मला नाही येत कवितेची भाषा

07:46:00

मला कविता लिहिता येत असती, 
तर लिहिली असती मी कविता.
तांबडं फुटतं तेव्हाच्या उजेडात, 
आपला निळा रंग दडवून ठेवणाऱ्या, 
काळ्यासावळ्या गुमसुम खंड्याबद्दल.
मनगटाएवढाले ताकदवान झरे पोटात रिचवत, 
स्वतःत चूर होऊन बसलेल्या, 
खोलावत जाणाऱ्या, 
गूढ, 
ऐसपैस विहिरीबद्दल.
काळ्याशार फरश्यांचा गारवा मुरवत, 
झोपाळ्याच्या कड्या कुरकुरवत, 
खिडकीच्या गजांच्या मंद सावल्या अंगाखांद्यावर झुलवत, 
गुडघ्यावर हनुवटी टेकवून बसलेल्या 
पोक्त घराबद्दल.
विनापाश होत जाण्याच्या वाटेवरल्या कुण्या निस्संगानं 
निरपेक्ष अनपेक्षितपणे हाती दिलेल्या, 
नखाएवढ्या रानफुलाबद्दल.
साध्यासुध्या, 
बोलता-बोलता विचारात पडण्याची ताकद न गमावलेल्या, 
बोलक्या-हसऱ्या-खोल डोळ्यांच्या माणसाबद्दल.
पण काय करू?
मला नाही येत कवितेची भाषा.


You Might Also Like

8 comments

 1. असं नं येणं आवडलेलं आहे मेघना..

  ReplyDelete
 2. दोघांचेही मनापासून आभार. :)

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. छान...हे अगदी
  काळ्याशार फरश्यांचा गारवा मुरवत,
  झोपाळ्याच्या कड्या कुरकुरवत,
  खिडकीच्या गजांच्या मंद सावल्या अंगाखांद्यावर झुलवत,
  गुडघ्यावर हनुवटी टेकवून बसलेल्या
  पोक्त घराबद्दल.

  ReplyDelete
 5. ही कविता म्हणजे, जुन्या मराठी सिनेमामधे (चंद्रकांत, जयश्री गडकरटाईप) नायिका, आम्ही नाही जां, म्हणत स्वतःहून नायकाच्या कुशीत शिरायची तसा प्रकार.

  ReplyDelete
  Replies
  1. फुटले, खपले, वारले - हसून ठार झाले! पण होय, अगदी अगदी अगदी बरोबर आहे.

   Delete