टीव्ही: नॉस्टाल्जिया, नौटंकी आणि निरीक्षणं

00:35:00


मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. दूरदर्शनचं ते ’टॅऽऽणॅणॅणॅ-टॅणॅणॅऽऽणॅणॅऽऽ’, माना वेळावून मानेचे व्यायाम दाखवणारा दाढीवाला सरदारजी, मूकबधिरांसाठीच्या बातम्या, ’एक चिडिया... अनेक चिडिया’वालं ऍनिमेशन, ’मिले सूर मेरा तुम्हारा’... असं करत करत नाना रस्ते घेता येतील नि शेवटी आपण ’काय साला दर्जा असायचा त्या काळात टीव्हीचा! नाहीतर हल्ली...’पर्यंत एकमुखानं येऊन पोहोचू.

पण ते कढ पुढे कधीतरी काढू. तूर्तास तरी हे पोस्ट माझ्या ब्लॉगवरचं नि त्यामुळे माझ्याबद्दलचं आहे.

तर - मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे. इतका की, एकदा वर्षाअखेर दाखवला जाणारा निवडक गाण्यांचा ’सुपरहिट मुकाबला’ काही कारणानं हुकला, तर मी हमसून हमसून रडले होते. माझ्या टीव्ही बघण्यावर आईबापाचा प्रचंड अन्यायकारक आक्षेप असे नि त्या काळात आमच्यातले मेजर खटके (उर्फ एकाधिकारशाहीविरुद्धची बंडं उर्फ तमाशे) टीव्ही या एकमात्र कारणावरून उडत. तेव्हा आमच्याकडे खटके पाडून च्यानेलं बदलणारा (सगळी मिळून दोन. नॅशनल नि मेट्रो. अजून एक च्यानेल कधीतरी सरकारकृपेनं दिसत असे. त्यावर रात्री अकरा वाजता चार्ली चॅप्लिन, गुरुदत्त या मंडळींचे काही सिनेमे पाहिल्याचे आठवतात. त्यातही ’कशी मी जागून, क्लॅरिटी नसलेल्या च्यानेलावर दर्जेदार सिनेमाचा अभ्यास कम रसग्रहण करू पाहतेय, पण आईबापाला किंमत नाही’ हा एकूण नूर. (असो. या पोस्टाचा बराचसा भाग अनुक्रमे नॉस्टेल्जिया वारण्यात नि त्याला शरण जाण्यात खर्ची पडणार आहे.) तर, असो.), शटर सरकावून पडदा बंद करणारा ब्लॅकऍण्डव्हाइट टीव्ही होता. ’केबल असली की अभ्यास होत नाही’ या तेव्हाच्या पालकप्रिय समजुतीप्रमाणे केबल फक्त मे महिन्याच्या सुटीत जोडण्याचा प्रघात होता. (हल्ली मुलांचे अभ्यास कसे होतात कुणास ठाऊक. बहुदा ही समजूत मोबाईलमार्गे इंटरनेटकडे सरकली असणार. तत्कालीन माध्यमांतलं सगळ्यांत प्रगत नि सगळ्यांत रोचक असं जे काही प्रकरण असतं, त्याच्यामुळे अभ्यास होत नाही असं हे समीकरण दिसतं.) परिणामी मला मेट्रोशिवाय तरणोपाय नसे. पण म्हणून काही अडलं असं नाही. मैदानी खेळांचं नि माझं सख्य तसंही कधीच नव्हतं. घनिष्ट मैत्रीही शाळेतच. त्यामुळे दिवसातला शाळेचा आणि झोपेचा वेळ वगळता बहुतांश वेळ मी टीव्हीला वाहिलेली असे. चष्म्याचा नंबर वाढणं आणि सामाजिक कौशल्यं जेमतेम पासापुरती असणं या दोन गोष्टी सोडल्या तर टीव्हीनं माझ्यासाठी पुस्तकांच्या खालोखाल महत्त्वाची भूमिका बजावली. सिनेमा या माझ्या प्रचंड आवडत्या विषयाशी ओळख करून दिली ती टीव्हीनंच. अधलामधला संतापजनक जाहिरातींचा व्यत्यय सहन करून मी इतके सिनेमे कसे काय पाहिले हे आजच्या मला अगम्य वाटतं. पण तेव्हा त्या जाहिरातींचं, ’फक्त सुटीत केबल मिळेल’ या दंडेलीचं, अशक्य वाईट दर्जाच्या थेटरप्रिंट्सचं इतकं काही वाटत नसे हे खरंच. सुटीच्या काळात तर मी दिवसाला पाचपाच सिनेमेही पाहिल्याचं आठवतं. (आईबाप बोलून थकले. चष्म्याच्या अधिकाधिक स्मार्ट फ्रेम्स येत गेल्या. अभ्यास आणि व्यायाम या गोष्टींची एकूण आयुष्यातली नगण्य पण अपरिहार्य जागा मी स्वीकारली. पण त्या काळात टीव्हीचं प्रमाण मात्र अटळ राहिलं.) परिणामी मी हिंदी सिनेमा (नट, दिग्दर्शक, त्यांची खाजगी आयुष्यं, एकुणात अभिरुचीबद्दलचं झेपेल तितपत आकलन, समांतर आणि मुख्यधारेतला सिनेमा इत्यादी सवतेसुभे, विशिष्ट वर्षांत गाजलेले, पडलेले, चाललेले, चांगलेवाईट सिनेमे, त्यांतली गाणी नि ड्वायलॉक) या विषयात पुरेशी अधिकारवाणी आणि बरंच बरंवाईट पाहून झाल्यावर येणारी जाणकार उदासीनता कमावली. (हीच उदासीनता प्रमाणाबाहेर वाढली की ती आपल्याला ’बनचुके’ हे लेबल बहाल करते हे ज्ञानही यथावकाश झालं, पण त्याकरता एका प्रेमभंगाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून जावं लागलं. असो. असो.) कुठल्याही एका विषयात आवडीनं नि झपाटून अशी - आपल्यापुरती का होईना - अधिकारवाणी कमावताना किती विषयांमधे रानोमाळ हिंडून होतं, किती गोष्टी काठाकाठानं आपोआप समजत जातात ते आता लक्षात येतं.

त्यामुळे आता टीव्ही आणि मी (आणि टीव्ही आणि पालक, पालक आणि मी) यांच्यातलं नातं पार उलटंपालटं झालेलं असलं, तरी टीव्हीबद्दलच्या नॉस्टाल्जियाला मी थोडी तरी विकली जातेच.

***

टीव्हीमुळे घरकोंबडे असलेले माझे समवयस्क संध्याकाळी बाहेर पडू लागायला बहरता राममारुती रोड हे एक कारण होतं, तसं डेली सोप्स हेही एक महत्त्वाचं कारण होतं. निदान माझ्यासाठी तरी होतंच होतं. (एकदा संध्याकाळी बाहेर पडायला लागल्यावर त्यातले अनेक रंगीबेरंगी फायदे मला यथावकाश कळत गेले ते निराळं. पण निमित्त मात्र टीव्ही असह्य होण्याचंच होतं.)

त्याच काळात मराठी वाहिन्या एकाएकी विऊन बसल्या. काही लायकीचे कार्यक्रम झाले, नाही असं नाही; (आता आठवून लैच धमाल येते, पण तेव्हा लोक ’नक्षत्रांचे देणे’चं तिकीट मिळवायला धडपडत नि ते मिळाल्यास प्रेक्षकांत झळकून आप्तमित्रांत त्याचा पुरावा देऊन यथाशक्ती मिरवत.) पण त्यांच्याही कॉप्या निघाल्या. पॉप्युलर पुस्तकांवर मालिका निघून संपल्या. नि मग टीव्हीत काही बरं करावं, त्याकरता कष्ट घ्यावेत, कौटुंबिक घमणसा सोडून इतर काही लिहावं... याचा टीव्हीतल्या लोकांना एकदम सामूहिक कंटाळाच आला. गणपती आला, की हर एक मालिकेत लोक नटूनसजून गणपती आणून बसवत. सगळीकडे नुसत्या सुबक-सुरेल-सजावटी आरत्याच. दिवाळी आली, की सगळ्या मालिकांत दिवाळीच. यच्चयावत मालिकांतल्या बायका नटूनसजून ठुमकत ठुमकत व्हरांड्यात येणार, पणती ठेवणार नि कुर्त्यातले पुरुष त्यांच्याशी माफक रोमॅण्टिक चेष्टामस्करी करणार. सण साजरे करायची कोण अहमहमिका. (तोवर सण साजरे करणं म्हणजे आपली संस्कृती जपणं असा आचरट फण्डा रूढ व्हायचा होता. तो व्हायला तिथूनच सुरुवात झाली असणार. लोक आधी या फण्ड्याला बळी पडले की टीव्हीनं आधी त्याची टूम काढली याचं उत्तर नेहमीप्रमाणे वादग्रस्तच, त्यामुळे ते मरो. पण स्वत:च्या लग्नात नऊवारी साड्या नि धोतरं नेसून संस्कृती जपणं (जशी काही होललॉट महाराष्ट्राची संस्कृती ब्राह्मणी लुगड्यात नि नथीत गहाण पडली होती), दसर्‍याच्या आदल्या रात्री सामूहिक दीपोत्सव नि चैत्रपाडव्याला शोभायात्रा साजर्‍या करणं, मराठी भावगीतं हा संस्कृतीचा अत्युच्च मानबिंदू असल्याच्या थाटात ’दिवाळी पहाट’ ष्टाईलचे कार्यक्रम करणं नि ऐकणं... हे सगळं त्याच काळात उपटलं.) अशा निरनिराळ्या लाटा येत राहिल्या. (’आजतक’ हा एक बातम्यांचा चांगला कार्यक्रम होता. तो हिंदी न्यूजच्यानेलांमधला ’पुण्यनगरी’ होण्यापर्यंतचा प्रवासही याच दिवसांतला. (पण न्यूज च्यानेलांच्या वाट्याला नको जाऊ या. ते एक स्वतंत्र प्रकरणच आहे.) हिंदी सिनेमे, सिनेमातली गाणी आणि टेस्ट क्रिकेटही हे सगळंही गप ब्याकफूटला गेलं. गाणी जाऊन सिनेमांचे प्रोमोज दिसायला लागले.) चराचर व्यापून फक्त मालिकाच काय त्या उरल्या.

सण झाल्यावर काही काळ लफडी करणार्‍या स्त्रीपुरुषांचा जोर होता. मग कपाळावर नागकुंकू काढणार्‍या मॉडर्न खलनायिका आणि त्यांच्याशी तुलनेला साटोपचंद्रिका तुपाळ आदर्श नायिका असा एक जमाना होता. मग बराच काळ खलनायिकांनी निरनिराळी कारस्थानं करायची, सज्जन नायकांनी त्या कारस्थानांतून साटोपचंद्रिकांना वाचवायचं आणि आपली सॅडिस्टिक कल्पनाशक्ती पणाला लावलावून खलनायिकांना शिक्षा करायच्या असा एक प्रकार होता. (चांगल्या पन्नाशीतल्या कर्त्यासवरत्या बायकांना अंगठे धरून उभे करणे, तोंडाला काळे फासून घरभर फिरवणे, उठाबशा काढायला लावणे वगैरे शिक्षा बघून मी आणि मैत्रिणीनं फेटिश या अद्भुत प्रकारावर चर्चा केलेली आठवते. असो.) सध्या लग्न या गोष्टीची चलती आहे. लग्नाळलेले, लग्नाला बिचकलेले, लग्न करून मग प्रेमात पडलेले, एकत्र कुटुंबामुळे लग्न नको / हवं असलेले... असे नाना प्रकार. लग्नाची पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट... फ्याक्टरी चालू.

माझ्या हातातला रिमोट पालकांच्या हातात जाणे आणि टीव्हीची आयुष्यातली जागा कमी होत जाणे हे महत्त्वाचं स्थित्यंतर याच काळात झालं.

***

टीव्हीची बाजू घेऊन माझ्याशी भांडायची वेळ कुणावर येणार नाही. कारण मी माझ्या ष्टाईलनं त्या माध्यमाचा पुरेपूर फायदा घेऊन बसले आहे. पण आता मला काही प्रश्नही पडले आहेत. टीव्ही अजून तगून आहे खरा. पण आघाडीचं माध्यम म्हणून त्याची जागा अजून शाबूत आहे का? की इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगनं ती जागा घेतली आहे? हल्ली लोक टीव्हीवर आवर्जून काय पाहतात? (कृपा करा आणि त्या ’आई, शू करायला जाऊ का?’ असं विचारणार्‍या चाळिशीतल्या मद्दड बायका असलेल्या सिर्यलचं नाव सांगू नका. राडा होईल. असो.) टीव्हीवर आवर्जून पाहण्यासारखं काही उरावं, असं काही बलस्थान त्या माध्यमापाशी अजुनी आहे का?

मला या प्रश्नांच्या उत्तरांत मनापासून रस आहे, कारण लोकांना मी घरकोंबडी-चष्मिष्ट-मद्दड वाटत असू शकत असेन अशा काळात मी टीव्हीपासून खूप काही मिळवलं आहे. खरोखर मला टीव्ही बघायला जाम म्हणजे जामच आवडत असे...

You Might Also Like

5 comments

 1. टीव्ही- नसून अडचण आणि असून खोळंबा असं आहे. कधी दुपारी रिजनल भारी सिनेमे लागायचे तर कधी रात्री इंग्रजी. तेव्हा स्वाभिमान बघून वाटलं होतं, च्यामारी असले श्रीमंत लोक पण असतात का? मॅंन्डी बेबी तेव्हा ज्याम आवडली होती. मराठीचा दर्जा बराच उच्च होता असं निदान तेव्हा तरी वाटायचं. हल्ली, बातम्या, अर्णव-कणव, बिग बॅन्ग आणि हो....धी ग्रेट साऊथ डब्ड सिनेमे...परवाच मेरी रेस असा गांधी तत्वज्ञानाचा प्रचार करणारा सिनेमा बघितला. न लाजता बोला जय टीव्हीबाबा की...

  ReplyDelete
 2. आता टीवीशिवाय माझी अडचण नाही व्हायची बहुतेक. पण जेव्हा वापरला तेव्हा लईच वापरला मी टीवी. आता इंटरनेट नसेल तर मरण ओढवेल. म्हणजे एकूण एकच. अजून काही वर्षांनी इंटरनेटबद्दलपण असं बोलू आपण. तेव्हा काय असेल आणखीन?
  असोच. टीवी भारी होता. जय टीवीबाबा की... :)

  ReplyDelete
 3. Meghana, farach mast. :) tuze likhan mala awadatech, pan ha lekh khupach awadala, may be mazya barobarahi tech zale ahe je tuzya :)

  Shilpa

  ReplyDelete
 4. शिल्पा,
  आभार. काय झालं आहे तुझ्यासोबत?! आईबापांनी रिमोट बळकावला का?!

  ReplyDelete
 5. :) kami marks che khapar mazya aai ne kayam TV var fodale,
  Me shala college madhe asatana atonat TV pahila ahe.
  As you said, khup cinema me TV var pahile ahet. sat , sunday, ratri 11 la asayache te :)
  One more thing, tu Diwali faral post madhe je Diwali ank vachanache varnan kele ahes na, me exactly tech karayache :) rather mazi awadati pose ahe tee konate hi pustak vachatanchi :)

  ReplyDelete