राजकीय आणि अराजकीय

08:41:00

काही विशिष्ट माणसांबद्दल आज मी थोडी निरीक्षणं मांडणार आहे. आपला आणि राजकारणाचा काय संबंध बुवा (किंवा बाई) असा त्यांचा अतिशय मनापासून आणि निरागस वगैरे समज असतो.

ही माणसं सर्वसाधारणपणे सवर्ण आणि आकर्षक आणि मध्यमवयीन तरुण वगैरे असतात. खाऊन्पिऊन्तृप्त-अंगानं भरलेली-तरीही-शेलाटी (पुरुषमाणसं असल्यास हीच विशेषणं थोडी फिरवून वापरावीत. खाऊन्पिऊन्तृप्त-पोट-किंचित्सुट्लेलं-गृहस्थी देखणेपणा) इत्यादी त्यांचं रुपडं सहसा आढळतं.

त्यांना एखादा बॉयफ्रेंड असतो. किंवा एखादा नवरा. (नाही. पुरुष असल्यास गर्लफ्रेंड किंवा बायको वाचावं. त्यांना बॉयफ्रेंड अथवा नवरा नसू शकतो, त्या प्रकारची 'उत्च्छृंखल' आधुनिकता यांच्यात नसते. माझी पैज लावायची तयारी आहे.) ते पारंपरिक, पारंपरिक देखणे आणि पारंपरिक पुरुषी असतात. (बरोबर, गरज पडल्यास लिंगपालट करून घेणे.) लग्न झालेलं असल्यास त्यांना किमान एक मूल असतं. हे लोक एकाच वेळी अतिशय आधुनिक असतात आणि त्याच वेळी तितक्याच उत्साहाने पारंपरिक. त्यांना टीव्ही सिरियली (पु० असल्यास - क्रिकेट) बघायला आवडतात आणि त्यांची टवाळी करणंही आवडतं. त्यांची मुलं प्रचंड टीव्ही पाहतात. मात्र त्यांच्या मुलांनी चुंबनदृश्यं आणि उघड्या अंगाचे स्त्रीपुरुष, होमोसेक्शुऍलिटीचे कोणतेही उल्लेख आणि गरीब लोकांनी दिलेल्या शिव्या पाहता कामा नयेत याबद्दल ते दक्ष असतात. होय, श्रीमंत लोकांनी दिलेल्या शिव्या चालतात. किंबहुना त्या हव्यातच, शक्यतोवर इंग्रजीतू्नही हव्यात याबद्दलही ते दक्ष आणि कौतुकोत्सुक असतात. त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास आणि विशिष्ट प्रकारचा गंड यांचं एक ठरलेलं मिश्रण असतं. त्यांना सहसा अंकुश चौधरी ते अक्षय कुमार आणि समीर धर्माधिकारी ते सलमान खान या प्रकारचे पुरुष पाहायला आवडतात (पु० अ० - गिरिजा ओक ते चित्रांगदा सेन आणि राधिका आपटे ते माधुरी दीक्षित). त्यांना सहसा उजवे हुकूमशाही प्रवृत्तीचे आणि 'काहीतरी करणारे' नेते आवडतात. काहीतरी म्हणजे नक्की काय, असा प्रश्न विचारला असता, ठाम आणि ठोस आवाजात 'काहीतरी करायला हवंच, अजिबात काही न करण्याहून ते उत्तम' अशा प्रकारचं अत्यंत गोलाकार आणि ठणठणीत निरुपयोगी संतापजनक उत्तर ते देतात.

लग्न करून मूल आणल्यामुळे किंवा एक जोडीदार कमावल्यामुळे आणि तो येनकेनप्रकारेण राखल्यामुळे जगातल्या सगळ्याच गोष्टींचं गुह्य आपल्याला समजलेलं आहे अशीही त्यांची खातरी असते. किंबहुना त्यांच्या अक्षय आत्मविश्वासाचा उगमच या तथाकथित ज्ञानातून होत असतो. त्यांच्या लिंगाचा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या लिंगाच्या सेंट-परसेंट शुद्धतेची (परस्पर्श नाही अशा अर्थीही आणि परफेक्शन अशा अर्थीही) सिद्धता जितक्या वेळा देता येईल, तितक्या वेळा देत राहणं हाही त्यांच्या एकूण आयुष्याचा एक कम्पल्सरी भाग असतो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जगातल्या कोणत्याही माणसाला - आणि त्यातही माझ्यासारख्या माणूसघाण्या, परंपराद्वेषी, फाटक्या तोंडाच्या, बाईची इंद्रियं असूनही मासिकपाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन्स हवेत म्हणून केमिस्टच्या आणि स्त्रीत्वाला ब्रेसियर कंपलसरी म्हणून अंतर्वस्त्रांच्या दुकानाला आश्रय याखेरीज त्या इंद्रियांचा कोणताही दृश्य उपयोग न करणार्या, बाई या नामाभिधाला लांछन ठरणार्‍या माणसाला - यच्चयावत गोष्टींबद्दल अधिकारवाणीने ज्ञान देण्याचा कायमचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला असतो.

ते घरी आल्यावर कधीही नीट माणसासारखे दिवाणखान्यात तंगड्या पसरून बसत नाहीत. (चाणाक्ष वाचकांच्या लक्ष्यात आलं असेलच, की हे पुरुषांना गैरलागू. ते ही सोडून इतर कुठल्याच पोझिशनमध्ये बसू शकत नाहीत.) त्यांना लगबगीने स्वैपाकघरात जाऊन मदत करायची असते. माझ्या स्वैपाकघरात मी काम करत असताना कुणीही मधे लुडबुडलेलं मला - होय, कुणीही म्हणजे कुणीही. उद्या साक्षात बेनेडिक्ट कम्बरब्याच आला, तरी मी त्याला बाहेर बसवून त्याच्या त्या चांदीच्या सुरईतून मध ओतल्यासारख्या आवाजात मोठ्याने गप्पा मारायला फर्मावीन आणि मी माझं काम एकटीनंच नीट करत ओरडून गप्पांना पिना मारीन आणि कर्णसुख लुटीन. असो. तर माझ्या स्वैपाकघरात इतर कुणी लुडबुडलेलं - चालत नसल्यामुळे मला या सवयीचा सुरुवातीला प्रचंडच ताप होत असे. पण हळूहळू मी त्यावर विजय मिळवला. आपण स्वतःच बाहेरच्या खोलीत पंख्याखाली निवांत पसरायचं आणि त्यांच्या स्त्रीत्वनिर्देशक तथाकथिक मोहक आणि सराईत हालचालींकडे दुर्लक्ष्य करत गप्पा मारायच्या. स्वैपाकात वेळोवेळी लागणार्‍या - मीठ, साखर, दाण्याचं कूट, कॉफी, वेलची, आलं इत्यादी - गोष्टी आधीच नीट लपवून ठेवायच्या. त्या त्यांना न मिळाल्यामुळे त्या काही वेळातच नामोहरम होतात. येताक्षणी स्वैपाकघरात शिरून 'ताबा' घेण्याची त्यांची प्रवृत्ती निदान आपल्या बाबतीत तरी यथावकाश विझते. दिसलं-स्वैपाकघर-ताबा-घे या त्यांच्या गंडाकडे एक प्रकारची मनोरंजक आणि काही प्रमाणात उपयुक्त सवय म्हणून पाहिल्यास फायदा होतो. (मजा म्हणजे हे पुरुषांनाही लागू पडतं. आपण बाहेरच ठिय्या देऊन बसायचं. शक्य तर अर्धोन्लोळित अवस्थाच घ्यायची. चहाची कितीही तल्लफ आली तरी कान म्हणून हलवायचा नाही. यानं यांच्यातली पुरुषमंडळी नरमतात.) पण एकुणात तो संयमपरीक्षेचा प्रकार आहे, यात काडीमात्र शंका नाही.

शक्यतोवर यांच्यासोबत कुठेही प्रवासाला जाऊ नये. कारण प्रवासाला गेल्यावर त्यांना वेळ आणि पैसे वसूल करण्यात मोठा रस असतो. त्यातून शक्ती उरली तर ती त्यांच्या जोडीदाराच्या आणि मुलाच्या खाण्यापिण्याच्या आणि खरेदीच्या गरजा भागवण्यात तिचा मोठा भाग संपतो. आणि खेरीज जी शक्ती उरते, त्यात उर्वरित घरगुती गॉसिपं, राजकारणाबद्दलच्या त्यांच्या थोर समजुतींतून मारलेले ठाम शेरे आणि सेल्फ्या हे सगळं बसवायचं असल्यामुळे दस्तुरखुद्द त्यांना मजा करायला वेळच नसतो. त्यात माझीही मजा चिरडली जातेय याचं त्यांना भानही नसतं. हेही ठीकच आहे. पण त्यांची मजा म्हणजेच यच्चयावत दुनियेने मजा करण्याची आदर्श पद्धती या त्यांच्या ठाम समजामुळे आणि तो लादण्याच्या आत्मविश्वासामुळे माझ्या चिडचिडीला पारावार उरत नाही. असो. यावर तसा कोणताही निवारक उपाय नाही. असे प्रवास टाळणे हाच एक उत्तम उपाय आहे.

यांना तथाकथित व्यभिचारी स्त्रियांबद्दल एक प्रकारचा छुपा राग असतो असंही माझं निरीक्षण मला सांगतं. (बाकीच्या तपशिलांप्रमाणे हेही लिंगसापेक्ष आहेच. पण यांच्या मते पुरुष कधी व्यभिचारी नसतातच.) पण स्त्रीवादानं अलीकडच्या काही दशकांत हातपाय पसरल्यामुळे त्यांची पंचाईत होते आणि त्यांच्यातल्या बायका हल्ली वरवर अशा खुल्या लफडेबाज स्त्रियांचं समर्थन करतात. (त्या बायकांबद्दलचा यांचा राग आणि माझ्याबद्दलचा यांचा राग यांची जातकुळी एकच आहे, हेही माझं निरीक्षण आहे. पण त्याच्या कारणांमध्ये आपण तूर्तास शिरायला नको.) रात्री उशिरा बाहेर राहून आणि तोकडे कपडे घालून मूर्खासारखा बलात्कार करून घेणार्‍या बायकांचाही त्यांना थोडा रागच येतो. बलात्कार्‍याचे लिंग कापावे वगैरे मजेदार्क्रूर सूचना करून ते हा राग समाजमान्य ठिकाणी काढायचा प्रयत्न यथाशक्ती करत असतात. (पुरुषांची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी असते. 'काळजी वाटते' हे त्यांचं पेटण्ट वाक्य असतं.)

या प्रकारच्या लोकांना माझी भीतीही वाटते आणि माझा एक विशिष्ट तिरस्कारही वाटतो असं माझ्या लक्ष्यात आलेलं आहे. त्यांना माझा आधारही वाटतो, हेही एक चमत्कारिक निरीक्षण. जेव्हा परंपरा धुडकावून आणि लोकांची तमा न बाळगणारे निर्णय घ्यायचे असतात आणि त्यात त्यांना पाठिंबा आणि मदत हवी असते, तेव्हा माझी त्यांना आवश्यकता भासते. पण जेव्हा मी काहीतरी व्यवस्थाविरोधी बोलत असते; चाकोरीच्या बाहेरचं पण त्यांच्या सुखवस्तू अवस्थेच्या अंगलट येऊ शकेलसं आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारं मत मांडत असते; किंवा सरळसरळ त्यांच्या आत्मतृप्तीला कोणत्याही प्रकारे असुरक्षित वाटेल असं काही करत असते, तेव्हा मात्र मी जगातलं सर्वांत विध्वंसक चेटूक करणारी हडळ असते आणि खरंतर मला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारलं पाहिजे, तेव्हा पार्श्वभूमीला वाद्यांचा गजर होत असला पाहिजे आणि सगळ्या टोळीने क्रूर आनंदी चीत्कार काढले पाहिजेत अशी त्यांची मनोमन खातरीच पटलेली असते; पण तथाकथित आधुनिक नागरी समाजात राहत असल्यामुळे त्यांना दुर्दैवाने तसं करता येत नाही, शिवाय या इच्छा आणि ठाम खातर्‍या बोलूनही दाखवता येत नाहीत, त्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होते.

राजकारण म्हणजे फक्त मोदी किंवा केजरीवाल किंवा ट्रम्प नव्हे. हे जे काही सूक्ष्मातिसूक्ष्म, तुमच्या बहुतेकदा लक्ष्यातही न येणारं, तरीही सराईतपणे आणि एका विशिष्ट पॅटर्नला अनुसरून तुमच्याकडून स-त-त घडणारं जे आहे; ते राजकारण आहे, हे या लोकांना एकदाच नीट समजावून सांगावं अशी माझी तीव्र इच्छा असते. सध्याच्या ज्वालाग्राही दिवसांत तर फारच. मैत्र्या आणि राजकारण एकत्र आणू नका, रात्री बेरात्री मित्र मदतीला येतात मोदी नाही, असं म्हणण्याची जी चाल सांप्रतकाळी प्रचारात आहे; तिच्या पार्श्वभूमीवर हे ज्ञान पसरवण्याची नितांत गरज आहे.