Monday 4 November 2013

खेळघर

आज ’खेळघर’ (रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) वाचलं. आधीच कबूल करते, माझी प्रतिक्रिया थोडी गोंधळलेली आहे.


मी एका सवर्ण कुटुंबातली, मार्कबिर्कं मिळवणारी, वाचणारी-बिचणारी, मुंबईत राहणारी व्यक्ती. आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचं अमुक इतपत भान नसलं, तर व्यक्तिमत्त्वात फाउल धरतात; त्यामुळे वर्तमानपत्रं नि आता इंटरनेटच्या माध्यमातून अद्ययावत इत्यादी राहायला धडपडणारी. मला आमटे कुटुंबीय ठाऊक असतात. उत्तरोत्तर त्यांना मध्यमवर्गात मिळत गेलेली प्रतिष्ठा आणि त्यांचं बालाजीसदृश पापमुक्ती देणारं स्टेटसही. अवचटांचं मुक्तांगण आणि त्यांची दिवाळी अंकातली प्रथितयश होत गेलेली कचकड्याची साहित्यिकी ठाऊक असते. मला बंगांचं ’सर्च’ही ठाऊक असतं आणि बालमृत्यूंवरच्या संशोधनापेक्षा फेमस झालेलं ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’सुद्धा. मला समाजवादी पार्श्वभूमी असलेले मित्र असतात. त्यांच्या कुटुंबातला वेगळेपणा आणि माझी सर्वसामान्य नेमस्त हिंदूबिंदू पार्श्वभूमी जमेस धरूनही आमचे प्रश्न आणि आमचं गोंधळलेपण बरंचंसं सारखंच, एकाच टप्प्यावरचं.

अशात गोष्टीबिष्टीत म्हणून तरी एखाद्या माणसाला असली यशस्वी सामाजिक प्रयोगाची परीकथा लिहावीशी वाटते, याचं अप्रूप वाटलं. मजा वाटली. जवळीक वाटली. पण मला तिनं भारून नाही टाकलं.

या लिहिण्यातल्या रचनेत, तिच्या भाषेत किती तुटलेपणा असावा? ती भाषा कुठलीच नाहीय. ना शहराची, ना गावाची. ना बाईची, ना बुवाची. ना पुण्याची, ना मुंबईची. ना ती पात्रानुसार बदलते, ना नेपथ्यानुसार. ती फक्त लेखक नामक प्राण्याची भाषा आहे, इतकंच सारखं कळत राहतं. आयन रॅण्ड जर अमुक एका वयाच्या नंतर वाचली, तर तिच्या गोष्टीतली तीच एकसारखी दिसत राहते नि वैताग-वैताग होतो तसं काहीतरी ही गोष्ट वाचताना होत राहतं. लेखकाची स्वप्नंबिप्नं ठीक आहेत. पण म्हणून ही अशी प्लॅस्टीकची भाषा नि कटाउट्ससारखी माणसं कशी बरं माफ करावीत? केवळ तेवढ्याकरता पुस्तकावर फुली मारावी, असं हे पाप. दुसरं म्हणजे यातल्या कित्तीतरी पात्रांच्या वास्तवातल्या ओरिजिनल स्रोतांची कल्पना सहज करता येते. नि गोष्टीतली पात्रं इतकी कचकड्याची-द्विमित उरतात की डोक्यातला ’हे पात्र कुणावरून रंगवलं असेल बरं’चा चाळा शेवटापर्यंत संपतच नाही. तिसरं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे तिच्यातला आशावाद. हा आशावाद कमालीचा भोळाभाबडा आणि कृतक आहे. इतका की, "सामाजिक कामामधले हे अमुक चार प्रयोग आणा, त्यात अमुक अमुक दोष होते हे नोंदा, त्याला तेव्हाच्या सामाजिक घडामोडींची एक जनरल बॅकग्राउण्ड द्या, थोडी मार्क्सवाद-लोहिया-डावा विचार-आणीबाणी इत्यादी चवीपुरती चर्चा, आणि मग सरतेशेवटी जनरल शांतिनिकेतन टाईप फुलंबिलं-सर्जनाचा सोहळा-नातेसंबंध हेच प्रगतीचा पाया.. डन! एक मस्त पॉझिटिव्ह गोष्ट तयार आहे बघा..." अशी मुलाखतच जणू लेखक देतो आहे असं चित्रही माझ्या मनानं तत्परतेनं रंगवलं.

तरी मी पुस्तक वाचलं. त्यात रचनेचं नावीन्य आहे. मुलाखती, डायरी, प्रथमपुरुषी निवेदन, तृतीयपुरुषी निवेदन, भाषणं... असे नाना फॉर्म्स आहेत. पण हे काही मला धरून ठेवणारं कारण नाही. मी पुस्तक वाचलं, कारण मलाही गोड शेवट असणारे हिंदी सिनेमे आवडतात. अजून काय इतकं काही संपलेलं नाही, अजून काहीतरी करण्याजोगं मस्त सापडेल, आपली निष्क्रियता आपण संपवू शकू, आपल्याला मजाही येईल, असं मला अजूनही अधूनमधून वाटत असतं. चांगले भारीपैकी धक्के खाऊनही मी अजूनही आवडलेल्या माणसांच्या प्रेमात वेडगळासारखी पडतच असते.

असल्याच वेडगळ प्रयोगाची गोष्ट सांगणारं (की सांगू पाहणारं?) पुस्तक, म्हणून बहुतेक मी ’खेळघर’ वाचलं असणार. म्हटलं ना, मी गोंधळलेय!

2 comments:

  1. Where is start and end of a circle my friend?

    ReplyDelete
  2. :)

    कळतंय मला. मला ते पुस्तक मनापासून आवडवून घ्यायचं होतं. पण नाहीच जमलं. परिणामी...

    ReplyDelete