टोक काढल्या जाणार्या पेन्सिलीसारखे स्वतःला तासत
आपण येऊन पोचतो एका टोकावर.
कंटाळा,
चाकोरीबद्ध कामांचे ढीग,
एकाच वेळी निर्बुद्ध नि क्रूर असू शकणार्या लोकांचे जथ्थे...
सगळी फोलपटं सोलत
एकमात्र बिंदूवर रोखले गेलेले आपण.
शरीर, मन, आत्माबित्मा बकवास मुकाट बोथटत गेलेली,
नि तरी या तिन्हीसकट निराळे आपण टोक काढून तय्यार.
फार काही नको,
दोन बिंदू नि त्यांना जोडणारी एक रेघ काढता यावी,
पेन्सिल संपून जाण्याअगोदर.