कविता

आत - बाहेर

09:11:00


ही तटबंदी अजिंक्य नाही
मला ठाऊक आहे.
अजाणता किती वेळा आत पाऊल टाकता टाकता राहिला आहात की...
पण म्हणून राजरोस महाद्वार उघडीन तुमच्यासाठी,
असं मात्र नाही.
नाहीच.

तटबंदी आकर्षक खरी.
बुलंद, काळीकभिन्न,
अंगाखांद्यावर अवकाळी पावसाचे अवशेष खेळवत,
दाटून येत
पिंपळपानांचे अंकुर नांदवणारी

तरी -
आत पडझड बरीच.
ती पाहून उठली तुमच्या कपाळावर एक आठी जरी,
वा डोळ्यांत उमटली नापसंतीची दिसे न दिसेशी लकेर -
मग आपल्याला एकमेकांबद्दल आदर उरायचा नाही.
नि एवढा धोका पत्करावा,
इतकी श्रीमंती माझ्या गाठीला नाही.

हां,
बाहेर
मांजरपावलांनी पुढे सरकणारी
किर्र-दमट जंगलं वा उष्ण-रुक्ष वाळवंटं नाहीत,
विस्मृत नगरांचे अवशेष आहेत काही,
बाहेरही.
नि समुद्र आहे...
बाहेर यावा की,
असं म्हणत असलात,
तर गोष्ट वेगळी.

मग तटबंदीला तसाही फारसा अर्थ उरत नाही.
नाही?

कविता

ऋणांचे हिशेब

10:11:00


फैज अहमद फैज हा कवी मित्रकृपेनं भेटला. पुरते शब्दार्थ न कळताही भाषेच्या लयीची भूल पडते नि मागून दमदार अर्थ आकर्षण अधिक सखोल करत नेतात, तसं झालं. कवी असण्यातली सगळी वेडं जगून घेणारा हा कवी. बंडखोर, स्वप्नाळू, धुंद प्रेम करणारा, प्रेम पचवून शहाणपणाचं खंतावलेलं पाऊल टाकणारा. तो गायलाही गेला खूप. वेड लागल्यासारखी मी वाचत, ऐकत, समजून घेत सुटले. १३ फेब्रुवारीला या कवीचा जन्मदिन. त्या निमित्तानं हे साहस. 

खरं तर काही ऋणनिर्देश करायला हवेत. पण काही ऋणांतून कधीच मुक्त न होण्यात... वगैरे वगैरे!

हे शब्दश: / अर्थश: भाषांतर नाही. कवितेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ चिमटीत धरायचा; की कवितेचं कवितापण, तिच्यातला मूड असा प्रश्न अनेकवार पडला. नि फैजच्या शब्दांना हात घालायचं पाप करतोच आहोत, तर न भिता-न कचरता-मनापासून करू, असं म्हणत मी दुसरा पर्याय स्वीकारला. गायत्री नातूनं मागे केलेली चार भाषांतरं आठवून मी खचणारा धीर सावरला. तिचे आभार मानायला हवेत. वाद होऊ शकतो अनेक गाळलेल्या नि घातलेल्या शब्दांवरून. क्रमावरून. प्रतीत होणार्‍या अर्थावरून. कुठे भाषांच्या मर्यादा आहेत, कुठे नादाच्या. मला मर्यादा मान्य आहेत. 'हे सापेक्ष आहे' ही इथे पळवाट म्हणून वापरत नाही, मला खरंच असंच म्हणायचं आहे, की हा कवितेनं 'मला' दिलेला अर्थ आहे नि तो प्रत्येकासाठी निराळा असेल.

असो. पुरे. एकदाच माफी मागते.

ही फैज यांची मूळ कविता:

तुम मेरे पास रहो

तुम मेरे पास रहो
मेरे क़ातिल मेरे दिलदार, मेरे पास रहो
जिस घड़ी रात चले,
आसमानों का लहू पी के सियाह रात चले
मर्हमे-मुश्क लिये नश्तरे-अल्मास लिये
बैन करती हुई, हंसती हुई, गाती निकले
दर्द की कासनी पाजेब बजाती निकले
जिस घड़ी सीनों मे डूबे हुए दिल
आस्तीनों मे निहां हाथों की राह तकने लगे
आस लिये
और बच्चों के बिलखने कि तरह क़ुलकुले-मै
बहरे-नासूदगी मचले तो मनाये न मने
जब कोई बात बनाए न बने
जब न कोई बात चले
जिस घड़ी रात चले
जिस घड़ी मातमी सुनसान, सियाह रात चले
पास रहो
मेरे क़ातिल, मेरे दिलदार, मेरे पास रहो

(इथे नायरा नूरच्या आवाजात नि इथे विद्या शाहच्या आवाजात ती ऐकताही येईल. मला विद्या शाहची आवृत्ती अधिक आवडली.)

थांब इथे.
माझ्यापाशी.

आभाळाच्या रक्तावर पोसलेली धुंद रात्र
काळोखाची लयबद्ध पावलं टाकत येते,
तेव्हा सार्‍या व्यथांवर क्षणमात्र फुंकर पडल्यासारखी होते.
पण तिच्या पायी कसलेले असतात दुःखांचे खळाळणारे चाळ 
आणि हातच्या नक्षत्रांना लक्कन कापून जाणारी हिर्‍याची धार असते.

तेव्हा,
थांब इथे माझ्यापाशी.

एरवी छातीच्या तटबंदीआड मुकाट राहणार्‍या काळजांचा सुटू पाहतो ठाव
लागते कुण्या आश्वासक हातांची ओढ,
स्पर्शांची स्वप्नं पडू लागतात...
तिन्हीसांजेला कळवळून रडणार्‍या पोरासारखा भेसूर सूर असतो ओतल्या जाणार्‍या मद्यालाही,
अवघ्या अर्थाला निरर्थकाचे वेढे पडतात.
काहीच मनासारखं होत नाही
काही केल्या.
दूरवर कुठेच कुणीच काही बोलत नाही.
स्मशानशांतता पेरत रात्रीची काळीशार दमदार पावलं पडू लागतात.

तेव्हा जिवलगा,
थांब इथे.
माझ्यापाशी.

श्रद्धा, याच कवितेचं भाषांतर करायचा खो घेणार का?

काहीबाही

गोल सेटिंग आणि अप्रेझल वगैरे...

16:29:00

डिस्क्लेमरः
अ) कोणत्याही अर्थाने ही साहित्यकृती नाही. डोक्यातला गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न आहे. लिहिताना गोष्टी अधिक स्पष्ट दिसतात, एका विशिष्ट क्रमानी-काही कप्पे करून मांडता येतात, त्यातून काहीएक उत्तर मिळण्याची आशा निर्माण होते, म्हणून. आपापल्या जबाबदारीवर वाचणे.
आ) 'आयुष्याचा अर्थ काय?' असा प्रश्न चारचौघांत विचारला तर लोक चमत्कारिक + हेटाळणीच्या नजरेनी पाहतात. प्रश्नाला उत्तर मिळणं तर दूरच, आपल्याला लोक गंभीरपणे घेण्याची शक्यताही कमी होते,  त्यामुळे ही शब्दरचना टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. पण प्रश्न साधारण त्याच प्रकारचे आहेत.

दोष
१. आळस / कंटाळा / थोड्या वेळानी करू: समोर करण्याजोगं, ठरवलेलं, मिळवलेलं काम असतानाही रिकाम्या वेळात भलतंच काहीतरी अनुत्पादक करून वेळ संपवला जातो.
२. तेच ते आणि तेच ते: आपल्याला जे बरं जमतं, ते नि त्याच्या कुरणातल्या गोष्टींकडेच लक्ष पुरवलं जातं. नवीन, वेगळ्या - उद्या कदाचित रोचक वाटूही शकतील अशा गोष्टी करून पाहण्याची तीव्र अनिच्छा.
३. व्यापक चित्राचा लोभ आणि धरसोडः आपल्याला अनेक गोष्टींत रस वाटतो, पण कुठलीच एक गोष्ट जीव जाईस्तोवर कष्ट करून तडीस नेता येत नाही. सुरुवात करताना कुठूनतरी करावीच लागणार नि ती भव्यदिव्यव्यापक नसणार हे कागदावर कळतं. पण अशी सुरुवात मात्र अपुरी, टुकार, अनाकर्षक, कंटाळवाणी वाटते.

गुणः
१. अनेक बाजू दिसतातः कुठल्याही गोष्टीच्या अनेक बाजू दिसतात. एकांगी, सोपी भूमिका सहजी घेतली जात नाही.
२. जगण्याचा लोभः निराशेचे कितीही कढ काढले, आता नको-पुरे-मरून जाऊ असे गळे काढले, तरी अजून जगायला अधूनमधून पण सातत्याने मज्जा येते. 'जगायला' हाही बदनाम शब्द. जगायला - पक्षी: भांडायला, हसायला, रडायला, खायला, प्यायला, झोपायला, जागायला, वाचायला, लिहायला, पाहायला, दाखवायला इत्यादी. त्यामुळे दर थोड्या दिवसांनी 'नवीन काहीतरी करून पाहू'चा किडा सुचत राहतो. (हे नवीन आपल्या राखीव कुरणाशी संबंधितच काहीतरी असतं म्हणा. (नवीन पीक माणसाळवण्याऐवजी त्याच पिकाची अजून एक प्रजाती घडवण्याशी याची तुलना व्हावी.) पण ठीक.)
३. मर्यादांची जाणीवः आपण थोर-बीर नाही हे एक नीट पक्कं ठाऊक असतं. त्यामुळे उगा स्वत:बद्दल अनाठायी गोग्गोड कल्पना नाहीत. हे जमतं, हे जमत नाही, अशी ठोक विधानं. (हां, त्यांचेही तोटे असतात. कुरणं वगैरे. प. ठी.)

(इतकं भारूड जमवल्यावर आता तरी मुख्य प्रश्नाला हात घालावा.) काय केलं म्हणजे मजा येईल, येत राहील - त्याचं उत्तर मिळत नाही, म्हणून हे भारूड.
जेवणखाण, निरनिराळ्या चवी, स्वैपाक, खरेद्या, गाणी-सिनेमे-पुस्तकं... यांनी तात्पुरती मजा येते. पण ही मजा दीर्घजीवी असत नाही. उलट एका मर्यादेनंतर आपण मुख्य प्रश्नांकडे डोळेझाक करून नाही त्या अश्लील गोष्टीत शहामृगी पद्धतीत डोकं खुपसून बसलो आहोत अशी जाणीव अजून अजून टोकदार होत जाते आणि गंमत संपत जाते. हेच नातेसंबंध या बहुचर्चित गोष्टीलाही लागू करता येईल अशा टप्प्यावर मी आत्ता आहे. उत्स्फूर्तता, उत्कटता, माणसांमधे बुडी मारण्याची वृत्ती... यांतून हाताला जे लागायचं ते लागलं आहे. आता हा रस्ता पुढे कुठेच जात नाही याचं नकोसं भान आल्यामुळे अस्वस्थता अधिक. माइंड यू, मी आयुष्यातल्या भोगवस्तू वा माणसं नाकारण्याबद्दल बोलत नाहीय. तर त्या भोगण्याच्या पद्धतीबद्दल बोलतेय.

हातून म्हणण्यासारखं काहीही होत नाही. कुणी म्हणण्यासारखं, लोक कोण काही म्हणणारे, लोक गेले फुल्याफुल्यांत... हे मीच मला विचारून-म्हणून झालं आहे. त्यावर टीपी नको. कुणी म्हणण्यासारखं? तर मीच म्हणण्यासारखं. मला माझ्या कामाबद्दल (काम किंवा काहीही. शब्द महत्त्वाचा नाही) भारी वाटेल, काळाच्या छोट्याश्या तुकड्यावर तरी ते उठून दिसत राहील अशी आशा वाटेल - असं काहीतरी - काहीही.

असं काहीतरी करावंसं वाटणं हेही आउटडेटेड-आउटॉफ्फ्याशन आहे, मला कल्पना आहे. पण आता आपल्याला आवडतो सचिन तेंडुलकर तर आवडतो. असेल आउटॉफ्फ्याशन. आपण काय करू शकतो?

कृतिकार्यक्रमः
१. निदान ३ तरी नवीन गोष्टी चालू करून वर्ष संपेपर्यंत सातत्यानी रेटायच्या. त्यातली एखादी तरली तरी चांगभलं.
२. निदान ३ तरी कुरणाबाहेरच्या गोष्टी करून पाहायच्या. वर्षाखेरपर्यंत नाही रेटणार कदाचित. पण करून बघायच्याच.
(तिसरं काही सुचत नाहीये, पण ३ आकडा मस्त वाटतो. बरंच काही करून पाहतोय असं वाटतं. आठवा च्यायला. हां, हे बरंय, स्टॅण्डर्ड.)
३. वजन कमी करणे.

इत्यलम.