Sunday 22 December 2013

बोंबील आणि बॅरल


पुनरुत्पादनाच्या प्रेरणेनं पुरुष आणि स्त्रिया सर्वसाधारणतः एकमेकांकडे आकर्षित होतात हे खरं. पण पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. त्या क्रियेतून मिळणारा आनंद ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्त्रीच्या योनीत पुरुषाचं लिंग या संभोगप्रकाराखेरीज इतर सर्व मैथुनप्रकार, गर्भनिरोधक साधनं, कायदेशीर गर्भपात, प्राणिसृष्टीतही आढळणारे समलिंगी संबंध या सार्‍यांच्या अस्तित्वातून हेच सिद्ध होतं की पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. असं असताना अमुक एका प्रकारचे संबंध / आकर्षण नैसर्गिक आणि बाकी अनैसर्गिक, असं कसं ठरवणार? असं ठरवण्याला कुठलाही ठोस आधार देता येत नाही. एकदा माणूस नैसर्गिक म्हटला की तो जे जे करेल, ते सगळं नैसर्गिकच. अर्थात कोणत्याही नैसर्गिक गोष्टींवर बंधनं नसावीतच असं म्हणणंही धोक्याचं आहे (हिंसेची प्रेरणा नैसर्गिकच आहे). पण एखादी कृती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हा त्या गोष्टीची योग्यायोग्यता ठरवण्याचा आधारच नव्हे. ती कृती करण्यामुळे इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा संकोच होत नाही ना, त्यांच्यावर अन्याय होत नाही ना याची खातरजमा करणं महत्त्वाचं आहे.
समलिंगी संबंधांना दोन व्यक्तींची परस्परसंमती असेल, तर त्यामुळे इतरांवर काय अन्याय संभवतो? कोणताच नाही.
मग त्याला विरोध करण्याला आधार काय?
माणसाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणत, समलिंगी संबंध बेकायदेशीर ठरवणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी निषेध करते.

***

मराठीत फॅनफिक्शन तर नाहीच, दर्जेदार इरॉटिकाही नाही. ’शेरलॉक’ ही ’बीबीसी’ची मालिका आणि मुख्यत्वेकरून तिच्यावर लिहिली जाणारी फॅनफिक्शन यांनी मला फॅनफिक्शन, इरॉटिका या प्रकारांची रसभरित ओळख तर करून दिलीच - पण लैंगिकतेचं विविधांगी भान आणून देण्याला त्यांनी बराच हातभार लावला. त्यातल्या एका शृंगारिकेचं भाषांतर करून हे ऋण थोडंसं फेडायचा मानस बरेच दिवस होता. पण काही केल्या झेपत नव्हतं. मातृभाषेत इरॉटिका, नि चांगली इरॉटिका लिहिणं किती अवघड ते लक्षात येऊन अनेकवार हतबल तेवढं व्हायला होत होतं. ते भाषांतर पुरं व्हायला निमित्त झालं, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं.
त्याबद्दल भूमिका घेताना काहीतरी सकारात्मक कृतीची जोड त्याला असली पाहिजे असा माझा आग्रह होता. त्यासाठी हे भाषांतर पुरं केलं. दमछाक झाली, पण मजाही आली.
हे थोर भाषांतर नाही, मान्य आहे. पण कुठूनतरी सुरुवात करावी लागतेच.

इथे हे भाषांतर उपलब्ध आहे.

शीर्षकाचा संदर्भ: विलास सारंग यांची ’मुक्त शब्द’च्या २०११ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा.

7 comments:

  1. उशीराबद्दल क्षमा मागणं मी आता बाणेदारपणे बंद केलय. उशीर हा माझा आता स्थाई भाव झाला आहे.
    टप्याटप्यानं प्रतिक्रिया मांडतो.
    मला समलिंगी संबंधांची कल्पना अमान्य आहे. बरोबर-चूक, नैसर्गिक-अनैसर्गिक या वादात न पडता मी माझ्यापुरती ही भुमिका स्पष्ट करतो. या संबंधांमागचा जैवीक, मानसिक, भौगोलिक, ऎतिहासिक इ. इतिहास मला ठाऊक नाही. त्यामुळे न्यायालयाचा ताजा निर्णय वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणतो की नाही याचा मी विचार करु शकत नाही. त्यांनी विचार करुन हा निर्णय दिला असेल तर मला आनंद किंवा खेद नाही. त्यांनी याच्या उलटा निर्णय दिला असता तर या संबंधांच्या पाठीराख्यांच्या स्वातंत्र्याचा मी आदर केला असता आणि माझी आताची भुमिका मी सध्याइतकीच वैयक्तीक ठेवली असती.
    य पार्श्वभुमीवर मी पुढची प्रतिक्रिया देत आहे. ईरॉटीका साहित्यप्रकार म्हणून हाताळायला प्रचंड कठीण आहे. कोणत्याही क्षणी तो फसु शकतो. मराठीत तो जवळ जवळ नाहीच. इंग्रजीत तो कितपत रुजला आहे, कल्पना नाही. खुप आधी एक ई-बुक वाचलं होतं, वयात येणाऱ्या एका मुलीला दुसऱ्या कुटुंबात राहायला जाते तेव्हा काय अनुभव येतात असं काहीसं होतं (लक्षात राहील असं प्लॉट मधे काहीच नव्हतं). ईरॉटीकाची गंमत अशी आहे नां किती वेगवेगळ्या प्रकारे आणि काय लिहीणार. जनरल ललित प्रकारात तुम्ही ईरॉटीसीझमबद्दल ईंम्पलिसीट लिहीता, तिथं वेगवेगळे संदर्भ, उपमा, शब्दांचे फुलोरे यांचा खेळ अनंत प्रकारे खेळता येतो. ईरॉटीकात तसं होत नाही. त्यात जी ऍक्शन आहे ती मुद्दलात खुप मर्यादित आहे.
    आता तू लिहीलस त्याकडे वळु. खुप धीटपणे लिहीलं आहेस. कदाचित बहुतेकांना सोसणार नाही इतक्या धीटपणे. खरं सांगायचं तर मराठीत तू वापरलेले बरेच शब्द दचकवुन टाकतात. इंग्रजीत त्यांना एक परकेपणा असतो पण मराठीत मात्र कुणीतरी घरी येऊन राहायल्या सारखं वाटतं. त्या अर्थाने मी ही थोडा दचकलोय. माझ्या दचकण्याला कथानकाच्या बॅकग्राऊंडचा अभाव हे ही एक कारण आहे. ईरॉटीकेला जर ठोस कथावस्तु नसेल तर ती x-rated सिनेमात एका मागं एक येणाऱ्या सेक्स-सीन सारखी वाटायला लागते आणि मग ती साहित्याचा एक प्रकार न राहाता स्वस्तातल्या पिवळ्या पुस्तकांच्या ओळीत येऊन उभी राहाते. तुझ्या भाषांतरीत तुकड्याला आधाराला काहीच नाही, ना कथानकाची पार्श्वभुमी, ना पात्रांची ओळख, ना गोष्टीचा फ्लो, त्यामुळे एक धीट (किंवा महाधीट) प्रयत्न या पलीकडे हे भाषांतर गेलं नाही असं मला वाटतं. या मतामधे मी माझे समलिंगी संबंधांबद्दलचे मत मिसळले नसावे असं वाटतय.

    ReplyDelete
  2. आधी या भाषांतराबद्दल: ही फक्त इरॉटिका नाही. इरॉटिक फॅनफिक्शन आहे. फॅनफिक्शनमध्ये वाचकाला पात्रांबद्दल, बरेचदा घटनाक्रमाबद्दलही पुरेशी माहिती असणं अध्याहृत असतं. (शेरलॉकवरच्या फॅनफिक्शनबद्दल इथे: http://wearenotcouple.blogspot.in/2013/11/blog-post.html) तुला शेरलॉक माहीत नसेल, तर तुझ्याकरता ही फॅनफिक फक्त पोर्नोग्राफिक गोष्ट उरते. साहजिकच आहे.
    धीटपणा. हम्म. केवळ सेक्स या एका गोष्टीबद्दल लिहिण्याला धीट म्हणणं आपण कधी बंद करणार आहोत?
    मातृभाषेत अवघड जागच्या गोष्टींबद्दल लिहिणं अजूनच अवघड, अधिक अंगावर येणारं, हे खरं आहे. इंग्रजीत वाचणं तुलनेनं सोपं जातं.
    समलिंगी संबंधांबद्दल: जसं तू नोंदलं आहेस, त्याच चालीवर न्यायालयाला समलिंगी संबंध मान्य आहेत की अमान्य यानं मला फरक पडतो, तुला मान्य आहेत की अमान्य यानं काहीच फरक पडत नाही. त्यामुळे तुला काही पटवून देण्याचा प्रयत्न मी करणार नाही. तुझ्या मताचं प्रतिबिंब तुझ्या भाषांतराबद्दलच्या मतात पडलं आहे, असं म्हणण्याचं काही कारण मला दिसत नाही.
    इरॉटिकाबद्दल: अवघड प्रकार आहे, प्रश्नच नाही. पण मी इतक्या वेगवेगळ्या प्रकारे हाताळलेली गे इरॉटिका वाचली आहे, की त्यात ’लिहून लिहून काय लिहिणार’ असा प्रश्न मला पडूच शकत नाही. सेक्स या प्रकरण किती प्रकारच्या मानवी भावभावनांचं माध्यम आहे, त्याबद्दल माणसांच्या मनात किती अज्ञान, किती संकोच, किती दडपणूक आहे, परिणामी त्यानं कायकाय गोंधळ, गंमती, गफलती होतात... ते मी या गोष्टींमधून अनुभवलं आहे. तुला तुझ्या डोक्यातल्या ब्लॉकवर मात करता आली, तर काही जॉनलॉक-शिपिंग करणार्‍या एक्स्प्लिसिट रेटेड फॅनफिक्स वाचून पहा, तुलाही पटेल.

    ReplyDelete
  3. मेघना, इरॉटिका या शब्दाचं मराठी भाषांतर नाही केलंस तू. काय असावं ते? संभोग कथा की प्रणय कथा? इरॉटिका आणि सेक्स स्टोरी यांत काय फ़रक असतो?की इरॉटिका म्हणाजेच सेक्स स्टोरी? याबद्दल मला तुझी मतं जाणून घ्यायला आवडतील.

    उदा, I smacked his face over my cunt. म्हणजे मी त्याचा चेहरा योनी/च्यूत (व्हॉटेव्हर)वर आवळून धरला असं वाक्य असेल तर ती संभोग कथाच असेल की तिला इरॉटिका असे म्हणता येईल? प्रणय कथा संभोग कथेत केव्हा बदलते. नेमका कशाचा समावेश झाल्यावर ती इरॉटिकावरून सेक्स स्टोरीत बदलते?

    माझ्या मते इरॉटिका सेक्शुआलिटीबद्दल असते.सेक्स किंवा संभोग हा सेक्शुआलिटीचा एक भाग आहे. सेक्शुआलिटीची परिणिती सेक्स किंवा संभोगात होते किंवा होत नाही. माझ्या मते फ़ोरप्ले ही गोष्ट प्रचंड इरॉटिक आहे आणि नंतर जे काही घडतं ते खूप ऑब्व्हियस.

    बाकी आपल्याला जे नैसर्गिक वाटत नाही, ते शतकानुशतके आपल्यावर बिंबवलं गेलं ते सोडून ते अनैसर्गिक मानायची खोड आपल्याकडे फ़ार जुनीच. मुलीला मुलगाच आवडला पाहिजे आणि व्हाईस अ व्हर्सा असं आप्ल्याला शिकवलं गेलंय म्हणून आपण आवडून घेत असतो का असा प्रश्न ब-याच जणांना पडत असेल.पण सगळेच त्याची उत्तरं शोधतात असे नव्हे. बाकी एससीच्या निर्णयाबद्दल न बोललेलं बरं. जीवन जगण्याचा अधिकारामध्ये ते कसं जगावं याचाही अधिकार येतोच. यांतच सर्व काही येतं असं मला वाटतं. फ़ार काही बोलायचं नाहीये यावर.

    ReplyDelete
  4. मी 'इरॉटिका'चं भाषांतर शृंगारकथा किंवा शृंगारिका असं केलं असतं. 'संभोग' हा जरा शास्त्रीय शब्द आहे आणि 'प्रणय' अंमळ अधिकच लाडीक, स्वप्नील, 'रोमान्स'शी नातं सांगणारा. 
    पोर्नोग्राफिक गोष्ट आणि इरॉटिका यांच्यातली सीमारेषा कायमच वादग्रस्त आणि सापेक्ष असणार. मी कसं करीन वर्गीकरण? अवघड प्रश्न आहे. ('http://www.three-patch.com/' या पॉडकास्टवर फॅनफिक्शनमधल्या सेक्शुअल कंटेण्टबद्दल फार सखोल, गंभीर चर्चा ऐकल्या आहेत मी. त्यांचा प्रभाव माझ्या मतावर असण्याची शक्यता आहे.) गोष्टीच्या ओघात, विशेषतः गोष्ट जेव्हा दोन माणसांमधल्या नात्याबद्दल असते तेव्हा, सेक्स ही गोष्ट विशेष महत्त्वाची ठरते. कितीतरी लपवून, दाबून ठेवलेले संकोच; सुप्त इच्छा; आकर्षण; तिरस्कार; मोह; अवघडलेपण... या सगळ्यांची वलयं त्या एका कृतीभोवती किंवा त्या कृतीच्या पोटेन्शिअलभोवती फिरत असतात. त्या रस्त्यावरून कितीतरी अवघड वळणं सहजी पार होतात, किंवा उलटपक्षी काही गोष्टी उगाचच अवघड होऊन बसतातही. अशी महत्त्वाची गोष्ट लेखकाला आकर्षक, आव्हानात्मक नाही वाटली तरच नवल. हे आव्हान स्वीकारून, सेक्स / सेक्शुअ‍ॅलिटी / फोरप्ले / ऑरगॅझम या माध्यमांतून मानवी नात्यांची गोष्ट सांगते, ती इरॉटिका - अशी व्याख्या मी करीन. मग त्यांत यांतला एकच घटक असेल, वा अनेक असतील. तो मुद्दा नाही. यातले प्रसंग, घटनाक्रम, निवेदन मुख्यत्वेकरून या गोष्टींभोवती फिरताना दिसतात, हे महत्त्वाचं. 
    पुरेसं आहे का हे?

    ReplyDelete
  5. समलिंगी संबंधाबाबत दचकणेवचकणे मला कळू शकत नाही.ऋतुपर्ण घोष यांचा Memories in March हा सिनेमा या संदर्भात आवर्जुन पहावा असा आहे.एवढच.......!

    ReplyDelete
  6. मला होमोफोबिया नाही.
    म्हणजे होता, पण आता नाही.
    पण तरीही मला या पोस्टबद्दल आणि कथेबद्दल दोन प्रॉब्लेम आहेत.
    पहिला म्हणजे मी शेरलॉक होम्सचा चाहता वगैरे नाही. ही मालिका मी एक दोन वर्षांपुर्वी पहायचा प्रयत्न केला पण तो शेरलॉकचा अ‍ॅरोगन्स मला फारसा झेपला नाही.
    तर पहिली गोष्ट म्हणजे समहाऊ मला आता ही वर्णनं वाचल्याने ही मालिका अजिबातच पहावणार नाही.
    हा वर्णनांचा दोष नाही.
    पण नाही.
    दुसरी गोष्ट म्हणजे ही गोष्ट मला श्रुंगारिका वाटली नाही.
    म्हणजे त्याचं असं कि गोष्टीत केवळ सेक्स आहे म्हणुन ती श्रुंगारिका होत नाही - सेक्स पार्ट संपल्यावर गोष्ट अगदीच घाईघाईत उरकल्यासारखी वातते.
    शिवाय श्रुंगारिका सहसा उतेजक असतात तशी ही वाटले नाही.
    पण याचं कारण माझी लैंगिकतेबद्दलची मतं असंही असु शकतं.
    आता मला माझ्या "मला होमोफोबिया नाही" या वक्तव्याबद्दल संशय यायला लागलाय!

    बाय द वे - मराठीत श्रुंगारिक साहित्य उपलब्ध आहे!

    ReplyDelete
  7. मचाक आणि इतर शृंगारिक साहित्याबद्दल मला ठाऊक आहे! पण ते मला उत्तेजक वाटत नाही, बीभत्स वाटतं. तेही एकवेळ व्यक्तिसापेक्ष आहे असं आपण म्हणू. त्याला प्रतिष्ठा नाही, त्याबद्दलचा दोषही हवं तर लोकांच्या झापडबंद दृष्टिकोनावर आणि तथाकथित संस्कृतिरक्षणावर ढकलू. पण ते निदान गंभीरपणानं (म्हणजे चश्मिष्ट पोक्तपणाचा आव आणून असं नव्हे, पण एक ठाम जबाबदार भूमिका घेऊन) लिहिलेलं आहे का? तर सॉरीच.
    गोष्टीत सेक्स आहे म्हणून ती शृंगारिका होत नाही, एकदम मान्य. पण मग ती शृंगारिका होते कधी तुझ्या मते, ते सांग. नसेल तुला उत्तेजक वाटली ही गोष्ट. ठीक. पण ती शृंगारिकाच नाही? इथे या शब्दाची नीट व्याख्या करायला पाहिजे. माझ्या मते संभोगाचा भाग वगळल्यावर ज्या गोष्टीतलं गोष्टपण निघून जाईल, ती शृंगारिका.
    होमोफोबियाबद्दल: तुझ्या संशयात मी सहभागी आहे. नाहीतर हा कल्पनाविस्तार वाचल्यामुळे तू ’शेरलॉक’ पाहवणार नाही, असं म्हणतो आहेस, याचा दुसरा अर्थ काय काढणार?!

    ReplyDelete