हे श्रेय न माझे...

00:59:00


कवितांनी भरून येण्याचे दिवस.
असतात.
’काय लिहावं’पासून ’लिहावं का’पर्यंत
’वाचणं, लिहिणं आणि करणं’ यांच्या भाजणीचे.
चर्चांच्या निष्क्रिय निवांत बुडबुड्यांचेही...
जातात.
  अजून कविता मात्र ’होते’.
  अंगासरशी बसणारा,
  वापरून विटका, मऊ झालेला
  जुना कुर्ता ’होतो’, तशीच.
जुन्या कविता
  जाऊन बसतात कपाटांतून.
  नव्या हाताशी पुस्तकांतून.
  काही डायरीच्या पानांवर, काही सवयीनं ओठांवर.
  काही अजुनी आठवतात, म्हणून थोडं शरमल्यासारखं होतं चारचौघांत.
तरी कविता
  नाकारत नाहीत आपल्याला.
  अर्थांच्या पाकळ्या उमलत राहतातच त्यांतून.
  कवेत घेत राहतात त्या आपलं बदलतं जग.
  चकित करत राहतात.
  चक्राकार वाटांचं भान पुरवत राहतात.
पुन्हा पुन्हा
  कवितांपाशी नेऊन सोडत राहतात,
   जिवंत असतो आपण तोवर.
  जिवंत राहण्याचं पक्कं ठरवून घेतो,
   तिथवर
कवितांनी भरून येण्याचे दिवस.
राहतात.

You Might Also Like

3 comments

  1. हं....कविता...आपल्याच सावल्यांशी कसे कसे खेळायचे निःशब्दांचे खेळ याचे आखिव गणित...झुरळांसारखी चिवट..मरता मरत नाही......

    ReplyDelete