Friday 12 December 2014

थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग!

पद्मजा गेली.

'बायकांचं ललित लिखाण एकतर आक्रमक कंठाळी उत्कट असतं, नाहीतर गुलजार खवासदृश भावनाप्रधान' असा बोचरा शेरा मारणार्‍या एका मित्राला मी पद्मजा फाटक भेट दिली होती. तेव्हा बर्‍यापैकी वाचन असणारा आणि तरीही पद्मजाच्या लेखनाशी अपरिचित असणारा हा माणूस तिच्या अभिनिवेशरहित मिश्कील मुक्तपणानं हरखून गेला होता. माझं काहीही कर्तृत्व नसताना पद्मजाच्या जिवावर मीच कॉलर ताठ केल्याचं आठवतं!

पण त्याबद्दल तिलाही आक्षेप नसताच. तिला हे फुकटचं भाव खाणं कळलं असतं, तर त्यातली तेवढी दाद बरोब्बर पोचवून घेऊन ती मिश्कीलपणे हसली असती फक्त.

तशी ती फार प्रसिद्ध नव्हती. दूरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात असेलही. पण तो काळ माझ्या फारच लहानपणी घडून गेलेला. पुढे मी वाचायलाबिचायला लागून मराठीतले लोकप्रिय, वादग्रस्त आणि थोरबीर लेखक ओलांडून तिच्यापर्यंत पोचले, तोवर तिची लोकप्रियता ओसरली होती. माझ्या पिढीत तरी कुणाला तिचं नाव फारसं ठाऊक नसे. तिचं 'आवजो' नावाचं पुस्तक मला मिळालं ते योगायोगानं. आमच्या शाळेत बक्षिसादाखल पुस्तकं देण्याची प्रथा होती. कुणी एक उत्साही शिक्षक जाऊन घाऊक उपदेशपर, नैतिक, सुसंस्कारी आणि बजेटात बसणारी पुस्तकं खरेदी करून आणत. त्यात मला 'आवजो' कसं मिळालं, हे एक नवलच आहे. पण मिळालं खरं. तोवर पुलं आणि वपु आणि श्रीमान योगी यांत अडकलेल्या मला एकदम नवंच कायतरी सापडलं त्यात. अमेरिकेचं प्रवासवर्णन हे अगदी अन्यायकारक वर्णन होईल त्या पुस्तकाचं. अमेरिकन कुटुंबांत राहून पद्मजानं घेतलेले अनुभव, त्यातून प्रातिनिधिक मराठी मध्यमवर्गीय
कुटुंबांना त्यांच्याशी ताडून पाहणं, त्यांच्या धारणा-समज-गैरसमज-पद्धती न्याहाळून पाहणं, टोकदार मिश्कील शेरे नोंदणं आणि काठाकाठानं स्वत:लाही पारदर्शकपणे तपासत राहणं होतं त्यात. तिची स्वतःची नास्तिकवजा प्रार्थनासमाजिष्ट पार्श्वभूमी, तिचं टीव्हीवरचं करियर, तिचं वाचन आणि धारदार बुद्धिमत्ता, तिच्यातली आधुनिक लेकुरवाळी शहरी विवाहिता आणि तिचा रोखठोक प्रामाणिकपणा... हे सगळं त्यातून दिसत राहिलं. मग ते नुसत्या अमेरिकन प्रवासवर्णनांहून बरंच काय काय झालं. आंतरजालीय मराठीच्या स्फोटानं अमेरिका अगदी जवळ येण्यापूर्वीच मला अमेरिकेतल्या बर्‍याच समकालीन गोष्टींबद्दल एक अपूर्वाईरहित दृष्टी मिळाली होती, त्याचं मूळ या पुस्तकात आहे बहुतेक.

त्यानं हरखून मी तिची बाकी पुस्तकं शोधायला घेतली, तर 'गर्भश्रीमंतीचं झाड' हे एक लोकांना ठाऊक असलेलं नाव मिळालं. पण इतकी गाजलेली पुस्तकं 'औटऑफप्रिंट आहे' असं सांगण्यात आपल्याकडच्या लोकांना काय गंमत वाटते कुणास ठाऊक, पुस्तक दुर्मीळ. मग स्नेह्यांच्या कपाटांना क्लेम लावणं आलं. अनेक सव्यापसव्य करून ते पुस्तक मिळालं नि त्यातली गुलमोहर, गोनीदा आणि इरावती अशा कैच्याकै गोष्टींनी खुळावलेली अगदी ताजी पद्मजा भेटली. मग 'सोनेलूमियेर'ची एक पिवळी पडलेली प्रत. त्यातली ड्रायव्हिंग शिकणारी, आंबे हापसणारी आणि अगदी नॉनसमीक्षकी रसिकतेनं रोदँचं प्रदर्शन बघणारी पद्मजा भेटली. तोवर आपण या बाईच्या प्रेमात पडलो आहोत, हे मी कबूल करून चुकले होते. 'राही' आणि 'दिवेलागण' हे तिचे अगदी आडवाटेचे कथासंग्रह. पण तेही मी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं मिळवले. एरवी चरित्रांना नाकं मुरडणारी मी. पण तिच्या प्रेमापोटी मी ताराबाई मोडकांचं तिनं लिहिलेलं चरित्रही वाचलं. मग 'माणूस माझी जात' मिळालं. त्यातली मुंबईकरांची अजब आणि दिसे न दिसेशी नाजूक संवेदनशीलता नोंदणारी पद्मजा मला तोवर सवयीची झाली होती. आधुनिक शहरी आयुष्यात ती मनापासून रमलेली असे. परंपरांशी तिला फार कधी भांडावं लागलं नाही आणि ती तशी भांडलीही नाही. त्यामुळे असेल, किंवा तिचा मूळचा गंमत्या स्वभावच असेल, पण तिच्यात कडवटपणा कसा तो नावाला नसे. माणसांच्या वागण्यातली विसंगती नोंदतानाही ती त्यांच्यातला ओलसर माणूसपणा अचूक टिपून घेई. ती पहाटे लिहायला बसे, तेव्हा तिला डिस्टर्ब न करता अलगद दार ओढून घेणारी तिच्या कॉलनीतली वॉचमनपत्नी काय; किंवा विरार लोकलच्या ऐन गर्दीत धावत्या गाडीत चढणार्‍या बाईला सुखरूप वर खेचून मग काळजीपोटी तिच्या मुस्काटीत देणारी लोकलकरीण काय! एरवी सहज निसटून गेली असती, अशी ही शहरी संवेदनेची रानफुलं बघायची तिला खास नजरच होती.

'हसरी किडणी' हे याहून तसं वेगळं पुस्तक. किडण्या निकामी होणं ही एकच गोष्ट पुरेशी धसकवणारी. त्यात आणि परदेशात शिकायला असताना (मध्यमवयात परदेशात वार्धक्यशास्त्र नावाचा नवाच विषय शिकायला गेलेली असताना!) आपल्या किडण्या कामातून गेल्याचं कळणं. त्यात वैद्यकीय विम्याचं संरक्षण नाही. ट्रान्सप्लाण्टचा खर्च आवाक्याबाहेर. मुलं शिकत असलेली. किडण्यांच्या बरोबरीनं अजून नाना रोगांचे अनपेक्षित हल्ले. यांत कुणाचीही सोकॉल्ड मिश्किली कोळपून गेली असती, तर ते सहज समजण्यासारखं होतं. पण ही बाई उपद्व्यापीच! मित्रपरिवारातून आर्थिक बळ मिळवणं, ते करताना मिंधेपण न येऊ देणं, आजारातून उठल्यावर या पुस्तकाच्या रूपानं आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिद्दीनं लिहिणं - तिचं तिलाच जमू जाणे. त्या पुस्तकात किडणीच्या आजारपणाबद्दलचे सगळे तपशील येतातच. शिवाय आपण एक समाज म्हणून या दुखण्याशी कसे वागतो, आपली वैद्यकीय व्यवस्था कोणत्या प्रतीची आहे, आपल्याकडच्या अनेक थोर पारंपरिक पॅथ्या यासंदर्भात कुठल्या पातळीवर आहेत ही थक्क करून टाकणारी सामाजिक निरीक्षणं तिनं त्यात नोंदली आहेत. खेरीज या निमित्तानं तिला नव्यानं गवसलेली आणि कुटुंबातली गृहीत धरलेली मैत्रं आहेत. आपत्कालात माणसं कशी कसाला लागतात आणि तावूनसुलाखून कशी लखलखून बाहेर पडतात, याचं निरीक्षण करणारा एक पोटप्रकल्प आहे. या पुस्तकानं पोटात घेतलेलं तिचं आत्मचरित्र, सामाजिक-वैद्यकीय निरीक्षणं आणि निव्वळ माहिती - यांच्याशी स्पर्धा करणारं दुसरं पुस्तक मराठीत नाहीच.

त्याची तुलना तिनं माधव नेरूरकरांसोबत लिहिलेल्या 'बाराला दहा कमी' या ग्रंथाशीच करावी लागेल. अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास हे या पुस्तकाचं ढोबळ वर्णन. अर्थातच ते अपुरं आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, वैज्ञानिकांबद्दलचे समजगैरसमज, युद्ध आणि अस्त्रं यांबाबत वैज्ञानि़कांच्यात असलेलं-नसलेलं सजगपण, त्यांचे आंतरदेशीय संबंध-मैत्र-जळफळाट-हेवेदावे आणि सहकार्य, महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर या वर्तुळात घडलेल्या घडामोडी आणि प्रत्यक्ष अण्वस्त्रनिर्मितीची गोष्ट. मग त्या भयानक संहारानंतर सर्वसामान्य माणसांवर, राज्यकर्त्यांवर, वैज्ञानिकांवर झालेले परिणाम... हेही पुस्तक गेल्या वर्षीपर्यंत 'औटॉफप्रिंट' होतं. चारेक महिन्यापूर्वी ते 'राजहंस'नं पुन्हा बाजारात आणलं.

बायका आणि दागिन्यांशी असलेले त्यांचे (आणि तिचे स्वतःचे) संबंध, दगडांची झाडं बनवण्याची खास अमेरिकी कला, तिच्या आजारपणात तिला आलेले काही अतींद्रिय अनुभव आणि खास पद्मजा-पद्धतीत शोधलेली त्यांची स्पष्टीकरणं, लहान मुलांचं साहित्य, आइनस्टाइनचं घर... यांवरचं तिचं लिहिणं आजारपणानंतर आणि वाढतं वय जमेस धरूनही विलक्षण ताजं-तरुण होतं. 'स्मायली', 'टेडी बेअर', ओरिगामीत भेटणारा जपानी करकोचा अशा गोष्टींवर लिहून त्यांच्याशी आधुनिक माणसांचे असलेले लडिवाळ संबंध उलगडून दाखवावेत, तर ते तिनंच.

आता वाटतं, आपल्याला तिला हे सगळं सांगता आलं असतं. ते आता राहून गेल्याची खंत करावी का? तर नयेच. कारण आइनस्टाइनच्या डॉक्टरांना भेटायची संधी असतानाही भेटावं की भेटू नये, अशा आट्यापाट्या स्वतःशीच खेळत, संकोचापोटी ती भेट हुकवल्याचं तिनंच एका ठिकाणी नोंदलं आहे. आणि आपल्याला आइनस्टाइन 'आधीच आणि निराळा भेटला' होता की, अशी सारवासारव करत आपल्या संकोचाचं लब्बाड स्पष्टीकरणही दिलं आहे.

तिला माझी गोची बरोबर ठाऊक असणार!

थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग. :)

8 comments:

  1. I had read 1-2 books long back but thanks for reintroducing her. Its not that I will jump to get her books but it will stay there in my mind for some more time.

    ReplyDelete
  2. जरूर बघ चाळून. तिला फार श्रेय मिळालं नाही...

    ReplyDelete
  3. मी त्यांचं ’हसरी किडनी’ वाचलं आहे. आता इतर मिळवून वाचायला हवीत असं वाटून गेलं.

    ReplyDelete
  4. मोहना, पद्मजाची काही पुस्तकं बाजारात मिळतात. काही नाही मिळत. :( लायब्र्या हुडकाव्या लागतील तु(म्हां)ला.

    ReplyDelete
  5. Keep it up Meghana. You are confirming my theory that I have read very little Marathi or for that matter any literature! :)

    ReplyDelete
    Replies
    1. काही कारणानंं मला कमेंट नोटिफिकेशनच येत नव्हतं. आत्ता पाहिली ही कमेंट. काय वाचतोयस सध्या?

      Delete
  6. फारच मस्त लिहिलंहेस मेघना... तुझी सांगण्याची लय इतकी वाहती सुंदर आहे की बासच!
    तू उल्लेखलेली सगळी पुस्तकं नाहीयेत...‘बाराला दहा कमी’, ‘हसरी किडणी’ आणि हो ‘बापलेकी’ इतकी आहेत.
    बाकी वाचावी वाटतात, पण तुझ्यासारखी खटपट करून मिळवणं खरोखर शक्य नाही. तुझा जो आनंद तू पोहोचवतेस त्यातून चव चाखण्यात समाधान मानावं लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. मला कमेंट नोटिफिकेशन न आल्यामुळे ही कमेंट आत्ता दिसली. भेटू तेव्हा देईन तुला आणखीन पद्मजा. डन!

      Delete