काहीबाही

काय करता! (उर्फ मातृभाषा आणि काही गट)

10:26:00

मातृभाषेबद्दल आस्था असलेल्या माझ्यासारख्या लोकांना एकाच वेळी अनेक निरनिराळ्या आघाड्यांवर झगडावं लागतं.

अ] अतिविशाल गट
एकीकडे नवश्रीमंत, मराठीबद्दल तुच्छता/न्यूनगंड बाळगणारे, अर्धवट आंग्लाळलेले, नवश्रीमंत लोक. या गटातले लोक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात. वटपौर्णिमेच्या जोडीनं करवा चौथही साजरा करतात नि ’छान दिसतं’ म्हणून ’मांगमें सिंदूर’ भरतात. शक्यतो लोकांकडून मागून किंवा पायरेटेड कॉपीजमधून पुलं, वपु, मृत्युंजय, स्वामी, सिडने शेल्डन, चेतन भगत वाचतात. प्रशांत दामलेची नि हल्ली ’हर्बेरियम’मधली मराठी नाटकं बघतात. चर्चाबिर्चांबद्दल यांना पोटातून भीती कम तिरस्कार असतो, पण हे तसं उघडपणे म्हणू धजत नाहीत. या गटाला आपण अतिविशाल गट म्हणू.

आ] डांबरीकरण गट
दुसरीकडे प्रश्नांचं घातक सुलभीकरण करणारे, न्यूनगंडातून येणारा उद्धटपणा बाळगणारे, दस्तावेजीकरण-संशोधन-अभ्यास यांची गरजच काय, असा प्रश्न विचारणारे लोक. यांच्यातल्या बहुसंख्यांच्या ’ण’ नि ’न’च्या वापराबद्दल नाक मुरडण्याची प्रथा ’अ.वि.’ गटात आहे. (पण ’न’ नि ’ण’चा तथाकथित थारेपालट ही काही या गटात असण्याची पूर्वअट नाही). यांची मुलं तूर्तास इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नसतात. पण पहिलीपासून इंग्रजी सुरू झाल्यानंतर हेच लोक सर्वाधिक सुखावलेले असतात. ’मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय ओढतो’ अशी तक्रार हे जगातल्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल करू शकतात. दीर्घकालीन, वास्तवादी आणि किचकट उत्तरं यांना सहन होत नाहीत. त्यावर ते हमखास बिथरतात. या गटाला आपण डांबरीकरण गट म्हणू.

इ] चर्चील गट
तिसरीकडे निष्क्रिय, उदासीन, स्थितिवादी, इंटुक लोक. यांना संस्कृत, इंग्रजी किंवा युरोपियन भाषा यांपैकी एका तरी भाषेबद्दल मातृभाषेपेक्षाही जास्त प्रेम असतं. हे सहसा फिल्मफेस्टिवल्समधून किंवा प्रायोगिक नाटकांना भेटतात. काहीही लोकप्रिय झालं की ते वाईट, निकस असणारच, असा यांचा ठाम विश्वास असतो. यांचीही मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांत असतात. पण ’त्याबरोबर आम्ही त्यांना उत्तमोत्तम मराठी साहित्याची ओळख करून देतो’ असं पालुपद जोडायला ते विसरत नाहीत. ’ष’चा अचूक उच्चार; चीज, वाईन, मोदक अशी अभूतपूर्व रेंज असलेल्या पदार्थांतली जाणकारी; गर्दीबद्दल कमाल तुच्छता नि तिरस्कार; ग्रेसबद्दल भक्तीच्या पातळीवरचं प्रेम; न कंटाळता कितीही चर्चा ही यांची खास लक्षणं. या गटाला आपण चर्चील गट म्हणू.

काही पोटगटही असतात. ’मरू दे ना च्यायला, आपल्याला काय करायचंय?’ हे घोषवाक्य असणारा ’आपल्याला काये’ गट; मराठीबद्दल प्रामाणिक, निरागस, घोर अज्ञान असणारा, फक्त क्रियापद तेवढं मराठी वापरून बोलणारा ’पत्र नव्हे मित्र’ गट; ’विलायती शब्दांचं आक्रमण होता कामा नये’ असा अभिनिवेश बाळगून ’मोबाइल नाही, भ्रमणध्वनी म्हणा’ असा हट्ट धरून बसणारा ’सावरकर बुद्रुक’ गट...

माझ्यासारख्या लोकांना वेळ बघून या सगळ्या आघाड्यांवर दोन हात करावे लागतात. कधी एका गटाला पाठीवर घेतलं, तर दुसर्‍याच्या तात्कालिक आश्रयाला जावं लागतं. कधी एकाला सहानुभूती दर्शवली, तर दुसर्‍याला ठेचावं लागतं. कधी सगळ्यांनाच थोडं चुचकारावं लागतं. कधी सगळ्यांना एकाच वेळी अंगावर - शिंगावर घ्यावं लागतं. कुणाशीच कायमस्वरूपी पातिव्रत्य ठेवून चालत नाही. कुणाशीच हाडवैर घेण्यात रस नसतो.

कारण शेवटी हे सगळे लोक तोंडानं काहीही बरळत असोत, शेवटी बोलतात माझ्याच भाषेत - मराठीत. काय करता!
***
(हा लेख पूर्वप्रकाशित आहे. पण ब्लॉगवर आणून टाकायचा राहून गेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गटनावं डॉ. विवेक बेळे यांच्या नाटकांमधल्या थोर आणि आचरट नावांवरून सुचलेली आहेत.)