Thursday, 9 June 2016

जन मार्मिक व्हावा...

ऐसी अक्षरेसाठी या वर्षीही एका विशेषांकाच्या संपादनाच्या मात मी सहभागी झाले होते. विशेषांकाचं नाव होतं पॉर्न ओके प्लीज. नाव खरं तर तसं स्वयंस्पष्ट आहे, त्यामुळे त्याबद्दल अधिक काही बोलत नाही! पूर्ण अंक इथे वाचता येईल. त्यात मी लिहिलेले लेख इथे एका मालिकेत प्रकाशित करणार आहे.

***

पॉर्न-ओके-प्लीज  
लेखांक तिसरा: लावणीबद्दलचा लेख
लेखनसाहाय्य: अमुक

जन मार्मिक व्हावा...

परिचय
सावित्री मेधातुल : अभिनेत्री आणि माहितीपट दिग्दर्शिका; 'व्हजायना मोनोलॉग्स' नाटकाच्या सुरुवातीच्या काही प्रयोगांत सामील; 'नटले तु्मच्यासाठी' या लावणीवरील माहितीपटाचं दिग्दर्शन; मुंबईतलं पाणीवितरण, बेने इस्रायली समाज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा निरनिराळ्या विषयांवर माहितीपट.
भूषण कोरगांवकर : लावणी कलावंतांचं आयुष्य आणि त्यांच्या कलेचं एकमेवाद्वितीयत्व सांगणाऱ्या 'संगीतबारी' या 'राजहंस' प्रकाशित पुस्तकाचं लेखन; 'नटले तु्मच्यासाठी' या माहितीपटाची निर्मिती; निरनिराळ्या नियतकालिकांमधून कथालेखन, तसंच लावणी आणि लावणी कलावंतांबद्दल ललित लेखन.
***
'संगीतबारी' कार्यक्रमातील कलाकार :
पुष्पा सातारकर, सुनिता धोंडराईकर, लताबाई वाईकर, चंद्रकांत लाखे (ऑर्गन/पायपेटी), सुनिल जावळे (तबला), सुमित कुडाळकर (ढोलकी), नासिर शेख (मंच साहाय्यक) आणि शकुंतलाबाई नगरकर.
ध्वनी : रुचिर चव्हाण.
प्रकाश: विलास हुमणे.
छायाचित्रण : कुणाल विजयकर, सचिन यशवंते, प्रीती बकाळकर 
निर्मिती साहाय्य : प्रतिक म्हात्रे, रोशन कोरीआ.
विशेष आभार: राजहंस प्रकाशन (पुणे), आर्यभूषण थिएटर (पुणे), मजिद तांबे (संचालक: आर्यभूषण थिएटर)
***
(शकुंतलाबाई नगरकर (छायाचित्र : कुणाल विजयकर))
मला 'संगीतबारी' या कार्यक्रमाबद्दल कळलं ते अमुककडून. हा कार्यक्रम बघच, अशी त्याची शिफारस उत्सुकता वाढवणारी होतीच. पण खरं दिलचस्प होतं ते त्यानं केलेलं वर्णन.
... शकुंतला नगरकर या साधारण पन्नाशीच्या वाटणाऱ्या बाई मंचावर आल्या. ठळक मोठी चंद्रकोर, टोकदार नाक, गर्दीत दिसला तर 'डबल टेक' करायला लावणारा असा रेखीव, ठसठशीत चेहरा नि उठावदार लालसुर्ख साडी. गाण्यात साथ द्यायला मागे पुष्पाबाई. शकुंतलाबाईंनी गाणं सुरू केलं -
नेसले पीतांबर जरी
जरी गं
जरतारी लाल साडी
पहिली ओळ ऐकताच सूर ओळखीचे वाटले. अरे! ही तर 'वद जाऊ कुणाला शरण'ची चाल!!
कुणी लाल साडीतली यौवना उन्हाळ्यात रानात लाडे लाडे आंबे चाखायला बोलावते आहे असं वर्णन करता करता अचानक -
आम्ही काशीचे ब्राह्मण, द्या हो आम्हां दान घडंल पुण्य
अशा ओळी आल्या आणि मग त्यातली 'आम्ही काशीचे ब्राह्मण' हीच ओळ पकडून पुढली सातआठ मिनिटं शकुंतलाबाईंनी जे काही सादर केलं ते निव्वळ थोर! त्याला कुठल्या अभिनयाच्या शाळेत काय म्हणतील ते माहीत नाही. या पन्नाशीच्या साडी नेसलेल्या बाईनं परकायाप्रवेश का काय म्हणतात ते केल्याप्रमाणे अक्षरश: धोतराचा कासोटा मारलेला, पाण्यात उतरलेला, काशीचा गंध लावलेला, एक कर्मठ शेंडीवाला उघडाबंब गरगरीत ब्राह्मण कशी डुबकी मारेल, अर्घ्य देईल, जानवं फिरवीत आल्यागेल्या बाईकडे कळेल कळेलसा कटाक्ष कसा टाकेल, गडबडून पुन्हा प्रार्थना करण्याचं ढोंग कसं करेल वगैरे लकबी अशा काही खेळून दाखवल्या; की त्या सात-आठ मिनिटांच्या मंतरलेल्या अवकाशात आख्खा मंच काशीचा घाट झाला. आणि हे सगळं फक्त 'आम्ही काशीचे ब्राह्मण' या तीन शब्दांवर घोळवत घोळवत, लोकांची हसून पुरेवाट होईस्तोवर. थेट - स्पष्ट - कडक सलाम! मला एकीकडे मार्सेल मार्सोच्या माइमिंगची आठवण येत होती. वाटलं, या बाई कसलंही संगीत वा सूर नसतानाही काय झकास माइमिंग करतील! पण नकोच ते.. हे तीन शब्दांवर हजारो अदा करून दाखवणं नि आणखी कशाची तुलना नकोच. जे समोर चाललं आहे ते अनन्य आहे.
ही दिलखुलास दाद देणारा मराठी प्रेक्षक खरा, की 'लावणी म्हणजे बाईचा नाद' या शेलक्या शेऱ्यानं लावणीची संभावना करणारा मराठी मध्यमवर्गीय माणूस खरा? खरोखर, या अनन्य लावणीबद्दल मराठी मध्यमवर्ग नक्की काय विचार करत असतो?
शृंगार म्हणजे काहीतरी पाप-गलिच्छ-वाईट-अंधारात करण्याजोगं हा संस्कार आपल्यावर असतोच. लावणी तर शृंगाराची जणू सम्राज्ञीच. अवखळपणा, खट्याळपणा, धसमुसळेपणा, धीटपणा, नाजूक प्रेमभावना आणि विरहाचं तेजाब या शृंगाराच्या यच्चयावत छटांचा परिपूर्ण आणि निस्संकोच आविष्कार तिच्यात असतो. स्त्रीला शतकानुशतकं नाकारलेली गेलेली तिची लैंगिकता त्यातून आत्मविश्वासानं प्रकट होत असते. तरीही मध्यमवर्ग लावणीचं यथायोग्य कौतुक करतो का? 'पिंजरा'सारखा मराठीत अभिजात मानला गेलेला चित्रपट आणि त्याची लोकप्रियता हा एकच ढोबळ निकष घेतला, तरी लावणीबद्दलचं आपलं मानसचित्र सहज उघड व्हावं. हिंदी चित्रपटांमधला गल्लाभरू शृंगार आणि हिंसा राजरोस मिरवली-गौरवली जाते. पण लावणी कलाकार मात्र आपलं व्यावसायिक आयुष्य लपवून आयुष्य काढतात.
यांत कुठेतरी एक मूलभूत अन्याय आहे. श्लीलाश्लीलाचे निर्णय आणि कामभावना या दोहोंना निराळं करून बघणाऱ्या या अंकात लावणीवर होणाऱ्या या अन्यायाबद्दलची चर्चा करणं यथोचित होईल.
तर - सर्वसामान्यांना माहीत असते ती चित्रपटातली लावणी. ती फडावरच्या तमाशातही असते, पण लावणी हा त्या तमाशाचा एकमात्र घटक नव्हे. त्यात गण-गवळण-वगनाट्य-बतावणी असं सगळं असतं आणि खेरीज लावणी असते. लावणी हाच मुख्य आणि एकमात्र कार्यक्रम असतो तो बॅनर शोमध्ये. ते हे काहीसं शहरी कामकरी वर्गाचं मनोरंजन करणारं प्रकरण. नाटकं जशी नाट्यगृहात लागतात, तसेच हे लावणीचे कार्यक्रमही होतात. लाइव्ह म्युझिक असतं आणि त्यावर एकापाठोपाठ एक लावणी नंबर्स पेश होतात. (या कार्यक्रमासाठी वापरलेली परिभाषा ऐकली तरी लक्ष्यात येईल, की हे लावणीचं किती शहरी रूप आहे!)
पण यांखेरीज पारंपरिक लावणीला प्रमुख स्थान देणारी आणखी एक प्रकारची लावणी असते, जिची मुळं थेट पेशवाईतल्या बावन्नखणीपर्यंत मागे जातात. त्यातल्या कलावंतांना अजूनही समाजमान्यता मिळालेली नाही. कसब, कला आणि कष्ट हे तिन्ही अंगी असूनही जिच्यावर काहीसा अन्याय झाला आहे, ती ही लावणी - संगीतबारीची लावणी.
(शकुंतलाबाई नगरकर, पुष्पा आणि सुनीता (छायाचित्र : कुणाल विजयकर))
ती काही ठरावीक थिएटर्समध्येच होते. तिथे एकेका वर्षभराच्या बोलीवर एकेक पार्टी उतरते आणि आपले कार्यक्रम करते. या वर्षभरात थिएटरमध्ये जे कार्यक्रम होतील, त्यांतला अर्धा वाटा थिएटर मालकाला जातो, तर अर्धा वाटा पार्टीचा असतो. मात्र लावणीच्या वेळी जो दौलतजादा होतो त्यावर हक्क केवळ पार्टीचा असतो. याखेरीज खाजगी बैठका होतात. त्या बैठकांतून जी कमाई होते तीसुद्धा थिएटर मालक आणि पार्टी यांच्यात निम्मी निम्मी वाटून घेतली जाते. या पार्ट्या जी लावणी सादर करतात, ती संगीतबारीची लावणी. या लावण्यांमध्ये कमालीचं वैविध्य असतं. सादरीकरणात बैठकीची लावणी, खडी लावणी, नाचाची लावणी, छक्कड असे प्रकार असतात. विषयांमध्ये विविधता असते. थेट आणि आत्मविश्वासपूर्ण लैंगिक अभिव्यक्ती आणि चकित करून टाकणारी अदाकारी असते.
या लावणीवर आधारित असलेल्या कार्यक्रमाच्या प्रेमात पडलेल्या चाहत्यांच्या शिफारसी, पुस्तक वाचून खुलं झालेलं एक नवीन विश्व आणि परिणामी सावित्री-भूषणला गाठून मारलेल्या गप्पाया सगळ्याचं फलित म्हणजे हा लेख.
***
बारी आणि लावणी
लावणीला चांगले दिवस कसे येतील, असा प्रश्न सावित्रीला विचारला. तिचं उत्तर मूलभूत विचार करायला लावणारं होतं.
"दहाएक वर्षांपूर्वीपर्यंतही लावणी शिकायला जाणं या गोष्टीचा आपण विचारही करू शकलो नसतो. पण आता तसं उरलं नाहीय. मुली सररास अशा शिकवण्यांना जातात. मुदलात अशा शिकवण्या असतात! त्यामुळे थोडंफार बदलायला सुरुवात झालेली आहे. पण अजून बराच टप्पा गाठणं शिल्लक आहे, हेही कबूल आहे. हे सगळं काहीसं गुंतागुंतीचं आहे. एकतर तो काही विशिष्ट जातींच्या पोटापाण्याचा उद्योग आहे. हल्ली हल्ली इतर जातीतल्या मुली त्यात यायला लागल्या आहेत. त्यांपैकी भातु-कोल्हाटी जमातीतल्या स्त्रियांनी एकदा घुंगरू बांधले की त्यांचं लग्न होऊ शकत नाही, ही रीत आहे. पण बरं, रीत गुंडाळून ठेवली, बंड केलं आणि राहिली बाई लग्नाला उभी; तरी कोण लग्न करणार तिच्याशी सहजासहजी? एकट्या राहणाऱ्या बायकांना राहायला भाड्याची जागा मिळणं अजूनही मुश्किल असतं हे वास्तव आहे. पुरुषांसमोर धीट लैंगिक अभिव्यक्ती करणारी लावणी खेळून त्यांना रिझवण्याचा उद्योग करून पोट भरणाऱ्या स्त्रीशी लग्न करायला कोण तयार होणार? ते अवघडच आहे. पण गरजा तर सगळ्यांना असतातच. मग त्यात 'मालक' ही संकल्पना येते."
मालक म्हणजे काही काळाकरता एखाद्या स्त्रीनं केलेला प्रियकर म्हणा, वा कागदोपत्री कोणताही करार करता केलेला नवरा म्हणा. बरेचदा हा माणूस आधीच विवाहित, मुलंबाळं असलेला असतो. त्यानं त्याच्या पैशाच्या जोरावर आणि शौकाच्या इच्छेनं बारीमधल्या स्त्रीसोबत दुसरा संसार मांडलेला असतो. ही स्त्री आपल्या मालकासोबत असेल, त्या काळात त्याच्याशी एकनिष्ठ असते. त्याच्याकडून घरदार मिळतं, पैसे मिळतात, मुलं होतात. जोवर दोघांचीही मर्जी असते, तोवर हे नातं टिकतं. एखाद्या वर्षापासून ते साधारण पाच-सात वर्षांपर्यंत हे नातं टिकतं. जन्मभरासाठी कुणी मिळणं हे दुर्मीळच. पण तशी आस कुणाला चुकलीय? नाच करा किंवा लग्न कराअसो! तर - लग्न करायला तयार कोण होणार?
सावित्री पुढे सांगत होती -
"हे संगीतबारीतल्या स्त्रियांचं वास्तव आहे.
दुसरं असं, की लावणी म्हणजे फक्त नृत्य नव्हे. प्रेक्षकांशी संवाद करणं, त्यांना 'खेळवणं', त्यांना शृंगारिक आव्हान देणं - त्यांना भुरळ घालणं हे लावणी 'खेळण्या'चं एक अविभाज्य अंग आहे. तेच लावणीमधून काढून टाकलं तर तिचा आत्माच हिरावून घेतल्यासारखं होईल. तसेही प्रयोग झाले आपल्याकडे. ते लोकप्रियही झाले. पण ती काही खरी लावणी नव्हे. ती लावणीची नक्कल आहे.
प्रेक्षकांचा जिवंत सहभाग हा दुसरा महत्त्वाचा भाग. आताही अकलूजला जी लावणी स्पर्धा होते, त्यात पारंपरिक लावण्यांना फार सुरेख वाव दिला जातो. त्यातून अनेक सुरेख नवीन लावण्या लिहिल्या जाताहेत, जुन्या लावण्या प्रकाशात येताहेत. त्याचा या क्षेत्राला फायदाच होणार आहे, यात दुमत नाही. पण तिथेही हेच. तिथे बाया आणि पुरुष प्रेक्षक चक्क निरनिराळे बसवतात. कारण काय, तर पुरुष शिट्ट्या मारतात ते पाहून बायकांना अवघडल्यासारखं होतं! शक्यतोवर शिट्ट्या मारल्या जाऊ नयेत, एखाद्या मध्यमवर्गीय मराठी नाटकाला दाद दिल्यागत टाळ्या वाजवून दाद दिली जावी, अशी अपेक्षा तिथे असते. कारण आयोजकांना लावणीतलं हे शृंगारिक आव्हान काढून टाकून लावणी 'शुद्ध' करून घ्यायची आहे, तिला पांढरपेशी-परीटघडीची करायची आहे. त्यांच्या दृष्टीनं तो लावणीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
मला ते पटत नाही. मला वाटतं, लावणीतला हा रांगडा-थेट शृंगार ही तिची एक महत्त्वाची ओळख आहे. ती तर मिटता कामा नये. पण लावणीला प्रतिष्ठाही मिळाली पाहिजे. ही कोंडी फुटायची कशी?
त्यावर माझं उत्तर असं आहे - जोवर बाई नाचते आहे, आणि पुरुष दाद देत तिला नजरेनं भोगतो आहे, हे वर्गीकरण मिटणार नाही; तोवर त्यातलं अवघडलेपण जाणार नाही. शेवटी लावणीतला नजरेचा खेळ स्त्रीसाठी आणि पुरुषासाठी असा निरनिराळा थोडाच असतो? तीच नजरबंदी, तेच आव्हान, तीच खुळावणारी भुरळआमच्या कार्यक्रमात पुढच्या ओळींमध्ये स्त्रिया बसलेल्या असतील, तर आम्ही निवेदनात त्याबद्दल सहजगत्या बोलतो. नर्तकीशी संवाद साधताना असं खेळकरपणे सुचवतो, की 'बघा बा, पुरुषच गटवायला हवा असं काही नाहीहल्ली तसं काही राहिलेलं नाही! दिवस बदलताहेत!' त्याला हमखास दाद मिळते. अशाच प्रयत्नांतून लावणीचा आश्रयदाता म्हणजे पुरुष हे समीकरण मोडलं गेलं पाहिजे, असं मला फार वाटतं. मग त्यातला लैंगिक शोषणाचा भाव लुप्त होईल आणि लावणीचं खट्याळ आव्हानही टिकेल. आम्ही प्रेक्षकांना असंही आवाहन करतो, की तुम्ही शांत बसून हा कार्यक्रम पाहणं अपेक्षित नाही. तुम्ही दाद द्या, शिट्या मारा - तुम्ही दाद द्याल, तितका हा कार्यक्रम अधिकाधिक रंगत जाईल. कारण ही देवघेव आहे - संवाद आहे."
राजमान्यता आणि लावणी
फार खोलवर विचार करायला लावणारे मुद्दे होते हे दोन्ही. याच मुद्द्याला धरून अमुकनं लावणीला राजमान्यता मिळण्याचा विषय काढला. तिला महाराष्ट्राची शास्त्रीय नृत्यकला म्हणून राजमान्यता मिळाली; तर लावणीला प्रतिष्ठा मिळेल? तिचे दिवस बदलतील? कलाकारांच्या रोजच्या जगण्यात फरक पडेल? त्यांचं समाजातलं स्थान बदलेल?
भूषणला तसं वाटत नाही. त्याच्या मते -
"आता सरकारनं शास्त्रीय वा उपशास्त्रीय नृत्यकला असं वर्गीकरण बंद केलं आहे. 'भारतातल्या महत्त्वाच्या मंचकला' इतकंच आणि एवढंच वर्गीकरण होतं. नि हे छानच आहे! पण मुद्दा असा की, असं वर्गीकरण आता बाद असल्यामुळे मुद्रा, नवरस वा कायिक अभिनय यांच्या नियमचौकटीत लावणी कितीही अचूक बसत असली; तरी त्यानं काही फरक पडत नाही. बरं, संगीतबारीची लावणी ही मला लोककलाही वाटत नाही. लोक लोकांसाठी जी सहज सादर करू शकतात ती म्हणजे लोककला. तशी लावणी काही लोककला नव्हे. ती मुख्यत्वेकरून विशिष्ट वर्गातल्या लोकांना, त्यातही पुरुषांनाच, उपलब्ध असते. शिवाय ती कोल्हाटी, डोंबारी अशा काही विशिष्ट जातीतल्या स्त्रियाच सादर करतात आणि मुख्यत्वेकरून ती पुरुषांनाच पाहायला मिळते. ही काही लोककलेची लक्षणं नाहीत. फडाचा तमाशा किंवा त्यातली लावणी, याला मात्र लोककला म्हणता येईल.
पण वर्गीकरणाचं एक वेळ बाजूला ठेवा. लावणीला जरी सरकारदरबारी मान्यता मिळाली, तरी त्यानं कलावंतांच्या जगण्यात ताबडतोब फरक पडेल असं मला वाटत नाही. तिथे खरी महत्त्वाची ठरते ती जात. भरतनाट्यम‌ हेही पूर्वी देवदासी समाजातल्या स्त्रियांनी करण्याचं नृत्य होतं. त्याला कुठे होती प्रतिष्ठा? त्यातही शृंगारिकता होती. ती गेली, आणि मग अगदी ब्राह्मण जातीतल्या स्त्रिया ते करू लागल्या, तेव्हाच त्याला प्रतिष्ठा मिळाली. ठुमरीचं काय निराळं आहे? तिच्यातला शृंगार कमी झाला, उच्चवर्गीय स्त्रियाही ती सादर करू लागल्या; तेव्हा तिला प्रतिष्ठा मिळाली. उच्चवर्णीय स्त्रिया लावणी कधी करतील? इथे आपण पुन्हा लावणीच्या 'शुद्धीकरणाच्या प्रक्रियेपाशी' येऊन ठेपतो. ते तर करायचं नाही
शिवाय या समाजातल्या स्त्रियांच्या पोटापाण्याचा तो पेशा आहे. त्यांच्याकडून तो काढून घेऊन मग त्या कलाप्रकाराला प्रतिष्ठा मिळणार असेल, तर त्याचा काय उपयोग? ती याच समाजातल्या स्त्रियांना मिळायला हवी, तर त्याला अर्थ आहे.
कोंडी आहे खरी. पण आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही करत असलेल्या प्रयत्नांमधलं पुढचं पाऊल म्हणजे लावणी कार्यशाळा. त्यात फक्त लावणी नृत्य असतं असा समज नावावरून होईल. पण तसं नाहीय. लावणीची अगदी प्राथमिक माहिती, तिची सामाजिक पार्श्वभूमी, तिच्यातली खास सौंदर्यस्थळं आणि शिवाय प्रत्यक्ष लावणीचं प्रशिक्षण - असं ते असतं. गृहिणींपासून ते कॉलेजमधल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींपर्यंत - होय, होय, मुलंही! फक्त मुलीच नाहीत! - आणि शास्त्रीय नर्तकींपासून ते मुक्ता बर्वे, सखी गोखले, गीतांजली कुलकर्णी यांच्यासारख्या अभिनेत्रीपर्यंत अनेक जण या कार्यशाळेत शिकून गेले आहेत. आनंदाचा भाग हा की, त्यांचं एका कार्यशाळेनं समाधान होत नाही. त्यांना लावणी खुणावत राहते. ते पुन्हा पुन्हा लावणीकडे परतत राहतात."
(वाडा इथे झालेल्या लावणीच्या निवासी कार्यशाळेत अर्चना पटेल, विशाल मोकाशी, मुक्ता बर्वे, अश्विनी, प्रथमेश भोईर, अंकुर बल्लाळ, सावित्री मेधातुल, सोनल खळे (छायाचित्र : सचिन यशवंते))
(वाडा इथे झालेल्या लावणीच्या निवासी कार्यशाळेत अर्चना पटेल, गीतांजली कुलकर्णी, सचिन यशवंते, शकुंतलाबाई नगरकर, भूषण कोरगांवकर, मुक्ता बर्वे, सोनल खळे, अंकुर बल्लाळ, श्रीराम चौधरी (छायाचित्र : प्रीती बकाळकर)
(लावणी कार्यशाळेमधल्या दोन चित्रफिती इथे आणि इथे पाहता येतील.)
लावणी कलावंतांचं जगणं
प्रतिष्ठा इतकी महत्त्वाची असते? माझा टिपिकल मध्यमवर्गीय प्रश्न. मला प्रतिष्ठा म्हणजे व्यासपीठावर जाऊन शाल आणि नारळ घेण्यासारखं काहीतरी निरुपद्रवी नाटक वाटत होतं. काय फरक पडतो त्यामुळे रोजच्या जगण्यात? सावित्रीनं मला थांबवलं. ती मोडनिंबच्या थिएटरवर कामासाठी आठवडाभर मुक्काम ठोकून आलेली होती.
"या बायकांचं जगणं सोपं नसतं.
थिएटरवरच्या आयुष्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तिथे या बायकांना आठवड्यातून फक्त एक दिवस बाहेर पडायची परवानगी असते. खरेदी, डॉक्टर, ब्यूटी पार्लरसगळं त्या एका दिवसात आटपायचं. दिवसा फक्त साडी नेसूनच वावरायचं असा दंडक असतो. सकाळी उठून नाचाचा रियाज, जेवणखाण, मग तयारी, संध्याकाळी थेटरमधला कार्यक्रम आणि मग खाजगी बैठका, असा दिनक्रम लागलेला असतो. अतिशय गुदमरवणारं असं ते वातावरण असतं.
(पिंजरा कलाकेंद्र, वेळे, सातारा (छायाचित्र: कुणाल विजयकर))
त्यात एका प्रकारे अर्थकारण गुंतलेलं असतं. सगळं उत्पन्नच मुळी त्या स्त्रीवर अवलंबून - तिनं बाहेर जाऊन कुणाशी लफडं केलं, ती कुठे निघून गेली, तिनं बाहेर काही मनोरंजन शोधलं आणि ती परतली नाही; तर? हे थेट धंदा बुडण्याशीच - पोटापाण्याशीच येऊन भिडतं! त्यामुळे त्यात ताबा गाजवणं येतंच. पण त्यात संरक्षणाचाही थोडा भाग असतो. या मुली त्यांच्या कुटुंबापासून दूर असतात, त्यांच्यापाशी शिक्षण नसतं, बाहेरच्या जगाबद्दल काही ज्ञान नसतं; त्यांना कुणी काही केलं तर जबाबदारी कोण घेणार? शेवटी थिएटर मालक आणि पार्टी हेच त्यांचं त्या काळातलं कुटुंब असतं. त्यामुळेही ही बंधनं येतात. पण परिणती अशी होते, की या मुलींना बाहेरच्या जगाचं भान नसतं, त्यात स्वतंत्रपणे वावरण्याची सवय नसते.
त्यांच्याकडे आर्थिक शहाणपण टक्केटोणपे खाऊन आलेलं असलं, तरी त्याकरता कोणतीही संस्थात्मक मदत त्यांच्यापर्यंत पोचत नाही, पोचलेली नाही, हे वास्तव आहे. वास्तविक त्यांना आरोग्याबद्दल भान आणून देण्याची गरज आहे, तत्संबंधी मदत मिळवून देण्याची गरज आहे. फक्त शरीरसंबंध आणि एड्स या दृष्टीनंच नव्हे, पण त्यांचे गुडघे-कंबर-पाठ-नियमित झोपेची गरज - अशा सगळ्याच बाबतींत. पण त्यांचा विमाही उतरवलेला नसतो. त्यांच्याकडे पुरेसं शिक्षण नसतं. ते देण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. वास्तविक त्यांना ते आता गरजेचं वाटू लागलं आहे. आमच्याकडे तशी विचारणा होत असते. साधे बचत गटासारखे आर्थिक कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. त्यांची बॅंकेत खाती असली, तरी बहुसंख्य व्यवहार रोखीनं होतात.
आमच्या कार्यक्रमात मात्र आम्ही त्यांना कोणत्याही कलाकारासारखं स्वतंत्रपणे वागवतो, प्रत्येकीचं पैशाचं पाकीट प्रत्येकीच्या हातात देतो, त्यांना लोकांशी बोलाचालायला उद्युक्त करतो. आता कुठे वर्षभरानंतर थोडाफार फरक पडायला लागला आहे. त्यांच्या वागण्यात थोडा मोकळेपणा, थोडी सफाईदार झिलई, कपड्यालत्त्यात थोडं स्वातंत्र्य यांची चुणूक दिसायला लागली आहे. त्यांच्या नृत्यात तो मोकळेपणा दिसायला लागला आहे. बुजरेपणा कमी झाला आहे. अर्थात - तरी थिएटर मालकांची आणि या मुलींच्या मालकांची भीती असते! त्यांना कुणी जीन्स घालून बाहेर वावरताना दिसलं, तरी 'हे धंदे करतेस तू बाहेर?' असा ओरडा होतो! विसंगती आहे, कबूल आहे. पण इलाज काय! मग आम्ही त्यांच्याशी बोलतो, त्यांना थोडं शांत करतो, थोडी लाडीगोडी लावतो! ते निवळतात. आम्हांलाही हळूहळू मालकांची मर्जी सांभाळायची सवय झाली आहे!"
लावणीनंतरचं आयुष्य : निवृत्ती
या बायकांचं म्हातारपणीचं आयुष्य कसं असतं, असा प्रश्न आम्हांला होता. जोवर पायात धमक आहे, तोवर ठीक आहे. नंतर? निवृत्तीच्या आयुष्याचं काय? या प्रश्नावर भूषण मिश्किल हसला.
"किती खितपत पडणारं आयुष्य असेल त्यांचंअसं वाटतं ना? मलाही असं वाटायचं! त्यांची अखेर किती उपेक्षित, निष्कांचन, दयनीय असेलमी उगाच कीव करत असे त्यांची. पण तसं काही नसतं! खरं म्हणजे दोन प्रकारची निवृत्ती असते - एक म्हणजे मालकानं घरी बसायला सांगितलं, तर नाचणं संपलं. मग घरी बसायचं. पण त्या मालकाशी पटलं नाही वा मालक तुटला वा मालकानं सोडलं - की पुन्हा नाचायला उतरायचं. असं आत-बाहेर सतत चालू असतं. त्यातली अनिश्चितता गृहीतच धरलेली असते. दुसरा प्रकार म्हणजे वयामुळे घेतली जाणारी निवृत्ती. पण ही निवृत्ती घेण्याचं वय येतं, तोवर बाई आर्थिक दृष्ट्या स्थिर झालेली असते. कारकिर्दीत मुलांची शिक्षणं, लग्नकार्यं, गावी शेतीवाडी, घर बांधणं, काहीतरी उद्योग असं सगळं बयाजवार झालेलं असतं. बहुतेक जणी हे नीट जमवतात, सगळ्यांनाच जमतं असं नाही. पण एकतर प्रतिष्ठा नसतानाही मुलंबाळं मोठी करणं, लोकांच्या भोचक चौकश्यांना लपवाछपवी करत वा करता तोंड देणं, अनिश्चिततेला तोंड देणं; यांतून त्यांच्यात जगण्याचं एक निराळंच शहाणपण-चतुरपण आलेलं असतं. घुंगरू आणि पैसे इतकंच भांडवल त्यांच्यापाशी असतं. त्यामुळे त्या आलेल्या पैशांचा उत्तम विनियोग करतात. पैसे कमवण्यापासून त्याची नीट व्यवस्था लावण्यापर्यंत आणि मुलंबाळं जन्माला घालण्यापासून आपल्या कुटुंबाचं उत्तम पालनपोषण करण्यापर्यंत त्या सगळं काही करतात. स्थैर्याचं, स्वाभिमानाचं म्हातारपण घालवतात. अनेक जणींवर अनेक प्रकारचं शोषित, अस्थिर आयुष्य जगण्याची पाळी येते हे खरं. पण त्या रडत बसत नाहीत. जिद्दीनं, हसत उभ्या राहतात."
या सगळ्या गप्पांदरम्यान मला राहून राहून प्राचीन भारतातलं गणिकांचं वर्णन आठवत होतं. त्याही चतुर, अष्टावधानी, बहुश्रुत, रसिक, कलावंत इत्यादी असत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे - राजसत्तेच्या आश्रयाला असतानाही त्या लिंगभेदाच्या पलीकडचं स्वातंत्र्य मिळवणाऱ्या स्त्रिया असत. त्यांना रूढार्थानं सामाजिक प्रतिष्ठा नसे. पण संसारादी मार्गांनी मिळणाऱ्या चाकोरीबद्ध प्रतिष्ठेची गरजच पडू नये असं स्वतंत्र आयुष्य त्यांनी घडवलेलं असे. नेमकं हेच निरीक्षण पॅरिसमधल्या वेश्यांबद्दलही नोंदलं गेलं आहे. पण भारतीय संदर्भात कधीही विसरता येण्यासारखी एक गोष्ट इथेही आहेच. जातिवास्तव. या व्यवसायात येताना परिस्थिती तसंही निवडीचं स्वातंत्र्य कुणालाच देत नसते, पण परंपरेनं तिला शोषणाचा आणखी एक क्रूर वळसा मिळतो. परिस्थिती ओढवलीच दुर्दैवानं, तर कोणत्याही प्रकारचं शिक्षण वा पाठबळ नसलेली ब्राह्मणाची बाई काय करते? ती निरुपायानं पोळपाट-लाटणं हाती घेते. तिच्या पायात घुंगरू बांधले जात नाहीत. हे खास भारतीय व्यामिश्र वास्तव.
पण तरीही - लैंगिक स्वातंत्र्य आणि भौतिकदृष्ट्या समृद्ध आयुष्य - मग ते अपार कष्टांनी कमवलेलं का असेना - असेल, तर स्त्री परंपरेचं जोखड ओलांडून जाते - जाऊ शकते, असं तर नाही ना? मला निष्कर्षाचा मोह पडतो. आणि पाठोपाठ आपण या शोषक-शोषित व्यवस्थेचं उदात्तीकरण तर करू पाहत नाही ना, असा आत्मपरीक्षण करायला लावणारा धारदार प्रश्न.
उत्तर मला अजूनही सापडलेलं नाही. असो.
लावणी आणि लैंगिकता
लावणीतून व्यक्त होणाऱ्या शृंगाराच्या विशेष धीटपणाबद्दल आम्हांला कुतूहल होतं. नियम सिद्ध करणारा एखाद-दुसरा अपवाद वगळता या लावण्या लिहिलेल्या असतात त्या पुरुषांनी. त्यांत शरीरसंबंधांचं अतिशय थेट असं वर्णन असतं. क्वचित बीभत्स होऊ शकतील, असे शब्द असतात. त्यांच्यावर अदा करताना ती आकर्षक-दिलखेचक करायची, पण ओंगळ-अश्लील-बीभत्स होऊ द्यायची नाही, ते जणू आपलेच शब्द असावेत अशा आत्मविश्वासानं आणि नाजूक पद्धतीनं सादरीकरण करायचंही एक निराळीच कला आहे. त्याबद्दल आम्हांला बोलायचं होतं.
भूषणनं एक मार्मिक निरीक्षण नोंदवलं.
"शब्द जेव्हा खूप धीट असतात, तेव्हा अदा साधी-मृदू-अस्फुट असते. आणि जेव्हा शब्द अगदी साधेसुधे असतात, तेव्हा अदा उत्तान असते.
यशोदा का नंदलाला
जू जू जू जू जू जू जू...
हे चित्रपटातलं एक अंगाईगीत आहे. आता हे किती साधे, वात्सल्यपूर्ण शब्द. पण ती अंगाई अतिशय शृंगारिक पद्धतीनं सादर केली जाते. असा तोल सांभाळणं हीच लावणीची गंमत आहे. तो साधणं त्यांना उपजतच जमतं. तो काही कुणी कधी बसवून शिकवलेला नसतो त्यांना. समतोल आणि विषमतोल हे आपण आता केलेलं विश्लेषण-विच्छेदन. त्यांच्या दृष्टीनं 'त्यात आणि काय सांगायचं? ते असंच करायचं असतं!' असा साधासरळसोपा मामला असतो! त्या बोलता बोलता थेट करूनच दाखवतात! तो पारंपरिक लावणीतून, एका पिढीनं दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवलेला वारसा आहे."
'संगीतबारी' पुस्तकातला एक महत्त्वाचा भाग इथे देणं अतिशय उचित होईल.
संगीतबारी, भूषण कोरगांवकर, राजहंस प्रकाशन
***
कालच्या आणि आजच्या कलेत अजून एक मोठा फरक पडलायलावण्यांच्या शब्दांमध्ये. पूर्वी अनेक विषयांवर लावण्या लिहिल्या जात होत्या. शृंगारिक, आध्यात्मिक, शिवाय देशभक्ती, वात्सल्य, वर्णनात्मक अशा विविध भावना दाखवणाऱ्याही काही लावण्या होत्या. दगलबाज प्रियकराबद्दल काही भाष्य करणाऱ्या दोन लावण्या माझ्या पाहण्यात, ऐकण्यात आल्या...
हे झालं भ्रमनिरास झालेल्या एका स्त्रीच्या हृदयीचं रुदन. दुसऱ्या बाईच्या नादी लागलेल्या आपल्या नवऱ्याबद्दल मांडलेली ही आहे कैफियत. फुलांनी सजवलेली शेज आता नुसती पडून आहे, कारण तिचा सार्थ सन्मान करणारा माझा सखा आता माझा राहिलेला नाही. त्याची बेईमानी मला कळून चुकली आहे.
दुसऱ्या स्त्रीशी संग करून त्याने माझा मानभंग केला आहे. असं वाटतंय की जणू त्याने माझा जीवच घेतलाय.
शेज मंचकी, व्यर्थ राहिली रे
शेज मंचकी...
कळूनी आला बईमान
कापिली मान,
ओवुनी प्रान, माझे आन
नवीन पाहिली सवत कोनती
तिनी मोहून, वचन देऊन
भुलला पाहून, थाप देऊन, हाक देऊन
ममता दाविली प्राणमंदिरी
बसुनी शांत पाहते अंत
माझे नाथ कसे निवांत, कसे निवांत
पाहुनी भ्रमला प्राणमंदिरी
हे शब्द जेव्हा एक लावणी गायिका तुमच्यासमोर पेश करते, तेव्हा त्यातल्या उघड विरोधाभासामुळे ते एका वेगळ्याच उंचीवर जातात. म्हणजे प्रत्यक्षात दुसऱ्या स्त्रीचा दर्जा असलेली स्त्रीच जेव्हा हे पहिल्या प्रेयसीचं दु: अनुभवते, तेव्हाच समजून येतं की शेवटी फसवणूक झालेल्या सगळ्यांची मन:स्थिती ही सारखीच असते. फसवणूक झालेली व्यक्ती, मग ती स्त्री असो वा पुरुष, विवाहित असो वा अविवाहित, आपलं माणूस दुसऱ्याच्या बाहूपाशात रममाण झालेलं पाहतानाचं दु: किती तीव्र असतं याचा एक सुंदर आलेख त्या लावणीत अनुभवास येतो.
...
या विषयावरची मी पाहिलेली दुसरी लावणी 'तुझं रं नाही होणार कल्याण' मात्र 'शेज मंचकी'च्या पहिल्या चौकाइतकी संयत नाही. त्यातली स्त्री आक्रमक आहे. मला दगा दिलास ना, आता बघ तुझ्या नशिबाचे फेरे कसे उलटे पडतील ते, तू देशोधडीला लागशील, असं सांगणारी ही नायिका सूडाच्या आगीने पेटून उठलेली आहे. रेशमा परितेकरने सादर केलेली ही लावणी पाहून स्वत: असा अपराध कधी केलेला नसतानाही तिचे शिव्याशाप ऐकून मनाचा थरकाप उडतो. बांगड्यांनी भरलेले हात जेव्हा स्टेजवर जोरजोरात आपटून आरती जावळे 'भोवंल तुला माझा तळतळाट' म्हणते, तेव्हा ते ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. हे यश जितकं रेशमा-आरतीच्या सादरीकरणाचं, तितकंच त्यातल्या कठोर शब्दांचंही आहे. या लावणीचा शेवटचा अंतरा मात्र गमतीशीर आहे.
खेळ खेळू विटी-दांडू न् भवऱ्याचा
शेवट काय करशील नवऱ्याचा
यातले 'खेळ खेळू विटी' हे तीनच शब्द भरपूर वेळ घोळवले जातात. विटी-दांडूचा खेळ यथेच्छ खेळून झाल्यावर, दमल्या-भागल्यावर तिला प्रश्न पडतो, एवढं फसवणाऱ्या या क्रूर, लबाड नवऱ्याचा शेवट कसा बरं करावा?
शृंगार या एकाच विषयाला वाहिलेल्या तर असंख्य लावण्या पूर्वी होत्या. शृंगाराच्या तर्‍हा तरी केवढ्या. सलज्ज स्त्री-आक्रमक पुरुष, आक्रमक स्त्री-लाजाळू पुरुष, दोघे आक्रमक, दोघे लाजाळू, शांत अशा वेगवेगळ्या जोड्या त्यांत असायच्या. आजच्या तुलनेत हा शृंगार जास्त थेट आणि जास्त तपशीलवार होता. वानगीदाखल काही ओळी पाहा :
'नका चोळू, जोबन हुळहुळी गं...'
'शिंगेवरती स्वार शिपाई, कमवुनी घ्या शिंगेला
आसनामध्ये आसन दाटले असे भासले मजला...'
'आवळून कवळून धरिते सख्याला, मुखामध्ये मुख घाला
कंबर उचलुनी देते सख्याला, मानेखाली हात घाला...'
'कवळे स्कंद, चुरी गेंद, होउनी धुंद, सदा फुंद...'
'कळ साहीना, मदन साचला...'
'इश्क लहर, चार प्रहर, जाहला भार, वारंवार...'
'दोन्ही मांड्यांमध्ये मांस दडपता वेणीचा बुचडा सुटला,
मानेवरती चोळी जिरली, कमरेस हासडा बसला...'
'
हळूहळू चालवा, पाझर भरवा, सुटंल वरच्यावरी
सख्या आला ओघळ मांड्यांवरी...
ओले लुगडे झाले उघडे खिसणीनं आंबा खिसा
राया तुमच्या धोतरानं डाग हा पुसा...'
हे सगळं ऐकून आजच्या द्व्यर्थी लावण्या फार फिक्या, मिळमिळीत वाटू लागतात. या जुन्या लावण्यांसारखंच शारीर गरजांचं, इच्छांचं, क्रियांचं थेट वर्णन हे भारतातील इतर कलाप्रकारांतही काही प्रमाणात आढळतं. परंतु तिथे ते देव आणि त्याची भक्त या स्वरूपात येतं, नायिकेच्या देवभक्तीचा एक प्रकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तीच कामना, तीच क्रिया, पण ती राधाकृष्णांची किंवा इतर देवांची बनून आली की तिला एक प्रकारचं दिव्यत्व येत असावं. किंबहुना नायिका म्हणजे इहलोकीची माणसं, आणि नायक म्हणजे परमेश्वर असं रूपकच योजलेलं असतं. लावणीत मात्र जे काही घडतं, ते हाडामांसाच्या माणसांत घडतं. स्वत:च्या लैंगिकतेला लपवण्याचे, दाबण्याचे संस्कार आपल्यावर सतत होत असल्यामुळे, अभिजनवर्गाला इतर कलांमधली रूपकं श्रेष्ठ वाटतात आणि लावणीतला थेटपणा कमी प्रतीचा वाटतो.
शकुंतलाबाई नगरकरांचा या बाबतीतला किस्सा इथे नमूद करावासा वाटतो...
..."जेमतेम सोळाची असंन. एके दिवशी बैठकीत त्या लावणीची फर्माईश झाली. मी गाऊ लागले.
निवळ चिमणी हो निवळ चिमणी मदनमस्ता
फोडुनी गल्ली पार, खोदिला रस्ता
नेउनी एकान्ती
लिंग हो काढिले
मला हसू येते
हे काय मांडिले
असे काय-काय शब्द होते. 'निवळ चिमणी' म्हणताना मी आपली उडणाऱ्या चिमणीची अ‍ॅक्शन सुरू केली. फर्माईश करणारा माणूस मोठा दर्दी होता. त्यानं खऱ्या अर्थाची ती किळसवाणी अ‍ॅक्शन करून दाखवली. मी लाजेनं चूर. तो हटूनच बसला. शेवटी आईनं त्याला हात जोडले, म्हणाली, हिला काही ते जमायचं नाही, आपण दुसरी लावणी घेऊ या."
सगळ्या खूप हसत होत्या.
"हा एक वाईट अनुभव झाला. पण अशे कित्येक चांगले रसिक त्या काळी होते, जे आमचं काही चुकलं, तर स्वत: करून दाखवायचे. कलेची खरी जाण तेव्हा होती. आमच्या चुका होऊ नयेत म्हणून ते धडपडायचे. कुठून-कुठून नवीन गाणी, त्यांची माहिती असं साहित्य आणून द्यायचे. कित्येक गोष्टी मी अशा रसिकांकडूनच शिकल्ये. आम्ही सगळं आत्मसात करून त्यात आपली भर घालून, नवीन आणि चांगलं काही पेश केलं की ते इतके खूश व्हायचे, की ती खुशी पाहूनच आम्ही भरून पावायचो."
"आज या चावट लावण्या बंदच झाल्यात ना?" मी म्हटलं.
"आजच्या मुलींना लाज वाटते. त्या सरळ सांगतात, जमणार नाही म्हणून. अन् त्यांनी केलं तरी ते बघायला प्रेक्षक बी राहिले नाहीत ना तश्ये. निवळ चिमणी गलिच्छच होती. पण बाकी किती चांगल्या चांगल्या लावण्या होत्या, त्या सगळ्या मागं पडल्या. आता तुम्ही जे रोज आवडीनं करता, त्यावर लावणी बनवली तर ती लगेच अश्लील कशी काय होऊ शकते? आज हिंदी पिक्चरमध्ये जी गाणी दाखवतात, ती आख्खं कुटुंब एकत्र बसून बघतं. म्हणजे लोकांना अश्लील वाटत नाही. तर मग आमची लावणी बी अश्लील नाहीच." त्यांचा मुद्दा बिनतोड होता. मधुकर नेराळेंच्या मते खजुराहोच्या मंदिरातली संभोगशिल्पं अभिजात आणि लावणीतलं संभोगवर्णन मात्र कलाहीन हे कुणी ठरवायचं?
शकुंतलाबाईंनी सादर केलेली 'सोडा सोडा राया' ही लावणी अशीच भन्नाट आहे. इश्काने पागल झालेला आपला यार कसा नको जीव करून सोडतो याचं मोठं खुमासदार वर्णन यात आहे.
सोडा सोडा राया, तनू शिणली
वेणी सुटली, निरी फिटली
तरी तुमच्या मनाची शांती नाही झाली
दमली न् झाले बाई मी
तरी मला सोडीना
घामानं काया सारी भिजली
सोडा सोडा राया, तनू शिणली
आवळुनी धरिता
कवळुनी धरिता
चुंबन घेता
दंत रुतले गालीऽऽ
साऱ्या अंगाची बाई माझ्या कमान करिता
पोटात माझ्या कळ रुतली
या चावट शब्दांवरचा शकुंतलाबाईंचा अभिनय थक्क करणारा असतो.


...
दूर देशी गेलेल्या पतीमुळे त्याची पतिव्रता कशी झुरत्ये याचं वर्णन करणाऱ्या लावण्यांमध्ये तिच्या शरीराच्या भुकेचंही तपशीलवार वर्णन असे. सगनभाऊंच्या या लावणीतली ही गरती स्त्री आपली अवस्था सांगताना म्हणते,
कामचेतना झाली शरीरी, विशेष आग्न होती
कंबरेतुनी निऱ्या भिजल्या, चोळीत भिजली छाती
मस्तीमध्ये गजराज टोचितो भाले जखमांवरती
त्या जखमांचा गुमान नाही, झुलत चालला हत्ती
मी बाहेर पडल्यावर लोक तमाशा पाहती
तशीच कळ सोशिते, परंतु आम्ही अबरूच्या गरती
माझे मला भासते, पतीवीण झोप लागेना नयनी, महालातुनी
मोहनाबाईंनी जी लावणी खेळून मुंबईतल्या रसिकांना घायाळ केलं होतं, त्या 'सुकुमार गुलाबाच्या फुला' या लावणीत तर 'वुमन ऑन टॉप' हे आसनही सांगितलं आहे.
आणखी एक, बाई, सांगिते मी मजा
बाई, खाली तुम्ही निजा
वरुनी मी हो जुगते, वरुनी मी हो जुगते...
खाली उतरायाच्या वेळी आला-बला घेते
कमरेसी घाला जरा मिठी
करा हो झटपटी, घाईला मी येते
मुळात इथे एक भूमिकांची मस्त अदलाबदल (रोल रिव्हर्सल) आहे. आपल्या साहित्यामधून पुरुषाचं चित्र नेहमी राकट, धिप्पाड, कणखर असं रंगवलेलं असतं, आणि स्त्रीचं नाजूक, सुगंधी फुलासारखं! पण या लावणीत नायिका आपल्या प्रियकराला चक्क 'सुकुमार गुलाबाच्या फुला' अशी हाक मारत्ये. स्त्रीचं सामर्थ्य आणि तिला असलेला समान दर्जा लावणीतून असा सतत दिसून येतो.
अजून एका लावणीतल्या नायिकेला स्वत:चा संभोग आरशात पाहायची इच्छा झालीय आणि हे करण्यास पतीस ती विनवणी करतेय,
आसन आरशात मला पाहू द्या...
या सगळ्या लावण्या, हे सगळे शब्द बहुसंख्य वेळा पुरुषांनी लिहिलेले असले, तरी त्यात स्त्रियांची लैंगिकता फार उघडपणे मांडलेली आढळते. भलेही ते पुरुषरंजनाकरताच लिहिलेले असू दे, भलेही त्यात स्त्रीच्या भावनांच्या अभिव्यक्तीचा हेतू नसू देत. परंतु पुरुषाने लिहिलेले हे शब्द, जेव्हा एका स्त्रीच्या तोंडून तुमच्यापर्यंत येतात, तेव्हा ती त्यात स्वतःची अशी काही भर घालते, की ते तिचे स्वत:चेच होऊन जातात. त्यामुळे लावणी म्हणजे समर्थ स्त्रियांची सशक्त अभिव्यक्तीच बनून जाते. ज्याने अशा एखाद्या ताकदीच्या कलाकाराने खेळलेली शरीरसंबंधावरची लावणी प्रत्यक्ष पाहिली आहे, त्यांनाच हे जाणवू शकेल.
...
[या लावणीतली]... नायिका आज कुठे गेली? नहाण येण्याच्या प्रसंगाचं वर्णन करणाऱ्या बऱ्याच लावण्या होत्या. एका लावणीत नायिका स्वत:च्या मासिक पाळीचं कारण सांगून सख्याला चतुराईनं दूर ठेवते. ही लावणी सादर करताना त्या काळी स्त्रिया पांढरी शुभ्र साडी नेसत आणि तोंडात पानाची पिंक ठेवीत. 'झाले दूरशी' ही ओळ आली की निरीवर पानाची पिंक टाकून तो लाल रंगाचा परिणाम साधत. आजच्या आधुनिक काळाचे परिमाण लावल्यासदेखील ते काळाच्या पुढचंच वाटतं.
माहेरी येऊन जुन्या प्रियकराकडे जाऊन त्याला 'वन लास्ट टाईम' संग करण्याची विनवणी करणाऱ्या, पतीला विविध आसनं शिकवणाऱ्या, त्याला शृंगारातली मजा दाखवणाऱ्या, त्याची थट्टा करणाऱ्या, स्वत: पुढाकार घेऊन त्याला मार्ग दाखवणाऱ्या नायिका आज का गप्प झाल्या?
आज या जुन्या धीट लावण्या बंदच झाल्या आहेत. त्या सादर करण्यासाठी एका निराळ्याच दर्जाच्या आत्मविश्वासाची गरज असते. एक प्रकारचा बेधडकपणा आणि थेटपणा अपेक्षित असतो. तो आजच्या मुलींकडे आहे का? नक्कीच आहे. मग या लावण्या आज मागे का पडल्या?
लावणी आणि प्रेक्षक
आज ही लावणी कुठे गेली, या प्रश्नाचं उत्तर गुंतागुंतीचं आहे, काहीसं गैरसोयीचंही आहे. त्याचा थेट संबंध शब्दांकडून प्रतिमाप्रधान माध्यमांकडे झुकत गेलेल्या, बटबटीत होत गेलेल्या आपल्या अभिव्यक्तीशी लागतो. ते मनात घोळवत पुढच्या प्रश्नाचा विषय काढला. प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल मी चिकार ऐकलं होतं. शहरातले प्रेक्षक, ज्यांना लावणीची सवय नाही, ही शुद्ध केलेली खट्याळ लावणी त्यांना किती रुचते, किती पचते, किती रंगते? असे अनेक प्रश्न मला पडले होते. प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिल्यानं अजूनच उत्सुकता.
सावित्रीच्या मते -
"आमचा कार्यक्रम लहान सभागृहात उत्तम रंगतो. कारण शेवटी तो बैठकीच्या नृत्याचा प्रकार आहे. मोजके प्रेक्षक, प्रेक्षक शक्य तितका जवळ असणं आणि दाद देणारा प्रेक्षक असणं या तिन्ही गोष्टी असतील, तर अर्थातच तो अधिक रंगतो. मोठ्या सभागृहात तो रंगत नाही असं नाही. दिल्लीतल्या अमराठी प्रेक्षकांनी आम्हांला छप्परतोड प्रतिसाद दिला. एक सरदारजी गृहस्थ तर शकूताईंसोबत नाचायला जवळजवळ रंगमंचावरच आले होते!"
(साठ्ये महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा दिलखुलास प्रतिसाद (छायाचित्र : कुणाल विजयकर))
***
भूषणही अमराठी प्रेक्षकांच्या कौतुकात उतरत सांगायला लागला -
"हेही एक गमतीदार निरीक्षण - आमच्या कार्यक्रमाची मजा लुटायसाठी मराठी भाषा अवगत असलीच पाहिजे, असं काही नाही! अमराठी प्रेक्षकही त्याची मनःपूत मजा लुटतात. 'आपल्याला मराठी आलं असतं, तर अजून किती मजा आली असती ना…' अशी हळहळ त्यांना वाटते. भाषेची गंमत त्यांच्याकडून हुकतेही. पण तरीही ते कार्यक्रमावर खूश असतात. एका ब्राझिलियन रंगकर्मी माणसानं तर आमच्या कार्यक्रमाचं इतकं सुंदर विश्लेषणात्मक कौतुक केलं होतं - "पारंपरिक घाट, समकालीन टिप्पणी आणि साथीला त्या स्त्रियांच्या आयुष्याची खरीखरी गोष्ट - हे तुम्ही इतकं सुंदर सादर करता! त्यातून त्या बाईला तुम्ही प्रतिष्ठाच देत असता…" हे कौतुक ऐकून आम्हांला अगदी धन्य धन्य झालं होतं! इतकं भारी विश्लेषण तर आम्हीही करू शकलो नसतो आमच्या कार्यक्रमाचं. नि हे त्याला मराठी येत नसताना - मराठी काय कोणतीही भारतीय भाषा येत नसताना. तसाच आमच्या एका कार्यक्रमाला एक ऑस्ट्रियन रंगकर्मी होता. त्याच्याशी नंतर बोलताना आम्ही त्याला सांगत होतो, आम्ही भाषांतर करण्याच्या प्रयत्नात आहोत. तर पठ्ठ्या म्हणे, "छे! काही गरज नाही. मला भाषा कळत नसली तरी तुम्ही कशाबद्दल बोलताहात, ते किती संवेदनशील-नाजूक विषयावरचं आहे, त्यात किती खोलवरचं विरेचन आहे, हे अगदी नीट कळत होतं मला. प्रेक्षकांचं हसणं-खिदळणं-मजा-मस्ती असूनही हा गंभीर धागा लपत नाही त्या कार्यक्रमातला." बास! अजून काय हवं? त्यानं आमच्या बायांना येऊन मिठ्या मारल्या, गालांवर मुके घेतले, त्यांचं अभिनंदन केलं - त्यामुळे आमच्या बायकाही खूश, तोही खूश आणि आम्हीही खूश. नंतर किती दिवस कुणीतरी गोरं दिसलं की आमच्या बायका त्याची आठवण काढायच्या!"
भूषणच्या पोतडीत अजूनही एक गंमत होती.
"पिरामल गॅलरीत आम्ही एक कार्यक्रम केला होता. लोअर परेलची ती आर्ट गॅलरी. 'पुरुषी नजर' असा विषय घेऊन त्यांनी काही कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यात संगीतबारी आणि त्याबद्दलची चर्चा असा एक दिवस होता. त्या कार्यक्रमात शृंगाररसाबद्दलही चर्चा झाली. शृंगार दाखवण्याचे काही विशिष्ट हावभाव असतात. बाईने छाती आणि कंबर उडवणं यातूनच शृंगार दाखवला जातो असा आपला एक समज आहे. पण ते तितकंच सीमित नसतं. शकूताईंनी काशीच्या ब्राह्मणाची व्यक्तिरेखा करून दाखवणं - त्यात त्या पूर्ण पुरुषी व्यक्तिरेखा उभी करतात. आणि त्यातून शृंगाराचा एक निराळा पैलू प्रेक्षकांना अनुभवता येतो. पुरुषी नजरेतून ठरीव होत गेलेल्या शृंगाराचा साचा तर यातून मोडला जातोच. पण हे एका प्रकारे 'मेल गेझ'ला - पुरुषी नजरेला - पार उलटपालट करून टाकणारंही आहे. लावणीत हा परकायाप्रवेशाचा धागा आहेच. पूर्वी ढोलकी-फडाच्या तमाशात पुरुष बाई बनून नाचायचे. आता 'बिनबायकांच्या तमाशा' ते सूत्र आपल्याला पुन्हा भेटतं. ('न्यू यॉर्कर'मधली बातमी.) हे खास लावणीचं सामर्थ्य आहे."
आज या सामर्थ्याचं काय झालं आहे?
'नटले तु्मच्यासाठी'मध्ये शकूताई याबद्दल जे काही बोलतात, ते कमालीचं मार्मिक आहे.'संगीतबारी' या पुस्तकात भूषणने एक गंमतीदार किस्सा सांगितला आहे. 'जवळी यावं, मला पुसावं, गुपित माझं खुशाल...' हे 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल' या प्रसिद्ध लावणीतले शब्द. त्या शब्दांवर कुणी नवखी नर्तकी नाचत असलेली. तिनं 'पुसाल' या शब्दावर काय अदा करावी? टॉवेलनं अंग खसखसून पुसण्याचा अभिनय!
हे वाचून हसू येतं खरं. पण वास्तविक ते अतिशय विदारक असं वास्तव आहे. दोन शब्दांच्या मधल्या अतिशय नाजूक जागा टिपण्याचं आणि व्यक्त करण्याचं अनन्य सामर्थ्य असलेला हा नृत्यप्रकार. तो आज कुठे येऊन पोचला आहे? कुणी याचा प्रतिवाद म्हणून अकलूजच्या स्पर्धेचं वा खुद्द सावित्री-भूषणच्या कार्यक्रमाचं आशादायी उदाहरण देईल. पण शेवटी हे दोन्ही प्रवाहाविरुद्ध चाललेले प्रयत्न आहेत. अपवादात्मक आहेत. त्यानं नियमच सिद्ध होतो. लावणीच्या क्षेत्रातल्या अस्तंगत होत चाललेल्या पारंपरिक कलावंतांवरूनही हाच नियम सिद्ध होईल, की लावणीचं हे सामर्थ्य जपण्यासाठी आज कुणापाशीच वेळ नाही. जातीचं वर्चस्व मोडायला लागलं आहे, हे चांगलं आहेच. पण परंपरेनं दिलेल्या वारशाचा चांगला भागही त्यासोबत लुप्त होऊ लागला आहे. हातात पैसे खेळवणारं नवश्रीमंत गिर्‍हाईक आज संगीतबारीचा प्रमुख प्रेक्षक आहे. त्याला लावणीबद्दलची ही जाण आहे? त्या प्रेक्षकाला रस आहे तो मन रिझवणारी, सुरेख दिसणारी आणि नाचणारी एखादी मराठमोळी मैत्रीण झटपट, तात्पुरती आणि हमखास मिळवण्यात. तो साहजिक त्याच्या आवडत्या हिंदी गाण्यांची फर्माईश करतो आणि दिसेल ते पदरी पत्करून पवित्र होतो. गिर्‍हाइकाच्या दौलतजाद्यावर कलाकाराचं पोट असल्याने कलाकारही या दुष्टचक्राचा भाग होतो. मराठी सिनेमे आणि सिनेमातली 'आयटम सॉन्ग'ही ह्या प्रक्रियेला हातभारच लावताहेत. 'देऊळ' चित्रपटातलं 'वेलकम हो राया वेलकम' आठवा. मादक गीतामधला सगळा शृंगारिक नखरा आणि नाजूकपणा काढून टाकला, नि त्यात झटपट पैशाचा माज, लखलखाटाची भूक आणि संपणारी तहान खच्चून भरली तर काय होईल? त्याचंच प्रतिबिंब त्या गाण्यात सही सही पडलेलं दिसतं.
लावणीसारखी एकमेवाद्वितीय, अभिजात कलाही हळूहळू पण निश्चितपणे या सवंगीकरणाची वाट चालू लागलेली आहे.
शाहीर रामजोशी एका लावणीतच म्हणून गेले आहेत,
...कवितारस मनांत झडकरि यावा
पुण्याचा ठेवा
दाता परि नीरस काय करावा,
जन मार्मिक व्हावा...
मराठी रसिकतेची परंपरा मोठी उज्ज्वल, रसाळ आहे खरी. पण आज लावणीचं होऊ घातलेलं हे पॉर्नीकरण टाळायचं असेल, तर जनांनाच मार्मिक व्हावं लागेल...
(छायाचित्र: कुणाल विजयकर)
***
मूळ प्रकाशित लेखन इथे वाचता येईल.

No comments:

Post a Comment