भारांक

"रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?"

23:47:00

आज भारांचा  १०५ वा वाढदिवस. ’ऐसी अक्षरे’ या संस्थळावरच्या मित्रांसोबत ’भा. रा. भागवत विशेषांक’ नामक एक मोठा उपक्रम पार पाडला आणि भारांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून प्रकाशित केला. त्याच्या समारोपाची ही नोंद.

अंक जरूर वाचा. एकमेकांना पाठवा. प्रतिक्रिया नोंदवा. नेहमीप्रमाणे सूचनांचं स्वागतच आहे!

हॅप्पी बड्डे, भारा!

***


चित्र: जालावरून साभार
***

खरे तर ऋणनिर्देश करून झाला आहे. मग हे प्रकटन लिहिण्याचे प्रयोजन काय? प्रश्न रास्त आहे.
त्याचे असे आहे, ऋणनिर्देशाचे उपचार कितीही आवश्यक असले, तरी मनात भरून आलेली कृतज्ञतेची - स्नेहाची भावना त्या उपचारातून पुरती व्यक्त होतेच असे नाही. दिव्याला निरोप दिल्यानंतरही त्याची शांत आभा मनात रेंगाळत राहावी, तशी कृतज्ञतेची भावना मनात अजून आहे. ती व्यक्त करण्यासाठी हे प्रकटन.
निरनिराळ्या क्षेत्रांत कामे करणारी वा शाळा-कॉलेजांत शिकणारी, नुकतीच मिसरुडे फुटलेली वा बॉबकट केलेली, लहानमोठी सगळी माणसे काही निमित्ताने घरात जमावीत; वाद-संवाद, गप्पाटप्पा व्हाव्यात; क्वचित थोडी गरमागरमी व्हावी... आवाज चिरडीला यावेत; दबक्या संतापाचे स्फोट व्हावेत आणि पुन्हा कुणी समजुतीने जुळवून घ्यावे; पण भरलेल्या घराला कुटुंबाची एकतानता येऊ नये, असे अनेकदा होते. पण क्वचित कधी, एखाद्या नशीबवान निवांत दुपारी आजोबांची एखादी ठेवणीतली आठवण निघते आणि सारे वाद हळूहळू ओसरतात. घरभर विखुरलेली माणसे नकळत झोपाळ्याभोवती जमतात. बोलण्यात ओलसरपणा येत जातो. आजोबांच्या एखाद्या विशेष किश्शाची उजळणी होते. हसू फुटते. कुणीतरी थोडे हळवे होते, डोळ्यांतून पाणी काढते. त्या हळवेपणाची हलकीशी थट्टाही होते आणि "आजोबा असते, तर म्हणालेस्ते..." अशी सुरुवात करून पुन्हा हशाचा गदारोळ उठतो. काही मंतरलेल्या क्षणांसाठी तरी घर कसल्याशा चिवट धाग्याने घट्ट बांधले जाते...
असे गेला आठवडाभर झाले.
पण गेला आठवडाभरच का? खरे तर भा. रा. भागवत या लेखकाबद्दल असा काहीतरी प्रकल्प करावा, असा बूट निघाल्यापासून जवळपास गेले वर्षभर हे असे पुन्हा पुन्हा होते आहे. पुन्हा पुन्हा होत राहील, असे आश्वासन मिळते आहे. मराठी शब्दावर प्रेम करणाऱ्या अनेक पिढ्यांच्या अनेक वाचकांसाठी या आजोबाने असे एक घर कायमचे बांधून ठेवले आहे, याची जाणीव होते आहे.
या प्रकल्पाची कल्पना वर्षभरापूर्वी सुचली. सलिल बडोदेकर हा एक मित्र आणि मी यांच्यात गप्पा चालल्या होत्या. भागवतांची कितीतरी जुनी, आता कुठे न मिळणारी पुस्तके त्याच्याकडे आहेत. त्याबद्दलचे बोलणे चालले होते. त्यांतली त्यांची अस्सल मराठी भाषा, फ्रेंचांपासून इंग्रजांपर्यंत आणि विज्ञानापासून फॅन्टसीपर्यंत अनेक विषयांना स्पर्श करणारा त्यांचा विषयांचा आवाका, बालसाहित्याचा ध्यास घेतल्याप्रमाणे अखेरपर्यंत केलेले लेखन, प्रसंगी पदराला खार लावून राबवलेले बालसन्मुख उपक्रम, या सगळ्या कारकिर्दीत टिकून राहिलेला प्रसन्न-ताजा-टवटवीत विनोद आणि सर्वज्ञतेच्या अभिनिवेशाचा संपूर्ण अभाव… या साऱ्या गोष्टी आम्ही पुन्हा पुन्हा एकमेकांना बोलून दाखवत होतो. त्यांची सगळी पुस्तके जमवण्याचे बेत रचत होतो. पण बोलता बोलता असे लक्षात आले, की पुस्तके जमवण्यासाठी संदर्भ म्हणून पाहता येईल अशी साधी समग्र साहित्याची सूचीही भागवतांच्या बाबतीत उपलब्ध नाही. त्यांच्या निवडक लेखनाचे संकलन असलेले 'भाराभर गवत' हे पुस्तकही आता कुठे मिळत नाही. इतरही अनेक पुस्तके काळाच्या ओघात लुप्त झाली आहेत.
ही माहिती शोधण्याचे निमित्त झाले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणारा एखादा जाहीर उपक्रम कुठेतरी केला गेला असेलच, अशी खातरी होती. त्या उपक्रमाशी संबंधित लोकांना भेटले वा तत्संबंधी साहित्य मिळवले म्हणजे झाले; मग आपल्याला हवी ती माहिती मिळेलच. पुढे पुस्तके जमवणे सोपे आहे, इतके साधे गणित मनाशी होते. पण आश्चर्य म्हणजे वर्तमानपत्रातील पुरवण्यांमधून प्रकाशित झालेले काही मोजके, प्रासंगिक लेख सोडले; तर मराठीतल्या भावी साहित्यव्यवहारासाठी वाचकांच्या काही पिढ्या घडवणाऱ्या या महत्त्वाच्या लेखकासाठी असा कोणताही उपक्रम झालेला नाही, हे लक्षात आले, तेव्हा काही काळ आम्ही हळहळलो. नेहमीप्रमाणे आपल्या कृतघ्नतेबद्दल कुरकुर केली, 'आपल्याच्याने काही व्हायचे नाही' अशी नकारात्मक खंत व्यक्त केली, आणि ते बोलणे तिथेच संपले.
पण विषय मनातून गेला नाही. आता आंतरजालीय मैत्र्यांच्या या दिवसांत समान रसविषय असणारी मैत्रे मिळणे तितकेसे अवघड उरलेले नाही. पुस्तके, वाचन आणि साहित्य या आवडीच्या विषयावर बोलणारी अनेक मंडळी जालावरून एकमेकांशी घट्ट जोडलेली असतात, एकमेकांना तत्परतेने संदर्भ आणि साहित्यही पुरवत असतात. अशा मित्रांच्या गोतावळ्यातही हा विषय पुन्हा पुन्हा डोके वर काढत राहिला. लोक आपली कृतज्ञता व्यक्त करत राहिले, भागवतांच्या अनेक पात्रांच्या आठवणी प्रेमाने नोंदत राहिले. तेव्हा 'असा उपक्रम आपणच का करू नये?' अशा महत्त्वाकांक्षी विचाराने मनात मूळ धरले.
तो भीत भीत बोलून दाखवला मात्र - खूप जणांकडून खूप प्रोत्साहन देणारे अनेक प्रतिसाद मिळाले. मदत करण्याची इच्छा दर्शवली गेली. अमुक, आदूबाळ, ऋषिकेश, स्नेहल नागोरी, अस्वल, गवि, केतकी आकडे, अमृतवल्ली, विनीत बेरी, सलिल बडोदेकर - असे अनेक मित्र या प्रकल्पात सामील झाले; ते याच टप्प्यावर. मूळ कल्पना २०१४ च्या दिवाळी अंकाच्या एका कोपऱ्यात असा प्रकल्प करण्याची होती. पण भारांच्या कामाचा एकूण आवाका लक्षात घेता 'ऐसी अक्षरे'च्या संपादकांनी आम्हांला एका आख्ख्या अंकाचे संपादकपदच देऊ केले. मग इमेलींच्या माळका लागल्या. फेसबुकावरच्या ओळखी निघाल्या. व्हॉट्सॅपवर चमू घडले. कुणी एकमेकांना पुस्तके पोचती केली, कुणी जिवावर उदार होऊन एकमेकांना पुस्तके उधार दिली. कुणी नव्याने बाजार धुंडाळून जुन्या पुस्तकांच्या प्रती हुडकल्या, कुणी दुर्मीळ पुस्तकांच्या प्रती काढून वाटल्या. कुणी संदर्भ शोधून दिले. कुणी संपर्क शोधून दिले. कुणी भाषांतरे केली. कुणी चित्रे काढली. कुणी कामे वेळेवर व्हावीत म्हणून स्वतःकडे वाईटपणा घेऊन लोकांमागे कामाचे लकडे लावले. कुणी फुरसुंगी-पुण्यात भ्रमंती केली. कुणी आपल्या चुलत-चुलत मित्रांना या प्रकल्पात हक्काने ओढले. कुणी जाऊन मुलाखती घेतल्या. कुणी फोटो काढले. कुणी शब्दांकने केली. कुणी मोठाल्या फायली टंकनासाठी बिनबोभाट आपापसांत वाटून घेतल्या. कुणी आपली महत्त्वाची कामे बाजूला सारली आणि ऐन वेळेला लेख लिहून दिले. कुणी केलेले काम काही तांत्रिक कारणांमुळे फुकट गेले, पण त्याबद्दल जराही कडवटपणा न आणता लोक मन:पूत मदत करतच राहिले.
तेजस मोडक आणि प्रसन्न धांदरफळे या दोघांनी इतका अनौपचारिक आणि संकोच विरघळवून टाकणारा उत्साही प्रतिसाद दिला, की आपण करू घातले आहे, ते अगदी योग्य आणि आवश्यकच आहे, अशी खातरी पटली. आदूबाळाच्या ओळखीने सौ. नीला धडफळे यांच्याकडून संदर्भसूची मिळाली. त्यांची तब्बेत फारशी बरी नसतानाही आम्हांला मदत करण्याचा त्यांचा उत्साह आमच्या निश्चयाला बळ देणाराच होता. पुढच्या टप्प्यात इतरही अनेक मंडळी 'भारा'वलेल्या आमच्या चमूत येत राहिली.
फॅनफिक्शन हा खरे म्हणजे माझ्या विशेष आवडीचा प्रांत. पण फास्टर फेणेवर फॅनफिक लिहिण्याची कल्पना आदूबाळ याची. ती त्याला सुचावी आणि मला सुचू नये, यामुळे काही काळ मी स्वत:चा राग-राग केला. पण कुठवर? थेट भागवतांच्या शैलीत लिहिलेली त्याची झकास फॅनफिक वाचेस्तोवरच! पुढे त्या कथेबद्दल वाटणाऱ्या कौतुकात माझी स्वार्थी खंत कुठल्या कुठे वाहून गेली!
या अंकाची प्रसिद्धी परिणामकारकपणे करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रश्नमंजूषा आणि लेखनस्पर्धा घेण्याची अफलातून कल्पना ऋषिकेशची होती. त्याचे सगळे बाळंतपण त्यानेच केले. त्यात आदूबाळाच्या मित्राची - विनीत बेरी याचीही - मदत झाली. या स्पर्धेत विजयी झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्याची संधी इथे घेतो आहोत.
'ऐसी अक्षरे'चे सगळेच संपादक मंंडळ या काळात सर्वतोपरी मदत पुरवत होते. टंकनापासून ते तांत्रिक मदतीपर्यंत आणि आर्थिक मदतीपासून संपर्क मिळवून देण्यापर्यंत सगळ्या प्रकारची कामे त्यांनी केली. नंदन होडावडेकर याने नेहमीच्या तत्परतेने मुद्रितशोधनाचे मोठेच काम केले. पण हे लोक घरचेच. त्यांचे आभार कसे बरे मानणार?
वाईरकरांच्या चित्रांनी फास्टर फेणेला जिवंत करणाऱ्या भागवतांबद्दलचा प्रकल्प आणि त्यात चित्रे नसावीत? छे! असे शक्य होते काय? अंक नुसत्या मजकुराला वाहिलेला असता कामा नये, हे तेव्हाच ठरले. आशीष पाडलेकर या एका व्यावसायिक चित्रकार मित्राला अ्मुकने साकडे घातले आणि अंकाचे देखणे मुखपृष्ठ मिळवून मोठीच बाजी मारली. एकूण अंकालाच जे देखणे, नीटस रुपडे आले आहे, त्याचे श्रेयही अमुकलाच आहे. त्याचे सुलेखन आणि रेखाटने 'ऐसी अक्षरे'च्या वाचकांना घरचीच आहेत, त्यामुळे 'घर की मुर्गी दाल बराबर' या न्यायाने त्यांचे पुरेसे कौतुक होत नाही, हे तर आहेच. पण वरवर लहानश्या भासणाऱ्या, तरी एकूण रूपावर मोठाच परिणाम करणाऱ्या अनेक बाबी न थकता तपासत राहणे, दुरुस्त करत राहणे, त्यासाठी शांतपणे लोकांकडून कामे करवून घेणे; आणि प्रकल्पाच्या एकंदर वाटचालीबद्दल दिग्दर्शन करत राहणे हे त्याच्याखेरीज इतर कुणाला साधले नसते.
जयंत नारळीकर, दिलीप प्रभावळकर, सुमीत राघवन, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे, हेमंत कर्णिक, गणेश मतकरी, रघुवीर कूल… ही प्रथितयश आणि प्रसिद्ध मंडळीही भागवतांवरच्या प्रेमाखातर वेळात वेळ काढून या प्रकल्पात सामील झाली, तेव्हा भागवतांच्या पुण्याईचा चकित करून टाकणारा प्रत्यय आम्हांला आला. भागवतांच्या कुटुंबीयांचा संपर्क मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम 'उत्कर्ष' प्रकाशनाच्या सुधाकर जोशी यांनी केले. भागवतांच्या घरी जाताना मनात थोडी धाकधूक होती. कितीही मनमोकळ्या आणि ऋजू स्वभावाचे म्हटले, तरी भा. रा. भागवत एक प्रसिद्ध लेखक. आणि आम्ही कोण? आम्ही फक्त चाहते. आपला मोलाचा वेळ आणि निगुतीने जपलेले आपले संदर्भसाहित्य आम्हांला त्यांच्या कुटुंबीयांनी का बरे देऊ करावे? पण रवीन्द्र भागवत, चंदर भागवत, विद्युत भागवत आणि रेवती भागवत या चौघांनीही आमचे जे प्रेमळ स्वागत केले; त्यात आमचा बिचकलेपणा, संकोच हे कधी कसे वाऱ्यावर उडून गेले ते कळलेही नाही. त्यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आणि देऊ केलेली हृद्य छायाचित्रे या अंकाचा अतिशय मोलाचा ठेवा होऊन बसली आहेत. त्याबद्दल आभार मानण्याचा प्रयत्न केला असता विद्युतताईंनी काढलेले उद्गार हे असे - "अगं, दादांनाही तुमचा उपक्रम फार आवडला असता. त्यांचं साहित्य इतकं प्रेमानं वाचलं जातं, की ते आता एका प्रकारे तुमचं-आमचं-सगळ्यांचंच आहे. त्याबद्दल कुणी कुणाचे आभार मानायचे?"
खरेच, कुणी कुणाचे आभार मानायचे?
हे काही सर्वंकष काम नव्हे. प्रकल्पात इतर अनेक गोष्टी सामील होऊ शकल्या असत्या. त्या झाल्या नाहीत याची खंत आहेच. अनेक मान्यवरांनी या प्रकल्पाची गरज मान्य केली आणि काही कारणांनी आपल्याकडून मदत होणे शक्य नसल्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली. त्यांची, आणि प्रकल्पाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या अनेकांची, नावेही इथे घेणे शक्य नाही, हेही ठाऊक आहे. पण यापेक्षाही मोठी आहे, ती कृतज्ञतेची भावना.
हे काम भारांच्या पुण्याईखातर झाले. त्यांच्या नावाखातर हे निरनिराळ्या पिढ्यांचे, आवडीनिवडींचे, कर्तृत्वाचे आणि स्वभावांचे लोक काही काळ एकत्र आले. भारांच्या स्मरणरंजनात रंगले…
त्या साऱ्यांसह भागवत आजोबांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त हा अंक सहर्ष सादर.
मेघना भुस्कुटे आणि 'भारा'वलेले इतर 'भागवत'जन