Friday 5 December 2014

गेलं वर्ष-दीड वर्षं मी काही वाचलेलं नाही

गेलं वर्ष-दीड वर्षं मी काही वाचलेलं नाही.

तांत्रिक दृष्ट्या हे वाक्य चूकच म्हणायला हवं. कारण पोटापाण्यासाठी करण्याचं माझं काम, आयुष्याचा प्रचंड मोठा भाग व्यापून बसलेली मजकूरप्रधान माध्यमं आणि निवळ सवयीनं चाळली वा ढकलली जाणारी पुस्तकं मोजली तरी बरंच वाचन भरेल. 

पण एकूणच पुस्तकांतलं गुंतलेपण बदललं आहे. पूर्वी पुस्तकाचा कणा पाहून ते कुठलं पुस्तक आहे हे अचूक ओळखता येई. पुस्तकं कितीही अस्ताव्यस्त वाढत गेली, तरीही आपल्याला हवं ते पुस्तक काही मिनिटांत अचूक सापडे. कोणती पुस्तकं कुणाकडे गेली आहेत, ते लक्षात राहण्याकरता नोंदी करण्याची गरज भासत नसे. नवं काय वाचण्याजोगं आहे, काय वाचलंच पाहिजे, काय प्रकाशित होऊ घातलं आहे, काय कुठे मिळण्याची शक्यता आहे - याचे हिशेब डोक्यात पृष्ठभागापाशीच असत. आवृत्ती संपलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती बाजारात आली आणि आपल्याला पत्ताच नाही, असे लाजिरवाणे प्रसंग येत नसत. हल्ली... 

असो. हे पुस्तकांच्या सगुण भक्तीविषयी झालं. निर्गुण भक्ती? 

तिथेही बदल घडले आहेतच. प्रेमभंग ताजा असताना प्रियकराचं नाव उघडपणे घेणं जसं ओल्या जखमेवरची खपली काढण्यासारखं भीषण वाटतं, त्या जातीचं पुस्तकांविषयी वाटत असे. आपल्याला प्रचंड आवडणार्‍या पुस्तकाला कुणी नाव ठेवलं, तर त्या माणसावर मनातल्या मनात फुली मारणं. कर्मधर्मसंयोगानं फुलीगोळा शक्य नसला, तर मग एक दीर्घ नि:श्वास सोडून वादाची तयारी. पुस्तकांतल्या व्यक्तींविषयी रक्तामांसाच्या माणसांसारखी आपुलकी. संदर्भासह आणि संदर्भाशिवाय त्यांतली उद्धृतं आठवून येणं. आपण बोलून न दाखवलेली उद्धृतं दुसर्‍या कुणी बोलून दाखवली, तर बोलणार्‍याविषयी अलोट माया उफाळून येणं. 

आता? माझ्या एका आवडत्या लेखकानं दुसर्‍या आवडत्या लेखिकेविषयी बोलताना छद्मी प्रतिक्रिया दिली, तरीही मी समजूतदार, शांत आणि स्वीकारशीलच. अर्थात - साक्षात सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या वेळीही गावाबाहेर असणं, लोकांचा हिस्टेरिया कुतूहलानं टीव्हीवर पाहणं आणि तरी सचिनविषयी कडवट नसणं जिथे मला साधलं आहे, तिथे...

तर हेही असो!

याचं प्रतिबिंब माझ्या लिहिण्यामध्ये पडलं असणारच. (अभिव्यक्ती हा शब्द खोडून, मी लिहिणे हा शब्द वापरला आहे. झालं का!) लिहिण्याच्या जागा बदलल्या आहेत, हे एक. ब्लॉगचं काहीसं आडवाटेचं माफक खाजगीपण आणि फोरम्सवरचा चावडीसदृश गलबला यांच्यातल्या फरकाइतकाच फरक माझ्या लिहिण्यातही पडला आहे, आणि हे फक्त जागांमधल्या बदलांमुळे घडलेलं नाही. किंबहुना परिणाम आणि परिणती या गोष्टींची वर्तुळं माझ्या डोक्यात तितकीशी स्पष्ट आणि नेमकी नाहीत. विषय बदलले आहेत, शैली बदलली आहे. नेव्हल गेझिंग हा तुच्छतादर्शक उद्गार मी पुरेशा गंभीरपणे घ्यायला शिकले आहे. पण म्हणून अभ्यासपूर्ण-माहितीपूर्ण-अललित लेखन म्हणजेच ’खरं’ लेखन हे मी मान्य केलेलं नाही. ’स्पॉण्टॅनियस ओव्हरफ्लो’ असला की पुरे, ही समजूत सोडून मी थोडी पुढे आले आहे, मात्र. त्यामुळे ’तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला गं’ लिहिणारे करंदीकर मला जितके जवळचे वाटतात, तितकेच गणपतीची सोंड नि श्लीलाश्लीलतेचा कर्दम यांवर विरूपिका लिहिणारे आणि भावनादुखाऊ लोकांना त्या विरूपिकेचं जबाबदार स्पष्टीकरण देणारे करंदीकरही जवळचे वाटतात. भावनांचं ओथंबलेपण आणि तर्ककठोर कोरडेपण, शैलीदारपणा आणि अनलंकृत शैलीविहीनता, प्रयोग आणि परंपरा, ताजेपणा आणि टिकाऊपणा, प्रेम-प्रेमभंग-दारू-जंगल आणि समाज-लोकशाही-पुरोगामित्व या टोकांपेक्षाही त्यांच्या अधल्यामधल्या प्रदेशांत असणार्‍या गोष्टी आता जास्त प्रेमानं न्याहाळल्या जातात.’आपल्याच बापाचं आहे इंटरनेट - आलं मनात, खरड आणि छाप’ या स्वातंत्र्यासह येणारे तोटे आता हळूहळू कळू लागले आहेत. 

नि आता - हे सगळं पुस्तकांपासून सुरू झालं की वाचायच्या पुस्तकांमध्ये केवळ प्रतिबिंबित झालं याबद्दलही मला प्रश्न पडायला लागले आहेत! 

ही गोंधळाची सुरुवात की सुरुवातीचा शेवट? असो. असो.

4 comments:

  1. मला खरं तर या पोस्ट बद्दल बरंच लिहायचं आहे. पण....
    यालाच शांत होणं म्हणतात बहुदा...निवळणं. मी हल्ली पुस्तकांच्या दुकानात जातो, चाळतो आणि काहीही न घेता हात हलवत परत येतो. याला जनरेशन गॅप म्हणावं की ही पुस्तकांच्या क्वालीटीची कमाल कळत नाही.
    असो. बोलायला हवं. बऱ्याच महीन्यात निंदावंदनाचा कार्यक्रम झालेला नाही

    ReplyDelete
  2. I like your blog. Exactly what work you do related to reading ?

    ReplyDelete
  3. @संवेद
    लिही ना. इतकंही ’निवळू’ नये ’लिहित्या लेखका’नं! खो देऊ का एखादा?

    @विजय नरवडे
    आभार. मी तांत्रिक भाषांतर करते पोटासाठी.

    ReplyDelete