे रूढ नाटकीय डावपेच नसल्यामुळे ते जास्तच परिणामकारक झालं होतं. आपल्या अ-नागर आणि आदिवासी रंगभूमीच्या परंपरेत अशी अनेक उदाहरणं सापडतात. आपल्या शहरी मनाला जे चिकित्सकपणाचं तार्किक वळण लागलेलं आहे; त्यामुळे आपण रंगभूमीच्या कृत्रिम, भपकेबाज आणि दिखाऊ कल्पनांकडे वळतो. त्यात आपण वास्तवाची नक्कल करायला जातो आणि सत्य नेमकं निसटूनच जातं. अस्सल भारतीय पद्धतीनं वास्तववाद समजून घेणार्‍या विजयाबाईंच्या कामाचा आत्माच इथे सापडतो. त्यांची नाटकाबद्दलची संवेदनशीलता आणि ती नेमकेपणानं, साधेपणानं टिपणारी भाषा - हे दोन्ही अनुभवण्यासाठी वाचावंच, असं हे टिपण.


'विजयाबाईंची गँग' या भागात त्यांच्या अनेक शिष्यांचे, सहकलावंतांचे लेख आहेत. हा भाग काहीसा कमी चोख आणि पुनरावृत्त झाल्याचं नोंदलं पाहिजे. बाईंच्या कारकिर्दीचा आढावा, आणि त्यांचा परिपूर्णतेचा ध्यास, त्यांचं दिमाखदार व्यक्तिमत्त्व, त्यांची प्रज्ञा यांमुळे भारून गेल्याचा भाव या दोन्ही गोष्टी आलटून पालटून अनेक लेखांतून दिसत राहतात. एक समान सूत्र याही लेखांतून जाणवतं. ते म्हणजे नाटक या एका गोष्टीसाठी माणसांना सहज आपल्या वर्तुळात ओढून घेणारा, अकृत्रिम प्रेमानं त्यांना जिंकून घेणारा, प्रसंगी त्यांना फटकारणारा आणि तरीही आपलं असं अंतर राखून असणारा विजयाबाईंचा स्वभाव. त्यातून त्यांच्या शिष्यांमध्ये तयार होणारी अधिकारवृत्ती (possessiveness) कधीकधी अतिशय लोभस वाटते, तर कधीकधी करुण. मंगेश कुळकर्णींचा लेख ('मला कधीही गंज चढणार नाहीए') या संदर्भात विशेषकरून वाचावा असा. जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेशपरीक्षेला जायला कुळकर्णींना एक दिवस उशीर झाला. त्यामुळे त्यांचं वर्ष फुकट जाऊ नये, म्हणून स्वतः विजयाबाई कुळकर्णींच्या वतीनं रदबदली करायला कॉलेजात जाऊन पोचल्या, असं नोंदून कुळकर्णींनी बाईंमधल्या आईपणाबद्दल सांगितलं आहे.


विजयाबाईंच्या यजमानांची - फारोख मेहता यांची - एक मिश्किल मुलाखतही याच भागात आहे. तिच्यातला नर्मविनोद अनुवादातही चोख उतरला आहे.


शेवटच्या विभागात आहेत स्वतः विजयाबाईंनी रेखाटलेली व्यक्तिचित्रं. त्यांतलं दामू केंकरे यांची चित्रण अतिशय बहारदार, जवळिकीचं असं. दामू केंकरे यांच्या प्रेमविवाहाच्या वेळी त्यांच्या भावी सासूबाईंनी या लग्नाबद्दल झापलं, ते केंकर्‍यांना नव्हे - तर त्यांच्या जवळच्या मैत्रिणीला - विजयाबाईंना. प्रेम करायचं दामूनं आणि शिव्या खायच्या मी असं विजयाबाई यात मिश्किलपणे म्हणतात. या आणि इतर लेखांतही त्यांचं तटस्थ मिश्किलपणे स्वतःसकट सगळ्यांकडे पाहणं दिसत राहतं.

मुद्रितशोधनातल्या काही बारीक चुका, अनुवाद करताना मूळ वाक्य न लपवणारी काही खड्यासारखी वाक्यं, थोडी पुनरावृत्ती; असे काही बारीकसारीक दोष पुस्तकात आहेत. पण त्यांकडे दुर्लक्ष्य करून वाचावं असं आणि इतकं हे पुस्तक देऊन जातं, यात शंका नाही.


***

'बाई' या अंबरीश मिश्र यांनी संपादित केलेल्या, विजया मेहता यांच्यावरच्या, पुस्तकाचा रसग्रहणात्मक परिचय जानेवारी 2017च्या  'अनुभव'मध्ये प्रकाशित झाला आहे.

***
मुखपृष्ठ : जालावरून साभार

You Might Also Like

0 comments